Wednesday, May 19, 2021

काजवा महोत्सव कोरोना मुळे ....

: नाशिक- नगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील भंडारदरा-कळसूबाई या पर्यटनस्थळांवर दर वर्षी मेमध्ये रंगणाऱ्या काजवा महोत्सवाला यंदा लॉकडाउनमुळे वनविभागाने प्रतिबंध केला आहे. त्यामुळे राज्यातील या बहुचर्चित काजवा महोत्सवातील ५० लाखांहून अधिकचे अर्थकारणही "लॉक" होणार आहे.
 ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो, तोच वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्गदेवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय, असा विचार मनात चमकून जावा. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय! इथे रात्रच चांदण्याची झालीय, याचा प्रत्यय येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांच्या दुनियेत येतो. मात्र, हा निसर्गाविष्कार पर्यटकांना, निसरप्रेमींना यंदा पाहता येणार नाही. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जून च्या १५ तारखेपर्यंत काजवा महोत्सव पाहण्यासाठी या परिसरात प्रचंड गर्दी होते.
 मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने ३१ मे पर्यंत अभयारण्य परिसरात प्रवेश बंदी केली आहे. त्यामुळे भंडारदरा परिसरातील काजव्यांचे लुकलुकणे यंदा अनुभवता येणार नाही.

काजव्यांची अनोखी दुनिया
भंडारदरा घाटघर कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मेअखेर आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळची झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभुत खेळ चालतो.
यंदा मात्र पर्यटकांना बंदी
मात्र, गेल्या काही महिन्यांपासून जगभर कोरोनाचा उपद्रव वाढत आहे. हा कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी खबरदारीचा भाग म्हणून प्रशासनाने व वन्यजीव विभागाने मागील काही दिवसांपासून  या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे येथील जवळपास दीडशे ते दोनशे   गाइड्सचा रोजगार बुडून हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे.
दोनशे गाइड यांचा रोजगार बुडणार
काजवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या भागात साधारण ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. पर्यटकांकडून शुल्कापोटी सात लाख, दोनशे गाइडना साधारण चार ते पाच लाख, तर दहा ते पंधरा हॉटेलचा साधारण ४० लाखांच्या आसपासचा हॉटेल व्यवसाय होतो. यंदा महोत्सव होणार नसल्याने सगळ्यांचे मिळून ५० ते ६० लाखांच्या आसपास अर्थकारण बुडणार आहे.
काजवा महोत्सवात वन्यजीव विभागांतर्गत ग्रामविकास समिती काजवा महोत्सवात पर्यटकांकडून जे शुल्क आकारते ते साधारण सात लाख रुपये यंदा बुडणार आहेत. पर्यटकांना  कळसूबाई- भंडारदरा अभयारण्यात  वनविभागाकडून ३० मे पर्यंत बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी आमचे कर्मचारी तैनात आहेत.
- अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारदरा

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...