Sunday, May 31, 2020

अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर

अकोले 2020-05-30


अकोले , ता. ३०: विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्राप्त लौकिकापलीकडे काही निराळे पैलू असतात . हे पैलू जनमानसात फारसे झोतात नसतात . अपरिचित असतात . असे काही विलक्षण , हटके पैलू नजरेस आल्यास जाणवते ते वेगळेपण . अकोले तालुक्याचे लोकनेते आणि राज्याच्या राजकीय पटलावर प्रदीर्घ काळ मंत्रीपदाच्या दखलपात्र कार्याने चर्चेत राहिलेले मा . मधुकर पिचड हेदेखील असेच व्यक्तित्व .

राजकारण , सत्ता , आमदारकी , मंत्रीपद , कार्यकर्त्यांचा गोतावळा यापलीकडे मधुकर पिचड यांचा आगळा परिचय ठराविक परिघापलीकडे सुप्त स्वरूपात राहिला आहे , आणि तसा तो परिचय फार थोड्या लोकांना ठाऊक आहे ! असा वेगळा , पूर्णतः भिन्न पैलूंचा मागोवा याठिकाणी नजरेस आणून द्यायचा उद्देश आहे .

मा . पिचड हे , विख्यात तत्वचिंतक , स्वातंत्र्य संग्रामातील थोर सेनानी , ज्येष्ठ समाजवादी , हाडाचे शिक्षक तसेच ' साधना ' साप्ताहिकाचे माजी संपादक दिवंगत प्रा . ग . प्र . प्रधान ( प्रधान मास्तर ) यांचे लाडके विद्यार्थी ! पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रधान मास्तर पिचड यांचे शिक्षक होते . पिचड यांचे वक्तृत्व , धडाडीचे नेतृत्व गुण हेरून प्रधान यांनी स्नेह जपला ! ऐतिहासिक , चरित्रपर , तात्विक आणि चिंतनपर पुस्तकांचे वाचन हे पिचड साहेबांचे वैशिष्ट्य .

समाजकारणासह सर्वच क्षेत्री पिचड यांनी मुत्सद्देगिरी टिकवून ठेवली . माणसांची पारख तसेच सूक्ष्म अभ्यास वृत्ती त्यांच्याकडे आहे . प्रादेशिक क्षेत्राविषयी ससंदर्भ असलेला त्यांचा अभ्यास थक्क करणारा . स्मरणशक्तीची त्यांना असलेली देण ही वेगळी बाब विलक्षणच . पुरोगामी , परिवर्तनशील विचारांचा पिचड यांच्या आयुष्यावर असणारा प्रभाव मोलाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज , महात्मा जोतीराव फुले - सावित्रीमाय फुले , डॉ . बाबासाहेब आंबेडकर , गाडगेबाबा , क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्यासह अन्य महापुरुषांच्या विचारांचा - कार्याचा प्रभाव जसा पिचड यांच्यावर आहे तसाच कृतीशील ध्यासही त्यांना राहिला आहे .

अभ्यासक , संशोधक , साहित्यिक , कलाकार , विद्वत्ता यांविषयी पिचड यांना कायमच आदर राहिला आहे . जिद्द , धैर्य , मेहनत हे त्यांचे सद्गुण ठरलेत . शैक्षणिक क्षेत्राचा आदर ठेवणारे साहेब गुणांची कदर करणारे आहेत . प्रसंगोपात् सडेतोड बाणा , परखड स्वभावाने निर्णयक्षमतेची चुणूक दाखविणारे पिचड आदरयुक्त दबदबा टिकवून राहिले . प्रश्नांच्या चौफेर बाजू समजावून घेऊन चुकीची तडजोड न करता फैसला करायचा पिचड यांचा स्वभाव . आदिवासी , उपेक्षित वर्गातील जनतेच्या समस्यांवर पुरेपूर कागदपत्रे , आधारभूत पुरावे आणि मुळापासून संदर्भीय दुवे मिळवून सातत्यपूर्वक पाठपुरावा करणे हे पिचड यांचे वेगळे वैशिष्ट्य .

सत्य समजल्यावर वैर न करता खिलाडूपणाने परिस्थितीवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हा आहे त्यांचा स्वभाव . क्षमाशील भाव हा कौतुकास्पद पैलू त्यांनी कायमस्वरूपी , सुरुवातीपासून जपला . सकारात्मक विचारसरणी हा आहे त्यांचा स्थायी भाव !

जन्मदिनाच्या स्नेहपूर्वक सदिच्छा ..




No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...