Tuesday, November 14, 2023

वैभव पिचड २०२४

2024 ची आशा-वैभवराव पिचड ...गत विधानसभा निवडणुकीत अकोले तालुक्यात मोठा राजकीय बदल झाला.या बदलामुळे तालुक्यातील लोकांच्या आशा-अपेक्षा फार मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या मात्र दीड दोन वर्षातच तालुक्यातील लोकांचा भ्रमनिराश झाला.भावनेच्या भरात मागील विधानसभा निवडणुकीत आपल्या कडून चूक झाल्याचे आता अनेक जण बोलून दाखवीत आहे.तालुक्यातील राजकीय वाऱ्याची दिशा बदलू लागली आहे.2024 साठी लोक पुन्हा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे अपेक्षेने पाहू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक सर्वसामान्य माणसांनी,कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत प्रचार केला.विकासाला मोठी गती मिळेल या अपेक्षेने बदल घडून आणला.निवडणूक प्रचारातील लहान मोठ्या आश्वासणांना लोक भुलले.पण आता वास्तवाची जाणीव झाल्यानंतर चूक झाल्याचे अनेकांना वाटू लागले आहे.लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही.तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे.गावोगाव ग्रामसभेत लोक त्याविरुद्ध आवाज उठवत आहेत.गावातील अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पद्मश्री राहीबाई पोपरे यांना अवैध व्यवसायावर हल्ला बोल करावा लागला.स्वतःच्या गावातील पोलीस ठाण्यात कुणीही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचा अनुभव दस्तुर खुद्द लोक प्रतिनिधींना आला.अकोलेची एम आय डी सी लिंगदेव च्या घाटातच अडकली.तीन वर्षात तालुक्यात साधा बंधारा झाला नाही की वीज वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण झाले नाही. निळवंडेचे उच्च स्तरीय कालवे,निळवंडेच्या उड्डाण पूल,32 गाव पाणी योजना अशा अनेक प्रकल्पांची रखडपट्टी सुरूच आहे.कोरोना काळात लोकांचे मोठे हाल झाले.वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमवावे लागले.कोरोना काळात आलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलांचा सामान्य माणसाला मोठा आर्थिक फटका बसला.तालुक्यात सुरू असणाऱ्या रस्ते आणि इतर कामांच्या दर्जा बाबत माध्यमांत सातत्याने बातम्या येत आहेत.पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनीच आपल्या गावच्या रस्त्याच्या सुरू असणाऱ्या कामाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. गतवर्षी वेळेवर कारखान्याने ऊस न नेल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल ,प्रशासनाकडून अडवणूक होणार नाही,अर्थिक उन्नती होऊ शकेल असे कोणतेही काम तीन वर्षात झाले नाही.गावातील रस्ते,ग्रामपंचायत व तलाठी कार्यालये,सभामंडप यालाच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही विकास म्हणत ढोल वाजविले जात आहेत. या सर्वांचा परिणाम लोकांच्या मानसिकतेत झाला आहे.माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या कडे लोक पुन्हा अपेक्षेने पाहू लागले आहेत. लोकांना माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांची आठवण होऊ लागली आहे.विविध प्रकारे लोक पिचड पिता पुत्रांबद्दलची आपली भावना उघडपणे व्यक्त करू लागले आहेत. सत्तेवर असताना सत्तेच्या माध्यमातून विकास योजना राबविण्यासाठी सतत आग्रही भूमिका घेणाऱ्या माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सत्ता नसताना विकासाच्या प्रश्नांवर,जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर संघर्षाची भूमिका तेव्हड्याच ताकतीने पार पाडली आहे,पार पाडत आहेत .विकास आणि संघर्ष या दोन्ही भूमिका सहजतेने पार पाडणारे असे राजकीय नेतृत्व तसे दुर्मिळच म्हणावे लागेल . विधानसभा निवडणुकीत वैभवराव पिचड याना धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला.