Thursday, March 9, 2017

ऋतुचक्र नेहमीच प्रभावी आणि आकर्षित करणारे असते. फाल्गुन मास संपण्यापूर्वीच चैत्राची चाहूल लागते.
गुढीपाडव्याला चैत्र नक्षत्र सुरू होईल. मात्र त्याच्या पाऊलखुणा आजपासून जाणवू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी संपूर्ण पाने गळून निष्पर्ण झालेले वृक्ष नव्या दिमाखात जणू नवा आविर्भाव, नवा पोषाख करून उभे राहिले.
गगनाशी स्पर्धा करणा-या उंच वृक्षांच्या माथ्यावर जणू नवा भरजरी मुकुट परिधान करावा असे जुनाट वृक्ष दिसू लागले.. पोपटी, हिरव्या आणि तांबडय़ा, गुलाबी रंगांची छटा असलेली पालवी फुटू लागली आहे. वाढत्या उन्हाबरोबरच आणि वातावरणातील उष्म्याबरोबरच ही पर्णसंपत्ती वाढू लागली आहे.
निसर्ग हा नव्या कलेने आणि नव्या ढंगाने विविध रंगांची उधळण करत असतो. मृगनक्षत्राला दिसणारे निसर्गाचे रूप वेगळे असते. ग्रीष्मातील निसर्ग वेगळा असतो. ऋतुचक्राच्या या फे-यात चैत्रातील निसर्ग पाहण्याजोगा असतो. फाल्गुन मासात पानगळतीच्या वृक्षांनी जणू आपली वल्करे भूमीवर ठेवून नि:शस्त्र झाल्यासारखा भास होतो.
मात्र हेच वृक्ष त्यानंतर आठ-पंधरा दिवसांतच नवी पालवी धारण करतात. ग्रीष्म ऋतूत आपल्या छायेखाली अनेक जीवांना शीतलता देण्यासाठी जणू ते सज्ज होतात.  या वृक्षांपैकी ‘कोसब’ हा वृक्ष गेल्या आठ दिवसांपासून तांबडय़ा, भगव्या रंगांची पालवी परिधान करू लागला आहे.
संपूर्ण वृक्षावर एकाच वेळी आलेली ही पालवी पाहिल्यानंतर जणू लाल रंगाचा पुष्पबहार वृक्षावर झाला आहे, असे वाटते. कधीही फूल न येणारा कोसब कदाचित कोवळय़ा गुलाबी आणि दाट तांबडय़ा रंगाच्या पालवीनेच स्वत:ला समाधानी मानत असावा. कोसबाप्रमाणेच ‘हेळा’ वृक्षही चैत्राच्या सुरुवातीलाच बहरू लागतो.
उंच आकाशाकडे वाढलेल्या, खोड पांढ-या रंगाचे असलेल्या हेळय़ाला पूर्ण पानगळती असते. पाने गळल्यानंतर निर्जीव वाटणारा हा वृक्ष चैत्राची चाहूल लागताच बहरू लागतो. उंच गेलेल्या फांद्यांच्या शेंडय़ावर पालवी फुटते. ही पालवी जणू राजमुकुटाप्रमाणे भासू लागते. ‘तुरा खोविला कस्तुरी मंजिरीचा’ अशीच जाणीव या वृक्षाकडे पाहिल्यानंतर होते.
चैत्रातल्या या पालवीने नवीन उमेद निर्माण होते. नवा जगण्याचा अर्थ हा ऋतू प्राप्त करून देतो. एक आशा आणि सर्व संपल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वी इतकेच होते ते वैभव निर्माण करण्याची असलेली ऊर्मी हा ऋतू बहाल करतो. नवा साज आणि नवी आशा हा ऋतू निर्माण करतो.
गमावलेला सर्व आनंद पुन्हा मिळविण्याचा आत्मविश्वास या ऋतूकडून मिळतो. प्रत्येक जीवाला हा ऋतू आनंद देतो. याच पालवीत कीटक आणि वेगवेगळे जीव आपली वाटचाल सुरू करतात. या चैतन्यमयी ऋतूचे आगमन निसर्गालाही हवेसे वाटू लागले आहे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...