Sunday, July 19, 2026

गाईच्या गोठ्यात सुरू झालेल्या शाळेपासून निवृत्तीच्या उंबरठ्यापर्यंत... ३४ वर्षांच्या ज्ञानयज्ञाला भावपूर्ण सलाम

 गाईच्या गोठ्यात सुरू झालेल्या शाळेपासून निवृत्तीच्या उंबरठ्यापर्यंत... ३४ वर्षांच्या ज्ञानयज्ञाला भावपूर्ण सलाम








अकोले, ता. २० : "माझ्या संस्थेने आणि शाळेने मला दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीवरच माझ्या ३४ वर्षांच्या ज्ञानदान सेवेचा यज्ञ सार्थकी लागला. विद्यार्थी, पालक, संस्था आणि ही शाळा मी आयुष्यभर विसरू शकणार नाही," अशा शब्दांत भावना व्यक्त करत सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मीरा नरसाळे यांच्या डोळ्यांत आठवणी दाटून आल्या.


राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती मीरा नरसाळे व शिक्षक साहेबराव कानवडे यांचा संस्था, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक मारुती नरवडे, सरपंच संतोष बनसोडे, संस्थाचालक बापू काळे, माधव गाभाळे, मुख्याध्यापिका मंजुषा काळे, वर्षा शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.


दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका मंजुषा काळे यांनी दोन्ही शिक्षकांच्या प्रदीर्घ सेवेला उजाळा देताना, "वर्षानुवर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आयुष्याच्या नव्या पर्वात आनंद, उत्तम आरोग्य आणि मनःशांती लाभो. आता जबाबदाऱ्यांच्या धावपळीतून मुक्त होऊन आपल्या अपूर्ण स्वप्नांना पूर्ण करण्याची आणि प्रत्येक क्षण मनमुराद जगण्याची वेळ आली आहे," अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.


संस्थेचे सचिव शांताराम काळे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या स्थापनेपासूनच्या संघर्षाची आठवण करून दिली. "संस्थेचे पहिले अपत्य असलेल्या श्री स्वामी समर्थ कन्या शाळेला वाढविण्याचे, तिच्यावर जीवापाड प्रेम करण्याचे आणि मंदिराच्या पायातील दगड होण्याचे भाग्य श्रीमती मीरा नरसाळे यांना लाभले. त्यांच्या सोबत किरण भागवत, मंजुषा काळे, विलास महाले आणि कल्पना शिंदे यांचे योगदानही तितकेच मोलाचे आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून केलेले कार्य म्हणजे परमेश्वराचीच सेवा होय. शिक्षण सर्वजण देतात; पण स्वतःच्या अडचणी पोटात घालून, कष्ट सहन करत आयुष्यभर सेवा देणे प्रत्येकाला जमत नाही. माझ्या शिक्षकांनी ती तपश्चर्या केली. त्यामुळेच ३४ वर्षांचा हा वटवृक्ष आज बहरला आहे. तो जपण्याची जबाबदारी आता भावी शिक्षकांची आहे," असे ते म्हणाले.


यावेळी माधव गाभाळे यांनीही संस्थेच्या आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमाचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला सलाम केला.


सत्काराला उत्तर देताना श्रीमती मीरा नरसाळे यांनी संघर्षमय प्रवास उलगडला. "१९९२ साली गाईच्या गोठ्यात शाळा भरायची. गाई रानात गेल्या की वर्ग सुरू व्हायचा आणि त्या परतल्या की शाळा सुटायची. ना बाके, ना इमारत, ना कोणत्याही सुविधा. शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही जिद्दीने एक तप संघर्ष केला. शासनाकडून नव्हे, तर न्यायालयाने दखल घेतल्यानंतर शाळेला मान्यता मिळाली. या संपूर्ण प्रवासात संस्थेने दिलेली साथच आमच्या संघर्षाचे खरे बळ ठरली," असे सांगताना सभागृहातील अनेकांचे डोळे पाणावले.


