Friday, April 20, 2018

कांताबाई सातारकर...

म . टा . वृत्तसेवा , संगमनेर -देशातल्या प्रत्येक राज्याला काही लोककला लाभल्या आहेत. या प्रत्येक लोककलेला कमीअधिक प्रमाणात लोकाश्रय मिळाला
आहे. महाराष्ट्र मात्र याबाबतीत इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक समृद्ध आहे. इथे कितीतरी लोककला बहरल्या आहेत. यापैकी
सर्वाधिक लोकप्रियता मिळालेला लोककलाप्रकार म्हणजे तमाशा. मराठी लोकरंगभूमीवर ज्या ज्या कलाकारांनी आपल्या
कार्यकर्तृत्वाची छाप सोडली आहे त्यातील खूप वरचे नाव म्हणजे कांताबाई सातारकर.
गुजरातमधील बडोदा जिल्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्या
पोटी जन्मलेया कांताबाईना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आईवडील सातारा या मूळगावी आले. इथे
कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्र मैत्रिणींसमोर नृत्य सादर करता करता त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी
मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरु झाला. छोट्यामोठ्या तमाशात काम करीत त्या खूप मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन
पोहोचल्या. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून करता करता त्यांच्यातील अस्सल
कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक
झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात
पोहचली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जाऊ लागला.
१९६४ मध्ये अचानक तुकाराम खेडकरांचे निधन झाले. आणि शब्दशः वनवास म्हणता येईल अशी अवस्था कांताबाईंच्या
आयुष्यात आली. पण तमाशाच्या बोर्डावर शिवाजी संभाजी या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई खऱ्या आयुष्यातही तशाच
धाडशी होत्या. कधीकाळी पतीच्या म्हणजे स्वतःच्याच तमाशा फडात काम केलेल्या कांताबाईंना दुसऱ्याच्या फडत काम करणे
रुचत नव्हते. त्यांनी जिद्दीने पै-पै जमवून स्वतःचा तमाशा फड उभा केला. एका स्त्रीने परंपरेने वाट्याला आलेला सुतळीचा
तोडाही न घेता स्वतःच्या हिमतीवर उभा केलेला आणि पुढे अमाप लोकप्रियता मिळून आजही तेव्हढ्याच दिमाखात उभा
असलेला एकमेव तमाशा फड हा कांताबाईंचाच.
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना
कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. आज त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली
अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित,अभिजित,नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम
असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे. त्यांच्या जीवनावर डॉ संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या
आजवर चार आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला जीवन गौरव
पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला आहे. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना
तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लाऊन सिने, नाट्य सृष्टीतील मान्यवरांसाठी
तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमान त्यांना मिळाला आहे. असंख्य पुरस्कार, असंख्य मानसन्मान मिळवलेल्या या महान
कलावतीला मात्र रसिकांचे प्रेम हाच आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान वाटतो. मात्र काही तरी खंतही त्यांच्या मनात सलत आहे त्यांच्याशी बातचीत करताना त्या म्हणाल्या   मी कांताबाई सातारकर, गेली ६५ वर्षे तमाशा क्षेत्रात कार्यरत आहे. माझे पती (कै) तुकाराम खेडकर यांची
तमाशामहर्षी म्हणून अवघ्या मराठी मुलखात ख्याती होती आणि आहे. खरतर तमाशा ही महाराष्ट्राची अस्सल
लोककला पण पण ज्यांच्यासाठी तमाशा नाही आणि ज्यांचा तमाशाशी दुरान्वये संबंध नाही अशा लोकांनी उच्चभ्रू
वर्तुळात तमाशाला बदनाम केले. तमाशा म्हणजे काहीतरी वाईट अशी हाकाटी पिटली. यामुळेच सरकारी