राज्यातही विरोधी पक्षांचे सरकार आले .पण या पराभवाने ते खचले नाहीत .एक जबाबदार विरोधी पक्ष नेत्याची भूमिका त्यांनी अडीच वर्षे तालुक्यात सक्षमपणे बजावली.तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सरकार बरोबर केलेला पत्रव्यवहार असो की प्रसंगी जनतेला भेडसावणाऱ्या लहान मोठ्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष असो,यातून दिसली ती जनहिताची तळमळ,आता राज्यातील सत्ता बदलानंतर त्यांची भूमिका बदलली आहे. 2019 नंतर त्यांचे अनेक जेष्ठ सहकारी त्यांना सोडून सत्ताधारी पक्षात गेले .पण या राजकीय वावटळीतही ते ठाम पणे उभे होते .कार्यकर्त्यांना धीर देत विचलित न होता ताकदीने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले .त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचेवर नाराज असणारी तरुणाई पुन्हा त्याच्या जवळ येऊ लागली आहे .गावोगाव त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होतांना दिसत आहे. नम्र स्वभाव,अंगी सुसंस्कृतपणा, मात्र अन्यायाविरुद्ध लढा देणारा म्हणून त्यांनी आपली ओळख संपूर्ण तालुक्यालाच नव्हे तर राज्याला करून दिली. प्रत्येक गावातील त्यांचा संपर्क व संवाद हा सध्या त्यांचा उत्साह वाढविणारा दिसत आहे.त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहाने सक्रिय झालेले दिसत आहे. मागील अडीच वर्षात विरोधी सत्ता असतांना तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकत्र येत त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला,राजकारणात ते एकटे पडले,पण खचले नाही.अगस्ती कारखाना निवडणुकीत त्यांना फटका बसला तरीही न डगमगता अमृतसागर दूध संघात एकहाती सत्ता आणून टायगर अभि जिंदा है हे दाखवून दिले. अकोले नगरपंचायत निवडणुकीत सुद्धा त्यांनी एक हाती विजयश्री खेचून आणली.अनेक विकास सोसायट्या त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी जिंकल्या.यापूर्वी ते कधीही सोसायटीच्या निवडणुकीत लक्ष घालत नव्हते पण यावेळी त्यांनी त्यात आवर्जून लक्ष घातले.आणि सोसायट्या वर वर्चस्व मिळविले. पुढील जिल्हा बँकेचया निवडणुकीत याचा त्यांना निश्चितच लाभ होणार आहे.महानंदा च्या संचालक पदावरही त्यांची बिनविरोध निवड झाली त्यामुळे पुन्हा एकदा राज्य पातळीवर काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. कोरोनाच्या काळात तालुक्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले, रुग्णांना,गरिबांना,आदिवासी बांधवाना मदत केली.त्यांच्या विविध प्रश्नांवर पत्रव्यवहार करीत तत्कालीन सरकारलाही निर्णय घेण्यास भाग पाडले. जे काम विद्यमान आमदाराने करणे गरजेचे असताना ती कामे माजी आमदार पिचड यांनी मार्गी लावली. तालुक्याच्या दृष्टीने जी विकास कामे प्रलंबित आहे,होणे गरजेचे आहे त्याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, विरोधी पक्षनेते, संबंधित विभागाचे मंत्री,सचिव,जिल्हाधिकारी, इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांचे कडे पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर यातील अनेक प्रश्न मार्गी लागतील यात संदेह नाही.त्यांच्या या धडपडी मुळे जनतेमध्ये त्यांचे बद्दल ची आपुलकी वाढत चालल्याचे दिसत आहे. त्यांच्या संघर्षाची व आदिवासी समाजासाठी असलेली तळमळ पाहून भाजप पक्षनेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी देण्याच्या दृष्टीने भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती करून त्यांचा सन्मान केला. भाजपच्या कारकिर्दीत पहिल्याच वेळी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास संधी मिळणारे पिचड हे एकमेव अपवाद असतील.