Friday, July 17, 2020

म्हणाल तर एक कागदाचा तुकडा पण...


शांताराम काळे
अकोले (अहमदनगर) : म्हणाल तर एक कागदाचा तुकडा... पण त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मिळाली की आयुष्य कस बदलून जातं याचे जीवंत उदाहरण म्हणजे रघु अर्थात रघुनाथ सोनवणे! आठवडी बाजारात भेळ खाताना हाती आलेली वृत्तपत्रातील जाहिरात बघून दिल्ली पादाक्रांत करणारा रघु आज स्वमेहनतीने व अपार कष्टाने देशाच्या राजधानीत राज्य सरकारच्या माहिती विभागात लेखापाल आहे.
घरची परिस्थिती बेताचीच! दोन वेळच्या जेवणाची ही भ्रांत. अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले येथील बुवासाहेब नवले पतसंस्थेत नोकरी करणारा रघु असाच एका संध्याकाळी आठवडी बाजारात 'हरी ओम भेळी'च्या हातगाडीवर गेला. त्याने भेळ घेतली. पण त्याला काय माहीत होते की ही भेळ त्याला थेट देशाच्या राजधानीत घेवून जाईल. वृत्तपत्राच्या कागदावर भेळ खात असताना रघुच्या नजरेस एक सरकारी जाहिरात पडली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयात नोकर भरतीची ती जाहिरात बघून रघु खूश झाला. 'उजडले भाग्य आता' अशीच काही अवस्था त्याची झाली. त्याने पात्रतेनुसार लिपिक टंकलेखक पदासाठी अर्ज केला. लेखी परीक्षा व मुलाखतीत उत्तम यश मिळवत त्याने या कार्यालयात आपले स्थान निश्चित केले. हाच शासकीय नोकरीतील त्याचा प्रवेश ठरला. दिल्ली हे शहर भल्या भल्यांना मानवत नाही. त्याला कारणे ही बरीच आहेत. ठळक कारणांमध्ये येथील विषम हवामान म्हणजे हिवाळ्यात टोकाची थंडी व उन्हाळ्यात टोकाचा उकाडा. बोल- चालीची भाषा हिंदी व देशाच्या राजकारणाची सुत्रच या शहरातून हलतात. या शहरातील लोकांमध्येही राजकारणाचे रंग भिनलेले अशा एकानेक प्रतिकुल परिस्थतीला तोंड देत रघुने आपलं प्रेमळ मन व माणुसकी साबुत ठेवत नोकरीतही यशस्वी प्रवास केला. लिपिक टंक लेखक पदावरून, वरिष्ठ लिपिक व आता थेट याच कार्यालयातील तिजोरीच्या चाव्या ज्याच्या हातात आहेत, असा लेखापाल म्हणून रघु हे जबाबदारी सांभाळत आहेत.
आपल्या कामा व्यतिरीक्त जनसंपर्क विभागात तो कामाला आहे. त्यातील प्रभावी जनसंपर्काचे गुण त्याने आत्मसात केले आहे. म्हणूनच नगरसह महाराष्ट्रातून दिल्लीत कामा निमित्त रघुच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम त्याच्याशी जोडला जातो.

संपादन : अशोक मुरुमकर

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...