Saturday, April 14, 2018

हरहुन्नरी आणि कार्यमग्न शिक्षक डॉ. सुधीर कुंभार* यांच्या कामाविषयी *भाऊसाहेब चासकर* यांनी लिहिलेला लेख....

दैनिक पुण्यनगरीच्या प्रवाह पुरवणीत  *शिक्षणाची बेटं* सदरात *हरहुन्नरी आणि कार्यमग्न शिक्षक डॉ. सुधीर कुंभार* यांच्या कामाविषयी *भाऊसाहेब चासकर* यांनी लिहिलेला लेख....

*बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचा ‘प्रयोग’शील शिक्षक!*

_*मुलांच्या जीवनाशी शिक्षण जोडत कृतीशील पद्धतीने विज्ञान शिकवणारा खराखुरा ‘प्रयोग’शील शिक्षक, गावागावांत जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झपाटून काम करणारा विज्ञान प्रसारक, पर्यावरण रक्षणाविषयी जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने तब्बल आठशेपाच आठवडे अविरतपणे ‘निसर्गज्ञान’ भित्तीपत्रक तयार करणारा तळमळीचा पर्यावरणवादी कार्यकर्ता, डोंगराला आग लागल्यावर ती बघून हताश हळहळ व्यक्त करण्यात वेळ न दवडता काट्याकुट्यांतून वाट काढत धावत जाऊन हातापायाला चटके बसेपर्यंत आग विझवणारा संवेदनशील 'वनरक्षक', पक्षी निरीक्षक, झाड-झाडोरा, रानफुले, साप, किटक, फुलपाखरे, प्राणी यांची विशेष माहिती असलेला निसर्गातल्या अरण्यलिपीचा भाष्यकार, एकशे पाच महिलांच्या जटा सोडवताना त्यांच्या अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरणारा अवलिया...*_ पाटण(सातारा) तालुक्यातल्या ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक असलेले डॉ. सुधीर कुंभार म्हणजे एक बहुपेडी व्यक्तीमत्त्व आहे. एक शिक्षक समाजात किती प्रकारे काम करू शकतो, याचे जितेजागते  नवल वाटावे, असे उदाहरण आहेत कुंभार सर.

रयत शिक्षण संस्थेत गेली २८ वर्षे कार्यरत असलेल्या कुंभार यांच्या नोकरीची सुरुवात झाली पुणे जिल्ह्यातल्या वडगाव मावळ येथे. चळवळ्या स्वभाव आणि सतत कार्यमग्न असलेल्या माणसांपैकी आहेत कुंभार. वेगवेगळ्या गोष्टी करताना त्यांच्या प्रयत्नांमधले सातत्य केवळ थक्क करणारे आहे. विज्ञान विषय पाठ्यपुस्तक आणि प्रयोगशाळेतल्या भिंतीत सीमित न ठेवता तो परिसराशी आणि मुलांच्या जगण्याशी जोडून शिकवण्याचा दृष्टिकोन त्यांना महाविद्यालयीन जीवनात मिळाला होता. स्वत:चे अनुभव आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची भर घालत त्यांनी निरनिराळे प्रयोग सुरु ठेवले आहेत.

*होळी बचाव आंदोलन:*

पक्षीमित्र किरण पुरंदरे यांच्या मदतीने स्टार्क नेचर क्लबची स्थापना करून १९९०च्या दशकात गळ्यात कॅमेरा अडकवून, पक्षी निरीक्षणाची दुर्बीण घेऊन हा माणूस मुलांना जंगल वाचायला शिकवत होता. जुना स्लाइड प्रोजेक्टर मिळवला. स्लाइड बनवायचे तंत्र आत्मसात केले. निसर्ग-पर्यावरण विषयाच्या सुमारे ८०० स्लाइड बनवल्या. स्लाइड शो आवडीने शिकण्याचे साधन बनले. एलसीडी प्रोजेक्टर आल्यावर तो घेतला. स्टार्क नेचर क्लबच्या माध्यमातून गावोगावी होळीविषयी जागृती केली. पाच दिवसांच्या होळीत झाडांची कत्तल होत असे. पर्यावरणाचे नुकसान गावागावांत जाऊन लोकांना समजून सांगितले. सभा घेतल्या, मुलांनी असंख्य पोस्टर्स लावले, पथनाट्ये केली, गाणी म्हटली. लोकांना ज्या ज्या भाषेत कळते ते सारे केले. सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर लोकांना ते पटले. पाच दिवसांची होळी एका दिवसावर आली!

