Friday, September 18, 2026

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना


नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया! 


पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर रोप वाटिकेचा व्यवसाय उभारला, त्याचा विस्तार केला. हरित साधक बनून कुटुंबाला आर्थिक आधार देत दहा जणांना दिला रोजगार. एका महिलेच्या कार्य कर्तृत्वाची साक्ष देणारी जिद्दीची ही कहाणी विलक्षण प्रेरणादायी आहे...


अकोले, ता. १७ : शांताराम काळे


पतीची साथ हरपल्यानंतर अनेक स्त्रियांच्या आयुष्यात मोठे संकट उभे राहते. संसाराचा आधार, मुलांची जबाबदारी आणि आर्थिक गणित अचानक बदलते. मात्र, या संकटाने खचून न जाता त्यातून मार्ग काढत स्वतःच्या कष्टाने उभे राहण्याची जिद्द दाखविणाऱ्या हरित साधक असलेल्या शोभाताई मंडलिक यांची कहाणी ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी अशीच आहे. अकोलेजवळील माळीझाप येथील शोभाताईंनी पतीच्या साथीने सुरू केलेली ‘निसर्ग रोपवाटिका’ त्यांच्या निधनानंतरही नेटाने आणि निष्ठेने पुढे चालवली. उलट, संकटाच्या काळातच या व्यवसायाला नवी दिशा देत रोपवाटिकेचा विस्तार केला. आजमितीस दीड ते दोन लाख रोपांची निर्मिती करण्याची क्षमता त्यांनी निर्माण केली आहे. स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक आधार देतानाच पाच महिला आणि पाच पुरुषांना रोजगार उपलब्ध करून देणारी शोभाताईंची ही गोष्ट विलक्षण वेचक आणि वेधक आहे.


शोभाताईंचे लग्न १९९३मध्ये झाले, त्यांचे पती मच्छिन्द्र सखाराम मंडलिक वन विभागात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. वन विभागातील रोपवाटिकेचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. याच अनुभवातून त्यांनी शोभाताईंना रोपवाटिका सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून २००५ मध्ये केवळ २५ हजार रोपांच्या निर्मितीपासून ‘निसर्ग रोपवाटिके’चा प्रवास सुरू झाला. शोभाताईंना सुरुवातीला रोपांची निर्मिती करण्याचे फारसे ज्ञान नव्हते. दर्जेदार बियाणे कुठून आणायचे, पोयटा मातीची व्यवस्था कशी करायची, प्लास्टिक पिशव्या, पाणी व्यवस्थापन, किडींचा प्रादुर्भाव अशा अनेक अडचणी होत्या. स्वतःच्या ३२ गुंठे क्षेत्रात वाफे तयार करून ठिबक सिंचन आणि शॉवरद्वारे पाण्याची व्यवस्था केली. पती मच्छिंद्र त्यांना या कामात जशी सवड मिळेल तशी मदत करत होते. प्रचंड मेहनतीने काम सुरू केले मात्र पहिल्याच वर्षी किडींच्या प्रादुर्भावामुळे आणि अन्य कारणांमुळे नुकसान झाले. अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. या अपयशी अनुभवामुळे जिद्दी स्वभावाच्या शोभाताईंच्या प्रयत्नांना खीळ बसली नाही.


पहिल्या वर्षातील चुका समजून घेत त्यांनी जाणकारांकडून मार्गदर्शन घेतले. रोपनिर्मितीतील बारकावे समजून घेऊन काम केले. आता रोपे जोमदार वाढली होती मग पुढील वर्षापासून रोपवाटिकेचा विस्तार सुरू केला. हळूहळू शेतकऱ्यांचा आणि वृक्षप्रेमींचा विश्वास मिळत गेला आणि रोपांची मागणी वाढत गेली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळात ‘निसर्ग रोपवाटिका’ने मोठा पल्ला गाठला. निसर्ग नर्सरीचा नावलौकिक वाढला. रोपांना मागणी वाढू लागली. सगळे काही ठीकठाक सुरू असताना अत्यंत अनपेक्षितपणे या प्रवासाला ३० डिसेंबर २०२१ रोजी मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने पती मच्छिन्द्र मंडलिक यांचे निधन झाले. शोभाताईंसाठी हा आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंग होता. पतीची साथ गेली आणि त्याच वेळी एक मुलगा, दोन मुली, त्यांचे शिक्षण, घरची जबाबदारी आणि उभा केलेला व्यवसाय अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या.


