Monday, April 27, 2026

बापू निर्भीड पत्रकार

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक घडामोडींना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. शांताराम काळे यांनी केवळ पत्रकारितेपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे, तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्ये देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली असून पालक, विद्यार्थी आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे शांताराम काळे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते.

बापू परिचय

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक घडामोडींना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. शांताराम काळे यांनी केवळ पत्रकारितेपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे, तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्ये देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली असून पालक, विद्यार्थी आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे शांताराम काळे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते.

Tuesday, September 23, 2025

चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले

अकोले,ता.२३:ग्रामस्थानी बोलावलेल्या ग्रामसभेकडे पाठ फिरवून ग्रामविकास अधिकारी याने कार्यलयात जाऊन सरपंच यांचे सांगण्यावरून चक्क केल्या जुन्या कागदपत्रे व चेकवर सह्या ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी कार्यलयात कोंडून घेतला लेखी कबुली जबाब चिंचोडी ग्रामपंचायत घडली ही घटना याबाबत ग्रामस्थानी तातडीने अकोले पंचायतसमिती मध्ये जाऊन गटविकास अधिकारी यांचे कडे तक्रार करून कारवाईची मागणी केली तर गटविकास अधिकारी अमर माने यांनी विस्तार अधिकारी अटकोरे यांना दिले चौकशीचे आदेश याबाबतचे वृत्त असेंकी,१७/०९/२०२५ रोजी मौजे चिंचोडी येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसेवक पवार हे मेडिकल रजेवर असल्याने सदर ग्रामसभेत अतिरिक्त पदभार असलेले ग्रामसेवक . गोडे हे काही कारणामुळे अनुपस्थित असल्यामुळे त्यांचा सचिव म्हणून पदभार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्यध्यापक . सुकटे यांनी स्विकारला असता सदर विशेष ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामस्थ आप-आपल्या मार्गी निघाले असता काही ग्रामस्थांच्या निर्दशनास आले की, मेडीकल रेजेवर असलेले ग्रामसेवक श्री. किशोर पवार हे ग्रामपंचायत कार्यालयात गेलेले आहे. काही ग्रामस्थ थोडया वेळाने कार्यालयात गेले असता असे निदर्शनास आले की ग्रामपंचायत कार्यालयातील कपाट उघडून. पवार काही तरी हाताळत होते. त्यावर ग्रामस्थांनी त्यांना विचारना केली की आपण मेडिकल रजेवर असतांना व सद्य स्थितीत गोडे यांचेकडे अतिरिक्त पदभार असतांना आपण कागदपत्रांची हाताळणी का करतात? त्यावर . पवार यांनी असे उत्तर दिले की, विद्यमान सरपंच चिचोडी यांच्या फोन वरुन मला कॉल आला होता. कॉलवर त्यांनी मला मेडिकल रजेवर असर्ताना सुध्दा चिंचोडी ग्रामपंचायत कार्यालय येथे येऊन थकीत असलेले देयके व मागील तारखा टाकुन चेक बनुन देण्यास सांगितले होते. तरी सदर घटना ग्रामस्थांनच्या निदर्शनास आल्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी सरपंचाना ग्रामपंचायत कार्यालय येथे बोलावले व घडलेल्या घटना बाबत विचारणा केली असता सरपंच यांनी सांगितले की मीच ग्रामसेवक यांना कॉल करुन कार्यालयात बोलावले होते. दप्तर अपुर्ण आहे शिवाय मागिल (स्मशान भूमिचे काम) कामांचे बिल देणे बाकी आहे यासाठी ग्रामसेवकास बोलावले होते.ग्रामस्थांनी उपस्थित केलेले म्हत्वाचे मुद्दे - > मेडिकल रजेवर असतांना ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात विनापरवानगी कागदपत्रे (चेक बुक, कॅश बुक, इत्यादी) हाताळु शकतात का ? > सरपंच यांना ग्रामपंचायत कार्यालयातील कपाटातील कागदपत्रे व इतर दस्तऐवज हाताळण्याची परवानगी आहे का ? > ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतांना शिवाय त्यांची दुस-या ठिकाणी बदली झालेली असतांना मागील तारखेचे चेक देऊ शकतात का ? > सर्व कामकाजामध्ये सरपंच बाई ऐवजी त्यांचे पती काम बघतात हे कायदेशीर आहे का ? कोट - चिंचोडी ग्रामस्थांची तक्रार मिळाली असून या प्रकरणाची चौकशी साठी विस्तार अधिकारी विशाल अटकोरे यांची नियुक्ती केली आहे . अमर माने (गटविकास अधिकारी )

Sunday, September 21, 2025

हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला

हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला

हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला
अकोले,ता.२१:हरिश्चंद्रगड रानफुलांनी बहरलाय मग कधी भेट देताय. आपल्या लाडक्या हरिश्चंद्र गडाला,आम्ही आहोतच तुमच्या स्वागताला.असे फ्लेक्स बोर्ड स्थानिक व्यवसायिक लावून पर्यटकाना व निसर्ग प्रेमीना साद घालत आहेत। पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते हरिसचंद्रगड पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पणपाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्‍या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्‍या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्‍या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.   कोट - आमच्या हरिसचंद्रगड पठार बेटावर नवरात्रीच्या स्वागतसाठी पिवळीधमक सोनकीने पठाराची शोभा वाढवली आहे .तिच्याबरोबरच गुलाबी,निळसर,पांढरी विविधरंगाची व विविध नावाची फुले तिला साथ देत आहे .तेव्हा पर्यटकांनी निसर्गप्रेमींना एकदा हरिशचंद्र गड परिसराला भेट दयावी भास्कर बादड (सरपंच पाचनई)

Wednesday, August 6, 2025

बापू जन्मदिवस

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व ३३ वर्षे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही मनात; उर्मी असणारे शांताराम बापू काळे यांचा ५९वा वाढदिवस; आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिललक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला; प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप; व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .; कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे; ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरलेआज वनिताचे वडील परबत आई; भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे रतनवाडी येथील सोनाली ही फुले विकणारी मुलगी माजी प्राध्यापक रावसाहेब मोरे यांच्या दातृत्व गुणांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आली .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष बापू तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत; बापूना; गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास; नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे

Tuesday, July 29, 2025

अकोले तालुका पर्यटन

अकोले तालुका निसर्ग,पर्यावरण,इतिहास,भूगोल,भूशास्र,अशा अनेक दृष्टीने समृध्द आहे.तालुक्यातील चार मध्ययुगीन मंदिरे त्यात भाविकांप्रमाणे अभ्यासकांनाही अशीच भुरळ घालतात. यामध्ये टाहाकारीचे जगदंबा (अंबिका)मंदिर वगळता रतनवाडीचे अमृतेश्वर ,अकोल्याचे सिध्देश्वर आणि हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर ही तीन मंदिरे शिवालये आहेत. तिथल्या शिल्पांचा बारकाईने अभ्यास केल्यास ही शिवाची तांत्रिक मंदिरे असावीत असा अंदाज करता येतो.अकोल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी यासंबंधाने बराच अभ्यास केलेला आहे. या मंदिरांचे अनोखे स्थापत्य,त्यांचे सौंदर्य, त्यांची निर्मिती,मंदिरांची शिखरे,जंघा भागातील सूर सुंदरींची शिल्पे,आतले वितान या सगळ्या गोष्टींबरोबरच मंदिरांचा अधिकृत इतिहास समजून घ्यायचा असेल तर 'उज्ज्वल उद्यासाठी' या त्रैमासिकाचा हा अंक जरूर वाचा. आणखी एक,एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा.अशा सुंदर मंदिर शैलीला अनेक जण 'हेमाडपंती'मंदिरे म्हणतात. ते 100 पक्के चूक आहे. हेमाडपंती म्हणजे 'हेमाद्री' नावाच्या यादवांच्या कारभा-याने बांधलेली.हा हेमाद्री तेराव्या शतकातला. ही मंदिरे दहाव्या-अकराव्या शतकातली. याबाबत याच अंकात आणखी जाणून घ्या.