मार्च २००८मध्ये हरित सेनेच्या मुलांनी परीसरातल्या १० गावांत जनजागृती करून ८०० पुरणपोळ्या, २०० नारळ, ११२० लाकडाचे मोठे ओंडके आणि ३०० गोवऱ्या वाचवल्या होत्या. २०१६मध्ये हेच काम ६५ गावांत विस्तारले. ३०७० पुरणपोळ्या, १२०० नारळ, २८००मोठे ओंडके आणि ४००० गोवऱ्या वाचवल्या. या नोंदी राष्ट्रीय हरित सेनेतल्या मुलांनी ठेवल्या आहेत. बिबट्या आणि माणसाचा संघर्ष याविषयी जागृती केली. वन्यजीवांचे संरक्षण करण्याविषयी मुले प्रयत्नरत आहेत.

*सेव पेपर सेव ट्रीज :*

कागद वाचवणे प्रकल्प असाच आणखीन एक हटके उपक्रम. लाकडाच्या लगद्यापासून कागद तयार होतो. जेवढे कागद जास्त वापरू तितकी जास्त झाडे तोडली जातात, हे समजून सांगितल्यावर मुलांना ते पटले. वर्गपाठाच्या वहीत समासापासून लिहिणे, कोरी जागा न सोडता लिहिणे अशा काही गोष्टी सुरू झाल्या. मात्र त्या अपुऱ्या होत्या. जुन्या वह्या रद्दीत विकण्याआधी त्यातली कोरी पाने शाळेत जमा करायचे आवाहन मुलांना केले. हरित सेनेच्या मुलांना कागदांपासून वह्यांची आकर्षक बायडिंग करायचे प्रशिक्षण दिले आहे. पानांपासून शाळेत हजारभर वह्या तयार होतात. प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर ‘सेव पेपर सेव ट्रीज’ असा शिक्का मारलेला असतो. गरीब मुलांना या वह्या मिळतात. पैसे आणि कागद दोन्हीची बचत होते.

*वैज्ञानिक दृष्टिकोन पंधरवडा:*

रॉकेल वापरल्याने घरात साप निघतात, म्हणून रॉकेल न वापरणाऱ्या डोंगरवाडी गावातल्या प्रथेविषयी त्यांना समजले. तिकडे जाऊन लोकांचे मन वळवण्यात कुंभार यशस्वी झाले. यात सातत्य ठेवत कुंभार यांनी स्वत:ला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीसोबत जोडून घेतले. यातून त्यांच्यातला शिक्षक समृद्ध होत गेला. विज्ञान शिक्षणाचा गरजाधिष्ठीत दृष्टिकोन विकसित व्हायला मोठी मदत झाली. तासिकांचा वेळ अपुरा पडू लागला. वेळापत्रकाव्यतिरिक्त ‘वैज्ञानिक दृष्टिकोन पंधरवडा’ ही अफलातून कल्पना पुढे आली. १९९२ पासून हा उपक्रम सुरू आहे. अंधश्रद्धा, तंत्रज्ञान, आरोग्य, ऊर्जा, पाणी, शेती, पर्यावरण या विषयांवर फोकस ठेवलेला असतो. स्लाइड शो, फिल्म शो, चर्चा, कृतीसत्रे, उपकरणे, जोड-तोड, निरीक्षण, सर्वेक्षण-विश्लेषण असे उपक्रम सुरु असतात. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीत या पंधरवड्यात विज्ञान प्रसारक, शास्रज्ञ, पर्यावरण क्षेत्रातले कार्यकर्ते, साहित्यिक, शेतकरी येऊन मुलांसोबत बोलतात. झाडांवर कलम करणे, निर्धूर चूल तयार करणे, पर्यावरण स्नेही मूर्ती बनवणे, प्रतिकृती तयार करणे, उपकरण-वस्तू तयार करणे आदी गोष्टी होतात. प्रयोग करणे, निरीक्षण, तर्क करणे, पृथ्थ:करण करणे, निष्कर्ष काढणे, प्रश्न विचारणे, उत्तरे शोधणे, ज्ञानाचे उपयोजन करणे, दुसरा पर्याय शोधणे, क्रमाने कृती करणे अशा गोष्टी करण्यासाठी मुलांना आवश्यक ते भरपूर साहित्य आणि संधी निर्माण केल्या. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन एका दमात येत नाही. म्हणून गेली २६ वर्षे यात सातत्य ठेवले आहे.