त्यांच्या वर एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निरीक्षक पदाची जबाबदारी येणार होती,मात्र पिचड यांनी भाजप ची कार्यप्रणाली,विचारधारा समजून घेऊन मला काम करू द्या, असे म्हणत मोठी संधी त्यांनी नम्रपणे नाकारली . दिल्ली येथील पक्षाच्या पहिल्याच मिटिंग मध्ये त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली.त्यांनी आपली निवड सार्थ ठरविली आहे. तालुक्यातील राजकीय घडामोडी त्यांना त्रासदायक ठरतात की,अशी शंका सर्व सामान्य जनतेच्या मनात येत होती.मात्र ज्यांनी साथ सोडली ते पाहून वैभवराव पिचड यांनी सर्व जिवाभावाच्या कार्यकर्त्यांना धीर दिला.मी खंबीर आहे.असा विश्वास दिला. व पहाता पहाता तरुणाई ने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आणि गावोगावचे युवक, महिला यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन आम्हीं तुमच्या बरोबर आहोत असा पाठींबा दिला.तालुक्यात भाजप पक्ष रुजनार नाही अशी चर्चा होत असताना प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र दिसायला लागले.जे सोडून गेले त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन युवक एकत्र आले. आणि गावागावात भाजपच्या शाखा सुरू व्हायला लागल्या.नवीन जोश भाजप कार्यकर्त्यांनी आणला. त्यांचे नेत्तुत्व मान्य करीत असल्याचे वातावरण तालुक्यातील जनता पाहू लागली.विरोधकावर टीका करताना कधी पातळी सोडून बोलले नाही.मोठ्यांना सन्मानाने वागणूक देणे ही त्यांना त्यांच्या आई वडिला कडून मिळालेली शिकवण जनतेला दिसू लागली. सर्व कार्यकर्त्यांना मानाने वागणूक देणारे नेत्तुत्व त्यांच्या रूपाने तरुणांना आकर्षित करू लागल्याचे चित्र दिसत आहे.40 वर्षे काय विकास केला ही जनता विसरली नाही मात्र विरोधी नेते जाणून बुजून राजकारण करत आहेत. हे आता जनतेला हळुहळू कळायला लागले. हे मात्र नक्की, व पुन्हा एकदा तालुक्यात पिचड यांच्या रूपाने आमदार म्हनुन जनता त्यांना विजयश्री मिळवून देईल व पुन्हा नव्या उत्साहात विकास कामासाठी तालुक्यात 'वैभवपर्व' सुरू होईल असा विश्वास भाजपचे कार्यकर्ते व पिचड समर्थक व्यक्त करत आहेत. अमृतसागर दूध संघ निवडणुकीत एक हाती सत्ता मिळविली त्यांच्या पारदर्शी व काटकसरी च्या कारभाराला दूध उत्पादकांनी स्वीकारले.मागील 7 वर्षाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात दरवर्षी त्यांनी दूध उत्पादकांना सर्वाधिक रिबेट दिला. कोरोना काळात तसेच लंपी आजाराच्या साथीच्या काळात दूध उत्पादकांना आधार देण्याचे काम त्यांचे मार्गदर्शनाखाली दूध संघाने केले.कर्जबाजारी अससेला दूध संघ कर्जमुक्त करीत उर्जितावस्थेत आणला. दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी आपले प्रशासकीय कौशल्य सिद्धा केले आहे. तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायती,विकास सोसायटी वैभवराव पिचड नेतृत्वाखाली ताब्यात आल्या आहेत.भविष्यात होणाऱ्या जि प ,पं स,बाजार समिती, खरेदी विक्री संघ यात योग्य माणसांना संधी देऊन या संस्थाही भाजप ताब्यात घेण्याचे त्यांनी नियोजन केलेले दिसुन येते. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही क्षेत्रात निर्णय घेतांना ते सर्वांगीण अभ्यास करतात. त्यांच्या या अभ्यासपूर्ण गुणांमुळे लहान सहान बाबही त्यांच्या नजरेतून सुटत नाही.त्यांचे हे वैशिष्ट्य अनेक बैठकांमध्ये दिसून येते. त्यांच्या अभ्यासपूर्ण वृत्ती मुळे तसेच पारदर्शी व्यक्तिमत्वा मुळे सध्याच्या शिंदे -फडणवीस सरकार मध्ये त्यांच्या शब्दाला मान आहे,त्यांनी सांगितलेले कोणतेही काम मार्गी लागत आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा त्यांच्यावर विशेष वरदहस्त आहे.त्यामुळेच माजी आमदार हा शब्द विसरून जनता आता त्यांच्या कडे आमदार म्हणूनच पहात आहे. हीच बाब त्यांना 2024 मध्ये पुन्हा एकदा आमदार करणार आहे.