भंडारदरा पाऊस

*भंडारदऱ्याचा पाऊस!* लेखक : भाऊसाहेब चासकर वैशाख सरता-सरता कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात पश्चिमेकडून भन्नाट वारा वाहू लागतो. पाठोपाठ आकाशात काळे ढगही जमा होऊ लागतात. तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकू लागतो. बरसून गेलेली एखादी सर मागोमाग मान्सून येणार असल्याची वर्दी देऊन जाते. ग्रीष्माच्या तापलेल्या उन्हात चांगलीच भाजून निघालेली तांबडी माती जणू याचीच प्रतीक्षा करीत असते! पाठोपाठच कोकणकड्यांवरून पाऊस दाखल होतोही. पाहता-पाहता तो मस्त ताल धरतो. भंडारदर्‍याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आणि सूरही आहे! म्हणूनच त्याचे येणे आनंदाचे गाणे होऊन जाते. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेरी आल्यागत मोसमी पाऊस येथे नादावतो. अवघ्या चराचर सृष्टीशी त्याचे गुज सुरु होते आणि बघता-बघता सह्यगिरीच्या कुशीत थबथबतो अनोखा जलोत्सव! भंडारदर्‍याचा पाऊस म्हणजे सृष्टीला सुखावणारा, आनंदाचे गाणे गाणारा, जगण्याला उभारी देणारा, बळ देणारा, चित्तवृत्ती प्रसन्न करणारा... सर्वांना हवाहवासा वाटणारा! ऋतुचक्र पुढे-पुढे सरकतेय. वर्षामागून वर्षे लोटलीत. भंडारदर्‍याच्या पावसाचा स्वभाव फारसा बदललेला नाहीये. भंडारदर्‍याचा पाऊस पाऊसवेड्यांच्या मनाला मोहिनी घालत त्यांना हिरवे-ओले स्वप्न दाखवीत, आमंत्रण देत आलाय. दर वर्षी त्याच्या येण्याची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. कधी तो चातकासारखी वाट पाहायला लावतो. कधी अगदी वेळेवर दाखल होतो. कधी रिमझिम बरसतो. तर कधी बेभान होवून धो-धो कोसळताना भूमिपुत्रांना 'नको नको रे पावसा...!' अशी आर्त विनवणी करायला लावतो. तर असा हा इथला पाऊस. *पावसाळी रानभूल!* पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारे धुके... सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला भन्नाट गारवा... टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस... पर्वत-शिखरांच्या कडेकपारीतून-डोंगर उतारांवरुन उड्या घेत आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, भंडारदरा धरणाच्या दिशेने खळाळत वाहणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... या ओढ्या-नाल्यांचे पाणी पिऊन खपाटीला गेलेल्या भंडारदर्‍याच्या जलाशयाचे पोट भरू लागते. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि कृष्णवंती या पूर्ववाहिनी नद्या दुथडी भरून वाहू लागतात. लालसर विटकरी पाण्याने भातखाचरे तुडुंब भरतात. या भातखाचरांत स्थानिक आदिवासींची चिखलणी आणि आवणीची लगबग सुरु असते. माळरानावर-पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत आणि साथीला असतो जीवाला वेडावून टाकणारा तो रानगंध... निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत आषाढ-श्रावणात असे परिपूर्ण निसर्गचित्रच जणू अवतीर्ण होते! यावं आणि धुंद होवून जावं, असं इथलं हे पावसाळी वातावरण. हा जलोत्सव बघायला, इथल्या या झिम्माड सरीत भिजायला पाऊसवेड्यांची केवढी मोठी झुंबड उडते! *रुपेरी जलधारांचे अगणित प्रपात!* पाऊस कोसळत असतो. वर्षा ऋतू धुंद नि कुंद. आभाळात निळ्या-काळ्या रंगाच्या राशी रचलेल्या. सूर्य जणू वर्षाकालीन रजेवर गेलेला! त्याची किरणे ढगातल्या ढगात विरलेली. नाचरा नाद करीत ओढे-नाले बेलगाम होऊन निघतात. डोंगर कड्यांवरून धबधबे कोसळू लागतात. वसुंधरा, बाहुबली, रंधा, नेकलेस, अम्ब्रेला... मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रदच्या रस्त्यावर अगणित धबधबे... जिकडे पहावे तिकडे धबधबे! विविध आकाराचे. प्रत्येकाचा आपला निराळा स्वभावविशेष! प्रत्येकाचे गाणे वेगळे, रूप-आकार सारे वेगळे. काही ज्ञानेशांच्या ओवीसारखे ओघळणारे! कुठे भाबडे तर कुठे आक्रमकतेने अंगावर येणारे तुकोबारायांच्या अभंगासारखे! साम्रदच्या सांधण व्हॅलीजवळ कड्यावरून पाण्याचा प्रवाह खाली कोसळतो तेव्हा पश्चिम बाजूने येणारा वारा पाणी हवेत उडवतो. हा रिव्हर्स वॉटरफॉल गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला धुडकावून उंच हवेत उडतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यात मौज असते. जीवाशिवाच्या भक्तीभावाने उड्या घेत सारे धबधबे आणि ओहोळ भंडारदरा धरणात आपला शेवट करतात. समर्पित होतात. इथे सह्यगिरीच्या दऱ्याखोऱ्यात वारा आणि धबधबे यांची झटपट भीम-जरासंधाच्या युद्धासारखीच असते. कुठे कुठे तर कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारांना वारा पुन्हा वर लोटतो. गुरुत्वाकर्षणाला धुडकावून या पाऊसधारा खुशाल काळ्या मेघांत मिसळतात. साम्रदच्या धबधब्याचे ते अपूर्व दृश्य निसर्गाच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देते. रतनगड आणि हरिश्चंद्रगडाच्या डोंगरावरील धबधबे तसे काहीसे रांगडेच! यांचा शेवट दिसतो, आरंभ कायमच धुक्यात गुडूप झालेला! जलोत्सव बहरतो तसा रंधा धबधबा पुन्हा तरुण होऊन; अजून यौवनात मी...' असे गाणे म्हणत आपल्याच नादात बेभान होऊन कोसळत असायचा. निळवंडे धरणाचे बॅक वॉटर रंधा धबधब्याला पोटात घेते... त्याच्या चाहत्यांची घोर निराशा होते. नाशिक-मुंबई-पुणेकर मंडळी कुटुंबकबिल्यासह येतात. सह्यगिरीच्या कुशीतल्या जलोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसाच्या झिम्माड सरी अंगावर घ्यायच्या. धबधब्यांखाली मस्त भिजायचं. चिंब व्हायचं. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतः हरवून द्यायचं, असा रिवाजच आता पडू लागलाय. इथले काही धबधबे तर नुसते पाहायचे, काहींचे तुषार अंगावर घ्यायचे. तर काहींच्या जलधारांत ओलेचिंब भिजायचे. केवढी ही विविधता. तनामनाला सुखावणारी. उल्हासित करणारी! *भंडारदरा धरण उर्फ विल्सन डॅम!* मुंबई-नासिक आणि पुणे या बरोब्बर त्रिकोणातले वर्षा सहलीसाठी एकदम भन्नाट जागा आहे भंडारदरा! एका बाजूला रतनगड, कात्राबाई, पाबरगडाची मोठ्ठी पर्वतरांग तर उत्तरेला कुलंग, मदन आणि अलंग हे दुर्गत्रिकुट आणि शेजारी कळसूबाई. यांच्या मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा अफाट, अथांग जलाशय. पावसाळ्यातला भंडारदरा म्हणजे निसर्गाचा नयनरम्य आविष्कारच! जुलै-ऑगस्ट महिन्यात धरण भरते. कुठून कुठून येणारे अगणित प्रवाह एकात्मतेचे गाणे गात धरणात येऊन मिसळतात. आभाळातली निळाई यावर हुकुमत गाजवीत असते. वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर त्या अथांग निळ्याशार दर्यातील लाटा उसळी घेत राहतात. काठावर येऊन आदळतात. तेव्हा चुबुक-चुबुक असा गमतीदार आवाज उठतो. निसर्गवेड्यांची झुंबड सदा येथे उडालेली. चिंता-काळजी, कामधंदा याची बोचकी घरात बांधून ठेऊन हे सारे जणू फुलपाखरे होवून उडताहेत, बागडताहेत! पाण्याचा नाच पाहताहेत. स्वतःदेखील नाचताहेत... दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करत बीभत्स नाचणारे काही नग मात्र नजरेला खटकत राहतात. *पावसाळ्यातले घाटघर; निसर्गसौंदर्याचा मानबिंदू!* पावसाळ्यातले घाटघर म्हणजे भंडारदर्‍याच्या अभिजात निसर्गसौंदर्याचा मानबिंदूच जणू! घाटघर म्हणजे नगर जिल्ह्याची चेरापुंजीच. दरवर्षी पाच-साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस येथे कोसळतो! म्हणूनच पावसाळ्यातले ओलेचिंब घाटघर पाहणे, हा अवर्णनीय असा अनुभव असतो. धुक्याच्या लाटांमागून लाटा वर येताहेत. कोकणकड्यावर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले की, खाली खोल दरी धुक्याने गच्च भरलेली दिसते. मनाच्या गाभाऱ्यातून आठवणी याव्यात, तसे एकामागून एक तलम धुक्याचे लोट येत असतात. साऱ्या आसमंताला कवेत घेतात. पुढच्या क्षणी धुक्याचा हा नाजूकसा पडदा दूर होतो. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू आपल्या पुढ्यात उभा आहे. हा खेळ रंगात असताना मधूनच आभाळ टपोऱ्या थेंबानी बरसू लागते. पावसाचे कोसळणे... वाऱ्याचे येणे-जाणे...असे सुरु राहते. वारा-धुके-पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ येथे सुरूच असतो. सुसाट, विराट आणि भन्नाट! येथील पाऊस, धुके, ओढे-नाले, झाडं-वेली यांच्याशी आपले चटकन नाते जुळून जाते. चैतन्याचा आंनदोत्सव होण्याचं हेच ते ठिकाण. पावसाचे गाणे इथेच ऐकू येते. निसर्गाचे काव्य इथेच उगम पावते! हे सारे पाहताना, अनुभवताना आपण बेधुंद, बेहोश! इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी रंग ताजा, टवटवीत आणि हवाहवासा वाटणारा असतो. सगळे काही जुळून आल्याने इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते! सप्तरंगांत सारी सृष्टी न्हावून निघते. नवलाईचे रंग उधळते. पाऊस आत आत पाझरत राहतो. अशा रम्य सायंकाळी कातरवेळी पावसाची गाणी हमखास मनात झिरपतात... लकेरी छेडल्या जातात. रानातील सुंदरता आणि उदारता यांनी आपले अंत:करण भरून जाते! *चित्रकार पाऊस..!* पाऊस म्हणजे सृष्टीचा प्राणसखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. अवघी सृष्टी आपली कुस बदलते! उजाड, ओसाड-भकासपणा कुठल्या कुठे गेलेला. निसर्ग कात टाकतो. चैतन्याने मोहरतो. चराचर सुखावते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी सळसळ सगळीकडे जाणवू लागते. हिरवाईचे ताजे टवटवीत रंग पाऊस भरू लागतो. झाडं-वेलींना नवा तजेला येतो. सारी सृष्टी चैतन्याने जणू मोहरून जाते. तिला आनंदाचे भरतेच येते! असा हा पाऊस म्हणजे सृजनशील चित्रकारच जणू! *भंडारदर्‍याचा पाऊस: उत्तर नगरचा पोशिंदा!* पावसाच्या येण्याची वाट केवळ येथील भूमिपुत्रच पाहतात असे नाही, तर संपूर्ण नगर जिल्हा त्याच्या येण्याकडे, बरसण्याकडे डोळे लावून बसलेला असतो. हा पाऊस म्हणजे केवळ निसर्गाला विलोभनीय रंग, रूप देणारा किमयागारच नाही तर शेती-भाती फुलवणारा, अख्ख्या नगर जिल्ह्यातील चराचरांची तहान भागविणारा, वीजनिर्मिती करणारा, साखर कारखान्यांची चाके फिरती ठेवणारा, शेतमळे फुलविणारा... भंडारदर्‍याचा पाऊस खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याचा 'पोशिंदा'च जणू! *पावसाचे मोजमाप-* अठराव्या शतकापर्यंत या पावसाचे शब्दांत(म्हणजे केवळ विशेषणं वापरून) 'वर्णन' केले जायचे. नक्षत्र आणि त्याचं वाहन यावरून त्याची तीव्रता सांगितली किंवा ठरवली जायची. प्रत्येक नक्षत्राशी निगडीत म्हणी आणि शब्दप्रयोगातून त्याचे वैशिष्ट्य अधोरेखित केले जात असे. ते मोठेच गमतीशीर होते. पुढे एकोणिसावे शतक संपता-संपता तत्कालीन ब्रिटिश सरकारने पावसाला इंचाच्या पट्टीने मोजायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ इंचात नोंद घेतली जात असे. फार थोड्या लोकांना याची माहिती असायची. पुढे दशमान पद्धती आली. पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये कळायला लागली. पुढे त्या त्या नदीच्या खोऱ्याचे 'वॉटर अकाउंट' झाले. पाणी अडवण्यास धरणे बांधली गेली. पाण्यावरून राजकारण सुरु झाले. म्हणूनच पावसाच्या आकडेवारीला मोठे महत्त्व आले. याबाबतचा आणखीन एक विशेष मुद्दामहून सांगायला हवा. तो म्हणजे या परिसरातला सर्वसामान्य माणूस देखील ‘पाऊस-साक्षर‘ झालाय. मिलीमीटर किंवा इंचात पावसाचे आकडे तसेच प्रवाह आणि पाण्याचा साठा मोजायला वापरली जाणारी क्युसेक्स आणि 'टीएमसी'ची भाषा पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या ओठाओठांवर असते. दिवसभरात किती पाणी आले किती विसर्ग सोडलाय याचे आकडे लाभक्षेत्रातले लोक करत असतात. राज्यभरात सामान्य माणसांत इतकी जलसाक्षरता क्वचित दिसून येईल. याचं श्रेय इथल्या विविध दैनिकांच्या स्थानिक वार्ताहरांना द्यावे लागेल. *वरूणराजाचे विविध गुणदर्शन!* सन १९०८पासून घाटघरचा पाऊस मोजायला सुरुवात झाली. भंडारदरा येथे १९०९पासून पावसाची नोंद ठेवायला सुरुवात झाली. आधी सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षांनंतरही येथील पावसाचा स्वभाव बदललेला नाहीये. शतकभरातील आकडेच तर हे बोलताहेत. इथल्या पावसाची रूपेही निरनिराळी. दर कोसांवर भाषा बदलते म्हणतात. इथे दर पाच मैलांवर पावसाची रूपे बदलत जातात. एका अर्थाने पावसाची बदलत जाणारी भाषाच! पश्चिमेकडून जसेजसे पूर्वेकडे जावे तसेतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. अगदी तपशीलातच बोलायचे तर अनेकदा नगर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाच्या घाटघरला जेव्हा बेभान पाऊस कोसळत असतो तेव्हा भंडारदर्‍याला पावसाच्या जोरदार सारी झडत असतात. माळेगावला पावसाची रिमझिम सुरु असते. राजूरला एखादी दुसरी सर येऊन जाते. अकोल्याला केवळ ढगाळ वातावरण असते. तर पूर्वेकडच्या कळस गावात चक्क ऊन पडलेले असते! अकोले तालुक्यातल्या पश्चिम टोकाच्या घाटघरपासून पूर्व टोकाच्या सीमेवरील कळसपर्यंतच्या अडुसष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरातले वरूणराजाचे हे विविध गुणदर्शन! कुमशेत, पाचनई, पेठेचीवाडी या हरिश्चंद्रगड परिसरातील दुर्गम गावात घाटघर-रतनवाडी असाच किंबहुना याहून मुसळधार पाऊस कोसळतो. तेथील निसर्ग अजून बऱ्यापैकी अनाघ्रात आहे. इथला पाऊसदेखील चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. अंबित व्हॅलीच्या सदाबहार निसर्गामुळे इथल्या पावसाळी पर्यटनाची मजा काही औरच असते! अलीकडे इथल्या पावसाळी पर्यटनाला बेधुंद, बेभान अतिउत्साही पर्यटकांच्या बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे ही काळजीची बाब म्हणावी लागेल. ते काहीही असो... ‘भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!‘ या कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी किती चपखल आहेत... भंडारदरा धरणाच्या परिसरात मिळणारा पावसाळी पर्यटनातला आनंद अन्य कुठेही नाही... (लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत शिक्षक असून, निसर्ग निरीक्षक आणि छायाचित्रकार आहेत.) मोबाइल - 9422855151 #भंडारदरा #घाटघर #महाराष्ट्र #पर्यटन #सांधण_व्हॅली #धबधबे #जलोत्सव #पावसाळी_पर्यटन #रानभूल #सह्याद्री *...