ग्रीन हाउस, पॉली हाउस, डेअरी, पोस्ट ऑफिस, टेलिफोन एक्सचेंज, वीज वितरण कंपनी, विविध वास्तुनिर्मितीचे केंद्रे, शेती, वनोद्याने अशा असंख्य ठिकाणांना भेटी देण्याचा सिलसिला सुरु झाला. ‘चार्वाक’ नावाचे विज्ञानविषयक हस्तलिखित कुंभार गेली १५ वर्षे काढत आहेत. त्यात मुले क्षेत्रभेटींचा अहवाल लिहितात. पिण्याचे पाणी, शेती-शेतकरी, महिला आणि पुरुष यांची व्यसने, इलेक्ट्रीकल वस्तूंचा वापर, ऊर्जा बचत, दुचाकी वाहने, आठवडे बाजार, घरांचा सर्वे, खाद्य पदार्थ, आरोग्यदायी वर्तन सवयी, दळणवळण आणि भौतिक सोयी सुविधा, लसीकरण, अंधश्रद्धा आदी विषयांवर केलेले सर्वे समजून घेण्यासारखे आहेत. प्रश्नावली तयार करण्यापासून विश्लेषण करून निष्कर्ष काढणे या गोष्टी मुलेच करतात. यातून संशोधन पद्धतीचा परिचय मुलांना झाला आहे. का, कसे, कोण, कधी अशा ‘क’कारांचे उत्तर शोधताना मुलांनी केलेले विज्ञानविषयक प्रकल्पही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. राज्य-राष्ट्रीय पातळीपर्यंतचे विज्ञान प्रदर्शन आणि इन्स्पायर अॅवार्ड यात कुंभार यांच्या मुलांनी शाळांचे नाव कमावले आहे. सध्या अनेक माध्यमिक शाळांत प्रयोगशाळा सहायक नाहीत. इथेही अडून न पडता कुंभार यांनी डोके लावले आहे. प्रयोगांचे प्रात्यक्षिक आणि सादरीकरण यासाठी मुलांची टीम तयार केलीय. शिकताना मुलांना कोणत्या अडचणी येतात, कोणत्या गोष्टी केल्याने मुले आनंदाने शिकतात, हे नेमके हेरून त्या गोष्टींवर भर देताना स्वत: ती कौशल्ये आत्मसात केली. त्यातून क्षेत्रभेटींचे महत्त्व लक्षात आले.

*निसर्गज्ञान भित्तीपत्रक :*

पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने निर्माण झालेली आणीबाणीसदृश्य स्थिती लक्षात घेऊन कुंभार यांनी विद्यार्थी आणि समाजात जाणीवजागृतीसाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न चालवले आहेत. गंभीर संकट बघता ‘पर्यावरण रक्षण काळाची गरज’ या विषयावर केवळ निबंध किंवा वक्तृत्व स्पर्धा घेऊन उपयोगाचे नाही, हे कुंभारांसारख्या चाणाक्ष कार्यकर्त्या शिक्षकाच्या लवकरच लक्षात आले. पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणे, त्यामुळे निसर्गात होणारे बदल, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, पर्यावरण रक्षण-संवर्धनासाठीचे उपक्रम, कृती याविषयी ते विचार आणि कृतीमग्न असतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ७ जानेवारी १९९८ रोजी स्वत:च्या जन्मदिवशी ‘निसर्गज्ञान’चा अंक सुरू केला. सलग ८०५ आठवडे कुंभार हे भित्तीपत्रक काढत आहेत. शाळेतली मुलेही आता तयार झाली आहेत. सातत्य ठेवून सुरु असलेला हा उपक्रम ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड’मध्ये नोंदवला गेलाय! मुलांनी लिहिलेला मजकूर, छायाचित्रे, वृत्तपत्रातली बातमी-लेख, बसस्थानक, पर्यावरणविषयक घटना-घडामोडी याचा समावेश अंकात असतो. बसस्थानक, रेल्वे स्थानक, चावडी, शाळां-महविद्यालयांत किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी भित्तीपत्रक डकवले जाते. आजवर कोणीही ते फाडलेले नाहीये. महाविद्यालये, शाळा, वन विभाग, स्वयंसेवी संस्था ते घेऊन जातात. कुंभार सरांनी आजवर यासाठी ८० हजार खर्च केले आहेत.