Thursday, July 13, 2023

हरिश्चंद्रगड

*हरिश्चंद्रगड* अकोल्यापासून चे अंतर : 43.8km स्थान : हा किल्ला पुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. या जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग हरिश्चंद्राची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरुवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. पौराणिक महत्त्व : हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ थेट राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्रगडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती. गडावर जाण्याच्या वाटा गडावर जाण्यासाठी सध्या तीन चार वाटा प्रचलित आहेत. सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग: गड सर करण्यासाठी एक सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग आहे. परंतु हा मार्ग फारच अवघड असल्याने प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असलेल्यांनीच हा मार्ग अवलंबावा. या मार्गे येण्यासाठी कल्याण-मुरबाड मार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे. येथून `बेलपाडा’ या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे. येथून कड्यातून काढलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर जाता येते. या वाटेने मंदिर गाठण्यास सुमारे दीड दिवस लागतो. या वाटेलाच `नळीची वाट’ असेही म्हणतात. रस्त्यातील व्याघ्रशिल्प: पाचनई कडील वाट हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनई मार्गे अहमदनगर जिल्ह्यातूनही आहे. यासाठी मुंबई-नाशिक हमरस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी जावे. राजूरवरून गडावर दोन मार्गांनी चढाई करता येते. • राजुर-पाचनई अशी बससेवा उपलब्ध आहे. हे अंतर सुमारे २९ कि.मी. भरते. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गड गाठण्यास सुमारे ३ तास लागतात. वाट फारच सोपी आहे. पाचनई ते हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर हे अंतर सुमारे ६ कि.मी. आहे. • हल्लीच राजूर ते तोलार खिंड अशी खाजगी वाहनसेवा उपलब्ध झाली आहे. ही वाट राजूर, अंबित, पाचनई, मुळा नदीचे खोरे, घनचक्कर या बाळेश्वर रांगेतील टेकडीस वळसा घालून सरळ एक तासात तोलारखिंडीत पोहचते. येथून वर जाणारा रस्ता हा दमछाक करणारा आहे. येथून २ तासात गडावरील मंदिरात पोहचता येते. पायथ्यापासून तोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड तोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेऊन जाते. खिंडीतून चढणार्याक वाटेवर खडकात पायठण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो. गडाचा घेरा फार मोठा असल्याने गडावर जाण्याच्या वाटाही फार आहेत. पाहण्यासारखी ठिकाणे: हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर: येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. चार खांब – चार युगांचे प्रतिक सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्या त जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. हरिश्चंद्रगडाचे सर्वांत जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र, सिद्धगड, माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. कोकणकड्यावर १८३५ मध्ये कर्नल साईक्सला इंद्रवज्र दिसले होते. तारामती शिखर: शिवलिंग – पिंडी तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत. कोकणकडा या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू ‘U’ या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. ऐतिहासिक महत्त्व: महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्री तील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाया गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्याडत जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत ‘चांगदेव ऋषींनी’ चौदाशे वर्ष तप केले होते असे स्थानिक गावकरी सांगतात. ‘शके चौतिसे बारा । परिधावी संवत्सरा । मार्गशिर तीज (तेरज) रविवार । नाम संख्य ॥ हरिश्चंद्रनाम पर्वतु । तेथ महादेव भक्तु । सुरसिद्ध गणी विरुयातु । सेविजे जो ॥ हरिश्चंद्र देवता ॥ मंगळगंगा सरिता । सर्वतीर्थ पुरविता सप्तस्थान । ब्रम्हस्थळ ब्रम्ह न संडीतु । चंचळ वृक्षु अनंतु । लिंगी जगन्नाथु । महादेओ ॥ जोतीर्थासि तीर्थ । केदारांसि तुकिनाति । आणि क्षेत्री निर्मातिबंधु हा॥’ हे चांगदेवाविषयीचे लेख मंदिराच्या प्राकारात, खांबांवर व भिंतींवर आढळतात. येथे तपश्चर्या करून झाल्यावर श्री चांगदेवांनी तत्त्वसार नावाचा ग्रंथ लिहिला. गाईड व राहण्याच्या सोयीसाठी संपर्क : 8390607203 , 9881890533

