maharashtra times akole taluka
Wednesday, June 18, 2025
Monday, May 19, 2025
मंजुषा जन्मदिवस
आज आमच्या लग्नाला ३३ वर्ष झाली आयुष्यातील यशस्वी सहजीवनाचा ३३ वर्षाचा प्रवास पूर्ण करत असताना थोडंसं लिहाव वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक व खाजगी आयुष्य व्यतीत करत असताना महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थीदशेत असल्यापासून वाडवडीलांच्या पुण्याईने थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी फार कमी वयातच मला व माझ्या सौभाग्यवतीला लाभली दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ महत्वकांक्षा, दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची असलेली उर्मी व अपार कष्टाची किनार या सर्वांच्याच जोरावर एका शिक्षकांच्या घरात जन्माला येऊन अकोले तालुक्यातील राजुर,गोंदीशी, कातळापूर अशा प्रभावशाली गावांचे शिक्षक पद भूषवताना माझे आठ बहीण भावंडे सांभाळताना गरिबीची रेष ओरखडू न देणारे माझे वडील व हाळी पाटी करून आम्हा बहीण भावंडाना सांभाळणारी आई तिच्या संस्कारात वाढून आम्ही कष्टाने शिक्षण घेतले त्यातच माझे १९९२ रोजी झालेले लग्न व आमच्या कुटुंबात आलेली माझी पत्नी मंजुषा हिने आपले माहेरचे व सासरचे संस्कार जोपासत माझा संसार यशस्वीरीत्या पार पाडला आज आमच्या लग्नाला ३३ वर्ष झाली परंतु मला ३३ वर्षे साथ देणारी मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी! मस्त बहरलेलं नातं.ऋषी , स्वप्नील मुळे आणखीच खुललेलं. ३३ वर्ष झाली तरीही नात्यातला टवटवितपणा तोच. महिलांना सुपरमॅनेजर का म्हणतात, ते मंजुषा कडे पाहिलं की कळतं. एक उत्तम गृहिणी , प्राचार्य पद सांभाळताना उत्कृष्ट प्रशासक उपेक्षित घटकातील मुलामुलींना असणारा तिचा आधार व माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी एक सहचारिणी त्यामुळेच मी गेली ३३ वर्षे अनेक संकटाना सामोरे जात संघर्ष करीत टिकून आहे . शिक्षण संस्थेचे काम करताना तिने दिलेले सल्ले मोलाचे ठरले माझं पत्रकारितेचं करिअर हे सातत्यानं चढउताराचं. मात्र कसलीही कुरबुर न करता तिची साथ कायम राहिली. हीच मंजुषा आहे. स्वत:च्या हक्काव्यतिरिक्त आणखी काहीच न मागणारी. अगदी हट्ट करूनही गरजेव्यतिरिक्त काहीच न घेणारी. आज लग्नाला ३३ वर्ष झाली. मात्र तेच प्रेम आहे. दिवसागणिक आणखीच मुरत चाललेलं. श्वासासारखंच तिचं अन् माझं नातं आहे!…. सखे तुझ्या सोबती ग काटे सुद्धा फुले वाटे अन तुझ्या विरहाने फुले सुद्धा मला बोचे सखे तुझ्या सहवासात मला जगणे मान्य होते अन तुझ्या विरहाने मला मरणे भाग होते
आज मंजुषाचा जन्म दिवस २०मे या शुभ दिवशी खूप साऱ्या शुभेच्छा
तुझाच शांताराम बापू काळे
Wednesday, December 4, 2024
वन्यजीवांचीही आबाळ
Swami Amazing
Saturday, June 18, 2011
वन्यजीवांचीही आबाळ
राजूर, १८ जून/वार्ताहर
अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिसरातील वनक्षेत्राचा निधी रखडल्याने अभयारण्यामधील वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन विभागातील अनेक पदेही रिक्त असल्याने त्याचाही विपरित परिणाम होत आहे.
सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये ३६१ चौरस किलोमीटर वनक्षेत्रात अभयारण्य आहे. हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी या भागात बिबटय़ा व अन्य वन्य प्राणी, तसेच पक्षांचे वास्तव्य होते. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र वन विभाग व डोंगरांनी व्यापला आहे. म्हणूनच १९८६ मध्ये येथे अभयारण्य घोषित झाले. वन व वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या हेतूनेच हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. पहिली सात वर्षे अभयारण्याचा कारभार अहमदनगर जिल्हा उपवन विभागामार्फत सुरू होता. या काळात वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण मिळाले. बिबटय़ा, वाघ, कोल्हा, सांबर, नीलगाय, घोरपड, वानर, जंगली मांजर, उदमांजर, घुबडे, मोर, भोकर व पाण्यातील अनेक प्रकारचे मासे, कासव असे वन्यजीव येथे मोठय़ा प्रमाणावर वस्ती करून होते. नंतरच्या काळात मात्र या वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली.
हे क्षेत्र १९९४ पासून नाशिक उपवन कार्यालयाच्या अखत्यारीत गेले. याच काळात जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभले. तेव्हापासून येथे दोन वनसंरक्षक व कर्मचारी नियुक्त आहेत. या विभागाची शेंडी (भंडारदरा) व राजूर अशी दोन कार्यालये आहेत. सुरूवातीला फारशा अडचणी नव्हत्या. मात्र ९६ नंतर वनक्षेत्राचा निधी बंद झाला आणि वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली. त्यानंतरच या क्षेत्राला उतरती कळा आली. त्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत.
येथील वन्यजीवांनी अलिकडच्या काळात इतरत्र स्थलांतर केल्याचे उघड झाले. त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध न झाल्याने ही स्थिती ओढवली. नवीन वृक्षारोपण तर थांबलेच, मात्र वृक्षतोडीवरही कुणाचे नियंत्रण राहिले नाही. भंडारदरा कार्यालयातील वनक्षेत्र अधिकारी, गार्डची चार पदे, वनपाल तर राजूर कार्यालयातील चार गार्ड, वनपाल, वनमजुरांची दोन पदे रिक्त आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी इतर गोष्टींनाही मर्यादा आल्या आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतानाच राज्य सरकारने या अभयारण्यात वन्य जीवांसाठी पिण्याचे पाणी, वृक्षतोडीला बंदी आदी गोष्टींचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
Swami Amazing at 7:01 PM
Share
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
Powered by Blogger.
Tuesday, October 8, 2024
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
हरिश्चंद्रगड…..
निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्र , रौद्र तितकाच मनोहारी , निसर्गरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ! आपल्या रौद्र कड्यांनी ट्रेकर्सना सदैव आव्हान देणारा , निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा , अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला , नटलेला हरिश्चंद्रगड !! ठाणे , पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला आणि सर्वात मोठा घेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव गड म्हणजे " हरिश्चंद्रगड !!!
