Tuesday, October 8, 2024
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
हरिश्चंद्रगड…..
निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्र , रौद्र तितकाच मनोहारी , निसर्गरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ! आपल्या रौद्र कड्यांनी ट्रेकर्सना सदैव आव्हान देणारा , निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा , अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला , नटलेला हरिश्चंद्रगड !! ठाणे , पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला आणि सर्वात मोठा घेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव गड म्हणजे " हरिश्चंद्रगड !!!
सुंदर कोरीव कलाकृतींनी नटलेलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर , बाजूलाच नितळ पाण्याची टाके आणि दगडात खोदलेली मोठ्ठी गुहा , विठ्ठल रखुमाईचं/विष्णूचं मंदिर , शेंदूर लावलेली गणपतीची मनमोहक मूर्ती , मंदिराच्या खालच्या बाजूस केदारलिंगेश्वराची प्रचंड गुहा आणि त्यातील शंकराची भव्य पिंड, मंदिराच्या वरच्या भागातील पुष्करणी , जमिनीत खोदलेल्या गुंफा, तारामतीचं उंच शिखर आणि त्याच्या पोटात गणपतीची भव्य मूर्ती असलेली मोठी गुंफा तसेच तिच्या आजूबाजूच्या अनेक गुंफा, उंचावलेला बालेकिल्ला , बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल , अवाढव्य आणि रौद्र कोकणकडा , गडाच्या विविध भागातील आजही सुस्थितीत असलेली मजबूत तटबंदी आणि बुरुज , कातळात खोदलेल्या पायऱ्या व खोबण्या, कोरलेली शिल्पे व देवतांच्या प्रतिमा…. असे नानाविध अलंकार आपल्या अंगावर घेऊन मिरवतोय हा हरिश्चंद्रगड…. एखाद्या नववधू प्रमाणे! प्रत्येक अलंकाराची नजाकत काही औरच!
हरिश्चंद्रगडाची ही श्रीमंती डोळ्यात साठवतांना आश्चर्यचकित व्हायला होतं. दगडी प्रवेशद्वारे, दगडी स्मारकं , देवतांच्या मूर्ती, आदिवासी बांधवांची श्रद्धास्थाने पाहून तर प्राचीन काळापासून या गडावर चहुबाजूने वावर असणार यात शंका राहत नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील जंगलात सांबर, रानडुकरे,बिबटे तसेच त्यांच्या पायाचे ठसे आणि विष्ठा, सांबरांची तुटलेली शिंगे, विविध जातीचे सर्प दृष्टीस पडतात .लहान-मोठे ओढे, नाले, धबधबे, विविध प्रकारच्या वेली, वनस्पती व वृक्षांचं समृद्ध जंगल असा जैवविविधतेने समृद्ध असलेला हा गड अभ्यासकांना मात्र मेजवानीच.
याचं आणखी एक आणि अनोखं वैशिष्ट्यं म्हणजे चहुबाजूंनी गडावर जाणाऱ्या सोळा (१६) गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा. इतक्या वाटा असणारा गड तसा दुर्मिळच…या वाटा म्हणजे निसर्गाने हरिश्चंद्रगडाला बांधलेलं एक ' देखणं तोरणच '.
प्रत्येक वाटेचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य. त्यामुळेच या सर्व वाटांनी गडावर जाणं, याचं ट्रेकर्सना मोठं आकर्षण आणि आव्हानही.
. गेल्या ८/१० वर्षात हरिश्चंद्रगडावर जसजशी गर्दी वाढू लागली, तसतशी त्याच्या संदर्भात अधिकाधिक माहिती सोशल मिडीयाद्वारे समोर येऊ लागली. अर्थात अनेक जाणकारांनी / अभ्यासकांनी / जुन्या पिढीतल्या ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडाविषयी बरीचशी माहिती यापूर्वीच करून दिली होती. पण गेल्या ४/५ वर्षात हरिश्चंद्रगडाच्या वाटांविषयीची माहिती सोशल मिडीयात यायला लागली. गडाच्या नेमक्या किती वाटा आहेत? याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. या दरम्यान माझ्या ट्रेकिंगच्या विश्वातले गुरु संगमनेरचे श्री. भरतजी रूपवाल, हे मला एकदा हरिश्चंद्रगडावर घेऊन गेले, वेगळ्या वाटेने…..' वेताळ धारेने ' ! आणि ' गणपतीच्या वाटे ' ने खाली घेऊन आले, लव्हाळीत. या ट्रेक मध्ये मला ' दरवाजाची वाट ' दाखवायलाही ते विसरले नाहीत. एकाच दिवशी तीन वाटा ?? त्याही फारशा माहिती नसलेल्या. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. त्या दिवसापासून मी पेटून उठलो. स्थानिक बांधवांना हाताशी धरून ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यातून गडावर जाणाऱ्या गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या घाटवाटा मनसोक्त भटकून आलो.