अशा वेळी व्यवसाय बंद करण्याचा किंवा त्यातून मागे हटण्याचा विचार त्यांनी केला नाही. पतीने दिलेले मार्गदर्शन आणि त्यांच्या मेहनतीतून उभा राहिलेला व्यवसाय पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी केला. दुःखातून स्वतःला सावरत त्यांनी पुन्हा रोपवाटिकेची धुरा आपल्या हातात घेतली. राहुरी कृषी विद्यापीठ तसेच गुजरातमधून विविध जातींची रोपे आणून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. गुणवत्तापूर्ण रोपे माफक दरात उपलब्ध करून दिल्याने अकोले परिसरासह अहिल्यानगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातही ‘निसर्ग रोपवाटिके’ची ओळख निर्माण झाली. एकाच वेळी पाच, दहा, पंधरा हजार केशर आंब्याच्या रोपांची मागणी करणारे शेतकरी जोडले गेले. रोपे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात आली.


व्यवसाय वाढत असताना शोभाताईंनी उपलब्ध जागेचाही कल्पकतेने वापर केला. स्वतःच्या एक एकर जागेत आंबा, संत्री, सीताफळ, चिकू आदी फळपिकांची रोपे तयार केली जातात. कोल्हार-घोटी महामार्गालगत २५ गुंठे क्षेत्रात शेडनेट उभारून वांगी आणि विविध भाजीपाल्यांची रोपे तयार केली जात असून, भाडेतत्त्वावरील या जागेत हादग्याच्या फुलांची लागवडही केली आहे. औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे आणि शोभेच्या वनस्पतींची मोठी विविधता या रोपवाटिकेत पाहायला मिळते. ब्राह्मी, शतावरी, अक्कलकारा, अडुळसा, हादगा, शेवगा, कढीपत्ता, इन्सुलिन यांसारख्या औषधी वनस्पतींबरोबरच आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, संत्री, मोसंबी, जांभूळ, स्टार फ्रूट, ॲव्होकॅडो, ब्लॅक पेरू, लीची, चिंच, आवळा, ॲपल बोर आदी फळझाडांची रोपे तयार केली जातात. मोरपंखी, पेट्रा, ब्रेसीना, पामच्या विविध जाती, गुलाब, मोगरा, जाई-जुई, मधुमालती, जास्वंद, चांदणी तसेच स्नेक प्लांट, कुबेर प्लांट, जेड प्लांट आणि लकी बांबू यांसारख्या शोभेच्या झाडांनाही चांगली मागणी  आहे. या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.


शेतकऱ्यांचा विश्वास टिकविण्यासाठी रोपांचा दर्जा आणि आरोग्य याकडे शोभाताई विशेष लक्ष देतात. वनविभाग आणि कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा उपयोग करून त्यांनी रोपनिर्मितीतील अनेक अडचणी दूर केल्या. रोपांची निगा, पाणी व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि दर्जा टिकविण्याचे काम त्या स्वतः लक्ष देऊन करतात. ‘रोपांचे आरोग्य चांगले तरच शेतकऱ्यांचा विश्वास टिकतो,’ ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळेच रोपवाटिका वाढविण्याबरोबरच ग्राहकांशी असलेले नातेही त्यांनी जपले आहे. एखादे गिर्‍हाईक रोपे घेण्यासाठी निसर्ग नर्सरीत आले तर त्याच्याशी शोभाताईंचे वागणे बोलणे अत्यंत विनयशील प्रेमळ असते.


आज निसर्ग रोपवाटिकेत पाच महिला आणि पाच पुरुष काम करतात. पुरुषांना दररोज ५०० रुपये, तर महिलांना ३०० रुपये मजुरी दिली जाते. सर्व खर्च वजा जाता महिन्याला सुमारे ५० हजार रुपये नफा मिळतो. स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम होताना इतर दहा कुटुंबांनाही रोजगाराचा आधार देणे ही त्यांच्या प्रवासातील अतिशय उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण बाब आहे. रोपवाटिका त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक उभारणीचे साधन ठरलीच; पण त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांसाठीही विविध प्रकारच्या रोपांचा विश्वासू स्रोत बनली. गेली दोन दशके निसर्ग नर्सरी इथल्या हरित साधकांच्या विश्वासाची जागा बनली आहे!


