Friday, September 24, 2021

मुळात गोडतेल तरी किती? तर आमच्या कुटुंबातल्या १५-१६ माणसांच्या कालवणात

मुळात गोडतेल तरी किती? तर आमच्या कुटुंबातल्या १५-१६ माणसांच्या कालवणात धारभर तेल वापरले जाई. होय, धार हेच एकक होतं कालवणात तेल टाकायचं. पाट्यावर वाटून शेंगदाणे, खुरासनी आणि मसाल्याचे पदार्थ टाकून गोडतेलाशिवाय चवदार भाजी होत असे. गरज भासल्यास शेजाऱ्यांकडून तेल उसने आणले जाई.
ही देवघेव अनेक बाबतीत होई.

तेल खूपच जपून वापरले जाई. आई दोघी सुनांकडे विशेष लक्ष ठेवून असायची. तेल आणि साखरेचा वापर खूपच जपून केला जाई. गोडतेल पॅकिंगमध्ये मिळत नव्हतं. तेलाला काचेच्या उभट बाटल्या वापरल्या जात. आमच्या घरातल्या बाटलीत सायरीचा टोकदार काटा ठेवलेला असायचा.(त्याचं कारण माहीत नाही.) आम्ही पोरं दुकानातून गरजेपुरते तेल आणायचो. सणासुदीच्या बाजारात भजे, कुरडया, पापड्या तळायच्या हिशोबाने जास्तीचे तेल आणले जाई. लसणाच्या चटणीत तेल टाकून खाताना लज्जत वाढते. आई लसणाच्या भल्यामोठ्या गोळ्यात तेलाची धार टाकायची. तेलाची बाटली खुंटीला टांगून ठेवली जायची. तिथली मातीने सारवलेली भिंत तेलकट होत असे. शाळकरी वयात डब्यात अनेकदा भाकरी आणि लसणाची चटणी असायची. पेंडकं बांधलेल्या कापडामधून चटणीतले तेल झिरपून वह्यापुस्तकं तेलकट होत. शिक्षकांचे बोलणे खायला लागत.

आमच्या परिसरात राजूर(ता. अकोले) येथे तेलाचे घाणे होते. खुरासनी घेऊन जायचे आणि तेल काढून आणले जायचे. त्या तेलाला रुचकर चव आणि विशिष्ट वास होता. आताच्या पिशवीतल्या तेलांना ना वास ना चव! अकोल्यात शेंगदाणा मील होत्या. शेंगा खरेदी करून तेल आणि पेंड विकली जात असे. तिथून दिवाळीच्या दिवसांत तेल आणले जायचे. घाण्यातले शेंगदाणा तेल मिळते अकोल्यात अजूनही.

एकदा पोळ्याच्या सणाच्या दिवशी सारात तेल जास्त पडलं त्याचा तवंग दिसला म्हणून बापाने जेवण नाकारले होते! ताट भिरकावून दिलं होतं. तेलाचा विषय निघाला की ही आठवण हटकून जागी होते....

आमच्याकडे डांगी गायी असायच्या. तेलाचा दुष्काळ असला तरी तुपाची रेलचेल असायची. चुलीवर भाजलेल्या बाजरीच्या गरम भाकऱ्या चुरून त्यात तूप आणि गूळ घालून केलेला काला(मलिदा) आमच्या आवडीचा पदार्थ होता. 

बालपणी एखाद्या मित्राची तेलकट भाजी बघून तोंडाला पाणी सुटत असे. तेलकट पदार्थ खायला मिळत नसत याचं वाईट वाटायचं. आता तेल खरेदी करायची ऐपत झाली असली तरी तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत. 

घरात गोडतेल, खोबरंतेल आणि घासलेट अशी तीन तेलं असायची. गोडतेल आणि खोबरं तेलाच्या विशिष्ट आकाराच्या बाटल्या असायच्या. चिमणी आणि घासलेट इतिहासजमा झाले आहे. तेलांच्या बाटल्या जाऊन पिशव्या आल्या आहेत. काळाचा महिमा दुसरं काय? फेसबुकवर एका मित्राची पोस्ट वाचून हे सगळं आठवलं...

वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...