हरिश्चंद्रगड आणि त्याच्या वाटा
. सर्वप्रथम गडवाट आणि घाटवाट म्हणजे काय? हे समजून घेऊया. गडवाट म्हणजे गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन थेट गडावर घेऊन जाणारी वाट आणि घाटवाट म्हणजे कोकणातून सुरू होऊन गडाच्या फक्त पायथ्याशी येऊन पोहोचणारी वाट.
▪️ वरील परिभाषेनुसार हरिश्चंद्र गडाला सोळा (१६) गडवाटा आणि नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा आहेत.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी गडावरील एक वाट ही दोन गडवाटांना जोडणारी आहे, तिचा सामावेश गडवाटांमध्ये केला आहे. या वाटेचं नांव आहे ' थनंरगडी ' ची वाट.
▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी बारा (१२) गडवाटा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत, तर तीन (३) गडवाटा पुणे जिल्ह्यात व एक (१) गडवाट ठाणे जिल्ह्यात आहे.
▪️ राहिलेल्या नऊ (९) घाटवाटा या ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडाच्या परिसरात वर आलेल्या आहेत.
सोळा (१६) गडवाटा :-
अ) अहमदनगर जिल्हा
१) टोलार खिंड (कोथळा मार्गे)
२) गणपतीची वाट
३) दरवाजाची वाट
४) पाईरीची वाट
५) गवळ्याची नळी
६) वेताळ धार
७) देवाची वाट (कपारीची वाट)
८) थनंरगडीची वाट
९) गायवाट
१०) बैलघाट
११) वाघरान टेप
१२) बेटाची नळी
ब) पुणे जिल्हा
१३) टोलार खिंड (खिरेश्वर मार्गे)
१४) जुन्नर दरवाजा
१५) ठमारगडी (तारामतीची घळ)
क) ठाणे जिल्हा
१६) नळीची वाट
नऊ (९) घाटवाटा:-
ठाणे जिल्हा
१) सादडे घाट
२) करपदरा
३) जवारीची वाट
४) माकड नाळ
५) रोहिदास घळ
६) तवलीची नळी
७) खुर्द्याची धार
८) गणपतीची वाट
९) चोरदरा
अशा एकूण पंचवीस (२५) वाटा
(भविष्यात आणखी वाटांची यात भर पडू शकते.)
सर्वप्रथम मी एक गोष्ट अगदी प्रांजलपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या वाटांपैकी एकही वाट मी " शोधलेली " नाही. यापूर्वी " ठमारगडी च्या निमित्ताने " या माझ्या लेखात मी तसं सांगितलंही आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या बरोबर या सर्व वाटा मी प्रत्यक्ष चढून / उतरून आलोय. या वाटांचा मी कोणत्याही दृष्टिकोनातून अभ्यासही केला नाही. त्यामुळे या वाटा प्राचीन/ ऐतिहासिक की राजमार्ग ? याबद्दल या क्षेत्रातील जाणकारांनीच ते ठरवावं. मी फक्त ट्रेकर या नात्याने या सर्व वाटांनी हरिश्चंद्रगड पिंजून काढला. त्याच्या निसर्गसौंदर्याचा आणि रौद्रपणाचाही मनमुराद आनंद लुटला.
या वाटांनीच माझ्या मनाला भुरळ घातली आणि अचानक मनात एक विचार चमकला …. या पैकी चौदा (१४ ) वाटा सलग सहा (६) दिवसांत केल्या तर ???..... त्याप्रमाणे मोहीम आखली. ह्या मोहिमेला नांवही सुचलं, " टोलारखिंड ते टोलारखिंड ". सुरूवात टोलारखिंडीतून अन् शेवटही टोलारखिंडीतच, अशी ही अनोखी मोहीम. नासिकचा डॉ. अतुल साठे आणि अरूण डावरे(CA) हे दोघेजण या मोहिमेत सामील झाले.