सुंदर कोरीव कलाकृतींनी नटलेलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर , बाजूलाच नितळ पाण्याची टाके आणि दगडात खोदलेली मोठ्ठी गुहा , विठ्ठल रखुमाईचं/विष्णूचं मंदिर , शेंदूर लावलेली गणपतीची मनमोहक मूर्ती , मंदिराच्या खालच्या बाजूस केदारलिंगेश्वराची प्रचंड गुहा आणि त्यातील शंकराची भव्य पिंड, मंदिराच्या वरच्या भागातील पुष्करणी , जमिनीत खोदलेल्या गुंफा, तारामतीचं उंच शिखर आणि त्याच्या पोटात गणपतीची भव्य मूर्ती असलेली मोठी गुंफा तसेच तिच्या आजूबाजूच्या अनेक गुंफा, उंचावलेला बालेकिल्ला , बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल , अवाढव्य आणि रौद्र कोकणकडा , गडाच्या विविध भागातील आजही सुस्थितीत असलेली मजबूत तटबंदी आणि बुरुज , कातळात खोदलेल्या पायऱ्या व खोबण्या, कोरलेली शिल्पे व देवतांच्या प्रतिमा…. असे नानाविध अलंकार आपल्या अंगावर घेऊन मिरवतोय हा हरिश्चंद्रगड…. एखाद्या नववधू प्रमाणे! प्रत्येक अलंकाराची नजाकत काही औरच!
हरिश्चंद्रगडाची ही श्रीमंती डोळ्यात साठवतांना आश्चर्यचकित व्हायला होतं. दगडी प्रवेशद्वारे, दगडी स्मारकं , देवतांच्या मूर्ती, आदिवासी बांधवांची श्रद्धास्थाने पाहून तर प्राचीन काळापासून या गडावर चहुबाजूने वावर असणार यात शंका राहत नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील जंगलात सांबर, रानडुकरे,बिबटे तसेच त्यांच्या पायाचे ठसे आणि विष्ठा, सांबरांची तुटलेली शिंगे, विविध जातीचे सर्प दृष्टीस पडतात .लहान-मोठे ओढे, नाले, धबधबे, विविध प्रकारच्या वेली, वनस्पती व वृक्षांचं समृद्ध जंगल असा जैवविविधतेने समृद्ध असलेला हा गड अभ्यासकांना मात्र मेजवानीच.
याचं आणखी एक आणि अनोखं वैशिष्ट्यं म्हणजे चहुबाजूंनी गडावर जाणाऱ्या सोळा (१६) गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा. इतक्या वाटा असणारा गड तसा दुर्मिळच…या वाटा म्हणजे निसर्गाने हरिश्चंद्रगडाला बांधलेलं एक ' देखणं तोरणच '.
प्रत्येक वाटेचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य. त्यामुळेच या सर्व वाटांनी गडावर जाणं, याचं ट्रेकर्सना मोठं आकर्षण आणि आव्हानही.
. गेल्या ८/१० वर्षात हरिश्चंद्रगडावर जसजशी गर्दी वाढू लागली, तसतशी त्याच्या संदर्भात अधिकाधिक माहिती सोशल मिडीयाद्वारे समोर येऊ लागली. अर्थात अनेक जाणकारांनी / अभ्यासकांनी / जुन्या पिढीतल्या ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडाविषयी बरीचशी माहिती यापूर्वीच करून दिली होती. पण गेल्या ४/५ वर्षात हरिश्चंद्रगडाच्या वाटांविषयीची माहिती सोशल मिडीयात यायला लागली. गडाच्या नेमक्या किती वाटा आहेत? याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. या दरम्यान माझ्या ट्रेकिंगच्या विश्वातले गुरु संगमनेरचे श्री. भरतजी रूपवाल, हे मला एकदा हरिश्चंद्रगडावर घेऊन गेले, वेगळ्या वाटेने…..' वेताळ धारेने ' ! आणि ' गणपतीच्या वाटे ' ने खाली घेऊन आले, लव्हाळीत. या ट्रेक मध्ये मला ' दरवाजाची वाट ' दाखवायलाही ते विसरले नाहीत. एकाच दिवशी तीन वाटा ?? त्याही फारशा माहिती नसलेल्या. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. त्या दिवसापासून मी पेटून उठलो. स्थानिक बांधवांना हाताशी धरून ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यातून गडावर जाणाऱ्या गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या घाटवाटा मनसोक्त भटकून आलो.
हरिश्चंद्रगड आणि त्याच्या वाटा
. सर्वप्रथम गडवाट आणि घाटवाट म्हणजे काय? हे समजून घेऊया. गडवाट म्हणजे गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन थेट गडावर घेऊन जाणारी वाट आणि घाटवाट म्हणजे कोकणातून सुरू होऊन गडाच्या फक्त पायथ्याशी येऊन पोहोचणारी वाट.
▪️ वरील परिभाषेनुसार हरिश्चंद्र गडाला सोळा (१६) गडवाटा आणि नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा आहेत.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी गडावरील एक वाट ही दोन गडवाटांना जोडणारी आहे, तिचा सामावेश गडवाटांमध्ये केला आहे. या वाटेचं नांव आहे ' थनंरगडी ' ची वाट.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी बारा (१२) गडवाटा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत, तर तीन (३) गडवाटा पुणे जिल्ह्यात व एक (१) गडवाट ठाणे जिल्ह्यात आहे.
▪️ राहिलेल्या नऊ (९) घाटवाटा या ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडाच्या परिसरात वर आलेल्या आहेत.
सोळा (१६) गडवाटा :-
अ) अहमदनगर जिल्हा
१) टोलार खिंड (कोथळा मार्गे)
२) गणपतीची वाट
३) दरवाजाची वाट
४) पाईरीची वाट
५) गवळ्याची नळी
६) वेताळ धार
७) देवाची वाट (कपारीची वाट)
८) थनंरगडीची वाट
९) गायवाट
१०) बैलघाट
११) वाघरान टेप
१२) बेटाची नळी
ब) पुणे जिल्हा
१३) टोलार खिंड (खिरेश्वर मार्गे)
१४) जुन्नर दरवाजा
१५) ठमारगडी (तारामतीची घळ)
क) ठाणे जिल्हा
१६) नळीची वाट
नऊ (९) घाटवाटा:-
ठाणे जिल्हा
१) सादडे घाट
२) करपदरा
३) जवारीची वाट
४) माकड नाळ
५) रोहिदास घळ
६) तवलीची नळी
७) खुर्द्याची धार
८) गणपतीची वाट
९) चोरदरा
अशा एकूण पंचवीस (२५) वाटा
(भविष्यात आणखी वाटांची यात भर पडू शकते.)
सर्वप्रथम मी एक गोष्ट अगदी प्रांजलपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या वाटांपैकी एकही वाट मी " शोधलेली " नाही. यापूर्वी " ठमारगडी च्या निमित्ताने " या माझ्या लेखात मी तसं सांगितलंही आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या बरोबर या सर्व वाटा मी प्रत्यक्ष चढून / उतरून आलोय. या वाटांचा मी कोणत्याही दृष्टिकोनातून अभ्यासही केला नाही. त्यामुळे या वाटा प्राचीन/ ऐतिहासिक की राजमार्ग ? याबद्दल या क्षेत्रातील जाणकारांनीच ते ठरवावं. मी फक्त ट्रेकर या नात्याने या सर्व वाटांनी हरिश्चंद्रगड पिंजून काढला. त्याच्या निसर्गसौंदर्याचा आणि रौद्रपणाचाही मनमुराद आनंद लुटला.
