Tuesday, November 3, 2026

आपला अकोले तालुका... ना काँग्रेसचा ना भाजपाचा .... बाले किल्ला...? ... हा तर खरे कम्युनिस्ट..

 ... आपला अकोले तालुका...

   ना काँग्रेसचा ना भाजपाचा 

      .... बाले किल्ला...?

...  हा तर खरे कम्युनिस्ट..

..पक्षाचा बाले किल्ला होता..!

**********************

 लेखन : एस. एस. पराड सर.

              .... आणि...

         श्री. भाऊराव धांडे.

------------------------------------


ब्रिटिश राजवटी पासून कॉग्रेस राजवट येई पर्यंत अकोले तालुका हा कम्युनिस्ट पक्षाचा बाले किल्ला होता, हे आताच्या पिढीला माहित असेल असे मला वाट नाही.

  महाराष्ट्रात  विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक सन 1962 साली झाली.

  त्यावेळी   आदिवासी महादेव समाजाचे कार्यकर्ते राजूरचे श्री बी. के देशमुख हे कम्युनिस्ट पक्षाच्या विळा कणीस आणि हातोडा या निवडणूक चिन्हावर निवडून आले होते. बी. के देशमुख हे अकोले तालुक्याच्या आदिवासी राखीव जागेचे पहिले आमदार! ते सलग दोन वेळा अकोले तालुक्यातून आमदार म्हणून निवडून आलेले आदिवासी महादेव कोळी समाजाचे आमदार! बी के. देशमुख फार उच्च शिक्षित नव्हते. असतील जेम तेम व्ह. पा. फायनल पास!  व्ह. पा. फायनल परीक्षा म्हणजे इंग्रज काळातील बोर्डाची सातवीची परीक्षा. त्यावेळी बोर्डाची सातवीची परीक्षा उत्तीर्ण असणे म्हणजे समाजात, गावात तालुक्यात खूप मानाची पदवी समजली जाई. सातवी पास तरुणांना तलाठी म्हणून किंवा प्राथमिक शाळा शिक्षक अथवा तहसीलदार कचेरीत कारकून म्हणून सहज नोकरी मिळत असे!

   बी. के. 1967 साली विधानसभा निवडणुकीसाठी उभे असतांना ते आमच्या खिरविरे गावी प्रचारासाठी आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रत्यक्ष पाहिले होते.

  त्यांची राहणी एकदम साधी.

पांढरा नेहरू सदरा, धोतर आणि पांढरी गांधी टोपी, पायात चामड्याच्या वहाणा ( चप्पल ) दोन बोटंमध्ये धरून  सिगारेटओढणे ,अशी साधी राहणी!

  बी. के. देशमुख  यांचा एका विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. ती सार्वत्रिक निवडणूक कोणत्या वर्षी झाली हे मला आठवत नाही. पण या निवडणुकीसाठी त्यांना स्वतःची जमीन विकावी लागली असे माझे चुलते ( काका ) कोंडाजी आवडाजी पराड की,जे अकोले तालुक्याच्या राजकारणाशी संबंधित होते, 1967 ते 1972 या कालावधीत ते आमच्या गावच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते व पुढे काही काळ अकोले तालुका पंचायत समितीचे स्वीकृत सदस्य म्हणून राहिले,त्यांनी मला हे सांगितले होते.

    बी. के. देशमुख यांची जमीन त्या निवडणुकीपायी तर गेलीच गेली पण त्यांना त्या निवडणुकीत पराभव सुद्धा स्वीकारावा लागला. त्यांच्यावर मोठं आर्थिक संकट कोसळल. इतकं की ते सिगारेटला व्याजीत झाले आणि लोकांकडे बिडीसाठी पैसे मागू लागले हे माझ्या चुलत्यांनी स्वतः पाहिले होते.आणि त्यांनीच मला सांगितलं होतं.

     त्यावेळी बी. के. देशमुख यांची मुलं लहान लहान होती. राजकारणामुळे बी. के. देशमुख यांनी बायको मुलांकडे फारसे लक्ष दिले नाही!

    पण पुढील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला ते पुन्हा कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि निवडून सुद्धा आले.

   पण यावेळी त्यांनी कुटुंबाच्या बाबतीत योग्य निर्णय घेतला! त्यांना कळून चुकले होते की पद आणि पैसा नसेल तर समाजात आपल्याला कोणीच विचारीत नाहीत. बिडी साठी त्यांना लोकांपुढे हात पसरावे लागले होते! हे ते विसरले नाहीत.

   यावेळी त्यांनी आपले पूर्ण लक्ष आपल्या कुटुंबावर केंद्रित केले! मुलांना उच्च शिक्षण देऊन नोकरीला लावले!  आणि पुढे राजकारणातून निवृत्त झाले!

   असे होते आपले, आपल्या तालुक्याचे आदिवासी समाजाचे, कम्युनिस्ट पक्षाचे आमदार मान. बी. के. देशमुख! त्यांचं खरं मराठी नाव बारकू कचरू देशमुख म्हणजेच इंग्लिशचे त्यांच्या नावातील पहिले अक्षर....