जय्यत तयारीला लागलो. मोहीम यशस्वी करण्यासाठी Time management अतिशय महत्वाचं, त्यानुसार आखणी केली. या मोहिमेत लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे संपूर्ण नियोजन आणि तयारी माझी पत्नी सौ. संगिता हिने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करून दिली. ज्यांच्या शिवाय अशा मोहिमा करणं केवळ अशक्य असे दऱ्या-डोंगरात राहणारे माझे जिवाभावाचे साथीदार म्हणजे पाचनईचा भास्कर बादड, लव्हाळीचा बाळू बांबळे, बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ आणि खिरेश्वरचा मारूती मेमाणे यांच्या बरोबर अनेक वेळा फोनाफोनी झाली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी हे सर्वजण आम्हाला जीवापाड जपत होते आणि जीवाची पर्वा न करता झटत होते… सोबतीला कोणकोण येणार? मुक्काम कुठे कुठे करायचा? टेक्निकल सपोर्ट कोण, कसा, कुठे करणार? पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व साहित्य कसे पोहोचवायचं? इमर्जन्सी कशी हाताळायची? अशा असंख्य प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून उत्तरं शोधली. अंथरुणावर पडलो की डोळे मिटून असंख्य वेळा ह्या वाटा चढून / उतरून यायचो. फक्त एकच ध्यास…. " टोलारखिंड ते टोलारखिंड ".
मोहिमेच्या आदल्या दिवशी लव्हाळीच्या बाळू बांबळेच्या झापावर मुक्काम केला. मोहिमेचा दिवस उजाडला…. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१. पहाटे ५ वाजता निघालो अन तासाभरात टोलारखिंडीत पोहचलो. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या खिंडीतल्या " वाघोबा " ला नारळ फोडला, छत्रपती शिवरायांचा मोठ्याने जयघोष झाला आणि मोहिमेला सुरुवात झाली.. आणि हा हा म्हणता पहिल्याच दिवशी चार वाटा पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमारास बाळू बांबळेच्या झापावर पोहचलो सुद्धा. बाळूच्या बायकोने, लक्ष्मीने गरम गरम चहा दिला आणि फ्रेश झालो. आत्मविश्वास प्रचंड वाढला…मोहीम फत्ते होणारच हे चित्र स्पष्ट झालं, कारण दुसऱ्या दिवसापासून दररोज दोनच वाटा करणार होतो. अधून मधून येणाऱ्या अडचणींवर मात करीत पुढील ५ दिवसात १० वाटा पूर्ण केल्या आणि टोलारखिंडीत पोहोचलो.
या सहा दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडाचं रौद्र पण तितकंच मनोहारी रूप बघायला मिळालं. त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडलो , काही वेळा धडपडलो पण त्याने अलगदपणे उचलूनही घेतले. ओसंडून वाहणारं पाणी पोटभर प्यालो आणि मनसोक्त डुंबलोही. निसर्गात भटकण्याचा आनंद मनमुरादपणे घेताना हरिश्चंद्रगडाला केंव्हा कवेत घेतलं ? हे कळलंच नाही. सलग सहा (६) दिवसांत चौदा (१४) वाटा पूर्ण झाल्या… ह्या स्वप्नपूर्तीचा आनंद केवळ शब्दातीत. सहकाऱ्यांना मिठी मारून या आनंदाला डोळ्यांनी वाट मोकळी करून दिली. ज्यांच्या जीवावर ही मोहीम यशस्वी झाली त्या दऱ्या-डोंगरात राहणाऱ्या सोबत्यांचा निरोप घ्यायची वेळ आली…. अक्षरशः ढसढसा रडलो सर्वजण.
हरिश्चंद्रगडावर विविध वाटांनी जाण्याचा आनंद सर्वांना मिळावा आणि स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश. भावी काळात या मोहिमेमुळे अनेक ट्रेकर्स या वाटांकडे आकर्षित होतील, यात शंकाच नाही. .
या पहिल्या मोहिमेनंतर मी
अक्षरशः झपाटलो गेलो. माझ्या मनावर हरिश्चंद्रगडाने गारुड केलं. गडाचा काना कोपरा धुंडाळून त्याचं सौंदर्य डोळ्याने भरभरून पहायचं ठरवलं. त्याच्या पोटातली गुपितं उलगडण्यासाठी छोट्या छोट्या मोहिमा आखल्या…
२) दुसरी मोहीम- गायवाट :
(१३/१४ नोव्हेंबर २०२१)
गायवाट ही तशी अवघड आणि धोकादायक वाट. ती सोपी करण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , बाळू बांबळे या तिघांना सोबत घेतलं आणि गाय वाटेवरचा * तो अवघड भाग * रुंद करून , पर्यटकांसाठी ही वाट खुली केली. या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली.. सोबत नेलेल्या छिन्नी, हातोडा आणि पहारीने काळा कातळ फोडण्याचं दिव्य त्यांनी मोठ्या कष्टाने आणि कौशल्याने पार पाडलं.. आणि महिनाभरातच स्थानिक आदिवासी बांधव पर्यटकांचे ३/४ ग्रुप गडावर घेऊनही गेले... त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आणि पर्यटकांना वेगळ्या वाटेने गडावर गेल्याचा आनंदही..