या वाटांनीच माझ्या मनाला भुरळ घातली आणि अचानक मनात एक विचार चमकला …. या पैकी चौदा (१४ ) वाटा सलग सहा (६) दिवसांत केल्या तर ???..... त्याप्रमाणे मोहीम आखली. ह्या मोहिमेला नांवही सुचलं, " टोलारखिंड ते टोलारखिंड ". सुरूवात टोलारखिंडीतून अन् शेवटही टोलारखिंडीतच, अशी ही अनोखी मोहीम. नासिकचा डॉ. अतुल साठे आणि अरूण डावरे(CA) हे दोघेजण या मोहिमेत सामील झाले.
जय्यत तयारीला लागलो. मोहीम यशस्वी करण्यासाठी Time management अतिशय महत्वाचं, त्यानुसार आखणी केली. या मोहिमेत लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे संपूर्ण नियोजन आणि तयारी माझी पत्नी सौ. संगिता हिने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करून दिली. ज्यांच्या शिवाय अशा मोहिमा करणं केवळ अशक्य असे दऱ्या-डोंगरात राहणारे माझे जिवाभावाचे साथीदार म्हणजे पाचनईचा भास्कर बादड, लव्हाळीचा बाळू बांबळे, बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ आणि खिरेश्वरचा मारूती मेमाणे यांच्या बरोबर अनेक वेळा फोनाफोनी झाली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी हे सर्वजण आम्हाला जीवापाड जपत होते आणि जीवाची पर्वा न करता झटत होते… सोबतीला कोणकोण येणार? मुक्काम कुठे कुठे करायचा? टेक्निकल सपोर्ट कोण, कसा, कुठे करणार? पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व साहित्य कसे पोहोचवायचं? इमर्जन्सी कशी हाताळायची? अशा असंख्य प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून उत्तरं शोधली. अंथरुणावर पडलो की डोळे मिटून असंख्य वेळा ह्या वाटा चढून / उतरून यायचो. फक्त एकच ध्यास…. " टोलारखिंड ते टोलारखिंड ".
मोहिमेच्या आदल्या दिवशी लव्हाळीच्या बाळू बांबळेच्या झापावर मुक्काम केला. मोहिमेचा दिवस उजाडला…. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१. पहाटे ५ वाजता निघालो अन तासाभरात टोलारखिंडीत पोहचलो. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या खिंडीतल्या " वाघोबा " ला नारळ फोडला, छत्रपती शिवरायांचा मोठ्याने जयघोष झाला आणि मोहिमेला सुरुवात झाली.. आणि हा हा म्हणता पहिल्याच दिवशी चार वाटा पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमारास बाळू बांबळेच्या झापावर पोहचलो सुद्धा. बाळूच्या बायकोने, लक्ष्मीने गरम गरम चहा दिला आणि फ्रेश झालो. आत्मविश्वास प्रचंड वाढला…मोहीम फत्ते होणारच हे चित्र स्पष्ट झालं, कारण दुसऱ्या दिवसापासून दररोज दोनच वाटा करणार होतो. अधून मधून येणाऱ्या अडचणींवर मात करीत पुढील ५ दिवसात १० वाटा पूर्ण केल्या आणि टोलारखिंडीत पोहोचलो.
या सहा दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडाचं रौद्र पण तितकंच मनोहारी रूप बघायला मिळालं. त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडलो , काही वेळा धडपडलो पण त्याने अलगदपणे उचलूनही घेतले. ओसंडून वाहणारं पाणी पोटभर प्यालो आणि मनसोक्त डुंबलोही. निसर्गात भटकण्याचा आनंद मनमुरादपणे घेताना हरिश्चंद्रगडाला केंव्हा कवेत घेतलं ? हे कळलंच नाही. सलग सहा (६) दिवसांत चौदा (१४) वाटा पूर्ण झाल्या… ह्या स्वप्नपूर्तीचा आनंद केवळ शब्दातीत. सहकाऱ्यांना मिठी मारून या आनंदाला डोळ्यांनी वाट मोकळी करून दिली. ज्यांच्या जीवावर ही मोहीम यशस्वी झाली त्या दऱ्या-डोंगरात राहणाऱ्या सोबत्यांचा निरोप घ्यायची वेळ आली…. अक्षरशः ढसढसा रडलो सर्वजण.
हरिश्चंद्रगडावर विविध वाटांनी जाण्याचा आनंद सर्वांना मिळावा आणि स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश. भावी काळात या मोहिमेमुळे अनेक ट्रेकर्स या वाटांकडे आकर्षित होतील, यात शंकाच नाही. .
या पहिल्या मोहिमेनंतर मी
अक्षरशः झपाटलो गेलो. माझ्या मनावर हरिश्चंद्रगडाने गारुड केलं. गडाचा काना कोपरा धुंडाळून त्याचं सौंदर्य डोळ्याने भरभरून पहायचं ठरवलं. त्याच्या पोटातली गुपितं उलगडण्यासाठी छोट्या छोट्या मोहिमा आखल्या…
२) दुसरी मोहीम- गायवाट :
(१३/१४ नोव्हेंबर २०२१)
गायवाट ही तशी अवघड आणि धोकादायक वाट. ती सोपी करण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , बाळू बांबळे या तिघांना सोबत घेतलं आणि गाय वाटेवरचा * तो अवघड भाग * रुंद करून , पर्यटकांसाठी ही वाट खुली केली. या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली.. सोबत नेलेल्या छिन्नी, हातोडा आणि पहारीने काळा कातळ फोडण्याचं दिव्य त्यांनी मोठ्या कष्टाने आणि कौशल्याने पार पाडलं.. आणि महिनाभरातच स्थानिक आदिवासी बांधव पर्यटकांचे ३/४ ग्रुप गडावर घेऊनही गेले... त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आणि पर्यटकांना वेगळ्या वाटेने गडावर गेल्याचा आनंदही..
३) तिसरी मोहीम - कोकणकडा ते कोकणकडा : (जानेवारी २०२२)
ही अशीच एक अनोखी मोहीम. * कोकणकड्यापासून * डाव्या बाजूने सुरूवात करून उजव्या बाजूने पुन्हा *कोकणकड्यावर* यायचं , अशी अंदाजे वीस किलोमीटरची ही गडावरील गड प्रदक्षिणा ... गडावर येणाऱ्या सर्व वाटांना स्पर्श करीत , दाट जंगलातून , छोट्या-मोठ्या टेकड्या चढून उतरून , कड्यावरील अरुंद वाटेने , घसाऱ्या वरून , काळ्या कातळातून , दगड धोंड्यातून , प्रचंड वाढलेल्या गवतातून , पाण्यातून , उन्हातान्हात अडखळत - ठेचकाळत ही प्रदक्षिणा पूर्ण केली.. यावेळी कालभैरवनाथा ची पिंड आणि परचितरायाची मूर्ती ही ठिकाणं नव्याने पहायला मिळाली... अवघा हरिश्चंद्रगड सर्वार्थाने पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच.. माझा वर्गमित्र लक्ष्मण दराडे (परिवहन उपायुक्त, महाराष्ट्र राज्य) हा खास या मोहिमेसाठी पुण्याहून आला होता. सोबत दत्ता जगदाळेही होता… भास्कर बादड आणि बाळू बांबळे हे सावलीसारखे मागेपुढे असायचे.