*जटा निर्मूलन :*

जटा निर्मूलन हा उपक्रम कुंभार यांच्या मुलखावेगळ्या व्यक्तीमत्त्वाचा परिचय करून देणारा आहे. वडगाव मावळ येथे कार्यरत असताना शाळेत वैज्ञानिक दृष्टिकोन पंधरवडा सुरू होता. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम झाल्यावर शाळेतल्या मुलींनी गावातल्या जटाधारी महिलेचे घर गाठले. दुसऱ्या दिवशी जटा सोडवायला त्या महिलेला घेऊन आल्या. जटा सोडवायचा अनुभव नव्हता. चुका करत शिकायचा स्वभाव कामी आला. काही विद्यार्थिनी आणि मित्रांच्या मदतीने पाच तासांच्या प्रयत्नांतून त्या जटा सोडवल्या. जटा कापायला अर्धा तास पुरेसा होता. केस कापल्यावर चेहरा विद्रूप दिसतो, गावात फिरणे अवघड होऊन बसते, म्हणून महिला केस कापायला तयार होत नाहीत. प्रत्येक जटाधारी महिलेचा प्रश्न वेगळा असतो. अनेकदा भेटून मानसिकता तयार करायला लागते. जटा सोडवल्यावर देवीचा कोप होईल अशी भीती घातली जाते. अशा वेळी परिस्थिती नीट हाताळायला लागते. जटांचा कालावधी, स्थिती, कुटुंबाची पार्श्वभूमी, तिचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य अशा बाबींचा साकल्याने विचार करायला लागतो.

जटाधारी महिलांचे हिमोग्लोबीन सरासरी सातच्या आत असल्याचे कुंभार सांगतात. डोकेदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अर्धशिशी यासोबत मानसिक आजारांच्या या महिला शिकार झालेल्या असतात. आजवर १०५ महिला आणि अविवाहित मुलींच्या जटा सोडवताना त्यांना धीर देण्याचे काम सुधीर करत आहेत. वाढलेल्या जटांमुळे मुलींची लग्न होत नव्हती, अशा सात मुलींची लग्न झालीत. मुली आणि महिलांच्या अंधारलेल्या आयुष्यात उजेड पेरणारा शिक्षक अशी नोंद इतिहासाने घेतलीय. जटा निर्मूलनावर आधारित ‘जटा रिमुव्हल मुव्हमेंट अन्फोल्डींग द जिंडर इन पोलिटिको रिलीजीअस सोसायटी’ हे पुस्तक लंडनस्थित केंब्रीज स्कॉलर प्रकाशनाने केले आहे. त्याची गोष्ट मोठी रंजक आहे. जर्मनीतल्या स्कॉलर या प्रकाशन संस्थेनेही याविषयी पुस्तक केलेय. इंग्रजीतल्या दोन पुस्तकांनंतर लवकरच मराठीत जटा निर्मूलनावर पुस्तक येणार आहे. शाळेतला एखादा उपक्रम समाजातल्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरांच्या उच्चाटनाकडे कसा घेऊन जातो, याचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरावे!