३) तिसरी मोहीम - कोकणकडा ते कोकणकडा : (जानेवारी २०२२)
ही अशीच एक अनोखी मोहीम. * कोकणकड्यापासून * डाव्या बाजूने सुरूवात करून उजव्या बाजूने पुन्हा *कोकणकड्यावर* यायचं , अशी अंदाजे वीस किलोमीटरची ही गडावरील गड प्रदक्षिणा ... गडावर येणाऱ्या सर्व वाटांना स्पर्श करीत , दाट जंगलातून , छोट्या-मोठ्या टेकड्या चढून उतरून , कड्यावरील अरुंद वाटेने , घसाऱ्या वरून , काळ्या कातळातून , दगड धोंड्यातून , प्रचंड वाढलेल्या गवतातून , पाण्यातून , उन्हातान्हात अडखळत - ठेचकाळत ही प्रदक्षिणा पूर्ण केली.. यावेळी कालभैरवनाथा ची पिंड आणि परचितरायाची मूर्ती ही ठिकाणं नव्याने पहायला मिळाली... अवघा हरिश्चंद्रगड सर्वार्थाने पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच.. माझा वर्गमित्र लक्ष्मण दराडे (परिवहन उपायुक्त, महाराष्ट्र राज्य) हा खास या मोहिमेसाठी पुण्याहून आला होता. सोबत दत्ता जगदाळेही होता… भास्कर बादड आणि बाळू बांबळे हे सावलीसारखे मागेपुढे असायचे.
४) चौथी मोहीम - हत्तीमहाल : (६ फेब्रुवारी २०२२)
तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यामध्ये * हत्ती महाल * हा परिसर आहे . या ठिकाणी कातीव दगडामध्ये बांधलेले एक छोटेसे मंदिर आहे , ज्याची खूपच पडझड झालेली आहे . त्याच्या खालच्या भागामध्ये एक मानवनिर्मित खोदलेली गुहा आहे . ही गुहा पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येऊन पूर्णपणे बुजून गेलेली होती . या गुहेत प्रवेश करता येणं केवळ अशक्य होतं. म्हणून या गुहेच्या बाहेरील , प्रवेशद्वारातील आणि आतील माती बाहेर काढून या गुहेत प्रवेश करणं हे या मोहिमेचे स्वरूप होतं. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू केलेली ही मोहीम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती . संगमनेरचे गोरख गाडे साहेब आणि रवी राऊत हे टिकाव फावडे घेऊन खोदकामात सहभागी झाले… भास्कर बादडने वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांमुळे हे खडतर काम सहजपणे पार पडलं. पाचनईचे विठ्ठल भारमल आणि संजय भारमल कंबर मोडेपर्यंत माती खोदत होते.
.
५) पाचवी मोहीम - पाचनई ते पाचनई अर्थात हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा :(४,५ ,६ मार्च २०२२)
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचनई या गावातून सुरूवात करून, पायथ्या पायथ्या ने प्रवास करीत गडाला पूर्ण वळसा घालून पुन्हा पाचनई या गावात पोहचायचं, असं या मोहिमेचं स्वरूप. दिनांक ४,५ ,६ मार्च २०२२ या तीन दिवसांत ही प्रदक्षिणा सफल झाली.
नासिकचा राहुल सराफ गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्याबरोबर सातत्याने ट्रेकला असतो , या मोहिमेतही होता. पण विशेष म्हणजे त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने, राघवनेही ही मोहीम पूर्ण केली.
प्रदक्षिणेचा मार्ग:
१ ला दिवस :- पाचनई ते खिरेश्वर
२ रा दिवस : - खिरेश्वर ते वाल्हीवरे (बेलपाडा)
३ रा दिवस : - वाल्हीवरे (बेलपाडा) ते पाचनई
६) सहावी मोहीम - (दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२)
या मोहिमेत आदरणीय उष:प्रभा पागे मॅडम (वय ८० वर्षे) व श्री. शशिकांतजी हिरेमठ (वय ६५ वर्षे) यांच्या समवेत सलग ६ दिवसांमध्ये बारा (१२) वाटा केल्या. आदरणीय पागे मॅडम या ' गिरीप्रेमी 'संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि त्यांचं नाव ट्रेकिंगच्या विश्वात अत्यंत आदराने घेतलं जातं. मा.श्री. शशिकांतजी हिरेमठ हेही गिरीप्रेमीचे संस्थापक सदस्य आहेत.