४) चौथी मोहीम - हत्तीमहाल : (६ फेब्रुवारी २०२२)
तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यामध्ये * हत्ती महाल * हा परिसर आहे . या ठिकाणी कातीव दगडामध्ये बांधलेले एक छोटेसे मंदिर आहे , ज्याची खूपच पडझड झालेली आहे . त्याच्या खालच्या भागामध्ये एक मानवनिर्मित खोदलेली गुहा आहे . ही गुहा पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येऊन पूर्णपणे बुजून गेलेली होती . या गुहेत प्रवेश करता येणं केवळ अशक्य होतं. म्हणून या गुहेच्या बाहेरील , प्रवेशद्वारातील आणि आतील माती बाहेर काढून या गुहेत प्रवेश करणं हे या मोहिमेचे स्वरूप होतं. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू केलेली ही मोहीम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती . संगमनेरचे गोरख गाडे साहेब आणि रवी राऊत हे टिकाव फावडे घेऊन खोदकामात सहभागी झाले… भास्कर बादडने वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांमुळे हे खडतर काम सहजपणे पार पडलं. पाचनईचे विठ्ठल भारमल आणि संजय भारमल कंबर मोडेपर्यंत माती खोदत होते.
.
५) पाचवी मोहीम - पाचनई ते पाचनई अर्थात हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा :(४,५ ,६ मार्च २०२२)
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचनई या गावातून सुरूवात करून, पायथ्या पायथ्या ने प्रवास करीत गडाला पूर्ण वळसा घालून पुन्हा पाचनई या गावात पोहचायचं, असं या मोहिमेचं स्वरूप. दिनांक ४,५ ,६ मार्च २०२२ या तीन दिवसांत ही प्रदक्षिणा सफल झाली.
नासिकचा राहुल सराफ गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्याबरोबर सातत्याने ट्रेकला असतो , या मोहिमेतही होता. पण विशेष म्हणजे त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने, राघवनेही ही मोहीम पूर्ण केली.
प्रदक्षिणेचा मार्ग:
१ ला दिवस :- पाचनई ते खिरेश्वर
२ रा दिवस : - खिरेश्वर ते वाल्हीवरे (बेलपाडा)
३ रा दिवस : - वाल्हीवरे (बेलपाडा) ते पाचनई
६) सहावी मोहीम - (दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२)
या मोहिमेत आदरणीय उष:प्रभा पागे मॅडम (वय ८० वर्षे) व श्री. शशिकांतजी हिरेमठ (वय ६५ वर्षे) यांच्या समवेत सलग ६ दिवसांमध्ये बारा (१२) वाटा केल्या. आदरणीय पागे मॅडम या ' गिरीप्रेमी 'संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि त्यांचं नाव ट्रेकिंगच्या विश्वात अत्यंत आदराने घेतलं जातं. मा.श्री. शशिकांतजी हिरेमठ हेही गिरीप्रेमीचे संस्थापक सदस्य आहेत.
या मोहिमेनंतर पागे मॅडम यांच्यावर ' पागे मॅडम! तुम्हाला मनापासून सलाम ' हा लेख लिहिला, तो अवश्य वाचावा.
अशा मोहिमांमुळे कौशल्य पणाला तर लागतेच त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो आणि निसर्गाची प्रचंड ओढ लागते. यापुढे अनेक ट्रेकर्स अशा प्रकारच्या मोहिमा करत राहणार, ज्यामुळे स्थानिकांचाही रोजगार वाढण्यास मदत होईल.....
हरिश्चंद्रगडाच्या या मोहिमा यशस्वी पार पाडण्यात ट्रेकर्सच्या गळ्यातला ताईत असलेला आणि माझा जिवाभावाचा मित्र भास्कर बादड तसेच बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ पोकळा हे तिघे बंधू आणि कमाची मुले रामदास व अशोक, लव्हाळीचा बाळू बांबळे, निलेश बांबळे, मंगेश , पाचनईचे ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , सखाराम भारमल , सुरेश भारमल , संतोष भारमल, पोपट बादड , विठ्ठल भारमल , संजय भारमल, बजरंग भारमल , खिरेश्वरचा मारूती मेमाणे, पाचनईच्या राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अशा अनेक स्थानिक आदिवासी बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यांच्या ऋणातच कायमचे रहाणे पसंद करेन.
.
जाता जाता…..
हरिश्चंद्रगडा व त्याच्या आजूबाजूला असलेली ठिकाणं :
१) गणपतीच्या वाटेवरील मोठी गडद कातळातील खोदीव पायऱ्या आणि गणपतीची मूर्ती.
२) दरवाजाच्या वाटेवरील दोन दगडी प्रवेशद्वारे.
३) पाईरीच्या वाटेवरचं थडगं.
४) वेताळ धारेची तटबंदी, बुरुज वेताळबाबाचं ठाणं आणि पाण्याचं टाकं.
५) थनंरगडी च्या वाटेवरचा गार्यादेव.
६) देवाच्या वाटेवर आड बाजूला असलेली भूतगडद.
७) गायवाटेवरची तटबंदी आणि कातळातील खोदीव पायऱ्या.
८) बैलघाटातील बुरुज आणि तटबंदी.
९) बैलघाट चढून गेल्यावर मंदिराकडे जाताना लागणारी सात पायऱ्यांची वाट.
१०) वाघरान टेप या वाटेवरची परचितरायाची मूर्ती.
११) कोकणकड्यावरचा काळभैरवनाथ.
१२) तारामतीच्या पलीकडलं भानवस रायचं जंगल, त्याच्या खालोखाल खराटीचा पूड, आडराईचे जंगल आणि तवलीचं जंगल,.
१३) बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल.
१४) जुन्नर दरवाजा व बालेकिल्ला या मधील खोदीव गुहा, पाण्याचं बंदिस्त टाकं, महादेवाची पिंड
१५) सरपंचाची गुहा, गणपती गडद, वरंजाचा धबधबा.
१६) पाचनई जवळील पाप पुण्याची कुंडे, कोड्याच्या राजाची गादी, घोडेमाळ.
१७) कलाडच्या भैरोबाच्या मागील हपाट्याचा कडा.
१८) लव्हाळीच्या माळरानावरील चिलमीचा खडा.
१९) कुमशेत जवळ परचितरायाचा भाऊ धारेराव यांचं मंदिर.
हरिश्चंद्रगडा जवळची उंच ठिकाणे : रोहिदासाचे शिखर , सीतेचा डोंगर, कलाडचा भैरोबा, नाप्ता, कोथळ्याचा भैरोबा, बुधलीची खिंड, कारकाईचा डोंगर.
अशा कित्येक अनमोल अलंकारांनी मढलेला हा हरिश्चंद्रगड पाहू तितका थोडा, भटकू तितका कमी. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. हरिश्चंद्रगडाच्या पोटात काही अनमोल रत्ने अजूनही दडलेली असतील…. सापडली तर जरूर सांगा.
