Sunday, July 17, 2016

ranbhaji

(no subject)

म. टा. वृत्तसेवा , अकोले - अकोले तालुक्यातील मुळा व भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील सह्याद्रीच्या डोंगर दर्यात रान भाज्या फुलल्या असून आदिवासी शेतकरी , महिला तरुण या भाज्या मिळविण्यासाठी डोंगररांगा धुंडाळताना दिसत आहे .मेथी, पालक, करडई, चुका, चाकवत, तांबडं पान...या पालेभाज्या सगळ्यांच्याच परिचयाच्या असतात. भाजीबाजारात त्या सहजपणे आणि विपुलतेनं मिळतातही....मात्र, याच पालेभाज्यांच्या तोलामोलाच्या कितीतरी रानभाज्या अशाही आहेत, ज्यांची आपल्याला माहितीही नसते...दोन-पाच नावं कानावरून गेलेली असतात तेवढीच. या रानभाज्या पावसाळ्यात; त्यातही खासकरून  याच महिन्यात, मोठ्या प्रमाणावर निसर्गात फुललेल्या असतात. नगर जिल्ह्यातील अकोल्याच्या वरच्या आदिवासी पट्ट्यात त्या मोठ्या प्रमाणावर आढळतात. डोंगर दऱ्यात दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांच्या संसाराला  आर्थिक आधार देणाऱ्या, पावसाळ्यात उगवण होणारया पौष्टिक रानभाज्या अकोले(जि.नगर) तालुक्यातील ठिकठिकाणच्या आठवडे बाजारात विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.रानमाळावर नैसर्गिक उगवून येत असलेल्या  या रानभाज्यांतून तालुक्यातील आदिवासी लोकांना आर्थिक आधार मिळतो. त्यात पाऊस लांबल्याने गतवर्षी पेक्षा यावर्षी खूपच उशिराने रानभाज्या बाजारात दाखल झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. अकोले तालुक्यातील जंगल भागातील कोळू, भडदा, चाई, आंबटवेल, फांज, कांचन, शिंदरमाकुडा, रानज्योत आदी रानभाज्या पहिला पाऊस झाला की, गवताच्या अगोदर जमिनीवर येतात. आदिवासींचा रानभाजी महोत्सव सुरू होतो. अडचणीच्या काळात या रानभाज्या आदिवासींना आर्थिक आधार देतात.चालू वर्षी जुलै महिन्याच्या दुसरया  आठवड्यात कोळू भाजी अकोले,कोतूळ,राजूर,समशेरपूर, गणोरे या बाजारामध्ये उशिरा दाखल झाली आहे. सर्वच भाजीपाल्याचे भाव उंचावल्याने यावर्षी कोळू भाजी २५ रुपये जुडीप्रमाणे विकली जात आहे. कोळू भाजी म्हणजे शास्त्रीय भाषेतील जाणकार मुसळीची भाजी म्हणतात. ही बहुगुणी व आरोग्यवर्धक आहे. या भाजीचा हंगाम वर्षातून फक्त दोन ते तीन आठवडे असतो. या कोळूच्या आरोग्यवर्धक भाजीमध्ये कार्बोहाड्रेट ४२ टक्के, प्रोटीन ८.५, सॅपोजेनिन १.७, सॅपोनिन, सोडीयम, पोटॅशइम, कॅल्शइम, मॅसेशियम, झींक, कॉपर अन्य खनिजे विपूल असल्याने कोळू भाजी बलवर्धक, शक्तिवर्धक त्रिदोष हारक असते. भाजीच्या सेवनाने हृदय, पोट, मुत्राशयाचे आजार बरे होतात. तसेच कावीळ, मूळव्याध, रक्तदाब, रक्तशुध्दी, वंध्यत्व दूर होते,अशी माहिती अकोले येथील वनौषधी अभ्यासक रामलाल हासे यांनी दिली.कोट - नीलिमा जोरवर (रान भाज्या अभ्यासक )कंदवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीय व झुडूपवर्गीय असं या भाज्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. त्यात प्रामुख्यानं चाई, कोळू , तांदुळचा, कोरडू, भारंगी, दिवा, चीचू, कैली, बडदा, आदी रानभाज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक पौष्टिक घटक पालक किंवा हिरव्या भाज्यांमध्ये आहे, असं आपण मानतो. शिवाय, योग्य पद्धतीनं शिजवल्यावर त्या चवदारही लागतात; परंतु याहूनही समृद्ध व पौष्टिक असलेल्या या रानभाज्या निसर्ग आपल्याला फुकटात पुरवत असतो. उदाहरणार्थ ः गुळवेलाची भाजी. हिच्यामुळं आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. चाईच्या मोहराच्या भाजीत उच्च प्रथिनं असतात. ही भाजी चवीला पनीर भुर्जीसारखीच लागते. मुरुबाठी नावाच्या बाभळीच्या कोवळ्या शेंगाची भाजीची चव तंतोतंत मटणासारखीच असते.

प्रत्येक भाजीची चव व गुणधर्म अर्थातच वेगवेगळे आहेत व त्या बनवण्याची पाकक्रियाही निरनिराळी आहे. या भाज्या शेतात पिकवल्या जात नाहीत. त्या त्यांच्या नैसर्गिक ठिकाणी म्हणजेच राना-वनात, डोंगरात, नदी-तळ्यात निसर्गात उगवतात. त्यांचं कीडनियंत्रणही निसर्गतःच होतं. उत्पादनखर्चही काहीच नाही. पौष्टिक, ताज्या, सकस व संपूर्ण सेंद्रिय अशा या रानभाज्या निसर्गच माणसाला देत असतो; म्हणूनच या भाज्यांचं महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवं. या रानभाज्यांपैकी काहींमध्ये औषधी गुणधर्मही आहेत उदाहरणार्थ ः भारंगीची भाजी ही पोटांच्या विकारांवर हमखास गुणकारी असते. आजही ठाकर ,महादेव कोळी समाज या भाज्यांचा उपयोग त्यांच्या आहारात करतातच. वराहकंद या फळवर्गातील रानभाजीचा हलवा केला जातो. दुधी भोपळा, गाजर इत्यादींसारखाच. हमीदकंद नुसताही खातात. असे एक ना अनेक कितीतरी प्रकार आणि कितीतरी उपयोग. तुलनेनं स्वस्त, औषधी, पौष्टिक, संपूर्ण सेंद्रिय असल्यामुळं रानभाज्यांचा वारसा आपल्यासाठी खूपच उपयुक्त आहे.सोबत फोटो - रान भाज्या , आंबट वेळ , तेरडा , दिवा , कोळू 
7 Attachments

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...