सुप्रभात...**भंडारदऱ्याचा पाऊस!* लेखक : भाऊसाहेब चासकर वैशाख सरता-सरता कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात पश्चिमेकडून भन्नाट वारा वाहू लागतो. पाठोपाठ आकाशात काळे ढगही जमा होऊ लागतात. तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकू लागतो. बरसून गेलेली एखादी सर मागोमाग मान्सून येणार असल्याची वर्दी देऊन जाते. ग्रीष्माच्या तापलेल्या उन्हात चांगलीच भाजून निघालेली तांबडी माती जणू याचीच प्रतीक्षा करीत असते! पाठोपाठच कोकणकड्यांवरून पाऊस दाखल होतोही. पाहता-पाहता तो मस्त ताल धरतो. भंडारदर्‍याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आणि सूरही आहे! म्हणूनच त्याचे येणे आनंदाचे गाणे होऊन जाते. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेरी आल्यागत मोसमी पाऊस येथे नादावतो. अवघ्या चराचर सृष्टीशी त्याचे गुज सुरु होते आणि बघता-बघता सह्यगिरीच्या कुशीत थबथबतो अनोखा जलोत्सव! भंडारदर्‍याचा पाऊस म्हणजे सृष्टीला सुखावणारा, आनंदाचे गाणे गाणारा, जगण्याला उभारी देणारा, बळ देणारा, चित्तवृत्ती प्रसन्न करणारा... सर्वांना हवाहवासा वाटणारा! ऋतुचक्र पुढे-पुढे सरकतेय. वर्षामागून वर्षे लोटलीत. भंडारदर्‍याच्या पावसाचा स्वभाव फारसा बदललेला नाहीये. भंडारदर्‍याचा पाऊस पाऊसवेड्यांच्या मनाला मोहिनी घालत त्यांना हिरवे-ओले स्वप्न दाखवीत, आमंत्रण देत आलाय. दर वर्षी त्याच्या येण्याची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. कधी तो चातकासारखी वाट पाहायला लावतो. कधी अगदी वेळेवर दाखल होतो. कधी रिमझिम बरसतो. तर कधी बेभान होवून धो-धो कोसळताना भूमिपुत्रांना 'नको नको रे पावसा...!' अशी आर्त विनवणी करायला लावतो. तर असा हा इथला पाऊस. *पावसाळी रानभूल!* पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारे धुके... सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला भन्नाट गारवा... टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस... पर्वत-शिखरांच्या कडेकपारीतून-डोंगर उतारांवरुन उड्या घेत आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, भंडारदरा धरणाच्या दिशेने खळाळत वाहणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... या ओढ्या-नाल्यांचे पाणी पिऊन खपाटीला गेलेल्या भंडारदर्‍याच्या जलाशयाचे पोट भरू लागते. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि कृष्णवंती या पूर्ववाहिनी नद्या दुथडी भरून वाहू लागतात. लालसर विटकरी पाण्याने भातखाचरे तुडुंब भरतात. या भातखाचरांत स्थानिक आदिवासींची चिखलणी आणि आवणीची लगबग सुरु असते. माळरानावर-पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत आणि साथीला असतो जीवाला वेडावून टाकणारा तो रानगंध... निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत आषाढ-श्रावणात असे परिपूर्ण निसर्गचित्रच जणू अवतीर्ण होते! यावं आणि धुंद होवून जावं, असं इथलं हे पावसाळी वातावरण. हा जलोत्सव बघायला, इथल्या या झिम्माड सरीत भिजायला पाऊसवेड्यांची केवढी मोठी झुंबड उडते! *रुपेरी जलधारांचे अगणित प्रपात!* पाऊस कोसळत असतो. वर्षा ऋतू धुंद नि कुंद. आभाळात निळ्या-काळ्या रंगाच्या राशी रचलेल्या. सूर्य जणू वर्षाकालीन रजेवर गेलेला! त्याची किरणे ढगातल्या ढगात विरलेली. नाचरा नाद करीत ओढे-नाले बेलगाम होऊन निघतात. डोंगर कड्यांवरून धबधबे कोसळू लागतात. वसुंधरा, बाहुबली, रंधा, नेकलेस, अम्ब्रेला... मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रदच्या रस्त्यावर अगणित धबधबे... जिकडे पहावे तिकडे धबधबे! विविध आकाराचे. प्रत्येकाचा आपला निराळा स्वभावविशेष! प्रत्येकाचे गाणे वेगळे, रूप-आकार सारे वेगळे. काही ज्ञानेशांच्या ओवीसारखे ओघळणारे! कुठे भाबडे तर कुठे आक्रमकतेने अंगावर येणारे तुकोबारायांच्या अभंगासारखे! साम्रदच्या सांधण व्हॅलीजवळ कड्यावरून पाण्याचा प्रवाह खाली कोसळतो तेव्हा पश्चिम बाजूने येणारा वारा पाणी हवेत उडवतो. हा रिव्हर्स वॉटरफॉल गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला धुडकावून उंच हवेत उडतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यात मौज असते. जीवाशिवाच्या भक्तीभावाने उड्या घेत सारे धबधबे आणि ओहोळ भंडारदरा धरणात आपला शेवट करतात. समर्पित होतात. इथे सह्यगिरीच्या दऱ्याखोऱ्यात वारा आणि धबधबे यांची झटपट भीम-जरासंधाच्या युद्धासारखीच असते. कुठे कुठे तर कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारांना वारा पुन्हा वर लोटतो. गुरुत्वाकर्षणाला धुडकावून या पाऊसधारा खुशाल काळ्या मेघांत मिसळतात. साम्रदच्या धबधब्याचे ते अपूर्व दृश्य निसर्गाच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देते. रतनगड आणि हरिश्चंद्रगडाच्या डोंगरावरील धबधबे तसे काहीसे रांगडेच! यांचा शेवट दिसतो, आरंभ कायमच धुक्यात गुडूप झालेला! जलोत्सव बहरतो तसा रंधा धबधबा पुन्हा तरुण होऊन; अजून यौवनात मी...' असे गाणे म्हणत आपल्याच नादात बेभान होऊन कोसळत असायचा. निळवंडे धरणाचे बॅक वॉटर रंधा धबधब्याला पोटात घेते... त्याच्या चाहत्यांची घोर निराशा होते. नाशिक-मुंबई-पुणेकर मंडळी कुटुंबकबिल्यासह येतात. सह्यगिरीच्या कुशीतल्या जलोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसाच्या झिम्माड सरी अंगावर घ्यायच्या. धबधब्यांखाली मस्त भिजायचं. चिंब व्हायचं. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतः हरवून द्यायचं, असा रिवाजच आता पडू लागलाय. इथले काही धबधबे तर नुसते पाहायचे, काहींचे तुषार अंगावर घ्यायचे. तर काहींच्या जलधारांत ओलेचिंब भिजायचे. केवढी ही विविधता. तनामनाला सुखावणारी. उल्हासित करणारी! *भंडारदरा धरण उर्फ विल्सन डॅम!* मुंबई-नासिक आणि पुणे या बरोब्बर त्रिकोणातले वर्षा सहलीसाठी एकदम भन्नाट जागा आहे भंडारदरा! एका बाजूला रतनगड, कात्राबाई, पाबरगडाची मोठ्ठी पर्वतरांग तर उत्तरेला कुलंग, मदन आणि अलंग हे दुर्गत्रिकुट आणि शेजारी कळसूबाई. यांच्या मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा अफाट, अथांग जलाशय. पावसाळ्यातला भंडारदरा म्हणजे निसर्गाचा नयनरम्य आविष्कारच! जुलै-ऑगस्ट महिन्यात धरण भरते. कुठून कुठून येणारे अगणित प्रवाह एकात्मतेचे गाणे गात धरणात येऊन मिसळतात. आभाळातली निळाई यावर हुकुमत गाजवीत असते. वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर त्या अथांग निळ्याशार दर्यातील लाटा उसळी घेत राहतात. काठावर येऊन आदळतात. तेव्हा चुबुक-चुबुक असा गमतीदार आवाज उठतो. निसर्गवेड्यांची झुंबड सदा येथे उडालेली. चिंता-काळजी, कामधंदा याची बोचकी घरात बांधून ठेऊन हे सारे जणू फुलपाखरे होवून उडताहेत, बागडताहेत! पाण्याचा नाच पाहताहेत. स्वतःदेखील नाचताहेत... दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करत बीभत्स नाचणारे काही नग मात्र नजरेला खटकत राहतात. *पावसाळ्यातले घाटघर; निसर्गसौंदर्याचा मानबिंदू!* पावसाळ्यातले घाटघर म्हणजे भंडारदर्‍याच्या अभिजात निसर्गसौंदर्याचा मानबिंदूच जणू! घाटघर म्हणजे नगर जिल्ह्याची चेरापुंजीच. दरवर्षी पाच-साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस येथे कोसळतो! म्हणूनच पावसाळ्यातले ओलेचिंब घाटघर पाहणे, हा अवर्णनीय असा अनुभव असतो. धुक्याच्या लाटांमागून लाटा वर येताहेत. कोकणकड्यावर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले की, खाली खोल दरी धुक्याने गच्च भरलेली दिसते. मनाच्या गाभाऱ्यातून आठवणी याव्यात, तसे एकामागून एक तलम धुक्याचे लोट येत असतात. साऱ्या आसमंताला कवेत घेतात. पुढच्या क्षणी धुक्याचा हा नाजूकसा पडदा दूर होतो. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू आपल्या पुढ्यात उभा आहे. हा खेळ रंगात असताना मधूनच आभाळ टपोऱ्या थेंबानी बरसू लागते. पावसाचे कोसळणे... वाऱ्याचे येणे-जाणे...असे सुरु राहते. वारा-धुके-पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ येथे सुरूच असतो. सुसाट, विराट आणि भन्नाट! येथील पाऊस, धुके, ओढे-नाले, झाडं-वेली यांच्याशी आपले चटकन नाते जुळून जाते. चैतन्याचा आंनदोत्सव होण्याचं हेच ते ठिकाण. पावसाचे गाणे इथेच ऐकू येते. निसर्गाचे काव्य इथेच उगम पावते! हे सारे पाहताना, अनुभवताना आपण बेधुंद, बेहोश! इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी रंग ताजा, टवटवीत आणि हवाहवासा वाटणारा असतो. सगळे काही जुळून आल्याने इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते! सप्तरंगांत सारी सृष्टी न्हावून निघते. नवलाईचे रंग उधळते. पाऊस आत आत पाझरत राहतो. अशा रम्य सायंकाळी कातरवेळी पावसाची गाणी हमखास मनात झिरपतात... लकेरी छेडल्या जातात. रानातील सुंदरता आणि उदारता यांनी आपले अंत:करण भरून जाते! *चित्रकार पाऊस..!* पाऊस म्हणजे सृष्टीचा प्राणसखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. अवघी सृष्टी आपली कुस बदलते! उजाड, ओसाड-भकासपणा कुठल्या कुठे गेलेला. निसर्ग कात टाकतो. चैतन्याने मोहरतो. चराचर सुखावते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी सळसळ सगळीकडे जाणवू लागते. हिरवाईचे ताजे टवटवीत रंग पाऊस भरू लागतो. झाडं-वेलींना नवा तजेला येतो. सारी सृष्टी चैतन्याने जणू मोहरून जाते. तिला आनंदाचे भरतेच येते! असा हा पाऊस म्हणजे सृजनशील चित्रकारच जणू! *भंडारदर्‍याचा पाऊस: उत्तर नगरचा पोशिंदा!* पावसाच्या येण्याची वाट केवळ येथील भूमिपुत्रच पाहतात असे नाही, तर संपूर्ण नगर जिल्हा त्याच्या येण्याकडे, बरसण्याकडे डोळे लावून बसलेला असतो. हा पाऊस म्हणजे केवळ निसर्गाला विलोभनीय रंग, रूप देणारा किमयागारच नाही तर शेती-भाती फुलवणारा, अख्ख्या नगर जिल्ह्यातील चराचरांची तहान भागविणारा, वीजनिर्मिती करणारा, साखर कारखान्यांची चाके फिरती ठेवणारा, शेतमळे फुलविणारा... भंडारदर्‍याचा पाऊस खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याचा 'पोशिंदा'च जणू! *पावसाचे मोजमाप-* अठराव्या शतकापर्यंत या पावसाचे शब्दांत(म्हणजे केवळ विशेषणं वापरून) 'वर्णन' केले जायचे. नक्षत्र आणि त्याचं वाहन यावरून त्याची तीव्रता सांगितली किंवा ठरवली जायची. प्रत्येक नक्षत्राशी निगडीत म्हणी आणि शब्दप्रयोगातून त्याचे वैशिष्ट्य अधोरेखित केले जात असे. ते मोठेच गमतीशीर होते. पुढे एकोणिसावे शतक संपता-संपता तत्कालीन ब्रिटिश सरकारने पावसाला इंचाच्या पट्टीने मोजायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ इंचात नोंद घेतली जात असे. फार थोड्या लोकांना याची माहिती असायची. पुढे दशमान पद्धती आली. पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये कळायला लागली. पुढे त्या त्या नदीच्या खोऱ्याचे 'वॉटर अकाउंट' झाले. पाणी अडवण्यास धरणे बांधली गेली. पाण्यावरून राजकारण सुरु झाले. म्हणूनच पावसाच्या आकडेवारीला मोठे महत्त्व आले. याबाबतचा आणखीन एक विशेष मुद्दामहून सांगायला हवा. तो म्हणजे या परिसरातला सर्वसामान्य माणूस देखील ‘पाऊस-साक्षर‘ झालाय. मिलीमीटर किंवा इंचात पावसाचे आकडे तसेच प्रवाह आणि पाण्याचा साठा मोजायला वापरली जाणारी क्युसेक्स आणि 'टीएमसी'ची भाषा पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या ओठाओठांवर असते. दिवसभरात किती पाणी आले किती विसर्ग सोडलाय याचे आकडे लाभक्षेत्रातले लोक करत असतात. राज्यभरात सामान्य माणसांत इतकी जलसाक्षरता क्वचित दिसून येईल. याचं श्रेय इथल्या विविध दैनिकांच्या स्थानिक वार्ताहरांना द्यावे लागेल. *वरूणराजाचे विविध गुणदर्शन!* सन १९०८पासून घाटघरचा पाऊस मोजायला सुरुवात झाली. भंडारदरा येथे १९०९पासून पावसाची नोंद ठेवायला सुरुवात झाली. आधी सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षांनंतरही येथील पावसाचा स्वभाव बदललेला नाहीये. शतकभरातील आकडेच तर हे बोलताहेत. इथल्या पावसाची रूपेही निरनिराळी. दर कोसांवर भाषा बदलते म्हणतात. इथे दर पाच मैलांवर पावसाची रूपे बदलत जातात. एका अर्थाने पावसाची बदलत जाणारी भाषाच! पश्चिमेकडून जसेजसे पूर्वेकडे जावे तसेतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. अगदी तपशीलातच बोलायचे तर अनेकदा नगर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाच्या घाटघरला जेव्हा बेभान पाऊस कोसळत असतो तेव्हा भंडारदर्‍याला पावसाच्या जोरदार सारी झडत असतात. माळेगावला पावसाची रिमझिम सुरु असते. राजूरला एखादी दुसरी सर येऊन जाते. अकोल्याला केवळ ढगाळ वातावरण असते. तर पूर्वेकडच्या कळस गावात चक्क ऊन पडलेले असते! अकोले तालुक्यातल्या पश्चिम टोकाच्या घाटघरपासून पूर्व टोकाच्या सीमेवरील कळसपर्यंतच्या अडुसष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरातले वरूणराजाचे हे विविध गुणदर्शन! कुमशेत, पाचनई, पेठेचीवाडी या हरिश्चंद्रगड परिसरातील दुर्गम गावात घाटघर-रतनवाडी असाच किंबहुना याहून मुसळधार पाऊस कोसळतो. तेथील निसर्ग अजून बऱ्यापैकी अनाघ्रात आहे. इथला पाऊसदेखील चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. अंबित व्हॅलीच्या सदाबहार निसर्गामुळे इथल्या पावसाळी पर्यटनाची मजा काही औरच असते! अलीकडे इथल्या पावसाळी पर्यटनाला बेधुंद, बेभान अतिउत्साही पर्यटकांच्या बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे ही काळजीची बाब म्हणावी लागेल. ते काहीही असो... ‘भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!‘ या कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी किती चपखल आहेत... भंडारदरा धरणाच्या परिसरात मिळणारा पावसाळी पर्यटनातला आनंद अन्य कुठेही नाही... (लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत शिक्षक असून, निसर्ग निरीक्षक आणि छायाचित्रकार आहेत.) मोबाइल - 9422855151 #भंडारदरा #घाटघर #महाराष्ट्र #पर्यटन #सांधण_व्हॅली #धबधबे #जलोत्सव #पावसाळी_पर्यटन #रानभूल #सह्याद्री *...सुप्रभात...*