विनायक वाडेकर
९३७२० १४६३२
Tuesday, September 3, 2024
बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.
*बैलपोळा....*
*आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️
बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो,
पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, परंतु त्याच बरोबर....
महाराष्ट्रात सह्याद्री मधील आदिवासी भागातसुद्धा परंपरेने हा सण आदिवासी पाडे, वाडी वस्ती, गावांमध्ये एक अनोळख्या पद्धतीने, भव्य- दिव्य, निसर्ग संस्कृती जोपासत, धरणी आईला वंदन करत सर्वत्र साजरा होतो.
भारत देशा मध्ये शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असल्याने, बैल वर्षभर शेतात कष्ट करून आपल्याला अन्न मिळते, शेतकरी सगळ्यांनचा पोशिंदा असला तरी बैल शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, त्याचा मान, सन्मान राखण्यासाठी हा सण साजरा करतात
हा सण पाऊसावळ्यात असल्याने हवेत गारवा पसरल्याने, मानवी मन देखील ताज तवान झालेलं दिसून येत, सगळी सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी,हिरवीगार,मंत्रमुग्ध करणार वातावरण तयार झालेलं असते.
आदिवासी गावांमध्ये सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दोन दिवस आधी गावातील पंचांची बैठक होते, त्या मध्ये सन उत्सव कसा साजरा करायचा याची चर्चा होऊन बासिंगाचे बैल असतील तर त्या मध्ये मोर, वाघोबा, बहिरोबा, डोंगऱ्या देव किंवा ग्रामदैवत इत्यादी यांचे हुबे हुब चित्र रेखाटून आकर्षक मोठे बासिंग तयार केले जाते, प्रत्येक घरावर अशी जबाबदारी वाटून दिली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा रुढी लुप्त होताना दिसत आहेत.
पोळ्याच्या काही दिवस अगोदर उंबराच्या झाडाच्या मुळ्यापासून चवार तयार केले जाते. आदिवासी समाजात उंबराच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे, तोडलेली मुळी उभी हातात पकडून तिच्या एका टोकाला मोगरीच्या सहाय्याने मारले जाते, जेव्हा मोगरिने मारले जात असते तेव्हा मुळी हाताने गोल गोल फिरवली जाते जेणे करून चवार एकसारखी तयार होतात. सुताच्या धाग्या प्रमाणे ही बारीक,मुळी जेवढी लांब तेवढ्या लांबीचा चवार, चवार उन्हात वाळवल्या नंतर त्याला घायपाताच्या वाखापासून बनवलेल्या दोऱ्याने बांधून गोंडे बनवले जातात, परंतु आदिवासीं बांधव एक झाडाच्या फक्त एक दोन मुळ्या तोडतात. त्या चवराचे बैल,गाई, म्हसी, शेळ्या इ.साठी आकर्षक गोंडे बनवले जातात. गोंड्याना हवे तेवढ्या रंगात बुडवून रंगीत केले जातात, तेच बैलांना फार शोभून दिसते.
काही दिवस अगोदर शेजारच्या किंवा गावच्या आठवडे बाजारातून बैलांसाठी खूप सारी खरेदी केली जाते, त्यात चावर,कासऱ्या, खुंगरू,गोंडे, बेगड, वेसन, पायाचे तोडे, रंगी बेरंगी वस्र, घुंगर माळा, झुली, गळ्यातले तोडे, साखळी, वेगवेगळे रंग इत्यादी अनेक साहित्य खरेदी केले जाते.
सणाच्या अाधल्या दिवशी गावचा कोतवाल प्रत्येक वाडी वस्ती वर दवंडी देऊन सांगत असतो की उद्या सायंकाळी बैल सजून होळीच्या माळावर घेऊन या म्हणून, त्याच दिवशी बैलांची शेंगे विळीने घोळून त्याला हिंगुळ,तेल, तुपाने चोपडून काढली जातात, पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल शेजारी असलेल्या ओढ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन काढतात, त्या नंतर राखलेले गायरान वर सर्वत्र चरायला सोडलं जातं किंवा भरपूर चारा बैलांना दिला जातो, शेतकऱ्याच्या सर्जा राज्याचा पोळ्याचा दिवस, मनाचा आनंदाचा असतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, कोणतेच काम करून घेतले जात नाही तर त्याचे पुजन लाड केले जातात.
या दिवशी बैलाच्या खांद्याला गोडे तेल, तुपाने आणि हळदीने मालिश केली जाते,
सकाळी बुजुर्ग किवां जाणकार माणसं हातात चवार घेऊन प्रत्येक शेतातील उभ्या पिकाला,गावातील ग्राम देवतेला, वाघोबा, उंबऱ्या देव, कनसारा आई, घर, गाडी, गुरे, शेणकईला चवार बांधले जाते, पूर्वी पासून भात,नाचणी, ज्वारी, बाजरी, मका खुरास्नी, भुईमुग, नागली इत्यादी सर्व पिकांची चावर लाऊन पूजा केली जाते,
आदिवासी ही निसर्गाला पुजनारी, देव माननारी संस्कृती आहे, या सणाच्या निमित्ताने पिकांचे, जनावरांचे, माणसांचे, गावाचे रक्षण करण्याची विनवणी निसर्ग देवतेकडे केली जाते,
बैल चारून झाल्यावर रानातून बैलांना दुपार नंतर घरी आणले जाते, स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते,
बैलांच्या शिंगणा नाचणीच्या पिठाच्या खळीने रंगी बेरंगी बेगड चीपकवली जातात, अंगावर घेरू किंवा रंगीत रंगांच्या साहाय्याने नक्षी किंवा रंगाने सजवले जाते,नवीन वेसण, नवीन कासऱ्या, गळ्यात तोढे घुंगर माळा, चवार बांधले जाते, कपाळावर मळवट बांधली जाते, शिंगणा चवार बांधले जाते, पाठीवर विविध नक्षीकाम केले जाते, गेरू चे अंगावर ठिपके दिले जातात, अंगावर झुली घातल्या जातात, गळ्यात छुम छुम करणार्या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.
