Sunday, April 15, 2018

जिणं आमुचं............ एक धागा सुखाचा

जिणं आमुचं............
एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र मानवा
तुझिया आयुष्याचे .

मानवी जीवन हे असेच आहे.जीवनात अनेक चढउतार येत असतात व यातून मार्ग काढत आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो.येथे प्रत्येकाला पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागते.
अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव ता.नेवासा येथील श्री.प्रकाश मोहन शिंदे वय-३० व बाबाजी बाबुराव शिंदे वय-२२ असेच फिरत फिरत करमाळ्यात आले आहेत. या दोघांची आज भेट झाली हे नाथपंथीय डवरी गोसावी. दोघे भेटल्यावर गप्पांना बहरच आला.अस्सल बहुरूपी ,निखळ आनंद देऊन जाणारा विनोद हे त्यांच्याकडे पाहून कळाले. भेट झाल्याबरोबर त्यातील एक जण म्हणाला,"साहेब काल तुमी मुंगीचा खून केलाय बैलगाडीत बसून तुम्हाला न्यायला आलोय. सायबाची आर्डर हाय,मुंगीच्या आईनं तुमच्यावर खुनाचा आरोप लावलाय असं विनोद करत ते दोघे हस्याचे फवारे निर्माण करत होते.महाराष्ट्रभर भ्रमंती करत ते आपली उपजीविका करत राहतात.खरं तर हे सारं करताना गाव, बायको मुलं यांना सोडून ऊन, पाऊस ,वारा सहन करत लोकांचे मनोरंजन करणारा हा बहुरूपी वर्ग आता कमी होत चाललाय.त्यांच्या म्हणण्यानुसार खेड्यात लोक आजही धान्याच्या रूपाने मदत करत असतात तर शहरामधून रोख पैसे देतात पण शहर आणि खेडं असं दोन्ही ठिकाणी आम्ही फिरतो असे ते सांगतात. दोघांचेही शिक्षण काहीच झाले नाही ,शिक्षण न झाल्यामुळे परंपरागत चालत आलेला हा व्यवसाय आम्हास पुढे चालवावा लागतोय पण आमची मुलं मात्र आम्ही शाळेत घातली आहेत त्यांच्या वाट्याला असे वणवण फिरणे येऊ नये असे असं बाबाजी व प्रकाश यांना वाटते.गावात किंवा शहरात गेल्यावर तेथील तुमचे अनुभव काय ? या प्रश्नाचे उत्तर खरं तर ऐकण्यासारखे होते, लोक म्हणतात अरे धडधाकटआहेत शेतात काम करत जा तेवढेच दोन पैसे मिळतील .यावर त्यांचे उत्तर असे की,शेतात काम करायला स्वतःची शेती नाही .आमचं घर म्हणजे माळरानावर छोटसं पाल आज इथं तर उदया तिथं .एक ठराविक राहण्याचा ठिकाणा नाही. होळी आणि शिवरात्रीला आम्ही सगळे नाथपंथीय डवरी गोसावी जे बाहेर गावी आहेत ते सगळे एकत्र जमतो सगळ्यांच्या यावेळी गाठीभेटी होतात .याच वेळी लग्न जमवली जातात.सगळे पाहुणेरावळे भेटल्याचा खूप आनंद होतो हे सांगताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मला खूप आनंद झळकलेला जाणवला.जाता जाता आणखी एक प्रश्न मी विचारला शासनाकडून तुमची काय अपेक्षा? आम्हाला एका ठिकाणी छोटसं घर शासनातर्फे बांधून द्यावं कारण आमची लेकरबाळ माळरानावर ऊन्हातान्हात ,पाऊस वाऱ्यात रहात असतात .सायब तेवढं घराचं बगा अस ते म्हणू लागले.गप्पा संपल्या चहापान झाला ते त्यांच्या वाटेने पुढे चालू लागले मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत विचार करू लागलो की इथं प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावाच लागतो.बहुरूपी विनोद जरी करीत असलेे तरी त्यांच्या अंतरंगातील वेदना मात्र कुणी समजून घेईल काय?
.....................................
नितीन तळपाडे, करमाळा जि. सोलापूर
मो.नं--९९२३४४१८१५





No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...