बा = बी. 

वडिलांचे क= कचरू 

  म्हणून बी.के  देशमुख असे त्यांचे नाव अकोले तालुक्यात रूढ झाले!


  बी. के. देशमुख यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्या नंतर अकोले तालुक्यात काँग्रेस ( अखिल भारतीय काँग्रेस ) चा उदय झाला.  मधुकरराव पिचड हे आपले नेतृत्व आणि नेते झाले! 


   बी. के. देशमुख दोन टर्म आमदार  राहून सुद्धा त्यांचेकडे स्वतःची बाईक किंवा चार चाकी वाहन ( कार ) नव्हती! कारण त्यावेळचे राजकारणी म्हणजे स्वतःच्या प्रपंचाचा त्याग करून समाजसेवा वृत्ती अंगी बानलेला कार्यकर्ता म्हणजे आताच्या भाषेत समाजसेवक!  अशी धारणा होती! त्यात  मुळीच स्वार्थ नव्हता. तर समाजासाठी आपले जीवन वाहून घेतलेली भावना होती. बी. के. देशमुख निष्काम कर्मयोगी होते! त्यांच्या जीवन कार्यास माझा साष्टांग नमस्कार!🙏

  आता काय परिस्थिती आहे हे ग्रामपंचायत, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका व महानगर पालिका लोक प्रतिनिधिंची? निवडून गेले की चार महिन्याच्या आत यांच्या दिमतीला महागडी फॉरच्यून किंवा इत्तर किंमती कार्स असतात!!

  कुठून मिळतात यांना अशी महागडी वाहने? तर सरकारी कामातील टक्केवारीच्या आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून! 

   अकोले तालुक्यातील एकनिष्ठ कॉम्रेड म्हणजे गरीब सामान्य जनता! विडी कामगार शेतकरी, मोलमजूर, 

आणि मराठा समाज व एकनिष्ठ हिंदू ठाकर समाज!

    अजूनही संपूर्ण नव्हे पण 90% ठाकर समाज कम्युनिस् आहे.

    कोतूळ विभागात आदिवासी समाज अल्प संख्यांक असून मराठा समाज लोकसंख्येच्या दृष्टीने बहुल आहे.

        अकोले परिसरात सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळते.

   ज्या भागात मराठा आणि आदिवासी ठाकर  समाज जास्त आहे तिथं कम्युनिस्टाचे प्राबल्य जास्त बघवयास मिळते!

   आज परिस्थिती अशी आहे की सगळीकडे प्रत्येक पक्षात विभागला गेला आहे!


  कम्युनिस्ट कार्यकर्त्याला "कॉम्रेड" असे म्हणतात आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला "साथी "किंवा भाई" असे म्हणतात!

   अजूनही आपण अकोले शहरात गेला तर आपल्याला बी. के. देशमुख यांचे स्मरणार्थ उभे राहिलेले कम्युनिस्ट भवन दिसेल.

    सध्या कामगार नेते Adv. अजित नवले साहेब हे अकोले तालुक्याच्या कम्युनिस्ट पक्षाची धुरा संभाळीत आहेत. याचा अर्थ आपल्या तालुक्यात कम्युनिस्ट पक्ष अजून जिवंत आहे! भुईसपाट झालेला नाही!

   अद्याप ही अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाज कोतुळ विभागातील मराठा समाज यांच्या जीवावर कमयुनिस्ट पक्ष तग धरून आहे ही आपल्या तालुक्यासाठी आहे  अभिमानाची बाब आहे!

  मित्र हो,सगळे विकले जातील, विकत घेतले जातील, पक्षांतर करतील पण कम्युनिस्ट कॉम्रेड कधीच विकला जाणार नाही! त्याला कोणी विकत घेऊ शकणार नाही आणि कॉम्रेड कधीच जीव गेला तरी पक्षांतर करणार नाही!!

    

   नाही म्हणायला, त्यावेळी अकोले तालुक्यात अखिल भारतीय काँग्रेस होती. वारंघुशीचे  गोपाळराव घाणे यांचे त्यावेळी काँग्रेस नेतृत्व होते!

    बी. के देशमुख तिसऱ्यांदा आमदारकीच्या निवडणूकीसाठी उभे राहिले. पण  नॅशनल काँग्रेसचे तरुण तडफदार नेतृत्व श्री. मधुकरराव पिचड यांनी त्यांचा पराभव केला आणि 1972 पासून अकोले तालुका नॅशनल काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला!

  कोण होते हे मधुकरराव पिचड साहेब?

   मधुकराव पिचड हे एका शिक्षकांचे चिरंजीव. त्यांचे नाव काशिनाथ पिचड!

  पिचड यांचे मूळ गाव अकोले तालुक्यातील पिंपरकणे!