सगळं काही नवीन, पायात चांदीचे किंवा तोरड्याचे तोडे घातले जातात. हे सगळ बैलांना खूपच सुंदर दिसू लागते,
बसिंगाच्या बैलांना बसिंग बांधली जातात,
बघता बघता होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागतो, तस तसे आपापली बैल घेऊन त्या ठिकाणी सर्वांची गर्दी होऊ लागते, सगळ्यांची बैल आल्यावर चावडी किंवा ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी हळू हळू वाद्या मागे बैल गेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत घेऊन जातात, बासिंगाचे बैल मागे असतात, ग्रामदैवत असलेल्या मंदिराला पाच प्रदिक्षणा घालतात, बैल फिरवले जातात, त्या नंतर बासिंगाचे बैल प्रदक्षिणा घातली जाते, पाच प्रदक्षिणा झाल्यावर ग्रामदैवतेला वंदन केले जाते, नारळ चढवला जातो, पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गावकरी सुद्धा या पवित्र उत्सवा मध्ये नृत्याचा ठेका धरत नाचू लागतात, महिला ही पारंपरिक गाण्याची साद घालत असतात, नंतर बैल घरी आणले जातात, बैल घरी येण्या आघोदर घरी महिलांनी घराबाहेर बैलांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली असते, बैलांना ओवाळून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला दिला जातो, बळी राजाची अतिथी देवो भव प्रमाणे पूजा केली जाते, त्याच प्रमाणे महिला बैलान पुढे गहु, ज्वारी चे दान मांडतात, ज्यांच्या घरी बैल नसतील ते अगजोदरच मातीचे बैल कुंभरांकडून घेतले जातात, त्याची विधिवत पूजन केले जाते, या दिवशी सगळ्याच शेतकरी बांधवांचा आनंद द्वगुणित होत असतो, सर्जा राजाचेही खूप लाड केले जातात,
अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण, आनंदात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण महाराष्ट्र सह्याद्री आदिवासी पाडे, वस्ती मध्ये पूर्वी पासून साजरा होत असतो,
या सणामुळे धान्याची,पिकांची, गो धनाची समृध्दी होते असे म्हणतात,
सर्व निसर्ग संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी समाजाची मूल्य, संस्कृती मानली जाते, आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करत असल्याने सर्वस्वी बैलांवर अवलंबून असतो, त्या मुळे बैलांन प्रती कृतज्ञता,प्रेम, जिव्हाळा, व्यक्त व्यक्त करण्यासाठी बैलं पोळा सण साजरा केला जातो.
हा सण सह्याद्री, महारष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी आदिवासीं भागात साजरा केला जातो, तसेच अकोले तालुक्यात मोठ्या उत्साह, आनंदमय वातावरणात बळीराजाची पूजा करतं साजरा करतात.
आज आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे बैलांचा वापर कमी झाला असला, तरी मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. म्हणून आपण हा सण साजरा करणे, ते पण पारंपरिक रीतिरिवाजाने अगत्याचे आहे."बैलपोळा सण "निसर्ग पुजक अदिवासीं संस्कृती व प्राणीमात्रावर जिव्हाळा दाखवीनारा सण आहे.
*:- तळपाडे भरत दशरथ*
*(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)*
९६६५४५१५३०
Monday, September 2, 2024
वनवाश्या ( वनाश्या )"
"वनवाश्या ( वनाश्या )"
दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही.
त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला.
वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ज्या गाईनं वनवाश्याला जन्म दिला होता ती वारली. अगदी चार पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला होता. जसं एखाद्या आईचं लेकरू तिला कमीतकमी सहा महिने तरी पीत असतं. तसंच गाईचं वासरू ही गाईला कमीतकमी दहा ते पंधरा दिवस तरी पेत असतं. त्यानंतर हळूहळू गवत वैगरे खायला सुरु करत असतं. पण आजोबांना मोठा प्रश्न पडला होता आता या वासराला जगवायच कसं. बाकीच्या एक दोन गाया ही वेलेल्या( बाळंतीण झालेल्या) होत्या. पण त्या काय वनवाश्याला पिऊ देत नव्हत्या. बाबाला खूप वाईट वाटत होतं. आता या वासराला जगवायच तरी कसं. ना याला बाकीच्या गाया पिऊन देत आहे ना याला गवत खाता येतंय. अन बाबाच तर काम असं होतं की ज्या गाईला गोऱ्हा होईल त्या गाईचं बाबा कधीच दूध नव्हता काढत. म्हणायचा पहिलवान झाला पाहिजे गोऱ्हा पहिलवान. कचाकच औत ओढलं पाहिजे त्यानी. पेऊदे सैल ( सवतं) त्याला म्हणायचा. कितीतरी वेळा त्यावरून आज्जीची न बाबाची भांडण होताना पाहिली होती मी. एखादी गाई गाभण राहिली की आज्जीला मनापासून वाटायचं की गाईला कारव्हडच ( कालव्हड) होयला पाहिजे. कारण घरात खायला दूध ही होयचं आणि अजून एक गाय वाढायची गोठ्यातल्या दावणीला. आजीला इतका आनंद होयचा की जणू काही स्वतः लाच लेक (मुलगी) झाली की काय ईतकी खुश दिसायची आज्जी. आता मात्र परिस्थिती वेगळी होती जेव्हढं दुःख बाबाला झालं होतं तेव्हढंच दुःख आज्जीला ही झालं होतं.
यावर मग आज्जीनेच एक उपाय शोधून काढला होता. आज्जी बोलली बाकीच्या ही गाया येल्या आहेत तर त्यांचं थोडं थोडं दूध काढून या वासराला पाजायचं म्हणून. बाबाला ही आज्जी बोललेलं पटत होतं. मग बाबा रोज सकाळ संध्याकाळ त्या दोन येलेल्या गायांच दूध काढायचा न त्या वासराला पाजायचा. वासराला दूध पाजल्याशिवाय बाबा जेवण पण करत नसत. जीवापाड जपायचा बाबा त्या वासराला. रात्र झालं की त्याला गोठयात न ठेवता बाकीच्या गाया त्याला मारतील या भीतीनं बाबा त्याला घरात घेऊन झोपायचा. स्वतः च्या मुलाला ही बाबा एव्हढा जपला नसल एव्हढी काळजी घायचा बाबा त्या वासराची. कधी कधी तर असही म्हणायचा बिना आईचं लेकरू आहे त्याला आपण नाही जिव लावायचा तर कोण लावील मग. लई वनवास सोसावा लागतो बिना आईच्या लेकराला अस म्हणायचा बाबा. म्हणून त्याचं नाव बाबांनीच "वनवाश्या" ठेवलं होतं. असाच बाबांनी त्याला लहानाचा मोठा केला. पण गावाकडं एखादं लहान पोरगं असू नाहीतर गाईचं वासरू असू त्याचं नाव बदलावलंच जाणार समजा. सोमाचा सोम्याच होणार न बैलाच नाव रतन असल तर त्याचा रतण्याचं होणार. म्हणून त्या वनवाश्या चा ही वनाश्या झाला होता.
त्याच्या सोबत भारत नावाचा बैल ही बाबांनी तयार केला होता. त्याला ही आम्ही भारत्या म्हणायचो. शेती करण्यासाठी आता बाबांनी वनाश्या आणि भारत्या ची जोडी तयार केली होती. भारत्याला आईचं दूध भेटल्यामुळं वनाश्या पेक्षा जास्त तयार दिसत होता. अगदी बाबाच्या भाषेत बोलायचं म्हंटल तर पहिलवानच दिसत होता भारत्या आणि खूप गरीब पण होता. मारत नव्हता काय नव्हता. कोणीही त्याला धरायचं सोडायचं. वनाश्या ही चांगलाच होता तब्बेतीन पण शिंगात जरा फसला होता. पाठमोरी शिंग झाली होती त्याची. बाशिंगा जवळ जाऊन दोन्ही शिंगाची टोकं एकमेकांना भेटत होती त्याची. भारत्या पेक्षा उंची नि ही कमीच होता दिसायला. पण बैलगाडी किंवा औताला जुंपला तर भारत्या बरोबरीनच चालायचा. कधीच माघ हटत नव्हता. दोघांचा चांगलाच जोड जमला होता.
