Sunday, April 15, 2018

आदरणीय वैद्य गुरुजी ज्ञान - संस्काराचा महासागर ..

आदरणीय वैद्य गुरुजी ज्ञान - संस्काराचा महासागर ..... सन १९७६ गणेशोत्सव सुरु होता... आम्ही संगमनेरहून लोणी या तत्कालीन ५-६ हजार लोकवस्तीच्या गावी रहायला आलो होतो. लोणीची मराठी शाळा, पाहताक्षणी कुणीही प्रेमात पदवी अशी इमारत. सकाळीच सर्व मुले शाळेच्या पटांगणात उभी प्रार्थनेला उभी राहिली. प्रार्थना संपली आणि आम्ही मुले वर्गाकडे जाऊ लागलो. सकाळची कोवळी उन्हे पडलेली. गुरुजींनी सर्व मुलांना वर्गाबाहेरील लिंबाच्या झाडाखाली बसवले. आजवर संगमनेरला बंद खोलीत शिकणाऱ्या माझ्यासारख्याला हे खूपच आवडले.... आमचा दुसरीचा वर्ग होता. गुरुजींनी जोडाक्षरे सांगायला सुरुवात केली... गुरुजी सांगत होते आणि आम्ही मुले लिहित होतो. गुरुजी आमच्या बैठकीच्या रांगांमधून फेऱ्या मारीत एकेक शब्द सांगत होते... ' लिहा ... स्वातंत्र्य ..' गुरुजींचा खणखणीत आवाज घुमला आणि मुले एकमेकांकडे पाहू लागली... गुरुजी माझ्याजवळ आले. माझ्या हातातली अर्धी फुटलेली पाटी घेतली आणि दाणकन पाठीवर थाप बसली ..' शाब्बास ... पाहा .... संगमनेरच्या या विद्यार्थ्याने सगळे शब्द बरोब्बर लिहिले आहे ..' मला फारसे समजत नव्हते पण आयुष्यातली टी पहिले शाबासकीची थाप मात्र अजूनही पाठीला छान गुदगुल्या करते आहे. आजवरच्या अनेक मानसन्मानापेक्षा त्या शाबासकीचे मोल काहीसे अधिकच आहे. हे होते आमचे वैद्य गुरुजी. पांढराशुभ्र पायजमा, पांढरा सदरा आणि त्यावर इस्त्री नसलेली काहीसा गोलाकार आकार झालेली पांढरी टोपी असा त्यांचा पेहराव.
लोणीच्या शाळेने म्हणजेच वैद्य गुरुजींनी पुढच्या काळात मला जे काही दिले ते कदाचित इतर कुठल्याही शाळेत खचितच मिळाले असते. गुरुजींना माझ्याबद्दल काय वाटले कुणास ठाऊक पण ते एकेक गोष्टी माझ्यावर सोपवू लागले. तोवर शाळेत वरच्या वर्गातील मुले सकाळी परीपाठाच्या महत्वाच्या बातम्या वाचून दाखवायची पण मी आल्यानंतर पुढची अडीच वर्षे म्हणजे चौथी पास होऊन हायस्कूलमध्य जाईपर्यंत वैद्य गुरुजी रोज मलाच बातम्या वाचायला सांगायचे. गुरुजी सकाळीच घरून शाळेत आले कि मला एकट्याला वर्गात बोलवायचे... तोवर इतर मुले बाहेत शाळेच्या प्रांगणात खेळत असायची . गुरुजी सकाळी रेडीओवर ऐकलेल्या आणि वर्तमानपत्रात वाचलेल्या दहा बातम्या एका कागदावर त्यांच्या सुवाच्च अक्षरात लिहायचे. या बातम्या लिहिताना त्यांच्यासमोर कुठलेही वर्तमानपत्र किंवा लिहून आणलेला कागद नसायचा. गुरुजींनी लिहून दिलेल्या बातम्या राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा झाल्यावर मी शाळेतल्या सर्व मुलांसमोर वाचायचो. मी आजही गमतीने अनेकांना सांगत असतो माझ्या न्यूज रीडिंगची सुरुवात होऊन आता ४१ वर्ष झालीत आणि मी आज कार्यरत असलेल्या कुणाही न्यूज रीडरपेक्षा सिनियर आहे... गुरुजींनी त्यावेळी जो विश्वास दाखवला, प्रेरणा दिली त्यातच माझ्या पत्रकारितेची आणि नंतरच्या लिखाणाची बीजे रोवली गेली हे प्रांजळपणे सांगावे वाटते. माझ्या आयुष्यात वैद्य गुरुजी नसते तर मी लिहू शकलो असतो का ? गेली सहा वर्षे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाचे सर्व सहाच्या सहा विषय शिकवतो आहे... हे जे काही माझ्यात आले ते केवळ वैद्य गुरुजींमुळेच.पुढे अनेक शिक्षक लाभले, सर्वांनी मनापासून शिकवले... पण आज सर्वाधिक लक्षात राहतात ते वैद्य गुरुजीच.