Saturday, May 13, 2023

म . टा .  वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरोळी ठोकत आदिवासी भागातील वाडी वस्तीवरील शाळेतील पोरं  बांबूच्या व प्लॅस्टीकच्या  टोकरीत काळे करवंन्दे घेऊन पर्यटकांना आर्जवी करीत असताना दिसू लागली आहे तर पर्यटकही मोहित होऊन हि करवंदे घेण्यासाठी आपल्या वातानुकूलित गाड्या  रस्त्याच्या कडेला उभ्या करून या मुलांकडून डोंगरची काळी मैना घेताना दिसत आहे . आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभल्याने कळसुबाई - हरीशचंद्र गड परिसरात आंबळे , करवंदे , जांभळे , मोहाची फुले , आळवे हि फळे व काही ठिकाणी रानफुलेही चमकू लागल्याने या निसर्गातून परिसरातील  आदिवासी छोट्या मुलांना रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे . तर या मिळालेल्या पैशातून हे विधार्थी शाळेतील सहल व शालेय साहित्य घेण्यासाठी वापर करतात असे सोमा प थवे  हा विधार्थी म्हणाला
आदिवासींचा रानमेवा डोंगरची काळीमैना नावाने ओळख असणार्‍याआंबट गोड चवीचे काळेभोर "करवंद" नावाचे फळ पिकु लागल्याने व शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने चिमुकल्यांना रोजगार मिळवून देवु लागला असुन चिमुकले शालेय विद्यार्थी बाजारपेठेमध्ये विक्री करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
        अकोले तालुक्यातील पश्चिम भागातील भंडारदरा परिसरात मुरशेत,पांजरे,रतनवाडी,घाटघर,वा
की,मुतखेल आदी ठिकाणी असणाऱ्या जंगलात करवंदाच्या काटेरी जाळ्या भरपूर प्रमाणात असुन साधारण एप्रिल महिन्याच्या अखेरीस या काटेरी जाळ्यांना आंबटगोड चवीचे काळेभोर गोल आकाराचे फळ पिकण्यास सुरुवात होते.त्यालाच आदिवासी ग्रामीण भागात रानमेवा म्हणुन संबोधले जाते.एप्रिल महिन्यात परीक्षा संपली की दररोज पहाटे लवकर उठायचे हातात पाटी एवजी डोक्यावर पाटी (टोपली)घ्यायची व जंगलचा रस्ता धरायचा जंगलातील काटेरी जाळ्यांना पिकलेली करवंदे तोडुन जमा करायची व पिंपळाच्या,वडाच्या झाडांच्या पानांची डोमे (द्रोण)तयार करून त्यामध्ये वाटे तयार करून सकाळी भंडारदरा बाजारपेठेत,बगीचा,पर्यटन निवास महामंडळ परिसर,महामंडळाच्या बसेस मध्ये करवंदे घ्या करंवदे आवाज देत विक्री करत रोजगार मिळवायचा.विशेष बाब म्हणजे विक्री करणारे सर्व 10 ते 15 वयोगटातील शालेय विद्यार्थी असून 50 ते 100 रुपये विक्री करतात.साधारण महिनाभर चालणाऱ्या या व्यवसायातातुन मिळणाऱ्या उत्पन्नाचा विनियोग शालेय उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी होत असल्याची माहिती शेंडी गावठा येथील ईयत्ता चौथीत शिकणाऱ्या राहुल बोऱ्हाडे या चिमुकल्याने सांगितले.आदिवासी ग्रामीण भागातील डोंगराच्या काळ्या मैनेला गावात जरी योग्य भाव मिळत नसलातरी शहरी भागात 80ते100 रुपये किलो भाव मिळतो मात्र शहरी भागातील बाजारपेठेत जाण्यासाठी वाहतूक खर्च परवडत नसल्याचे देखील यांनी सांगितले. चौकट - हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.
करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.
कोट ---सौ . राहीबाई पोपेरे --सेंद्रिय शेती  आदिवासी भागातील महिलांना रोजगार मिळाला आहे तर करवंन्दे व जंगली फळे आमच्या छोटया मुलांना रोजगार मिळवून देत आहे .  तोंडातून काही काव्यही बाहेर आले हिरव्या पानामंधी करवंद
जिभेवर लाळ घोळवती
उघडा-नागडा आदिवासी
परी संस्कृती सदा जपती

काळ्या मैनेचे हे प्रेम
चाखली हजारोंनी माया
कातळ-कपारितला गोडवा
नांगरताना गायी आभाळमाया

काटयांचे असणे कधी
करवंदाला टोचत नाही
संकटांचे जगणे बाई
सरकारला बोचत नाही

हिरवाईचा शालू बघा कसा
करवंद जपतो आहे
फाटलेली मने विकासाची
आदिवासी शिवतो आहे

उघड्या माळरानावर सदा
जाळी करवंदाची रूपवती
योजनांचा वंचित राजा
सह्याद्री संस्कृती पेरती