काही वर्षानंतर घरातील काही कारणास्तव वडील व चुलते यांनी वाईलं ( वेगळं) घेण्याचा निर्णय घेतला. हा तर आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. वडिल आणि एक चुलता दोघंच भाऊ असल्यामुळे जमिनिसगट वाटणी समान होणार हे ठरलेलं होतं. सर्व घरदाराची व शेतीवाडी समान वाटून घेतली. सगळ्याची वाटणी झाल्यानंतर प्रश्न राहिला होता जनावरांचा. दोन बैल व गावरान गायांचा. गायांच मला जास्त काही आठवत नाही पण बैलांची वाटणी केलेलं चांगलंच आठवतंय. भारत्या चुलत्यांच्या वाटणीला गेलता तर वनाश्या आमच्या वाटणीला आला होता.
आता भारत्या आणि वनाश्या दोघही जणू वाईलच निघाले होते. त्या दिवसापासून दोघांचे साथीदार बदलले होते. दोघांच्या दावणी बदलल्या होत्या व उठायची बसायची जागा ही बदलली होती. बदलली होती त्यांची खांद्यावरली शिवळाटी व अगदी गळयातली घुंगरमाळ ही. भारत्याला जोडीदार घरच्याच गाईचा एक सुरत( सुरत्या) नावाचा नवा जोडीदार भेटला होता तर वनाश्याला मामाच्या इथुन आणलेला मथुऱ्या नावाचा जोडीदार भेटला होता. वाईलं झाल्यानंतर आमची सर्व शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर ( महादूवर) व आजोबांवर आली होती. मला वाटत त्या वेळेस त्याला सहवीतूनच शाळा सोडावी लागली होती. ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घेऊन खूप शिकायचं होतं लिहायचं होतं त्या वयात भावावर हातात नांगर व पाभार धरण्याची वेळ आली होती. त्यानं केलेल्या कष्टाला व मेहनतीला माझा कायम सलाम राहील. मला वाटतं आज जो काही आमचा संसार उभा राहिला आहे त्यात भावाचा व आईचा खूप मोठा वाटा आहे.
काही दिवसातच अचानक भारत्याच दुखायला लागलं. अन ज्या भारत्यानं कधीही कोणाकडे साधं फूस करून सुद्धा पाहिलं नव्हतं की कधी कोणाच्या अंगाला धक्का ही लावला नव्हता. तो अचानक जो जवळ जाईल त्याच्या अंगावर धावून जायचा. पिसाळल्या गत करायला लागला होता अचानक. डॉक्टर ला ही दाखवलं पण कळतच नव्हतं नेमकी काय झालं ते. अन दुर्दैवाने एक दिवस भारत्याने या जगाचा व आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेतला. भारत्या जरी अमच्यातून वाईला झाला होता तरी आमच्या हृदयातून कधीच वाईला झाला नाही. त्या दिवशी भारत्या साठी घरातल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगदी घरातला माणूस गेल्यासारख दुःख सगळ्यांना झालं होतं. कारण भारत्या म्हणजे सर्वांचा लाडका होता. कोणीही यावं त्याच्याशी खेळावं इतका गरीब होता . भारत्याला शेतातल्याच बांधावर खड्डा खांदुन शेतातच पुरलं व त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही त्या बांधावर गेलं की भरत्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही.
भारत्या गेल्या पासून वनाश्याला मात्र एक घाण सवय लागली होती ती म्हणजे तो आता बाबा आणि भाऊ सोडून कोणावरही धावून जात होता. बाबा अन भाऊ सोडून त्याला कोणी खायला टाकत नव्हतं की पाणी ही पाजत नव्हतं. त्याची एक खोड अशी होती की त्याला खायला टाकेपर्यंत किंवा पाणी पाजेपर्यंत तो काहीच करत नव्हता. जस त्याच्या समोरची बदली उचलून पाठ फिरवली रे फिरवली की लगेच माघून धडकी द्यायचा. त्यामुळे त्याला खायला टाकायचं ही भ्याव वाटायचं. एकदा तर आई गोठ्यातला शेणकुर करत असताना आईला गोठ्यातच लोळवल होतं त्यानं.
एक दिवस तर गड्याने कहरच केला ज्या बाबांनी त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. लहानच मोठं केलं होतं त्यालाच आता तो मारायला लागला होता. एक दिवस औत सोडलं न बाबा त्यांना जवळच्या बांधावर चरण्यासाठी घेऊन जात होता तर जाताजाता वनाश्याला काय हुकी आली काय माहीत बाबालाच बांधावर उचलून टाकलं होतं. भाऊ जवळ होता म्हणून थोडक्यात निभावल त्या दिवशी. आणि अजून एक गोष्ट अशी होती की त्याची शिंग पाठमोरी होती न गोल आकाराची झाली होती . त्यामुळं जरी मारलं तर फक्त मुका मार लागायचा. असं करता करता त्यानं भाऊ सोडून सगळ्यांनाच शिंगाव घेतलं होतं. अगदी मला ही नाही सोडलं त्यानं. माझ्या बाबतीत काय झालं तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग सुट्टीमध्ये मी नेहमी भावा सोबत जायचो औतावर बसायला. कारण कुठं वावरात जास्त गबाळ( गवत) झालं असलं की कुळाची किंवा फरटाची पाळी घालावा लागायची. मग गवत निघण्यासाठी औतावर वजन म्हणून एक छोटासा दगड ठेवायला लागायचा. पण मी सोबत असलो की भावाचा दगड ठेवायचा ताण( त्रास) वाचायचा न दगडाची जागा मी घ्यायचो. खूप मज्जा यायची न जेंव्हा वेळ भेटेल तेव्हा मी एखादं औताच मोडान( चक्कर) आणायचो. असं औतावर बसून बसूनच मी औत हाकायला ही शिकलो होतो. औत हाकून झालं की भाऊ वनाश्याला न मथुऱ्याला चाराया नेण्याचं काम माझ्याकड सोपवायचा. असं रोज त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मला जरा अति आत्मविश्वास आला होता की वनाश्या आता मला चांगला ओळखायला लागलाय न मला मारनार ही नाही. पण तोच अति आत्मविश्वास एक दिवस माझ्या चांगलाच अंगलट आला. झालं काय की बांधाला चरता चरता कासरा वनाश्याच्या पायात गुतला होता न तो मी अति आत्मविश्वासाने काढायला गेलो. पार अगदी त्याच्या गळ्याला मिठी मारायचाच राहिलो होतो. जसं मी कासरा काढायला गेलो तसं वनाश्यानं मला जवळच्या गव्हात उचलून टाकलं. मी आयोव.... आयोव करत तिथून पळत बोंबलत सुटलो थेट भावाला जाऊन गाठलं. अन त्याला मोठ्याने भोकाड वासवतच घडलेला प्रकार सांगून टाकला. त्यानंतर मी वनाश्याला कधीच चारायला घेऊन एकटा गेलो नाही.