Sunday, July 6, 2025

राजूरचा समर्थ विधालयाने काढली पायी दिंडी

अकोले,ता.५: आषाढ सरी अंगावर झेलत जय जय रामकृष्ण हरी जयघोषात टाळ मृदुंग निनादात धोतर नेहरू शर्ट वारकरी वेशभूषेत ,नऊवारी घालून समर्थच्या बालचमुनी आज राजूर शहरात पायी दिंडी व गोल रिंगणात आपल्या अध्यात्मिक संस्काराचा वसा एक पाऊल पुढे टाकत जपला यावेळी रसजूर परिसरातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपारिक शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी शिक्षक भक्ती भावाने सहभागी झाले विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी वेष परिधान करून ज्ञानोबा तुकारामांच्या जय घोषात विद्यालयातून दिंडीला सुरुवात केली . या दिंडी सोहळ्याची सुरुवातपालक शिवशंकर व नीता मुतडक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली .या दिंडी सोहळ्याला ह.भ.प.श्रीराम पन्हाळे यांनी मार्गदर्शन केले . सर्व विद्यार्थी या दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले असेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांनी एक आठवण म्हणून एक एक वृक्ष लावावा त्याचे जतन करावे ही तुमची आषाढी एकादशी निमित्त ओळख राहील असे आवाहन केले .त्यानंतर ढोल, ताशा ,टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थिनी अभंग गात लक्ष्मीनारायण मंदिरासमोर ज्ञानोबा तुकाराम यांचे अभंग म्हटले .त्या ठिकाणी मंदिरातील भक्त मुतडक बाबा यांनीही विद्यार्थ्यांसोबत अभंग म्हटले . या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिवदीप शिवशंकर मुतडक व नूतन मेंगाळ या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई चा वेष परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .त्यानंतर वारकरी दिंडी मुख्य बाजारपेठेतून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाची आरती करून समारोप करण्यात आला .या आरती सोहळ्यामध्ये राजूर मधील प्रतिष्ठित व्यापारी प्रदीप बनसोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप केले . दिंडी सोहळा पाहून समाधान व्यक्त केले . शाळेचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगताना ऊन ,वारा पाऊस, तहान भूक यांची तमा न बाळगता माऊली सोबत तुकोबांसोबत वारीत चालत राहतो तो वारकरी . माऊली प्रमाणेच त्याला सुद्धा भेटायचे असते . आपल्या लाडक्या विठुरायाला या दिंडीमध्ये शिस्त ,नियोजन ,सुत्रता बंधुभाव ,विश्वास ,प्रेम, एकता असे एक ना अनेक गुण भाव अनुभवायास मिळतात .येथील प्रत्येक वारकरी तुकोबांच्या गाथेतील एकेक अभंग जगतो आणि अभंग बरोबर हरिनामाच्या गजरात त्याची आळवणी सुद्धा करतो असं वारकऱ्यांच्या मुखातून प्रकट होत होता तोच भाव विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार रूजावेत हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे सांगितले . हा सोहळा विद्यार्थ्यांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणारा ठरेल असे आपल्या मनोगतातून सांगितले . विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून केळी वाटप केल्याबद्दल प्रदीप बनसोडे यांचा मुख्याध्यापकांनी सत्कार केला या वारकरी सोहळ्यामध्ये विद्यालयातील शिक्षक सतीश काळे ,विनायक साळवे, साहेबराव कानवडे, दगडू टकले ,तानाजी फापाळे, सुनीता पापळ,श्रीनिवास मुळे, जयराम कोकतरे,यांनी सहभाग घेतला

Monday, May 19, 2025

मंजुषा जन्मदिवस

आज आमच्या लग्नाला ३३ वर्ष झाली आयुष्यातील यशस्वी सहजीवनाचा ३३ वर्षाचा प्रवास पूर्ण करत असताना थोडंसं लिहाव वाटलं म्हणून हा शब्दप्रपंच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक व खाजगी आयुष्य व्यतीत करत असताना महाविद्यालयीन जीवनातील विद्यार्थीदशेत असल्यापासून वाडवडीलांच्या पुण्याईने थोरा-मोठ्यांच्या आशिर्वादाने अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी फार कमी वयातच मला व माझ्या सौभाग्यवतीला लाभली दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रबळ महत्वकांक्षा, दीनदुबळ्यांसाठी काम करण्याची असलेली उर्मी व अपार कष्टाची किनार या सर्वांच्याच जोरावर एका शिक्षकांच्या घरात जन्माला येऊन अकोले तालुक्यातील राजुर,गोंदीशी, कातळापूर अशा प्रभावशाली गावांचे शिक्षक पद भूषवताना माझे आठ बहीण भावंडे सांभाळताना गरिबीची रेष ओरखडू न देणारे माझे वडील व हाळी पाटी करून आम्हा बहीण भावंडाना सांभाळणारी आई तिच्या संस्कारात वाढून आम्ही कष्टाने शिक्षण घेतले त्यातच माझे १९९२ रोजी झालेले लग्न व आमच्या कुटुंबात आलेली माझी पत्नी मंजुषा हिने आपले माहेरचे व सासरचे संस्कार जोपासत माझा संसार यशस्वीरीत्या पार पाडला आज आमच्या लग्नाला ३३ वर्ष झाली परंतु मला ३३ वर्षे साथ देणारी मंजुषा ..फक्त पत्नी नाही तर जीवनसाथी! मस्त बहरलेलं नातं.ऋषी , स्वप्नील मुळे आणखीच खुललेलं. ३३ वर्ष झाली तरीही नात्यातला टवटवितपणा तोच. महिलांना सुपरमॅनेजर का म्हणतात, ते मंजुषा कडे पाहिलं की कळतं. एक उत्तम गृहिणी , प्राचार्य पद सांभाळताना उत्कृष्ट प्रशासक उपेक्षित घटकातील मुलामुलींना असणारा तिचा आधार व माझ्यामागे खंबीरपणे उभी राहणारी एक सहचारिणी त्यामुळेच मी गेली ३३ वर्षे अनेक संकटाना सामोरे जात संघर्ष करीत टिकून आहे . शिक्षण संस्थेचे काम करताना तिने दिलेले सल्ले मोलाचे ठरले माझं पत्रकारितेचं करिअर हे सातत्यानं चढउताराचं. मात्र कसलीही कुरबुर न करता तिची साथ कायम राहिली. हीच मंजुषा आहे. स्वत:च्या हक्काव्यतिरिक्त आणखी काहीच न मागणारी. अगदी हट्ट करूनही गरजेव्यतिरिक्त काहीच न घेणारी. आज लग्नाला ३३ वर्ष झाली. मात्र तेच प्रेम आहे. दिवसागणिक आणखीच मुरत चाललेलं. श्वासासारखंच तिचं अन् माझं नातं आहे!…. सखे  तुझ्या सोबती ग काटे सुद्धा फुले वाटे अन तुझ्या विरहाने फुले सुद्धा मला बोचे सखे तुझ्या सहवासात मला जगणे मान्य होते अन तुझ्या विरहाने मला मरणे भाग होते  आज मंजुषाचा जन्म दिवस २०मे या शुभ दिवशी खूप साऱ्या शुभेच्छा तुझाच शांताराम बापू काळे