Monday, April 24, 2023

कौठवाडीकी यात्रा उत्साहात डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

 कौठवाडीची यात्रा उत्साहात डोक्यावर पेटते कठे घेऊन बिरोबाला नवस

अकोले, ता.२४:

 कौठवाडी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून परंपरागत भरणारी कठ्याची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. डोक्यावर पेटलेले मडके (कठे) घेतलेले भाविक, मडक्याला छिद्रे पाडून, मडक्यात उकळलेले तेल टाकून नवस फेडणारे व बोलणारे भाविक, हे दृश्य रात्रीच्या अंधारात उठून दिसत होते. रात्रभर उत्साहात व पेटत्या कठ्यांच्या उजेडात परिसर उजळून काढणारी ही यात्रा पाहण्यासाठी, तसेच देवाला नवस बोलण्यासाठी राज्यभरातून लोकांनी येथे गर्दी केली होती. गावात श्री बिरोबादेवाचे मंदिर आहे. कठ्याच्या यात्रेमुळे हे गाव सर्वदूर प्रसिद्ध झाले आहे. नगर, पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, कल्याण, विदर्भातून लोकांनी येथे यात्रेसाठी गर्दी केली होती. कोणतेही काम पूर्ण होण्यासाठी देवाला 'कठा' लावून नवस बोलला जातो. हा नवस पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. 

कठा म्हणजे मडक्याची घागर. मडक्याची वरची बाजू कापून त्यात खैर, साग, चंदन अशी विविध प्रकारची लाकडे व समिधा टाकून घागर पूर्ण भरतात. त्यात गोडेतेल टाकून चांगली भिजवतात. घागरीच्या चोहोबाजूंनी पांढरे शुभ्र कापड गुंडाळून, वरच्या टोकाला मंदिरासारखा आकार करतात. हे कठे बिरोबा मंदिरात ठेवतात. साकिरवाडी येथून सात  वाजता मानाची काठी येते व बिरोबा की जय अशा घोषात ढोल, ताशांच्या गजरात कठे पेटविले जाऊन यात्रेला सुरूवात होते.


मंदिराभोवती उघड्या अंगाने, डोक्यावरून संपूर्ण शरीरावर वाहत असलेले तेल, डोक्यावरचा अग्नी अशा वातावरणात हे दृश्य पाहणाऱ्यांच्या अंगाला काटा येतो.  यंदा  ७४ कठे पेटविले होते. भाविकांची संख्याही वाढत असल्याची माहिती मंदिराचे ट्रस्टी दत्ता भोईर यांनी दिली. . त्यांनी यथोचित पूजा करून सामुदायिक आरती केली. साकिरवाडी येथून मानाच्या काठीचे आगमन झाले. पुजाऱ्याच्या अंगात येताच कठे पेटले व मोठा अग्नीचा भडका झाला. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पेटलेले कठे आले.  बिरोबा की जय म्हणत मंदिराभोवती ५,  फेरे मारून भाविकांनी नवस फेडले. काहींनी नवसही केले.

सुरेश भांगरे,सरपंच विठ्ठल भांगरे बाळू घोडे सावळेराम भांगरे सर्व यात्रा कमिटी ग्रामस्थांनी नियोजन केले.    मनोरंजनासाठी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या साठी राजूर पोलीस स्टेशन चे सा. पो. नि. गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली चोक बंदोबस्त करण्यात आला


Saturday, April 22, 2023

अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा

 अकोले तालुक्यातील कौठवाडी येथील पेटत्या कठ्यांची अनोखी यात्रा आज रविवार, दिनांक २३. ४.२०२३ रोजी आहे. यानिमित्ताने दहा वर्षांपूर्वी ‘सकाळ‘च्या सप्तरंग पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख जरूर वाचा आणि हा थरार एकदा प्रत्यक्ष बघाच.


कठ्याच्या यात्रेतील धगधगता थरार....

