Friday, May 28, 2021

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

मा. प्राचार्य सौ. मंजुषा शांताराम काळे

"दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो । प्राणिजात ॥" - संत ज्ञानेश्वर माऊली

आदरणीय मंजुषाताई, आपणास आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा 'संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार' प्रदान करताना संस्थेला अतिशय आनंद होत आहे.

ताई आपण आपली आवश्यक अशी एम.ए., एम.एड. अर्हता प्राप्त करून; आदिवासी भागात शिक्षिका म्हणून सेवा करण्याचे असिघाराव्रत घेतलेत. गत पंचवीस वर्षांपासून आपण 'श्री स्वामी समर्थ सेवा संस्था' संचालित 'समर्थ कन्या प्रशाला' या संस्थेत राजूर येथे सेवारत आहात. त्याचबरोबर आपण त्या संस्थेच्या उभारणीत सिंहाचा वाटा असून; आपल्या आदिवासी मुली व महिला यात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनाचे काम करीत आहात.

आदिवासी भागातील नापास झालेल्या मुलींना प्रोत्साहन देऊन त्यांच्यासाठी पुन्हा शिक्षणाची दारे खुली करण्याचे काम आपण सुरू केलेत. आदिवासी भागात असे काम करणे हे अतिशय अवघड कार्य होते. या प्रयत्नांतूनच आपण सामाजिक व शैक्षणिक प्रबोधनाची, राष्ट्रीय दृष्टी असलेल्या, सेवाभावी, धुरीण कार्यकर्त्यांच्या सकारात्मक सहाय्याने; संस्थात्मक कार्यास सुरुवात केलीत. गाईच्या गोठ्यात बीस विद्यार्थिनींना घेऊन सुरू केलेल्या कार्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता एक हजार कन्या या विद्यालयाचा लाभ घेत आहेत. हे केवळ आपली सेवावृत्ती, जिद्द आणि चिकाटी यामुळेच शक्य झाले आहे. या शैक्षणिक कार्याबरोबरच आपण हुंडाबंदी, बालविवाह प्रतिबंध, युवती सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, पर्यावरणपूरक कार्यक्रमांतर्गत पाणी बचत कार्यक्रम, लेक वाचवा लेक शिकवा, महिला प्रबोधन व सक्षमीकरण मेळावे, संस्कारवर्ग अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून; सामाजिक प्रबोधन, पर्यावरण संरक्षण आणि राष्ट्रीय प्रश्न सोडवणूक; असे महत्त्वाचे कार्य करीत आहात.

आपण राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप, बालविवाह प्रतिबंध यासाठी प्रबोधक व्याख्याने, या गोष्टी करण्यात पुढाकार घेतलात. कोणतीही शिक्षणसंस्था आणि त्यातील आचार्य, प्राचार्य ह्या व्यक्ती केवळ व्यवसाय म्हणून कार्य करीत नसतात; तर 'विश्व मोहरे लावावे' यासाठीचा सेवा व प्रबोधनाचा यज्ञ करीत असतात. या सेवाव्रताचा आपण वस्तुपाठ आहात. समाजाने शासनाने आपल्या या ध्येयनिष्ठ सेवाकार्याची नोंद घेऊन आपल्याला मार्गदर्शक, प्रबोधक आणि उपक्रमशील प्राचार्य म्हणून गौरविले आहे. आपले जलसंधारणाचे कार्य हे वाखाणण्यासारखे आहे.

याशिवाय आपण राष्ट्रीय वृत्ती जोपासण्यासाठी पालक समुपदेशन, गडकोटकिल्ले स्वच्छता अभियान, इफ्तार पार्टी आयोजनातून सामाजिक समरसता संदेशन, शालाबाह्य विद्याथ्र्यांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य, वाचन संस्कृती अभिवृद्धी ही वैशिष्ट्यपूर्ण कार्येकरीत आहात. आदिवासी भागात हे कार्य करणे म्हणजे सत्वपरीक्षा होय. आपण ह्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण झालातच. इतरांनाही या कार्यात जोडता आहात. माणूस घडविण्यासाठीचे ऋषीकार्य आपण करीत आहात. आपल्या द्या, उपेक्षित आणि वंचितांसाठीच्या कार्यास अभिवादनपूर्वक संस्थात्मक कार्यकर्ता गौरव पुरस्कार देऊन गौरवितांना, हे सन्मानपत्र प्रदान करीत आहोत. आपल्या पुरस्कार स्वीकृतीने पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. अभिनंदन आणि आभार

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...