Wednesday, December 4, 2024

वन्यजीवांचीही आबाळ

Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिसरातील वनक्षेत्राचा निधी रखडल्याने अभयारण्यामधील वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. वन विभागातील अनेक पदेही रिक्त असल्याने त्याचाही विपरित परिणाम होत आहे. सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये ३६१ चौरस किलोमीटर वनक्षेत्रात अभयारण्य आहे. हा पूर्णपणे आदिवासी भाग आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी या भागात बिबटय़ा व अन्य वन्य प्राणी, तसेच पक्षांचे वास्तव्य होते. एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २८ टक्के क्षेत्र वन विभाग व डोंगरांनी व्यापला आहे. म्हणूनच १९८६ मध्ये येथे अभयारण्य घोषित झाले. वन व वन्यजीवांचे संरक्षण व्हावे या हेतूनेच हा निर्णय त्यावेळी घेण्यात आला. पहिली सात वर्षे अभयारण्याचा कारभार अहमदनगर जिल्हा उपवन विभागामार्फत सुरू होता. या काळात वृक्ष लागवड मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यामुळे वन्यजीवांना संरक्षण मिळाले. बिबटय़ा, वाघ, कोल्हा, सांबर, नीलगाय, घोरपड, वानर, जंगली मांजर, उदमांजर, घुबडे, मोर, भोकर व पाण्यातील अनेक प्रकारचे मासे, कासव असे वन्यजीव येथे मोठय़ा प्रमाणावर वस्ती करून होते. नंतरच्या काळात मात्र या वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली. हे क्षेत्र १९९४ पासून नाशिक उपवन कार्यालयाच्या अखत्यारीत गेले. याच काळात जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभले. तेव्हापासून येथे दोन वनसंरक्षक व कर्मचारी नियुक्त आहेत. या विभागाची शेंडी (भंडारदरा) व राजूर अशी दोन कार्यालये आहेत. सुरूवातीला फारशा अडचणी नव्हत्या. मात्र ९६ नंतर वनक्षेत्राचा निधी बंद झाला आणि वनक्षेत्राची आबाळ सुरू झाली. त्यानंतरच या क्षेत्राला उतरती कळा आली. त्यानंतरही राज्य सरकारने कोणतीच ठोस पाऊले उचलली नाहीत. येथील वन्यजीवांनी अलिकडच्या काळात इतरत्र स्थलांतर केल्याचे उघड झाले. त्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा येथे उपलब्ध न झाल्याने ही स्थिती ओढवली. नवीन वृक्षारोपण तर थांबलेच, मात्र वृक्षतोडीवरही कुणाचे नियंत्रण राहिले नाही. भंडारदरा कार्यालयातील वनक्षेत्र अधिकारी, गार्डची चार पदे, वनपाल तर राजूर कार्यालयातील चार गार्ड, वनपाल, वनमजुरांची दोन पदे रिक्त आहेत. पुरेशा कर्मचाऱ्यांअभावी इतर गोष्टींनाही मर्यादा आल्या आहेत. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पाऊले उचलतानाच राज्य सरकारने या अभयारण्यात वन्य जीवांसाठी पिण्याचे पाणी, वृक्षतोडीला बंदी आदी गोष्टींचे काटेकोर पालन करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातून होत आहे. Swami Amazing at 7:01 PM Share No comments: Post a Comment ‹ › Home View web version Powered by Blogger.

Tuesday, October 8, 2024

" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड "

