Friday, July 19, 2024

राही मावशी

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे..... सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. ,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .

Monday, July 15, 2024

भंडारदरा परिक्रमा म्हणजे पर्यटनाची उच्च अनुभूती

सकाळ विशेष शांताराम काळे अकोले, ता. १६ : सहाद्रीच्या कुशीत सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबनीत वसवलेला सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा धरण) ब्रिटिशांनी १९९० मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरवात केली आणि ते १९२६मध्ये पूर्ण झाले. ब्रिटिशांनी धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीमुळे परिसराला 'प्रतिकाश्मीर' म्हटले जाते. म्हणूनच या परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांचों गर्दी होते. धरणाची परिक्रमा करणे म्हणजे पर्यटनानंदाची उच्च अनुभूतीच! भंडारदरा धरणाच्या परिसरात दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजे बालाघाट. राकट कातळाच्या पिंगट करड्या रंगाची ही डोंगररांग ऋतुमानाप्रमाणेन तिचे सौंदर्यही बदलत जाते. कधी काळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक इथे भ्रमंती करायचे, आता पावसाळी पर्यटनाचा आनंद येथे लुटला जातो. पावसाळ्यापूर्वी काजवा महोत्सव सरता ग्रीष्म आणि वर्षाऋतूंच्या आगमना अगोदरच्या संधिरुतूत या परिसरातील सादाडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके इथल्या झाडांवर वास्तव्याला असतात, या काळात झाडांवर जनू चांदण्याचे संमेलन भरल्याचा भास होतो. त्याला काजवा महोत्सव म्हटले जाते. खरे तर लवकरच येणाऱ्या कृष्णजलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देतात. पावसाला सुरवात होताच त्यांचे जीवनचक्र संपते वर्षाकाला सुरवात झाली, की इथल्या काळ्या कातळाचा रंगही बदलू लागतो, संपूर्ण डोंगरावर हिरवाईची शाल पसरू लागते. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते, तसतसे या पर्वतरांगांचे सौंदर्य खुलू लागते. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उतुंग शिखरांवर विसावतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघदुलई बाजूला होताच डोंगरांच्या फटीतून कोसळणारे शुभ्र फेसाळनारे धबधबे नजरेस पडतात. लोभस 'अम्ब्रेला फॉल' भंडारदरा धरणाच्या अतोकडे १० किलोमीटरवर रंधा धबधब्याचे दर्शन पडायचे; मात्र आता कोदनी जलविद्युत३२मेगा वॅट प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानेहा धबधबा अकसल्यासारखा कोसळतो असे वाटते, . त्यामुळे हल्ली धबधबा पाहायला मिळणे या भागातील पर्यटकाना अलभ्य लाभच। भंडारदरा जलाशय भरले, की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरुन सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकर धारण करत वहू लागतात. म्हणूनच त्याचे नाव 'अम्ब्रेला फॉल' ठेवण्यात आले. या धरणाखाली एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषाररस्नान घेता येते. त्यामुळे 'अम्ब्रेला फॉल' लोभस झाला आहे. इथेही ब्रिटिशांच्या रसिकतेला दाद द्यावी तितकी थोडीच महाराष्ट्राची चेरापुंजी परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरवात करता येते. या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा..' या ओळी ओठांवर येतात, रतनगडाच्या डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे .धरणापासून साधारण सात किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरे नावाचे छोटेखानी गाव आहे. इथून कळसूबाई शिखराचे दर्शन घडते. 'महाराष्ट्राचे एव्हरेष्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून चढाई सुरू करता येते. पांजरे गावातून पुढे घाटघरकडे जाता येते, पांजरे,घाटघर ,रतनवाडी ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात एकदा पाऊस सुरू झाला, की चार-सहा दिवस अविश्रांत कोसळने ठरलेलेच, घाटघरच्या कोकणकडावर उभे राहून खाली डोकावले, की खोल दरीतल्या उदंचन जलविद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्याचा नाद पर्यटकांना भुरळ घालतो. घटघरच्या घाटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. साम्रदची सांदण घाटघर कडून सांदण मार्गे रतनवाडीकडे जाताना साधारण एक किलोमीटर आडवाटेत सांदण आहे. पावसाचे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्याने खडकावर आकाराला आलेल्या नानाविध रचना, कोकणकडाचे रौद्र रूप, कधी साहसला साद घालणारे सुळके तर कधी रांजणखळगे ..असा अनेक नैसर्गिक कला कृती येथे साकारल्या आहेत. . एक किलोमीटर लांबीच्या सांदणीची रुंदी साधारण५० फूट आहे. रतनगडाच्या पोटातून येणारा ओढा हा सांदणीतून वाहतो .त्यातील मोठमोठ्या शिळा साहसी पर्यटकांना साद घालतात अर्थात, पावसाळ्यात सांदणीत उतरणे धोक्याचे असते. अचानक पूर आला, तर आसरा घेण्यास सांदनीमध्ये जागा नाही. साम्रद पासून रतनवाडी येथे पोहचल्यावर इस इसन पूर्वीचे शिवकालीन हेमाडपंती शिवमंदिर पाहायला मिळते तर तेथूनच पुढे दक्षिणेला रतनगड आहे . रतनगड मार्गे भंडारदरा कडे निघताना काळ्या कातळावरून पांढरे शुभ्र ,नाणी फॉल,नेकलेस फॉल,कोलटेम्भे येथील बाहुबली फॉल पाहताना पर्यटक हरखून जातात धबधबे पाहत मुतखेलमार्गे धरणाचाजवळ पोचता येते. या ठिकाणी आपली संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रत मुतखेलजवळच्यया डोंगरमाथ्यावरून पडणारे पायथ्याशों न पोचत वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना थांबण्यास भाग पाडते काही ठिकाणी एकमेकांना बिलगुन उभी असलेलो कौलारू घरे इथल्या आदिवासी संस्कृतीचे येथे दर्शन घडवितात.

Sunday, July 14, 2024

सेवानिवृत्ती म्हणजे काय हो भाऊ

*सेवानिवृत्ती-* नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत. काही 'कष्टाळू ब्रँड' चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील 'रामू काकां'च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात. उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी 'वाहन चालक' म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावेत, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे. असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि त्यांनी यापूर्वी कधी मंदिरात डोकावले ही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात, अशा लोकांना आपण नोकरीस असतांना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापातून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे. सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात 'कवी' च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाविलाजाने 'व्वा व्वा' म्हणायला भाग पडतात. अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात ज्यांच्यात 'राजकारणाचा किडा' नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात 'आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो' असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहित असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना 'मिळणारा मान, होणारा आदर' हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असतांना दिसतात. निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित 'नकोशे झालेले' आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात. वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि जरी त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात. आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच रहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच 'आजोबा'च्या भुमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध होतात. ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम 'बाळ संगोपन' सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत. यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत, अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत. काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतांनाचे 'कारनामे' ऐकवण्यासाठी 'श्रोते' शोधत बागेत फिरतात कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत. काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुने मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे. मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात. मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजुवर बसणार हे बघू या.. तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो हीच सदिच्छा.

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...