सेवानिवृत्त शिक्षक साहेबराव कानवडे यांनीही जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, "दररोज सायकलवरून लांबचा प्रवास करून शाळेत पोहोचायचो. विद्यार्थ्यांना कधी परके मानले नाही; स्वतःच्या मुलांप्रमाणे त्यांच्यावर संस्कार करत ज्ञानदानाची सेवा केली. विद्यार्थ्यांचे यश हेच आमच्या आयुष्याचे सर्वात मोठे समाधान आहे."






कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले, तर प्रभारी प्राचार्य सतीश काळे यांनी आभार मानले. संघर्षातून उभी राहिलेली शाळा, शिक्षकांची निस्वार्थ सेवा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले अपार प्रेम यामुळे हा सत्कार सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला.

Tuesday, July 7, 2026

पश्चिम अकोल्यात अतिवृष्टीचा कहर; तीन तलाव ओव्हरफ्लो, भंडारदरा ५० टक्के तर मुळा धरणात झपाट्याने वाढ

 चौकट - भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून  भंडारदरा जलाशयात  ५६०४ (५०.७६%) दशलक्ष घनफुट साठा असून पन्नास टक्के जलाशय भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱयानी समाधान व्यक्त केले आहे तर वाकी जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून कोदणी वीज प्रकल्प (३४  मेगावाट )सुरू होऊन वीज निर्मिती चालू झाली आहे .मथळा :

पश्चिम अकोल्यात अतिवृष्टीचा कहर; तीन तलाव ओव्हरफ्लो, भंडारदरा ५० टक्के तर मुळा धरणात झपाट्याने वाढ

Writing

अकोले, ता. ७ : तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून तीन लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले आहेत. टिटवी (३०३.३२ दलघफू), देवहांडी-शिरपुंजे (९४.८० दलघफू) आणि कोथळे (१८२ दलघफू) हे तलाव ओव्हरफ्लो झाले असून भंडारदरा धरण ५०.७६ टक्के भरले आहे. मुळा नदीला मध्यम स्वरूपाचा पूर आल्याने मुळा धरणातील पाणीसाठाही २९.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या चोवीस तासांत घाटघर येथे तब्बल ३२१ मिमी (सुमारे १३ इंच) तर रतनवाडी येथे ३०२ मिमी (सुमारे १२ इंच) पावसाची नोंद झाली. सततच्या अतिवृष्टीमुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसर गारठून गेला असून डोंगरकड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांसह ओढ्यांनीही रौद्ररूप धारण केले आहे.

हरिश्चंद्रगड पर्वतरांगांतील पावसामुळे मुळा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. कोतुळजवळ सकाळी १३ हजार ८३६ क्युसेक असलेला विसर्ग दुपारी तीनपर्यंत वाढून ३७ हजार ८७५ क्युसेकवर पोहोचला. केवळ बारा तासांत मुळा धरणात ४६७ दलघफू पाण्याची आवक झाली.

पुराच्या पाण्यामुळे लहित खुर्द येथील मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने लहित खुर्द आणि लहित बुद्रुक या गावांतील संपर्क तुटला आहे. कोतुळ येथील प्राचीन कोटुळेश्वर महादेव मंदिरही सुमारे पाच फूट पाण्याखाली गेले आहे. कोतुळ व ब्राम्हणवाडा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही अतिवृष्टी कायम असून गेल्या चोवीस तासांत धरणात एक टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली. सायंकाळपर्यंत
























































धरणातील पाणीसाठा ५,६०४ दलघफू (५०.७६ टक्के) झाला होता.

प्रवरा खोऱ्यातील वाकी पाठोपाठ टिटवी तलावही भरून वाहू लागल्याने निळवंडे धरणातील आवकेत वाढ झाली आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळपर्यंत २,११६ दलघफू (२५.३८ टक्के) नोंदविण्यात आला.

दरम्यान, सततच्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरे घरातच बांधून ठेवावी लागत असून परिसरात थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. उबेसाठी अनेक ठिकाणी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. भाताची खाचरे तुडुंब भरली असून अनेक ठिकाणी भाताची रोपे वाहून गेली किंवा सडली आहेत. पाऊस ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!

 हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!  पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...