*ज्ञानलालसा :*

आवडीच्या विषयातले ताणेबाणे जाणून घ्यायची जिज्ञासा कुंभारांच्या ठायी आहे. पीएचडी केल्याने माणसाची हुशारी वाढते वगैरे असे नसले तरी अभ्यास आणि मांडणीला शिस्त यावी म्हणून त्यांनी २०१०मध्ये पर्यावरणशास्रात पीएचडी केली. कामात स्पष्टता यायला मदत झाली. पर्यावरण संरक्षणविषयक उपक्रमांचा पर्यावरण जाणीवांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास कुंभार यांनी केला. कामाचा अनुभव होताच शिस्तीने भरपूर वाचन केले. त्यांच्या घरातल्या ग्रंथालयात सुमारे दोन हजार पुस्तके आहेत. पर्यावरण, शिक्षण आणि समाजशास्र यांचा तुलनात्मक चिकित्सक विचार कुंभार यांनी केला. फिलीपाईन्स विद्यापीठात पर्यावरण संरक्षणासाठी शाळा आणि गाव पातळीवर केलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करायची संधी डॉ. कुंभार यांना मिळाली. ‘वणवा निर्मूलन मोहीम’, ‘राष्ट्रीय एकात्मता आणि युवक’, ‘गांडूळ: शेतकऱ्याचा भरवशाचा मित्र’, ‘पर्यावरण मित्र होऊया’, अशी पुस्तके/पुस्तिका नागनालंदा प्रकाशनाने केली आहेत. पर्यावरण आणि प्रदूषण या विषयावरील पुस्तक मॅकमिलन प्रकाशनाने इंग्रजी आणि मराठीत केले आहे.

*‘रोड किल्स’विषयी जागर :*

कराड ते ढेबेवाडी असा २५ किलोमीटरचा प्रवास कुंभार रोज करतात. हा प्रवास कंटाळवाणा न मानता तो अभ्यास विषय बनवलाय. रस्त्यावर वाहनांखाली चिरडून, धडक बसून मरणाऱ्या प्राणी-पक्षांच्या अभ्यास सुरू आहे. गेल्या १३ वर्षांत  ८५९ सस्तन प्राणी, १ हजार ५४ सरपटणारे प्राणी, ६७५ पक्षी असे एकूण २ हजार ५८८ प्राणी आणि पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जखमी प्राणी-पक्ष्यांवर उपचार केले आहेत. बेदरकारपणे वाहने चालवताना प्राणी मरताहेत. हे बघून त्याविषयी केवळ हळहळ व्यक्त करून न थांबता ‘रोड किल्स’ विषयावर स्वयंसेवी संस्था, संघटना, वन विभाग यांच्या मदतीने 'सावध ऐका निसर्गाच्या हाका' म्हणत शाळा, महाविद्यालयांतून स्लाइड शो, भाषणे, प्रदर्शन, पथनाट्ये यातून प्रबोधन सुरू केले.

*कार्यमग्न:*

कुंभार यांच्या घरात हातोडी, पकड, करवत, पान्हे, नटबोल्ट, स्क्रूड्रायवर, शोल्डरगन पडलेले असतात. प्लंबिंग, फिटिंग, वायरिंग, पाइपिंग तसेच रंगरंगोटीची काम त्यांना जमतात. मुलांना अशी कामे करता आली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो. घरात, शाळेत, समाजात... कुठे ना कुठे काही ना काही कामात गुंतलेला 'वर्कोहोलिक' माणूस आहे हा! जीवनकौशल्ये शिक्षणातून हरवल्याची खंत त्यांच्या मनात आहे.

सामान्यपणे आपण बघतो. लेखक, संशोधकांचे विश्व वेगळे असते. सामाजिक चळवळीपासून ते स्वतःला फटकून लांब ठेवतात. मात्र कुंभार यांच्यासारखा संशोधक जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करू लागतो, तेव्हा कामाची व्याप्ती कशी भराभर वाढत जाते आणि केवढा मोठा परिणाम त्यातून साधला जातो हेच कुंभार यांनी सिद्ध केलेय.

अनेक विज्ञान शिक्षक, संशोधक कर्मकांडात अडकलेले असताना कुंभार यांची जीवनशैली विज्ञाननिष्ठ, पर्यावरणस्नेही आहे. कुंडली बघण्यापासून जागरण गोंधळ, सत्यनारायण, वास्तूशांती असली कर्मकांडं त्यांनी केली नाहीत. प्लास्टिक पिशव्या ते वापरत नाहीत! पर्यावरणविषयक समस्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक, पत्रकार, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, राजकारणी, वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी कुंभार 'माहितीचा स्रोत' बनले आहेत. समजून-उमजून काम करणाऱ्या शिक्षकांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी रयत विज्ञान परिषदेच्या माध्यमातून ते प्रयत्नशील आहेत.

*भाऊसाहेब चासकर,*
📱9422855151
_लेखक नगर जिल्हा परिषदेच्या बहिरवाडी येथील शाळेत शिक्षक आहेत._
मोबाइल- ९४२२८५५१५१

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...