पातळीवरदेखील तमाशाबद्दल एक अनास्था दिसून येते. जगात असे एखादे क्षेत्र आहे का जिथे कोणत्याही अपप्रवृत्ती
नाहीत, थोडेबहुत वाईट लोक नाहीत ? पण मग तमाशालाच आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे केले जाते.
मी १९५० पासून तमाशात काम करते, आज माझे वय ७८ वर्षाचे आहे. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्री वेश
परिधान केला त्याच सगळ्या महाराष्ट्राने कौतुक केले. या कलाकारांबद्दल मला मनापासून आदरच आहे पण ही
कांताबाई पाच पाच हजार प्रेक्षकांपुढे शिवाजी साकारते, संभाजी साकारते, तलवार- दांडपट्टा फिरवते, प्रेक्षकांच्या
काळजात धस्स होईपर्यंत एखाद्या कसलेल्या योध्ध्याप्रमाणे रंगमंचावर लढाई खेळते, शेकडो ऐतिहासिक, धार्मिक,
सामाजिक वगनाट्यात भूमिका करून समाज प्रबोधन करते. महाराष्ट्रातल्या एकही आजवर असा एकही प्रेक्षक
सापडणार नाही कि जो सांगेल कि कांताबाईने या या दिवशी आम्हाला मान खाली घालायला भाग पाडले असा
तमाशा केला. साहेब १९५० ते जवळपास १९८५ पर्यंत मी केवळ समाज घडवण्याचेच काम केले. खरेतर काही गोष्टी
सांगायला नको पण मी आणि माझा मुलगा रघुवीर खेडकर याने मिळून आजवर दरवर्षी १० ते १५ तमाशाचे खेळ
शाळा खोल्या, वाचनालय, कुणाचे ऑपरेशन, कुठले तरी मंदिर अशा समाजोपयोगी कामासाठी केले आहेत. या
खेळांचे एक रुपया सुद्धा उत्पन्न न घेता आम्ही दोन ते अडीच कोटी रुपयांची मदत या लोकांना मिळवून दिली आहे.
सांगायचे तात्पर्य हेच कि तमाशासुद्धा समाजात काही चांगले करू शकतो हे आम्ही कृतीतून दाखवून दिले आहे.
साहेब आता एकाच इच्छा आहे कि मायबाप सरकार सगळ्या क्षेत्रात पद्म पुरस्कार देते पण आजवर कोणत्याही
सरकारला तमाशा कलावंताला पद्म पुरस्कार द्यावा वाटला नाही किंवा सरकार पर्यंत आमची बाजू पोहचलीही
नसेल. तमाशा सृष्टीत स्वतःच्या हिमतीवर तमाशा फड उभी करणारी पहिली महिला कलावंत मी आहे. माझे पती
तुकाराम खेडकर यांचे निधन झाल्यावर त्यांच्या तमाशातला सुतळीचा तोडा देखील मला मिळाला नाही ... पण मी
माझी जिद्द सोडली नाही, स्वतःचा तमाशा फड उभा केला आज मला सांगायला अभिमान वाटतो कि माझा मुलगा
रघुवीर खेडकर हा फड समर्थपणे पुढे नेतोय आणि महाराष्ट्रातला नंबर एकचा तमाशा म्हणून लौकिक मिळवतो आहे.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता माझे डोळे मिटण्यापूर्वी मायबाप सरकारने माझ्यासारख्या कलावंताला पद्म
पुरस्कार देऊन केवळ माझा नव्हे तर तमाशा सृष्टीचा सन्मान करावा... महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेचा सन्मान
करावा तसे पाहिल्यास प्रत्येक तमाशा कलावती ही विठाबाईचेच जीवन जगत असते. संघर्ष, गरिबी, पुरुषी वर्चस्व, निरक्षरता, आपल्या गणगोतांकडून होणारी फसवणूक, प्रकृती या साऱ्या समस्यांचा सामना     पती तुकाराम खेडकरांच्या अचानक जाण्याने आकाशच कोसळलं. घरचा धनी, फडाचा मालक असा अचानक गेला... पैशांची तरतूद नव्हती. चरितार्थाचा प्रश्न होता. फडही विस्कळीत झाला. पण कांताबाई स्वस्थ बसणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांनी पुन्हा जुळवाजुळव केली. पुन्हा फड उभा राहिला. मराठी मुलखातल्या तमाम जनतेच्या मनोरंजनासाठी ढोलकीच्या तालावर कांताबाईंचे घुंगरू पुन्हा नाचू लागले. भिंगरीसारख्या नाचणाऱ्या कांताबाईंच्या तमाशाचे तंबू हजारो लोकांच्या उपस्थितीने गावोगावी ओसंडत वाहू लागले. महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात वर्षाकाठी दोनशे सव्वादोनशे दिवस फडातील दोनशे कामकरी, कलाकारांसह आपल्या परंपरागत कलेने मराठी मनाला रिझविण्यासाठी फिरणाऱ्या कांताबाई आजही आपल्याच मस्तीत दंग आहेत. फडाच्या रूपानं खेडकरांचं नाव जिवंत ठेवलं. मुलगा रघुवीर फड चालविण्यास समर्थ बनला. रसिकांचं उदंड प्रेम मिळालं. कलाकाराला आणखी काय हवं? भल्या पहाटेची शुक्राची चांदणी आजही त्यांना याद देते लडिवाळपणे रेंगाळणाऱ्या त्या दिवसातल्या लावणीची!

कांताबाई सातारकर...

सोबत फोटो

2 Attachments


No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...