   पण ब्रिटिश किंवा पेक्षावाईत पिंपरकणे गावच्या पिचडांना राजूर परगण्याची देशमुखी मिळाली आणि हे पिंपरकण्याचे अर्धे अधिक पिचड राजूरला स्थलांतरित झाले. राजूरला त्यांनी आपले पिचड हे आडनाव बदलून देशमुख असे केले!

   म्हणजे मधुकरराव पिचड यांचे खरे आडनाव पिचडच! पण त्यांचे वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी आपले आडनाव देशमुख असे न बदलता पिचड  असेच ठेवले!

    पण मधुकराव पिचड यांच्या घराण्याची सगळी मालमत्ता, जमीन जुमला राजूर इथंच होता आणि आहे! पिंपरकणे आणि मधुकराव पिचड घराण्याचा संबंध केवळ आडनावा पुरता मर्यादित होता आणि आजतागायत आहे तसाच आहे!

  तेव्हा आपणास कळलेच असेल की मधुकरराव पिचड यांचे मूळ घराणे कुठले?

    मधुकरराव पिचड सातत्याने 1972 ते 1992 पर्यंत अकोले राखीव ( ST ) विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले.

  पण 1994 साली शरद पवार नॅशनल काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला.

  शरद पवार हे नॅशनल काँग्रेसच्या अनेक आमदारांना घेऊन बाहेर पडले! त्यात छगन भुजबळ आणि आपले मधुकरराव पिचड सुद्धा शरद पवार सोबत गेले. तेव्हापासून महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची पडझड सुरु झाली. नॅशनल काँग्रेसचे दोन तुकडे झाले आणि कॉग्रेसची एक हाती सत्ता लोप पावली!

    शरद पवार यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमदार संख्या  बळाबळ कमी पडू लागले. म्हणून शरद पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या नेतृत्वाखाली पुलोदची ( पुरोगामी लोक दल ) आघाडी तयार केली. पुलोदचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष मान. दादासाहेब रुपवते होते. शरद पवार यांनीच दादासाहेब रुपवते यांना पुलोदचे अध्यक्ष केले होते!

  दादासाहेब रुपवते खरे रिपब्लिकन पार्टीचे! पण काही राजकीय कारणास्तव ते नॅशनल काँग्रेसमध्ये गेले. आणि पुढे जेव्हा नॅशनल काँग्रेस फुटली तेव्हा आपल्या अकोले तालुक्यातील आपले नेते मान.दादासाहेब रुपवते आणि मधुकरराव पिचड यांनी शरद पवारांना साथ दिली.

  काँग्रेस पक्ष फुटला आणि शरद पवार यांची पुलोद आघाडी महाराष्ट्रात सत्तेवर आली. शरद पवार यांनी अनेक अपक्ष आमदार आणि भाजपाचे काही फुटीर आमदार घेऊन पुलोदची स्थापना केली. म्हणून शरद पवार तरुणपणीच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी आरुढ झाले....

   अकोले तालुका आणि

********************

 भाजपा : 

********

  तसं पाहिलं तर काल परवा पर्यंत भाजपाचा आणि अकोले तालुक्याचा काहीच संबंध नव्हता.

   मान.मंत्री आणि अहिल्या नगर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भाजपाने आपल्या अकोले तालुक्यात पाय रोवले!

     विखे पाटील आणि त्यांचा इतिहास :----

   विखे पाटील त्यांच्या आजोबामुळे विखे घराणे राजकारणात प्रविष्ट झाले!

  राधाकृष्ण पाटील यांचे वडील भाऊसाहेब विखे पाटील आणि भाऊसाहेब विखे पाटील यांचे वडील म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा पद्मश्री, सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील!

  यांच मूळ गाव श्रीराम तालुक्यातील लोणी!

   माझे मित्र श्री. भाऊराव धांडे यांनी विखे पाटील कुटुंबालाविषयी छान लिहिलं आहे. माझ्या या लेखा सोबत धांडे यांचा लेख पाठवीत आहे ते जरूर वाचा! नाही तर माझा हा लेख आपण अपूर्ण वाचला असे मी समजेन. पण भाऊराव धांडे यांनी अकोले तालुक्यावर खूप छान टिप्पनी केली आहे ती वाचने ही विनंती!🙏

   मी माझ्या या लेखास इथंच पूर्ण विराम देत आहे.

    जय महाराष्ट्र!🙏

     जयभीम!🙏

     जय आदिवासी!🙏


... एस. एस. पराड सर.


दि., 01 नोव्हेंबर 2026.

No comments:

Post a Comment

आपला अकोले तालुका... ना काँग्रेसचा ना भाजपाचा .... बाले किल्ला...? ... हा तर खरे कम्युनिस्ट..

 ... आपला अकोले तालुका...    ना काँग्रेसचा ना भाजपाचा        .... बाले किल्ला...? ...  हा तर खरे कम्युनिस्ट.. ..पक्षाचा बाले किल्ला होता..! ...