- भाऊसाहेब चासकर


आधुनिक जीवनशैलीमुळे आपण आपले नैसर्गिक जीवन आणि प्रसन्न मन त्या संस्कृतीच्या हवाली केले आहे. त्याचे काही बरे-वाईट परिणामही आज आपण भोगतो आहोत. मात्र, सह्याद्रीतील गिरीकंदरांत राहणारा आदिवासी समाज अजूनही त्यांच्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक धारणांना चिकटून जीवन जगतो आहे. आदिवासींचे जीवन, त्यांच्या रुढी, परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, वहिवाट इत्यादींशी एकरूप झाल्याचे दिसून येते. जीवनात आनंदी राहण्याचा मंत्रच जणू या लोकसंस्कृतीने, परंपरेने आदिवासींना बहाल केला आहे. दरवर्षी चैत्र, वैशाखाच्या सुमारास हे लोक रिकामे होतात. गावांच्या सामुदायिक जत्रांचा तो हंगाम असतो. आदिवासी समाजाची धार्मिकता आणि श्रद्धा यातून दिसते. याशिवाय आदिवासींच्या सांस्कृतिक वेगळेपणाचे मनोज्ञ दर्शनही यातून घडते. अत्यंत तन्मयतेने आणि उत्साहाने हे लोक यात सहभागी होतात.


कौठवाडी. अकोले तालुक्यातील राजूरजवळचे असेच दुर्गम आदिवासी खेडे. अक्षय्य तृतीयेनंतरच्या पहिल्या रविवारी येथे बिरोबाची मोठी यात्रा भरते. कठ्याची यात्रा म्हणून तिची ख्याती सर्वदूर पसरलेली. पुणे, ठाणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील भाविक आणि जिज्ञासू येथे मोठी गर्दी करतात. खरे तर बिरोबा हे धनगर समाजाचे दैवत. परंतु येथे कौठवाडीत हा उत्सव साजरा करतात ते महादेव कोळी समाजाचे भाविक. महाराष्ट्राच्या­ लोकसंस्कृतीशी नातं सांगणारा असाच इथला यात्रोत्सव असतो. येथील बिरोबाच्या देवस्थानची आख्यायिकाही मजेशीर आहे.


पुणे जिल्ह्यातील चिल्हेवाडी-पाचघ­रचे धनगर लोकं कधी काळी मेंढ्या चारीत चारीत या भागात आले.एका मुक्कामी त्यांना ती पाटी काही उचलेना. मग परतीच्या वाटेवरील मेंढपाळांनी दोघांना देवाच्या पुजेअर्चेसाठी तेथेच ठेवले. बाकी मंडळी गावी परतली. येथील देवस्थान तेव्हापासूनचे! आद्य पूजा-यांची नावे भोईर. म्हणून आजही पूजेचा मान गावातील भोईरांना मिळतो. पूर्वी येथे छोटेखानी मंदिर होते. गावक-यांनी त्याचा अलिकडेच जीर्णोद्धार केलाय. सध्या येथे सभामंडपासह टुमदार मंदिर उभे आहे. चोहोबाजूने सह्य पर्वताच्या डोंगररांगेनं वेढलेल्या कौठवाडीला अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेय.


येथील यात्रेचे वैशिष्टय म्हणजे पेटलेले कठे (घागरी)डोईवर घेऊन धुंद भक्तगण मध्यरात्रीपर्यं­त बिरोबाच्या चौथ-याभोवती फे-या मारत असतात. प्रत्येक फेरीगणिक किलो किलोने तेल भाविक मंडळी ओतत असतात. तापलेले हे तेल कठ्यांतून खाली ओघळते. ज्वालांनी लालबुंद झालेल्या आतील निखा-याने किंवा तप्त तेलाने भाविकांना इजा होत नाही असं समज परंपरेने चालत आलाय. तसे झाल्याचे दिसून आलेले नाही. एरवी निखार्‍याजवळ हात गेला तरी आपल्या हाताला चटका बसतो, या पार्श्वभूमीवर येथील हे दृश्य बघणा-याला काहीसे चक्रावून टाकते. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे.


'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणा-या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रान चाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात. सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण यात तेल ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात. दर वर्षी यात्रेत ३५-४० कठे असतात. एकाच वेळी ते चेतवले जातात. ज्यांच्या अंगात बिरोबा 'संचारतो' असे भक्तगण कठा डोईवर घेवून मिरवतात.


डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध चीत्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... मात्र फेऱ्यांमागून फेऱ्या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यं­त सुरूच असते... कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहातात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होवून जातात...


आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत रहातात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते...तो वाद्यांचा नाद कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी पाहावी...


लेखक प्राथमिक शिक्षक असून, अॅक्टिव टीचर्स फोरमचे(महाराष्ट्र) संयोजक आहेत.

Mobile No. 9422855151

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...