या मोहिमेनंतर पागे मॅडम यांच्यावर ' पागे मॅडम! तुम्हाला मनापासून सलाम ' हा लेख लिहिला, तो अवश्य वाचावा.
अशा मोहिमांमुळे कौशल्य पणाला तर लागतेच त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो आणि निसर्गाची प्रचंड ओढ लागते. यापुढे अनेक ट्रेकर्स अशा प्रकारच्या मोहिमा करत राहणार, ज्यामुळे स्थानिकांचाही रोजगार वाढण्यास मदत होईल.....
हरिश्चंद्रगडाच्या या मोहिमा यशस्वी पार पाडण्यात ट्रेकर्सच्या गळ्यातला ताईत असलेला आणि माझा जिवाभावाचा मित्र भास्कर बादड तसेच बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ पोकळा हे तिघे बंधू आणि कमाची मुले रामदास व अशोक, लव्हाळीचा बाळू बांबळे, निलेश बांबळे, मंगेश , पाचनईचे ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , सखाराम भारमल , सुरेश भारमल , संतोष भारमल, पोपट बादड , विठ्ठल भारमल , संजय भारमल, बजरंग भारमल , खिरेश्वरचा मारूती मेमाणे, पाचनईच्या राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अशा अनेक स्थानिक आदिवासी बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यांच्या ऋणातच कायमचे रहाणे पसंद करेन.
.
जाता जाता…..
हरिश्चंद्रगडा व त्याच्या आजूबाजूला असलेली ठिकाणं :
१) गणपतीच्या वाटेवरील मोठी गडद कातळातील खोदीव पायऱ्या आणि गणपतीची मूर्ती.
२) दरवाजाच्या वाटेवरील दोन दगडी प्रवेशद्वारे.
३) पाईरीच्या वाटेवरचं थडगं.
४) वेताळ धारेची तटबंदी, बुरुज वेताळबाबाचं ठाणं आणि पाण्याचं टाकं.
५) थनंरगडी च्या वाटेवरचा गार्यादेव.
६) देवाच्या वाटेवर आड बाजूला असलेली भूतगडद.
७) गायवाटेवरची तटबंदी आणि कातळातील खोदीव पायऱ्या.
८) बैलघाटातील बुरुज आणि तटबंदी.
९) बैलघाट चढून गेल्यावर मंदिराकडे जाताना लागणारी सात पायऱ्यांची वाट.
१०) वाघरान टेप या वाटेवरची परचितरायाची मूर्ती.
११) कोकणकड्यावरचा काळभैरवनाथ.
१२) तारामतीच्या पलीकडलं भानवस रायचं जंगल, त्याच्या खालोखाल खराटीचा पूड, आडराईचे जंगल आणि तवलीचं जंगल,.
१३) बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल.
१४) जुन्नर दरवाजा व बालेकिल्ला या मधील खोदीव गुहा, पाण्याचं बंदिस्त टाकं, महादेवाची पिंड
१५) सरपंचाची गुहा, गणपती गडद, वरंजाचा धबधबा.
१६) पाचनई जवळील पाप पुण्याची कुंडे, कोड्याच्या राजाची गादी, घोडेमाळ.
१७) कलाडच्या भैरोबाच्या मागील हपाट्याचा कडा.
१८) लव्हाळीच्या माळरानावरील चिलमीचा खडा.
१९) कुमशेत जवळ परचितरायाचा भाऊ धारेराव यांचं मंदिर.
हरिश्चंद्रगडा जवळची उंच ठिकाणे : रोहिदासाचे शिखर , सीतेचा डोंगर, कलाडचा भैरोबा, नाप्ता, कोथळ्याचा भैरोबा, बुधलीची खिंड, कारकाईचा डोंगर.
अशा कित्येक अनमोल अलंकारांनी मढलेला हा हरिश्चंद्रगड पाहू तितका थोडा, भटकू तितका कमी. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. हरिश्चंद्रगडाच्या पोटात काही अनमोल रत्ने अजूनही दडलेली असतील…. सापडली तर जरूर सांगा.
विनायक वाडेकर
९३७२० १४६३२
Subscribe to:
Post Comments (Atom)
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "
" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड " हरिश्चंद्रगड….. निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्...
-
दैनिक पुण्यनगरीच्या प्रवाह पुरवणीत *शिक्षणाची बेटं* सदरात *हरहुन्नरी आणि कार्यमग्न शिक्षक डॉ. सुधीर कुंभार* यांच्या कामाविषयी *भाऊसा...
No comments:
Post a Comment