Sunday, July 14, 2024

सेवानिवृत्ती म्हणजे काय हो भाऊ

*सेवानिवृत्ती-* नोकरीनंतर निरुपयोगी म्हणजेच ‘रिटायर्ड’ झाल्यानंतर सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोर वेळ घालवणे ही एक भीषण समस्या बनली आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लोकांनी विविध मार्ग आणि पद्धती शोधून काढल्या आहेत. काही 'कष्टाळू ब्रँड' चे लोक निवृत्ती नंतर लगेचच चित्रपटातील 'रामू काकां'च्या भूमिकेत येतात आणि सकाळी लवकर उठून खांद्यावर टॉवेल टाकून घराची साफसफाई आणि स्वयंपाकघर साफ करायला लागतात. उरलेल्या दिवसात ते त्यांच्या बायकोसाठी 'वाहन चालक' म्हणून सेवा देतात आणि बाजारात खरेदी किंवा चित्रपट वगैरे दाखवतात. अशा लोकांच्या पत्नींनी पूर्वजन्मात काही चांगले कर्म केले असावेत, ज्याचे फळ म्हणून त्यांना ही सुखासीन परिस्थिती प्राप्त झाली आहे. असेही काही लोक आहेत जे निवृत्तीनंतर अचानक अतिधार्मिक बनतात आणि त्यांनी यापूर्वी कधी मंदिरात डोकावले ही नसले तरीही सकाळ संध्याकाळ दोन दोन तास विविध मंदिरात पूजा आणि भजन कीर्तन करण्यात घालवतात, अशा लोकांना आपण नोकरीस असतांना केलेल्या सर्व गैरकृत्यांच्या पापातून आता निस्तरले जात असल्याची भावना होत आहे. सेवानिवृत्तांचा असा आणखी एक वर्ग आहे, ज्यांच्यामध्ये निवृत्तीनंतर अचानक वाल्मिकी आणि तुळशीदासांचे आत्मे प्रवेश करतात आणि ते रातोरात 'कवी' च्या भुमिकेत येतात. हे लोक सोशल मीडियावर असे विचार लिहितात की त्यांचे मित्र या काव्य-प्रदूषणाने त्रस्त राहतात पण नाविलाजाने 'व्वा व्वा' म्हणायला भाग पडतात. अशी काही थोर माणसे सुद्धा बघायला मिळतात ज्यांच्यात 'राजकारणाचा किडा' नेहमी धुमाकूळ घालत राहतो आणि नोकरीच्या कार्यकाळात 'आपण जनतेत खूप लोकप्रिय होतो' असा त्यांना भ्रम निर्माण होतो आणि निवृत्त होताच ते एखाद्या राजकीय पक्षाशी किंवा नेत्याशी हातमिळवणी करतात व एखाद्या गटात सामील होऊन निवडणूक लढवतात आणि निवडणुकीत आपटले की ते खूप संतापतात, पण त्यांना हे क्वचितच माहित असते की नोकरीत असताना त्यांची होणारी विचारपूस किंवा त्यांना 'मिळणारा मान, होणारा आदर' हा त्यांच्या आसनस्थ पदामुळे त्यांच्या लाळघोटेपणा करणाऱ्या चमच्यांनी पसरवलेला खोटा आभास होता. मग ते अनेकदा पक्षाच्या कार्यालयाबाहेर लाह्या किंवा चणे खात असतांना दिसतात. निवृत्त वृद्धांचा एक मोठा वर्ग असा देखील आहे जे कुटुंबात कदाचित 'नकोशे झालेले' आहेत आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर पडण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो. सकाळी दहा वाजता ते स्वत:ची व कुटुंबातील सर्वांची बँकेची पासबुके जमा करतात आणि कुठल्यातरी बँकेत प्रवेश करून त्या पासबुकांच्या नोंदी काढण्यात आणि बँकेच्या वातानुकूलित वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी दिवसाचे एक दीड वाजवतात. हे लोक बँकेच्या ग्राहकांपेक्षा जास्त तेथील कर्मचारी असल्यासारखे दिसतात आणि बँक कर्मचाऱ्यांचे जगणे ते कठीण करुन सोडतात. वरील सर्व श्रेण्यांव्यतिरिक्त, मोठ्या संख्येने सेवानिवृत्त लोकांची आवडती ठिकाणे म्हणजे शेजारची उद्याने, जिथे ते सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या बहाण्याने जमतात आणि जरी त्यांच्यापैकी कोणीही नोकरीत असताना आपापल्या क्षेत्रात कधीही सकारात्मक काम केले नाही हे साफ विसरून सरकारला शिव्याशाप देण्याचे त्यांचे आवडते कार्य करत राहतात व दीर्घकाळ हळहळ व्यक्त करत असतात. आमच्या अनेक सेवानिवृत्त बांधवांना हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्यांना जास्तीत जास्त वेळ घरातच रहायला आवडते. अशा लोकांसाठी त्यांच्या सुना व मुलांनी वेळ घालवण्याचे चांगले साधन शोधून ठेवले आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्याकडे सोपवून सर्व काळजींपासून मुक्त होऊन ते ऑफिस, मार्केट आणि थिएटरमध्ये जातात आणि हे निवृत्त भाऊ लगेच 'आजोबा'च्या भुमिकेमध्ये येतात आणि आपल्या मुलांसाठी ते अत्यंत उपयुक्त आणि कामाचे व मौल्यवान असल्याचे सिद्ध होतात. ज्यांची मुले-मुली कुठेतरी परदेशात आहेत, तिथे गेल्यावरही हे लोक महिनोनमहिने उत्तम 'बाळ संगोपन' सेवा दिल्याबद्दल कृतज्ञ होत आहेत. यांतील असेही काही आहेत की निवृत्त झाल्यावरही ज्यांचे चेहरे मोहरे अजूनही तेजस्वी, ओजस्वी आणि समाधानाच्या ओघवत्या तेजाने चमकत आहेत, अशांच्याभोवती त्यांच्या अनुभवाचा लाभ घेण्यासाठी ते सतत लोकांच्या गर्दीने वेढलेले आहेत. त्यांना आदराने, भेटवस्तू दिल्या जात आहेत. काही सेवानिवृत्त लोक त्यांचे नोकरीत असतांनाचे 'कारनामे' ऐकवण्यासाठी 'श्रोते' शोधत बागेत फिरतात कारण बायको त्यांच्या या भाकडकथांना कंटाळालेली असते आणि मुलगा व सून मोबाईलमधून डोकंही वर काढत नाहीत. काही सेवानिवृत्त लोक कार्यालयातील सवय झालेल्या फुकट चहाची तलफ भागवण्यासाठी जवळपासच्या चौकातील चहाची टपरी आणि जुने मित्रांच्या शोधात फिरत आहेत. घरात तर शुगर आणि वाढत्या वयाचे दाखले देत त्यांच्या चहा पिण्यावर बंधन घालण्यात आले आहे. मला आशा आहे की आपण या वर्णनात स्वत: कुठे बसतो ते शोधत आहात. मी स्वतः माझी जागा आणि काम निवडण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब करत आहे. उंट कोणत्या बाजुवर बसणार हे बघू या.. तुम्हा सर्वांचे निवृत्ती नंतरचे जीवन सुखमय, आनंदी व स्वास्थ्यपूर्ण राहो हीच सदिच्छा.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...