" २५ वाटांचं तोरण ल्यालेला हरिश्चंद्रगड " हरिश्चंद्रगड….. निसर्गाला पडलेलं एक अप्रतिम स्वप्न! अवाढव्य , अजस्र , रौद्र तितकाच मनोहारी , निसर्गरम्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ! आपल्या रौद्र कड्यांनी ट्रेकर्सना सदैव आव्हान देणारा , निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालणारा , अनेक वैशिष्ट्यांनी सजलेला , नटलेला हरिश्चंद्रगड !! ठाणे , पुणे आणि नगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेला आणि सर्वात मोठा घेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव गड म्हणजे " हरिश्चंद्रगड !!! सुंदर कोरीव कलाकृतींनी नटलेलं हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर , बाजूलाच नितळ पाण्याची टाके आणि दगडात खोदलेली मोठ्ठी गुहा , विठ्ठल रखुमाईचं/विष्णूचं मंदिर , शेंदूर लावलेली गणपतीची मनमोहक मूर्ती , मंदिराच्या खालच्या बाजूस केदारलिंगेश्वराची प्रचंड गुहा आणि त्यातील शंकराची भव्य पिंड, मंदिराच्या वरच्या भागातील पुष्करणी , जमिनीत खोदलेल्या गुंफा, तारामतीचं उंच शिखर आणि त्याच्या पोटात गणपतीची भव्य मूर्ती असलेली मोठी गुंफा तसेच तिच्या आजूबाजूच्या अनेक गुंफा, उंचावलेला बालेकिल्ला , बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल , अवाढव्य आणि रौद्र कोकणकडा , गडाच्या विविध भागातील आजही सुस्थितीत असलेली मजबूत तटबंदी आणि बुरुज , कातळात खोदलेल्या पायऱ्या व खोबण्या, कोरलेली शिल्पे व देवतांच्या प्रतिमा…. असे नानाविध अलंकार आपल्या अंगावर घेऊन मिरवतोय हा हरिश्चंद्रगड…. एखाद्या नववधू प्रमाणे! प्रत्येक अलंकाराची नजाकत काही औरच! हरिश्चंद्रगडाची ही श्रीमंती डोळ्यात साठवतांना आश्चर्यचकित व्हायला होतं. दगडी प्रवेशद्वारे, दगडी स्मारकं , देवतांच्या मूर्ती, आदिवासी बांधवांची श्रद्धास्थाने पाहून तर प्राचीन काळापासून या गडावर चहुबाजूने वावर असणार यात शंका राहत नाही. हरिश्चंद्रगडाच्या परिसरातील जंगलात सांबर, रानडुकरे,बिबटे तसेच त्यांच्या पायाचे ठसे आणि विष्ठा, सांबरांची तुटलेली शिंगे, विविध जातीचे सर्प दृष्टीस पडतात .लहान-मोठे ओढे, नाले, धबधबे, विविध प्रकारच्या वेली, वनस्पती व वृक्षांचं समृद्ध जंगल असा जैवविविधतेने समृद्ध असलेला हा गड अभ्यासकांना मात्र मेजवानीच. याचं आणखी एक आणि अनोखं वैशिष्ट्यं म्हणजे चहुबाजूंनी गडावर जाणाऱ्या सोळा (१६) गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा. इतक्या वाटा असणारा गड तसा दुर्मिळच…या वाटा म्हणजे निसर्गाने हरिश्चंद्रगडाला बांधलेलं एक ' देखणं तोरणच '. प्रत्येक वाटेचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य. त्यामुळेच या सर्व वाटांनी गडावर जाणं, याचं ट्रेकर्सना मोठं आकर्षण आणि आव्हानही. . गेल्या ८/१० वर्षात हरिश्चंद्रगडावर जसजशी गर्दी वाढू लागली, तसतशी त्याच्या संदर्भात अधिकाधिक माहिती सोशल मिडीयाद्वारे समोर येऊ लागली. अर्थात अनेक जाणकारांनी / अभ्यासकांनी / जुन्या पिढीतल्या ट्रेकर्सनी हरिश्चंद्रगडाविषयी बरीचशी माहिती यापूर्वीच करून दिली होती. पण गेल्या ४/५ वर्षात हरिश्चंद्रगडाच्या वाटांविषयीची माहिती सोशल मिडीयात यायला लागली. गडाच्या नेमक्या किती वाटा आहेत? याच्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. या दरम्यान माझ्या ट्रेकिंगच्या विश्वातले गुरु संगमनेरचे श्री. भरतजी रूपवाल, हे मला एकदा हरिश्चंद्रगडावर घेऊन गेले, वेगळ्या वाटेने…..' वेताळ धारेने ' ! आणि ' गणपतीच्या वाटे ' ने खाली घेऊन आले, लव्हाळीत. या ट्रेक मध्ये मला ' दरवाजाची वाट ' दाखवायलाही ते विसरले नाहीत. एकाच दिवशी तीन वाटा ?? त्याही फारशा माहिती नसलेल्या. माझ्यासाठी ही पर्वणीच होती. त्या दिवसापासून मी पेटून उठलो. स्थानिक बांधवांना हाताशी धरून ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यातून गडावर जाणाऱ्या गडवाटा आणि पायथ्याशी येणाऱ्या घाटवाटा मनसोक्त भटकून आलो. हरिश्चंद्रगड आणि त्याच्या वाटा . सर्वप्रथम गडवाट आणि घाटवाट म्हणजे काय? हे समजून घेऊया. गडवाट म्हणजे गडाच्या पायथ्यापासून सुरू होऊन थेट गडावर घेऊन जाणारी वाट आणि घाटवाट म्हणजे कोकणातून सुरू होऊन गडाच्या फक्त पायथ्याशी येऊन पोहोचणारी वाट. ▪️ वरील परिभाषेनुसार हरिश्चंद्र गडाला सोळा (१६) गडवाटा आणि नऊ (९) घाटवाटा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा आहेत. ▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी गडावरील एक वाट ही दोन गडवाटांना जोडणारी आहे, तिचा सामावेश गडवाटांमध्ये केला आहे. या वाटेचं नांव आहे ' थनंरगडी ' ची वाट. ▪️ या सोळा (१६) गडवाटांपैकी बारा (१२) गडवाटा एकट्या नगर जिल्ह्यामध्ये आहेत, तर तीन (३) गडवाटा पुणे जिल्ह्यात व एक (१) गडवाट ठाणे जिल्ह्यात आहे. ▪️ राहिलेल्या नऊ (९) घाटवाटा या ठाणे जिल्ह्यातून हरिश्चंद्रगडाच्या परिसरात वर आलेल्या आहेत. सोळा (१६) गडवाटा :- अ) अहमदनगर जिल्हा १) टोलार खिंड (कोथळा मार्गे) २) गणपतीची वाट ३) दरवाजाची वाट ४) पाईरीची वाट ५) गवळ्याची नळी ६) वेताळ धार ७) देवाची वाट (कपारीची वाट) ८) थनंरगडीची वाट ९) गायवाट १०) बैलघाट ११) वाघरान टेप १२) बेटाची नळी ब) पुणे जिल्हा १३) टोलार खिंड (खिरेश्वर मार्गे) १४) जुन्नर दरवाजा १५) ठमारगडी (तारामतीची घळ) क) ठाणे जिल्हा १६) नळीची वाट नऊ (९) घाटवाटा:- ठाणे जिल्हा १) सादडे घाट २) करपदरा ३) जवारीची वाट ४) माकड नाळ ५) रोहिदास घळ ६) तवलीची नळी ७) खुर्द्याची धार ८) गणपतीची वाट ९) चोरदरा अशा एकूण पंचवीस (२५) वाटा (भविष्यात आणखी वाटांची यात भर पडू शकते.) सर्वप्रथम मी एक गोष्ट अगदी प्रांजलपणे आणि स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या वाटांपैकी एकही वाट मी " शोधलेली " नाही. यापूर्वी " ठमारगडी च्या निमित्ताने " या माझ्या लेखात मी तसं सांगितलंही आहे. स्थानिक आदिवासी बांधवांच्या बरोबर या सर्व वाटा मी प्रत्यक्ष चढून / उतरून आलोय. या वाटांचा मी कोणत्याही दृष्टिकोनातून अभ्यासही केला नाही. त्यामुळे या वाटा प्राचीन/ ऐतिहासिक की राजमार्ग ? याबद्दल या क्षेत्रातील जाणकारांनीच ते ठरवावं. मी फक्त ट्रेकर या नात्याने या सर्व वाटांनी हरिश्चंद्रगड पिंजून काढला. त्याच्या निसर्गसौंदर्याचा आणि रौद्रपणाचाही मनमुराद आनंद लुटला. या वाटांनीच माझ्या मनाला भुरळ घातली आणि अचानक मनात एक विचार चमकला …. या पैकी चौदा (१४ ) वाटा सलग सहा (६) दिवसांत केल्या तर ???..... त्याप्रमाणे मोहीम आखली. ह्या मोहिमेला नांवही सुचलं, " टोलारखिंड ते टोलारखिंड ". सुरूवात टोलारखिंडीतून अन् शेवटही टोलारखिंडीतच, अशी ही अनोखी मोहीम. नासिकचा डॉ. अतुल साठे आणि अरूण डावरे(CA) हे दोघेजण या मोहिमेत सामील झाले. जय्यत तयारीला लागलो. मोहीम यशस्वी करण्यासाठी Time management अतिशय महत्वाचं, त्यानुसार आखणी केली. या मोहिमेत लागणाऱ्या खाद्यपदार्थांचे संपूर्ण नियोजन आणि तयारी माझी पत्नी सौ. संगिता हिने अतिशय कौशल्यपूर्ण रीतीने करून दिली. ज्यांच्या शिवाय अशा मोहिमा करणं केवळ अशक्य असे दऱ्या-डोंगरात राहणारे माझे जिवाभावाचे साथीदार म्हणजे पाचनईचा भास्कर बादड, लव्हाळीचा बाळू बांबळे, बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ आणि खिरेश्वरचा मारूती मेमाणे यांच्या बरोबर अनेक वेळा फोनाफोनी झाली. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी हे सर्वजण आम्हाला जीवापाड जपत होते आणि जीवाची पर्वा न करता झटत होते… सोबतीला कोणकोण येणार? मुक्काम कुठे कुठे करायचा? टेक्निकल सपोर्ट कोण, कसा, कुठे करणार? पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी सर्व साहित्य कसे पोहोचवायचं? इमर्जन्सी कशी हाताळायची? अशा असंख्य प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करून उत्तरं शोधली. अंथरुणावर पडलो की डोळे मिटून असंख्य वेळा ह्या वाटा चढून / उतरून यायचो. फक्त एकच ध्यास…. " टोलारखिंड ते टोलारखिंड ". मोहिमेच्या आदल्या दिवशी लव्हाळीच्या बाळू बांबळेच्या झापावर मुक्काम केला. मोहिमेचा दिवस उजाडला…. दिनांक २५ ऑक्टोबर २०२१. पहाटे ५ वाजता निघालो अन तासाभरात टोलारखिंडीत पोहचलो. आदिवासी बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या खिंडीतल्या " वाघोबा " ला नारळ फोडला, छत्रपती शिवरायांचा मोठ्याने जयघोष झाला आणि मोहिमेला सुरुवात झाली.. आणि हा हा म्हणता पहिल्याच दिवशी चार वाटा पूर्ण करून संध्याकाळी ५ च्या सुमारास बाळू बांबळेच्या झापावर पोहचलो सुद्धा. बाळूच्या बायकोने, लक्ष्मीने गरम गरम चहा दिला आणि फ्रेश झालो. आत्मविश्वास प्रचंड वाढला…मोहीम फत्ते होणारच हे चित्र स्पष्ट झालं, कारण दुसऱ्या दिवसापासून दररोज दोनच वाटा करणार होतो. अधून मधून येणाऱ्या अडचणींवर मात करीत पुढील ५ दिवसात १० वाटा पूर्ण केल्या आणि टोलारखिंडीत पोहोचलो. या सहा दिवसांमध्ये हरिश्चंद्रगडाचं रौद्र पण तितकंच मनोहारी रूप बघायला मिळालं. त्याच्या अंगाखांद्यावर मनसोक्तपणे बागडलो , काही वेळा धडपडलो पण त्याने अलगदपणे उचलूनही घेतले. ओसंडून वाहणारं पाणी पोटभर प्यालो आणि मनसोक्त डुंबलोही. निसर्गात भटकण्याचा आनंद मनमुरादपणे घेताना हरिश्चंद्रगडाला केंव्हा कवेत घेतलं ? हे कळलंच नाही. सलग सहा (६) दिवसांत चौदा (१४) वाटा पूर्ण झाल्या… ह्या स्वप्नपूर्तीचा आनंद केवळ शब्दातीत. सहकाऱ्यांना मिठी मारून या आनंदाला डोळ्यांनी वाट मोकळी करून दिली. ज्यांच्या जीवावर ही मोहीम यशस्वी झाली त्या दऱ्या-डोंगरात राहणाऱ्या सोबत्यांचा निरोप घ्यायची वेळ आली…. अक्षरशः ढसढसा रडलो सर्वजण. हरिश्चंद्रगडावर विविध वाटांनी जाण्याचा आनंद सर्वांना मिळावा आणि स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा, हा या मोहिमेचा उद्देश. भावी काळात या मोहिमेमुळे अनेक ट्रेकर्स या वाटांकडे आकर्षित होतील, यात शंकाच नाही. . या पहिल्या मोहिमेनंतर मी अक्षरशः झपाटलो गेलो. माझ्या मनावर हरिश्चंद्रगडाने गारुड केलं. गडाचा काना कोपरा धुंडाळून त्याचं सौंदर्य डोळ्याने भरभरून पहायचं ठरवलं. त्याच्या पोटातली गुपितं उलगडण्यासाठी छोट्या छोट्या मोहिमा आखल्या… २) दुसरी मोहीम- गायवाट : (१३/१४ नोव्हेंबर २०२१) गायवाट ही तशी अवघड आणि धोकादायक वाट. ती सोपी करण्यासाठी स्थानिक आदिवासी बांधव ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , बाळू बांबळे या तिघांना सोबत घेतलं आणि गाय वाटेवरचा * तो अवघड भाग * रुंद करून , पर्यटकांसाठी ही वाट खुली केली. या तिघांनी प्रचंड मेहनत घेतली‌‌.. सोबत नेलेल्या छिन्नी, हातोडा आणि पहारीने काळा कातळ फोडण्याचं दिव्य त्यांनी मोठ्या कष्टाने आणि कौशल्याने पार पाडलं.. आणि महिनाभरातच स्थानिक आदिवासी बांधव पर्यटकांचे ३/४ ग्रुप गडावर घेऊनही गेले... त्यामुळे त्यांना रोजगारही मिळाला आणि पर्यटकांना वेगळ्या वाटेने गडावर गेल्याचा आनंदही.. ३) तिसरी मोहीम - कोकणकडा ते कोकणकडा : (जानेवारी २०२२) ही अशीच एक अनोखी मोहीम. * कोकणकड्यापासून * डाव्या बाजूने सुरूवात करून उजव्या बाजूने पुन्हा *कोकणकड्यावर* यायचं , अशी अंदाजे वीस किलोमीटरची ही गडावरील गड प्रदक्षिणा ... गडावर येणाऱ्या सर्व वाटांना स्पर्श करीत , दाट जंगलातून , छोट्या-मोठ्या टेकड्या चढून उतरून , कड्यावरील अरुंद वाटेने , घसाऱ्या वरून , काळ्या कातळातून , दगड धोंड्यातून , प्रचंड वाढलेल्या गवतातून , पाण्यातून , उन्हातान्हात अडखळत - ठेचकाळत ही प्रदक्षिणा पूर्ण केली.. यावेळी कालभैरवनाथा ची पिंड आणि परचितरायाची मूर्ती ही ठिकाणं नव्याने पहायला मिळाली... अवघा हरिश्चंद्रगड सर्वार्थाने पाहायला मिळाल्याचा आनंद काही वेगळाच.. माझा वर्गमित्र लक्ष्मण दराडे (परिवहन उपायुक्त, महाराष्ट्र राज्य) हा खास या मोहिमेसाठी पुण्याहून आला होता. सोबत दत्ता जगदाळेही होता… भास्कर बादड आणि बाळू बांबळे हे सावलीसारखे मागेपुढे असायचे. ४) चौथी मोहीम - हत्तीमहाल : (६ फेब्रुवारी २०२२) तारामती शिखर आणि बालेकिल्ला यांच्यामध्ये * हत्ती महाल * हा परिसर आहे . या ठिकाणी कातीव दगडामध्ये बांधलेले एक छोटेसे मंदिर आहे , ज्याची खूपच पडझड झालेली आहे . त्याच्या खालच्या भागामध्ये एक मानवनिर्मित खोदलेली गुहा आहे . ही गुहा पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहत येऊन पूर्णपणे बुजून गेलेली होती . या गुहेत प्रवेश करता येणं केवळ अशक्य होतं. म्हणून या गुहेच्या बाहेरील , प्रवेशद्वारातील आणि आतील माती बाहेर काढून या गुहेत प्रवेश करणं हे या मोहिमेचे स्वरूप होतं. दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू केलेली ही मोहीम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होती . संगमनेरचे गोरख गाडे साहेब आणि रवी राऊत हे टिकाव फावडे घेऊन खोदकामात सहभागी झाले… भास्कर बादडने वेळोवेळी केलेल्या महत्वपूर्ण सूचनांमुळे हे खडतर काम सहजपणे पार पडलं. पाचनईचे विठ्ठल भारमल आणि संजय भारमल कंबर मोडेपर्यंत माती खोदत होते. . ५) पाचवी मोहीम - पाचनई ते पाचनई अर्थात हरिश्चंद्रगड प्रदक्षिणा :(४,५ ,६ मार्च २०२२) हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचनई या गावातून सुरूवात करून, पायथ्या पायथ्या ने प्रवास करीत गडाला पूर्ण वळसा घालून पुन्हा पाचनई या गावात पोहचायचं, असं या मोहिमेचं स्वरूप. दिनांक ४,५ ,६ मार्च २०२२ या तीन दिवसांत ही प्रदक्षिणा सफल झाली. नासिकचा राहुल सराफ गेल्या पंचवीस वर्षांपासून माझ्याबरोबर सातत्याने ट्रेकला असतो , या मोहिमेतही होता. पण विशेष म्हणजे त्याच्या १४ वर्षाच्या मुलाने, राघवनेही ही मोहीम पूर्ण केली. प्रदक्षिणेचा मार्ग: १ ला दिवस :- पाचनई ते खिरेश्वर २ रा दिवस : - खिरेश्वर ते वाल्हीवरे (बेलपाडा) ३ रा दिवस : - वाल्हीवरे (बेलपाडा) ते पाचनई ६) सहावी मोहीम - (दिनांक २० नोव्हेंबर २०२२ ते २५ नोव्हेंबर २०२२) या मोहिमेत आदरणीय उष:प्रभा पागे मॅडम (वय ८० वर्षे) व श्री. शशिकांतजी हिरेमठ (वय ६५ वर्षे) यांच्या समवेत सलग ६ दिवसांमध्ये बारा (१२) वाटा केल्या. आदरणीय पागे मॅडम या ' गिरीप्रेमी 'संस्थेच्या संस्थापिका आहेत आणि त्यांचं नाव ट्रेकिंगच्या विश्वात अत्यंत आदराने घेतलं जातं. मा.श्री. शशिकांतजी हिरेमठ हेही गिरीप्रेमीचे संस्थापक सदस्य आहेत. या मोहिमेनंतर पागे मॅडम यांच्यावर ' पागे मॅडम! तुम्हाला मनापासून सलाम ' हा लेख लिहिला, तो अवश्य वाचावा. अशा मोहिमांमुळे कौशल्य पणाला तर लागतेच त्याचबरोबर आत्मविश्वासही वाढतो आणि निसर्गाची प्रचंड ओढ लागते. यापुढे अनेक ट्रेकर्स अशा प्रकारच्या मोहिमा करत राहणार, ज्यामुळे स्थानिकांचाही रोजगार वाढण्यास मदत होईल..... हरिश्चंद्रगडाच्या या मोहिमा यशस्वी पार पाडण्यात ट्रेकर्सच्या गळ्यातला ताईत असलेला आणि माझा जिवाभावाचा मित्र भास्कर बादड तसेच बेलपाड्याचे कमा /कमळू /काशिनाथ पोकळा हे तिघे बंधू आणि कमाची मुले रामदास व अशोक, लव्हाळीचा बाळू बांबळे, निलेश बांबळे, मंगेश , पाचनईचे ज्ञानेश्वर बादड, रामनाथ बादड , सखाराम भारमल , सुरेश भारमल , संतोष भारमल, पोपट बादड , विठ्ठल भारमल , संजय भारमल, बजरंग भारमल , खिरेश्वरचा मारूती मेमाणे, पाचनईच्या राजा हरिश्चंद्र युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, अशा अनेक स्थानिक आदिवासी बांधवांचं मोलाचं सहकार्य लाभलं. यांच्या ऋणातच कायमचे रहाणे पसंद करेन. . जाता जाता….. हरिश्चंद्रगडा व त्याच्या आजूबाजूला असलेली ठिकाणं : १) गणपतीच्या वाटेवरील मोठी गडद कातळातील खोदीव पायऱ्या आणि गणपतीची मूर्ती. २) दरवाजाच्या वाटेवरील दोन दगडी प्रवेशद्वारे. ३) पाईरीच्या वाटेवरचं थडगं. ४) वेताळ धारेची तटबंदी, बुरुज वेताळबाबाचं ठाणं आणि पाण्याचं टाकं. ५) थनंरगडी च्या वाटेवरचा गार्‍यादेव. ६) देवाच्या वाटेवर आड बाजूला असलेली भूतगडद. ७) गायवाटेवरची तटबंदी आणि कातळातील खोदीव पायऱ्या. ८) बैलघाटातील बुरुज आणि तटबंदी. ९) बैलघाट चढून गेल्यावर मंदिराकडे जाताना लागणारी सात पायऱ्यांची वाट. १०) वाघरान टेप या वाटेवरची परचितरायाची मूर्ती. ११) कोकणकड्यावरचा काळभैरवनाथ. १२) तारामतीच्या पलीकडलं भानवस रायचं जंगल, त्याच्या खालोखाल खराटीचा पूड, आडराईचे जंगल आणि तवलीचं जंगल,. १३) बालेकिल्ल्या जवळील हत्तीमहाल. १४) जुन्नर दरवाजा व बालेकिल्ला या मधील खोदीव गुहा, पाण्याचं बंदिस्त टाकं, महादेवाची पिंड १५) सरपंचाची गुहा, गणपती गडद, वरंजाचा धबधबा. १६) पाचनई जवळील पाप पुण्याची कुंडे, कोड्याच्या राजाची गादी, घोडेमाळ. १७) कलाडच्या भैरोबाच्या मागील हपाट्याचा कडा. १८) लव्हाळीच्या माळरानावरील चिलमीचा खडा. १९) कुमशेत जवळ परचितरायाचा भाऊ धारेराव यांचं मंदिर. हरिश्चंद्रगडा जवळची उंच ठिकाणे : रोहिदासाचे शिखर , सीतेचा डोंगर, कलाडचा भैरोबा, नाप्ता, कोथळ्याचा भैरोबा, बुधलीची खिंड, कारकाईचा डोंगर. अशा कित्येक अनमोल अलंकारांनी मढलेला हा हरिश्चंद्रगड पाहू तितका थोडा, भटकू तितका कमी. कितीही वेळा गेलो तरी मन भरत नाही. हरिश्चंद्रगडाच्या पोटात काही अनमोल रत्ने अजूनही दडलेली असतील…. सापडली तर जरूर सांगा. विनायक वाडेकर ९३७२० १४६३२