मागच्या १५-२० वर्षापासून सातत्याने लिहितोय.. आकाशवाणीवर विविध कार्यक्रम सदर करतोय... हे सर्व घडत असताना एक गोष्ट मात्र कॉमन होत गेली ... माझ्या बहुतेक लिखाणानंतर मला गुरुजींचा फोन येतो ..' संतोष .. आरे आज तुझा अमुक पेपर मधला लेख वाचला रे ... छान लिहिलास ... बर वाटल ...' गुरुजींचा असा प्रत्येक फोन म्हणजे...त्याला एखाद्या बालवाडीतल्या मुलाला त्याने स्टेजवर छान भाषण केल्यावर कुणी मोठ्याने चोकलेट भेट दिल्यावर त्याला जो आनंद होतो तसा आनंद मला गुरुजींच्या प्रत्येक फोननंतर होतो... त्यांचे बरे वाटले रे हे शब्द खूप मोठ्ठा पुरस्कार असतो माझ्यासाठी. साधारण एखादा महिना जातो आणि गुरुजींचा हमखास फोन येतो .. गुरुजी चौकशी करतात कसा आहेस ...
दोन तीन महिन्यापूर्वी ' भिक्षा घाल माई ' हे पुस्तक लिहून -छापून झाले . त्याचे अद्याप प्रकाशन व्हायचे आहे. काही निमित्ताने गुरुजींकडे लोणीला गेलो आणि गुरुजींना नमस्कार करून आम्ही उभयतांनी ते पुस्तक गुरुजींना दिले. गुरुजी भावनावश झाले ..त्यांनी खिशात हात घातला आणि पाचशे रुपयांची नोट काढून मला दिली... खरतर आपल्याकडे गुरुदक्षिणा देण्याची पद्धत आहे पण इथे तर गुरूच शिष्याला काही देताहेत... गुरुजींना काय गुरुदक्षिणा द्यावी हे खूप दिवसांपासून मनात होते ... कारण माझे लिखाण हे अनेकांच्या प्रभावातून तयार झालेले आहे. सन २००० पासून एका प्रोजेक्टवर काम करीत होतो आणि २०११ मध्ये त्यावर आधारित माझे ड्रीम प्रोजेक्ट असलेले ' गोष्ट एका गावाची' हे पुस्तक आले. हे पुस्तक मी वैद्य गुरुजीना अर्पण केले आहे. या पुस्तकच्या अर्पण पत्रिकेत मी तीन लोकांचा उल्लेख केला आहे ... वैद्य गुरुजी, साहित्यिक मित्र प्रवीण दवणे सर आणि श्री विनय गुणे... या तिघांचे लेखन नेहमीच माझी प्रेरणा राहिली आहे.
आज गुरुजींचं वाढदिवस ... गुरुजी आता काहीसे थकले आहेत पण उत्साह कायम आहे ... महत्वाचे म्हणजे गुरुजी आजही जगाशी कनेक्ट असतात ... जगात जे चालले आहे त्याची माहित घेत असतात .. अगदी १९७६ साली आम्हाला पंचतारंकित हॉटेल म्हणजे काय हे सांगताना आम्हा दुसरीतल्या मुलांना मुंबईच्या ताजमहाल हॉटेलची माहिती देणारे गुरुजी आणि आजचे गुरुजी कहीही फरक नाही .... गुरुजी तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो .... तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम पाठीशी राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो .... गुरुजी खूप दिलाय तुम्ही ... अगदी आमच्या मनाच्या - मेंदूच्या झोळीतून ओसंडून सांडेपर्यंत .... तुम्हाला मनापासून नमस्कार

LikeShow more reactions
Comment

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...