Sunday, January 10, 2021

संस्काराचे विद्यापीठ....

हळव्या मायेच्या बोलांनी माणसाला जीव लावणारी काही नाती विलक्षणच असतात . भले ही नाती नसूद्यात रक्ताची .. अकोल्यातील चिरेबंदी परिसरात टाकळकर वाड्यात होतं असंच गजबजलेलं नांव अन् एक मायेचं गांव .. टाकळकर मामी नावाचं ! या नावाचं वलय आणि मात काय सांगावी देवा ! 

   प्रमिला पुरुषोत्तम टाकळकर हे झालं लौकीक नाव हो . पण ' टाकळकर मामी ' हीच खरी ओळख या आजींची . वयाच्या ९२ वर्षी नुकताच निरोप घेतला मामींनी . टाकळकर मामांची पत्नी , प्रकाश उर्फ मधू टाकळकरांची आई , टाकळकर वाड्यासह पंचक्रोशीतील मामी ! हळव्या मायेचं उत्साही बोलणारं व्यक्तित्व . आल्यागेल्यांची आस्थेनं  विचारपूस करणारं , चहापाणी - नाश्ता घेतल्याविना दाराबाहेर पडू न देणारं , गोडगोडव्या शब्दांत संवाद करणारं , खणखणीत आवाजातलं , समजुतीनं बोलणारं असं सारं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्व म्हणजे टाकळकर मामी ! आपुलकीनं अनेकांचा या घरात सातत्याने वावर असायचा .. 

   मामी म्हणजे शिस्त . मामी म्हणजे वळण . मामी म्हणजे समजून उमजून लळा लावणारं घर . मामी म्हणजे तब्येतीची ख्यालीखुशाली विचारणारं आदराचं ठिकाण . मामी म्हणजे जिव्हाळ्याची सावली . जुन्या वळणाचा जिना पार करुन मामींना आवर्जून भेटायला जाताना घराला दार असेल .. उंबरा असेल .. पण येणाऱ्याच्या पावलांना नव्हता अटकाव आणि अडसर - अडथळा ! इथल्या आतिथ्य सागराला नव्हता कधी किनारा . प्रत्यक्ष भेटीत मामींचं आवर्जून स्मरणभरलं बोलणं असायचं , ' सर , परवा बातमी वाचली . मागचा लेखही वाचला बरं का ! अभिमान वाटतो . ' तर कधी - ' मधू सरच हवेत का .. घाई नाही ना निघण्याची .. म्हटलं बघूयात परस्पर जाताय काय ! ' अशी सारी एकंदर विचारपूस .. 

   कधी चिरेबंदी वाड्याच्या मुख्य कमानीसमोरील पुरातन शिव मंदिराच्या ओट्यावर बसलेल्या मामी माणसांची मनाची - आदराची श्रीमंती जमवत संवादी सूर जपणार . तर कधी वाट पाहणारं हे दार  किलकिल्या नजरेनं ममतेचं नातं अधिक दृढ करणार ! 
    कधी मामी हळव्या मनानं म्हणायच्या -
     ' तुम्ही मधूकडं येतात . माझ्याकडे येतात आठवणीनं . फार बरं वाटतं . '  
   ' मामी तुमच्यासाठीच तर यायचं की . टळून टाळून कधी घडेल काय ? ' 
  ' हो ना .. हो ना . आहे तोवर येत जा ! ' 
     मामी दीर्घायु ठरल्या . वय होतं अधिक . पण मन आणि उत्साही बोलणं .. अगत्य अन् आतिथ्य नाही कधीच उणं पडलं इथं .. या आस्था - आपुलकीनं मग आठवतात पाडगावकरांच्या ओळी - 
       ' कुठे कुणाच्या घडल्या भेटी ।
      गीत एक मोहरले ओठी । 
      त्या जुळल्या ह्रदयाची गाथा ।
     सूर अजूनही गाती । 
     देवघरच्या समईमधुनी अजून जळती वाती .. ' 

     वाट पाहणारं हे दार , हा वाडा , हा जिना , चिरेबंदीचा परिसर , शिवालयाचा ओटा आता अधिक अधिक शांत शांत , सुना सुना ... रिता रिता .. हरवलेल्या श्रीमंती क्षणांची , आठवणींची गडदगर्द सावली विरळ - जाळीदार पिंपळ पानासारखा याद देणारा असेल .. 
      ----------------------------------- 🍂🍂

    📚 डॉ . सुनील शिंदे

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...