Tuesday, September 3, 2024

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशेषतः भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणा वर साजरा केला जातो, पोळा हा श्रावणात येणार सण, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जाणारा सण, परंतु त्याच बरोबर.... महाराष्ट्रात सह्याद्री मधील आदिवासी भागातसुद्धा परंपरेने हा सण आदिवासी पाडे, वाडी वस्ती, गावांमध्ये एक अनोळख्या पद्धतीने, भव्य- दिव्य, निसर्ग संस्कृती जोपासत, धरणी आईला वंदन करत सर्वत्र साजरा होतो. भारत देशा मध्ये शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असल्याने, बैल वर्षभर शेतात कष्ट करून आपल्याला अन्न मिळते, शेतकरी सगळ्यांनचा पोशिंदा असला तरी बैल शेतकऱ्याचा पोशिंदा आहे, त्याचा मान, सन्मान राखण्यासाठी हा सण साजरा करतात हा सण पाऊसावळ्यात असल्याने हवेत गारवा पसरल्याने, मानवी मन देखील ताज तवान झालेलं दिसून येत, सगळी सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी,हिरवीगार,मंत्रमुग्ध करणार वातावरण तयार झालेलं असते. आदिवासी गावांमध्ये सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दोन दिवस आधी गावातील पंचांची बैठक होते, त्या मध्ये सन उत्सव कसा साजरा करायचा याची चर्चा होऊन बासिंगाचे बैल असतील तर त्या मध्ये मोर, वाघोबा, बहिरोबा, डोंगऱ्या देव किंवा ग्रामदैवत इत्यादी यांचे हुबे हुब चित्र रेखाटून आकर्षक मोठे बासिंग तयार केले जाते, प्रत्येक घरावर अशी जबाबदारी वाटून दिली जाते, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा रुढी लुप्त होताना दिसत आहेत. पोळ्याच्या काही दिवस अगोदर उंबराच्या झाडाच्या मुळ्यापासून चवार तयार केले जाते. आदिवासी समाजात उंबराच्या झाडाला अनन्य साधारण महत्व आहे, तोडलेली मुळी उभी हातात पकडून तिच्या एका टोकाला मोगरीच्या सहाय्याने मारले जाते, जेव्हा मोगरिने मारले जात असते तेव्हा मुळी हाताने गोल गोल फिरवली जाते जेणे करून चवार एकसारखी तयार होतात. सुताच्या धाग्या प्रमाणे ही बारीक,मुळी जेवढी लांब तेवढ्या लांबीचा चवार, चवार उन्हात वाळवल्या नंतर त्याला घायपाताच्या वाखापासून बनवलेल्या दोऱ्याने बांधून गोंडे बनवले जातात, परंतु आदिवासीं बांधव एक झाडाच्या फक्त एक दोन मुळ्या तोडतात. त्या चवराचे बैल,गाई, म्हसी, शेळ्या इ.साठी आकर्षक गोंडे बनवले जातात. गोंड्याना हवे तेवढ्या रंगात बुडवून रंगीत केले जातात, तेच बैलांना फार शोभून दिसते. काही दिवस अगोदर शेजारच्या किंवा गावच्या आठवडे बाजारातून बैलांसाठी खूप सारी खरेदी केली जाते, त्यात चावर,कासऱ्या, खुंगरू,गोंडे, बेगड, वेसन, पायाचे तोडे, रंगी बेरंगी वस्र, घुंगर माळा, झुली, गळ्यातले तोडे, साखळी, वेगवेगळे रंग इत्यादी अनेक साहित्य खरेदी केले जाते. सणाच्या अाधल्या दिवशी गावचा कोतवाल प्रत्येक वाडी वस्ती वर दवंडी देऊन सांगत असतो की उद्या सायंकाळी बैल सजून होळीच्या माळावर घेऊन या म्हणून, त्याच दिवशी बैलांची शेंगे विळीने घोळून त्याला हिंगुळ,तेल, तुपाने चोपडून काढली जातात, पोळ्याच्या दिवशी सकाळीच बैल शेजारी असलेल्या ओढ्यावर नेऊन स्वच्छ धूऊन काढतात, त्या नंतर राखलेले गायरान वर सर्वत्र चरायला सोडलं जातं किंवा भरपूर चारा बैलांना दिला जातो, शेतकऱ्याच्या सर्जा राज्याचा पोळ्याचा दिवस, मनाचा आनंदाचा असतो, पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही, कोणतेच काम करून घेतले जात नाही तर त्याचे पुजन लाड केले जातात. या दिवशी बैलाच्या खांद्याला गोडे तेल, तुपाने आणि हळदीने मालिश केली जाते, सकाळी बुजुर्ग किवां जाणकार माणसं हातात चवार घेऊन प्रत्येक शेतातील उभ्या पिकाला,गावातील ग्राम देवतेला, वाघोबा, उंबऱ्या देव, कनसारा आई, घर, गाडी, गुरे, शेणकईला चवार बांधले जाते, पूर्वी पासून भात,नाचणी, ज्वारी, बाजरी, मका खुरास्नी, भुईमुग, नागली इत्यादी सर्व पिकांची चावर लाऊन पूजा केली जाते, आदिवासी ही निसर्गाला पुजनारी, देव माननारी संस्कृती आहे, या सणाच्या निमित्ताने पिकांचे, जनावरांचे, माणसांचे, गावाचे रक्षण करण्याची विनवणी निसर्ग देवतेकडे केली जाते, बैल चारून झाल्यावर रानातून बैलांना दुपार नंतर घरी आणले जाते, स्वच्छ कपड्याने त्यांना पुसून घेतले जाते, बैलांच्या शिंगणा नाचणीच्या पिठाच्या खळीने रंगी बेरंगी बेगड चीपकवली जातात, अंगावर घेरू किंवा रंगीत रंगांच्या साहाय्याने नक्षी किंवा रंगाने सजवले जाते,नवीन वेसण, नवीन कासऱ्या, गळ्यात तोढे घुंगर माळा, चवार बांधले जाते, कपाळावर मळवट बांधली जाते, शिंगणा चवार बांधले जाते, पाठीवर विविध नक्षीकाम केले जाते, गेरू चे अंगावर ठिपके दिले जातात, अंगावर झुली घातल्या जातात, गळ्यात छुम छुम करणार्‍या घुंगरांच्या माळा घातल्या जातात. सगळं काही नवीन, पायात चांदीचे किंवा तोरड्याचे तोडे घातले जातात. हे सगळ बैलांना खूपच सुंदर दिसू लागते, बसिंगाच्या बैलांना बसिंग बांधली जातात, बघता बघता होळीच्या माळावर पारंपरिक वाद्यांचा गजर होऊ लागतो, तस तसे आपापली बैल घेऊन त्या ठिकाणी सर्वांची गर्दी होऊ लागते, सगळ्यांची बैल आल्यावर चावडी किंवा ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी हळू हळू वाद्या मागे बैल गेऊन वाजत गाजत मिरवणूक काढत घेऊन जातात, बासिंगाचे बैल मागे असतात, ग्रामदैवत असलेल्या मंदिराला पाच प्रदिक्षणा घालतात, बैल फिरवले जातात, त्या नंतर बासिंगाचे बैल प्रदक्षिणा घातली जाते, पाच प्रदक्षिणा झाल्यावर ग्रामदैवतेला वंदन केले जाते, नारळ चढवला जातो, पारंपरिक वाद्यांच्या ठेक्यावर गावकरी सुद्धा या पवित्र उत्सवा मध्ये नृत्याचा ठेका धरत नाचू लागतात, महिला ही पारंपरिक गाण्याची साद घालत असतात, नंतर बैल घरी आणले जातात, बैल घरी येण्या आघोदर घरी महिलांनी घराबाहेर बैलांच्या स्वागतासाठी रांगोळी काढलेली असते, बैलांना ओवाळून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवला दिला जातो, बळी राजाची अतिथी देवो भव प्रमाणे पूजा केली जाते, त्याच प्रमाणे महिला बैलान पुढे गहु, ज्वारी चे दान मांडतात, ज्यांच्या घरी बैल नसतील ते अगजोदरच मातीचे बैल कुंभरांकडून घेतले जातात, त्याची विधिवत पूजन केले जाते, या दिवशी सगळ्याच शेतकरी बांधवांचा आनंद द्वगुणित होत असतो, सर्जा राजाचेही खूप लाड केले जातात, अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साह पूर्ण, आनंदात शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा सण महाराष्ट्र सह्याद्री आदिवासी पाडे, वस्ती मध्ये पूर्वी पासून साजरा होत असतो, या सणामुळे धान्याची,पिकांची, गो धनाची समृध्दी होते असे म्हणतात, सर्व निसर्ग संस्कृती जोपासण्यासाठी आदिवासी समाजाची मूल्य, संस्कृती मानली जाते, आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय करत असल्याने सर्वस्वी बैलांवर अवलंबून असतो, त्या मुळे बैलांन प्रती कृतज्ञता,प्रेम, जिव्हाळा, व्यक्त व्यक्त करण्यासाठी बैलं पोळा सण साजरा केला जातो. हा सण सह्याद्री, महारष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी आदिवासीं भागात साजरा केला जातो, तसेच अकोले तालुक्यात मोठ्या उत्साह, आनंदमय वातावरणात बळीराजाची पूजा करतं साजरा करतात. आज आधुनिक यंत्रसामुग्रीमुळे बैलांचा वापर कमी झाला असला, तरी मानवी जीवनातील त्यांचे महत्त्व कमी होणार नाही. म्हणून आपण हा सण साजरा करणे, ते पण पारंपरिक रीतिरिवाजाने अगत्याचे आहे."बैलपोळा सण "निसर्ग पुजक अदिवासीं संस्कृती व प्राणीमात्रावर जिव्हाळा दाखवीनारा सण आहे. *:- तळपाडे भरत दशरथ* *(बिरसा ब्रिगेड, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष)* ९६६५४५१५३०