घर आणि व्यवसायाची जबाबदारी सांभाळतानाच शोभाताईंनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मुलगा निशांत मंडलिक नाशिक येथे जीएसटी विभागात करसहायक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी श्रुती सिव्हिल इंजिनिअर आहेत. मोठी मुलगी सिव्हिल इंजिनिअर असून तिचे पती पुणे येथे मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. दुसरी मुलगीही सिव्हिल इंजिनिअर असून तिचे पती सिव्हिल इंजिनिअर आहेत. पतीच्या निधनानंतर घर आणि व्यवसायाचा भार सांभाळताना आई झुंबराबाई आहेर यांनी दिलेल्या खंबीर साथीचा शोभाताई कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. ‘माझ्या पाठीशी माझी आई सावलीसारखी उभी राहिली. त्यामुळे मला हजार हत्तींचे बळ मिळालं. घरची जबाबदारी सांभाळत रोपवाटिकेलाही पूर्ण वेळ देता आला,’ असे त्या सांगतात.


शोभाताईंचा प्रवास रोपवाटिकेच्या व्यवसायाच्या विस्ताराची गोष्ट नसून पती हयात असताना त्यांच्या साथीने सुरू केलेले काम पतीच्या निधनानंतर स्वतःच्या कणखरपणावर पुढे नेण्याची ही विलक्षण रोचक आणि त्याहून प्रेरणादायी कहाणी आहे. संकट आले म्हणून थांबायचे नाही, परिस्थिती प्रतिकूल बनली आहे म्हणून हार मानायची नाही आणि जबाबदाऱ्या वाढल्या म्हणून स्वतःच्या कार्यक्षमतेवर शंका घ्यायची नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या हातातील माती, रोपांची निगा आणि व्यवसायाकडे पाहण्याची दृष्टी यामधून त्यांचा आत्मविश्वास आणि चिकाटी सतत जाणवते.


आता या व्यवसायाला आणखी मोठी दिशा देण्याचा त्यांचा मानस आहे. सुमारे २० लाख रुपये खर्च करून शेडनेट उभारून त्यामध्ये इनडोअर प्लांटचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. आवश्यक साहित्य आणण्यात आले असून लवकरच प्रत्यक्ष उभारणी सुरू होणार आहे. पिशव्या भरणे, त्यात बिया लावणे त्या रुजवणे त्यांना खत पाणी देणे, निगा राखणे त्यांचे संवर्धन करणे... यात शोभाताईंचा वेळ जात असे. पतीच्या वियोगाचे दुःख झाडवेलींनी हलके केले आणि समृद्ध जगण्याचा मार्ग दाखवला असे शोभाताई कृतज्ञतापूर्वक सांगतात.


पतीच्या निधनानंतर आयुष्याने त्यांच्यासमोर अनेक प्रश्न उभे केले खरे मात्र जिद्दीस स्वभावाच्या चिकाटीने काम करणाऱ्या शोभाताईंनी हार मानली नाही. हात टेकले नाहीत. उलट, पतीने सोपविलेल्या रोपवाटिकेला स्वतःच्या जिद्दीची जोड देत ती अधिक विस्तारली. आज ‘निसर्ग रोपवाटिके’तील लाखो रोपांसोबतच अनेक स्वप्नेही वाढत आहेत. स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत इतरांच्या हाताला काम देणाऱ्या शोभाताई मंडलिक यांचा हा प्रवास ग्रामीण स्त्रीच्या कणखरपणाचा, आत्मविश्वासाचा आणि स्वावलंबनाच्या जिद्दीचा हिरवा प्रवास ठरला आहे. आज गतीने होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची प्रचंड हानी सुरू असताना निसर्ग रोपवाटिकेच्या माध्यमातून दरवर्षी हजारो रोपे तयार करून त्यांची लागवड करण्यासाठी शोभाताई महत्त्वाचं काम करत आहेत. हे जग आपसूक सुंदर होणार नाही ते सुंदर करण्यासाठी जिद्दीने काम करायला लागणार आहे.  पतीच्या मार्गदर्शनाखाली सहकार्याने आपल्या परीने हे जग हिरवं करण्याचं स्वप्न शोभाताईंनी बघितलं आणि ते साकार करण्यासाठी हरित साधक बनून त्या कार्यरत आहेत!  जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कल्पकतेतून मिळवलेले व्यावसायिक यश आणि उभा केलेला प्रपंच अनेक अनेकांसाठी प्रेरणादायी आहे...

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!  पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...