वनाश्यानी त्या दिवशी मला उचलून टाकून भाऊ सोडून सगळ्यांना मारल्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर बैल पोळा आला की आम्ही दोन भाऊ ( संदिप अन मी) बैलांन पेक्षा गाईच्या गोऱ्यांना जास्त सजवायचो. नवी घुंगर माळ नवी मोरखी असं सारं काही नवं नवं आम्ही गोऱ्यांना सजवायलाच जास्त वापरायचो. गावात मिरवणुकीला ही मस्त सजवून न्यायचो. वनाश्याकड थोडं दुर्लक्ष च करायचो आम्ही. त्याला चिडवत बोलायचो आम्हांला लई मारितो ना तुला सजवणारच नाही जा. गोणीतून काढलेलं आमच्या हातचं काय उरलं सुरल गोंड कांडकी भाऊ त्यांना बांधायचा न छान सजवायचा. वनश्याला हिंगोळ लावायचं काम भावकडच असायचं. त्याला दुसरं कोणी हिंगळ लावलेलं आवडतच नव्हतं. पोळा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सगळ्या घुंगरमाळा व ईतर सामान सोडून ऐका गोणपाटात बांधून ठेवायचं. परत दुसऱ्या वर्षी तेच सामान काढून त्यांना सजवायचं. काही खराब झालं तरच नवीन आणायचं नाहीतर तेच वापरायचं. असं दरवर्षीच असायचं. पण मज्जा यायची पोळ्याला. मला वाटतं अजूनही त्या घुंगर माळा तश्याच आहेत त्यांना बंधायचो त्या. तेव्हढीच एक काय आठवण उरली आहे त्यांची.
आता राहिला होता फक्त भावाचा नंबर. तर एक प्रसंग असा आला की ज्वारीची कनसं काटणीचा सिजन चालू होता. रानात काटलेली कणसं बैलगाडीची साटी भरून घरी आणायची व घराच्या माळदावर उन्हाला तापायला घालायची. त्या दिवशी ही अशीच कनसांची साटी भरून घरी आणली होती ती गाडीतून घराच्या ओट्यावर खाली करत होतो. आणि ओट्याच्या जवळच लगेच बैलांची दावन होती. गाडी खाली होई पर्यंत त्यांना भावाने तिथंच बांधलं होतं. गाडीच्या धुऱ्या खाली करताना चाकांना उटी लावली नसल्यामुळे उतार असल्यामुळे गाडी काय भावाला झेपवता आली नाही. भाऊ गाडी सोबत नेमकी वनश्या च्या समोर आला न तसच वनाश्यानं भावाला माघून जोरदार धडक दिली. वनाश्याने दिलेल्या धडकेमुळे भावाचं तोंड जाऊन नेमकी धुऱ्यांना आदळलं व भावाचे समोरचे दोन दात जाग्यावरच गळून पडले. घडीभर तर कोणाला काहीच कळले नाही की नेमकी काय झालं ते. नशिब भावाला दुसरी काही जास्त ईजा झाली नव्हती मात्र भावला त्याचे दोन दात कायमचे गमवावा लागले.
आता घरात एकच चर्चा चालू झाली की वनाश्याला विकून टाकायचा म्हणून. आज दात पाडलेत उद्या कोणाचा जिव घेईल म्हणून. पण भावाला त्याचीच चूक लक्षात आली व म्हंटला वनाश्यानी मला मारलचं नाही तर मी गाडी घेऊन तो बसला असताना त्याच्या शिंगावर जाऊन बसलो. जेव्हा तो घाबरून उठला तेव्हा माझं तोंड धुऱ्यांना आदळल म्हणून. काहीजण बोलत होते घरचा बैल आहे काय वाया जाईल का ? परत दुसरा कसा निघतोय कसा नाही. अश्या अनेक उलट सुलट चर्चा नंतर वनाश्याला विकायचं रद्द करण्यात आलं. हा भावाने तरी त्याचा राग काढलाच त्याच्यावर थोडा. राग काढला म्हणजे चांगला चोपला होता वनाश्याला.
आता मात्र वनाश्या आणि मथुऱ्या दोघही थकले होते. नांगराला चालताना त्याची चाहूल लागत होती भावाला. आता चाव्हरीला चालायची त्यांची ताकद संपली होती. अन त्यातच दुष्काळ ही पडला होता. पुढील वर्षीची नांगरट काशी करायची हा भावाला मोठा प्रश्न पडला होता. आता परत एकदा दोघांनाही विकायचा विषय घरात हळूहळू येऊ लागला होता. वाटत होतं यांना नाही विकावा खूप सेवा केली त्यांनी. दावणीलाच मारून द्यावं यांना असं सगळ्यांना वाटायचं पण दुष्काळ पडल्यामुळे चार चार बैलं सांभाळणं अवघड होतं. शेती केल्या शिवाय तर काही पर्याय नव्हता. आईनं व भावानं काळजाव दगड ठेऊन एक दिवस दोघांनाही विकून टाकलं. आमच्या आयुष्यतला वनवाश्या आम्हांला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी घरात चूल सुद्धा पेटवली नव्हती.
घरच्या दावणीला बैलं येत राहतील जात राहतील पण वनवाश्या सारखा बैल कधीच दावणीला दिसणार नाही हे ही तेव्हढंच खरं. मी सुरवातीला जसं म्हंटल ना की आमचा संसार उभा करण्यात भावाचा न आईचा जेव्हढा वाटा आहे तितकाच वाटा मला वनवाश्या चा ही वाटतो. जो पर्यंत घरात पोळा साजरा होत राहील तोपर्यंत वनवाश्या ही आमच्या मनात साजरा होत राहील कायमचाच....
सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी
मु. पो. करंदी, ता. पारनेर
जि. अहमदनगर
9421778013
Friday, August 30, 2024
सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!
छान! सुंदर!!👍
आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!🙏
राघोजी भांगरे नंतर आता एक एक आदिवासी क्रांतिकारक समोर येत आहे! याला कारण मोबाईल! मोबाईलमुळे अगदी छोटीशी गोष्ट जगभर क्षणात पोहचते.
धारेबाबा प्रमाणेच आमच्या खिरविरे गावचे " रामा डगळे " नावाचे बंडकरी 1920 ते 1945 दरम्यान होऊन गेले. अगदी 1980 सालापर्यंत ते हयात होते.
पण रामा डगळे यांचे बंड इंग्रज सरकार विरुद्ध नव्हते तर राजूर येथील जे वाणी, गुजराती आदिवासीना त्रास देत असत, त्यांच्या जमिनी कर्जपायी गहाण घेऊन आपल्या नावावर करून घेत असत, अशा गुजराती सावकरांविरुद्ध रामा डगळे यांनी बंड पुकारले होते.
रामा बंडकरी म्हणून ते नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत.
वेळ मिळाल्यास रामा डगळे बंडकरी यांच्या विषयी मला जे माहित आहे, ते मी आपणास विस्तृतपणे लिहून पाठविण. कारण रामा बंडकरी यांच्या तोंडून मी त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आहेत!
धन्यवाद!🙏
शुभ रात्री!🙏🙏
....... पराड सर.
( खिरविरे )
Subscribe to:
Posts (Atom)
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...