Monday, September 2, 2024

वनवाश्या ( वनाश्या )"

"वनवाश्या ( वनाश्या )" दरवर्षी बैल पोळा आला की घरातल्या सर्वांना एकच बैल आठवतो तो म्हणजे "वनाश्या". अजूनही बैलपोळ्याला त्याला बांधत असलेली घुंगर माळ तशीच जपून ठेवली आहे. घुंगरमाळीला आता मात्र गळा वेगळा दिसत असतो. जशी वनाश्याच्या गळ्याला ती घुंगरमाळ शोभायची ना तेव्हढी अजून एकही बैलाला ती शोभली नाही. वाट पाहतोय मी त्या गळ्याची अन त्या वनवाश्याची ही. त्याच्या नावाला कारण ही तसच होतं. तो ज्या परिस्थितीत वाढला त्यानुसारच त्याच नाव "वनवाश्या" ठेवलं होतं आजोबांनी. आजोबांच्या काळात आमच्या घरी खूप गावरान गाया असायच्या. मला आठवतंय तेव्हा पासून तरी कमीतकमी आठ ते दहा गावरान गाया हमखास असायच्या घरी. पण वडील गेल्यापासून त्यांना सांभाळायला कोण नव्हतं म्हणून कमी झाल्या. आत्ता फक्त एकच गावरान गाय राहिली आहे गोठ्यातल्या दावणीला. वनाश्या हा घरच्याच गावरान गाईच्या पोटी जन्माला आलेला. पण दुर्दैवाने काही दिवसातच ज्या गाईनं वनवाश्याला जन्म दिला होता ती वारली. अगदी चार पाच दिवसातच तिचा मृत्यू झाला होता. जसं एखाद्या आईचं लेकरू तिला कमीतकमी सहा महिने तरी पीत असतं. तसंच गाईचं वासरू ही गाईला कमीतकमी दहा ते पंधरा दिवस तरी पेत असतं. त्यानंतर हळूहळू गवत वैगरे खायला सुरु करत असतं. पण आजोबांना मोठा प्रश्न पडला होता आता या वासराला जगवायच कसं. बाकीच्या एक दोन गाया ही वेलेल्या( बाळंतीण झालेल्या) होत्या. पण त्या काय वनवाश्याला पिऊ देत नव्हत्या. बाबाला खूप वाईट वाटत होतं. आता या वासराला जगवायच तरी कसं. ना याला बाकीच्या गाया पिऊन देत आहे ना याला गवत खाता येतंय. अन बाबाच तर काम असं होतं की ज्या गाईला गोऱ्हा होईल त्या गाईचं बाबा कधीच दूध नव्हता काढत. म्हणायचा पहिलवान झाला पाहिजे गोऱ्हा पहिलवान. कचाकच औत ओढलं पाहिजे त्यानी. पेऊदे सैल ( सवतं) त्याला म्हणायचा. कितीतरी वेळा त्यावरून आज्जीची न बाबाची भांडण होताना पाहिली होती मी. एखादी गाई गाभण राहिली की आज्जीला मनापासून वाटायचं की गाईला कारव्हडच ( कालव्हड) होयला पाहिजे. कारण घरात खायला दूध ही होयचं आणि अजून एक गाय वाढायची गोठ्यातल्या दावणीला. आजीला इतका आनंद होयचा की जणू काही स्वतः लाच लेक (मुलगी) झाली की काय ईतकी खुश दिसायची आज्जी. आता मात्र परिस्थिती वेगळी होती जेव्हढं दुःख बाबाला झालं होतं तेव्हढंच दुःख आज्जीला ही झालं होतं. यावर मग आज्जीनेच एक उपाय शोधून काढला होता. आज्जी बोलली बाकीच्या ही गाया येल्या आहेत तर त्यांचं थोडं थोडं दूध काढून या वासराला पाजायचं म्हणून. बाबाला ही आज्जी बोललेलं पटत होतं. मग बाबा रोज सकाळ संध्याकाळ त्या दोन येलेल्या गायांच दूध काढायचा न त्या वासराला पाजायचा. वासराला दूध पाजल्याशिवाय बाबा जेवण पण करत नसत. जीवापाड जपायचा बाबा त्या वासराला. रात्र झालं की त्याला गोठयात न ठेवता बाकीच्या गाया त्याला मारतील या भीतीनं बाबा त्याला घरात घेऊन झोपायचा. स्वतः च्या मुलाला ही बाबा एव्हढा जपला नसल एव्हढी काळजी घायचा बाबा त्या वासराची. कधी कधी तर असही म्हणायचा बिना आईचं लेकरू आहे त्याला आपण नाही जिव लावायचा तर कोण लावील मग. लई वनवास सोसावा लागतो बिना आईच्या लेकराला अस म्हणायचा बाबा. म्हणून त्याचं नाव बाबांनीच "वनवाश्या" ठेवलं होतं. असाच बाबांनी त्याला लहानाचा मोठा केला. पण गावाकडं एखादं लहान पोरगं असू नाहीतर गाईचं वासरू असू त्याचं नाव बदलावलंच जाणार समजा. सोमाचा सोम्याच होणार न बैलाच नाव रतन असल तर त्याचा रतण्याचं होणार. म्हणून त्या वनवाश्या चा ही वनाश्या झाला होता. त्याच्या सोबत भारत नावाचा बैल ही बाबांनी तयार केला होता. त्याला ही आम्ही भारत्या म्हणायचो. शेती करण्यासाठी आता बाबांनी वनाश्या आणि भारत्या ची जोडी तयार केली होती. भारत्याला आईचं दूध भेटल्यामुळं वनाश्या पेक्षा जास्त तयार दिसत होता. अगदी बाबाच्या भाषेत बोलायचं म्हंटल तर पहिलवानच दिसत होता भारत्या आणि खूप गरीब पण होता. मारत नव्हता काय नव्हता. कोणीही त्याला धरायचं सोडायचं. वनाश्या ही चांगलाच होता तब्बेतीन पण शिंगात जरा फसला होता. पाठमोरी शिंग झाली होती त्याची. बाशिंगा जवळ जाऊन दोन्ही शिंगाची टोकं एकमेकांना भेटत होती त्याची. भारत्या पेक्षा उंची नि ही कमीच होता दिसायला. पण बैलगाडी किंवा औताला जुंपला तर भारत्या बरोबरीनच चालायचा. कधीच माघ हटत नव्हता. दोघांचा चांगलाच जोड जमला होता. काही वर्षानंतर घरातील काही कारणास्तव वडील व चुलते यांनी वाईलं ( वेगळं) घेण्याचा निर्णय घेतला. हा तर आम्हा सर्वांसाठी एक आश्चर्याचा धक्काच होता. वडिल आणि एक चुलता दोघंच भाऊ असल्यामुळे जमिनिसगट वाटणी समान होणार हे ठरलेलं होतं. सर्व घरदाराची व शेतीवाडी समान वाटून घेतली. सगळ्याची वाटणी झाल्यानंतर प्रश्न राहिला होता जनावरांचा. दोन बैल व गावरान गायांचा. गायांच मला जास्त काही आठवत नाही पण बैलांची वाटणी केलेलं चांगलंच आठवतंय. भारत्या चुलत्यांच्या वाटणीला गेलता तर वनाश्या आमच्या वाटणीला आला होता. आता भारत्या आणि वनाश्या दोघही जणू वाईलच निघाले होते. त्या दिवसापासून दोघांचे साथीदार बदलले होते. दोघांच्या दावणी बदलल्या होत्या व उठायची बसायची जागा ही बदलली होती. बदलली होती त्यांची खांद्यावरली शिवळाटी व अगदी गळयातली घुंगरमाळ ही. भारत्याला जोडीदार घरच्याच गाईचा एक सुरत( सुरत्या) नावाचा नवा जोडीदार भेटला होता तर वनाश्याला मामाच्या इथुन आणलेला मथुऱ्या नावाचा जोडीदार भेटला होता. वाईलं झाल्यानंतर आमची सर्व शेतीची जबाबदारी मोठ्या भावावर ( महादूवर) व आजोबांवर आली होती. मला वाटत त्या वेळेस त्याला सहवीतूनच शाळा सोडावी लागली होती. ज्या वयात हातात पाटी पेन्सिल घेऊन खूप शिकायचं होतं लिहायचं होतं त्या वयात भावावर हातात नांगर व पाभार धरण्याची वेळ आली होती. त्यानं केलेल्या कष्टाला व मेहनतीला माझा कायम सलाम राहील. मला वाटतं आज जो काही आमचा संसार उभा राहिला आहे त्यात भावाचा व आईचा खूप मोठा वाटा आहे. काही दिवसातच अचानक भारत्याच दुखायला लागलं. अन ज्या भारत्यानं कधीही कोणाकडे साधं फूस करून सुद्धा पाहिलं नव्हतं की कधी कोणाच्या अंगाला धक्का ही लावला नव्हता. तो अचानक जो जवळ जाईल त्याच्या अंगावर धावून जायचा. पिसाळल्या गत करायला लागला होता अचानक. डॉक्टर ला ही दाखवलं पण कळतच नव्हतं नेमकी काय झालं ते. अन दुर्दैवाने एक दिवस भारत्याने या जगाचा व आम्हां सर्वांचा कायमचा निरोप घेतला. भारत्या जरी अमच्यातून वाईला झाला होता तरी आमच्या हृदयातून कधीच वाईला झाला नाही. त्या दिवशी भारत्या साठी घरातल्या सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहत होते. अगदी घरातला माणूस गेल्यासारख दुःख सगळ्यांना झालं होतं. कारण भारत्या म्हणजे सर्वांचा लाडका होता. कोणीही यावं त्याच्याशी खेळावं इतका गरीब होता . भारत्याला शेतातल्याच बांधावर खड्डा खांदुन शेतातच पुरलं व त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही त्या बांधावर गेलं की भरत्याची आठवण आल्या शिवाय राहत नाही. भारत्या गेल्या पासून वनाश्याला मात्र एक घाण सवय लागली होती ती म्हणजे तो आता बाबा आणि भाऊ सोडून कोणावरही धावून जात होता. बाबा अन भाऊ सोडून त्याला कोणी खायला टाकत नव्हतं की पाणी ही पाजत नव्हतं. त्याची एक खोड अशी होती की त्याला खायला टाकेपर्यंत किंवा पाणी पाजेपर्यंत तो काहीच करत नव्हता. जस त्याच्या समोरची बदली उचलून पाठ फिरवली रे फिरवली की लगेच माघून धडकी द्यायचा. त्यामुळे त्याला खायला टाकायचं ही भ्याव वाटायचं. एकदा तर आई गोठ्यातला शेणकुर करत असताना आईला गोठ्यातच लोळवल होतं त्यानं. एक दिवस तर गड्याने कहरच केला ज्या बाबांनी त्याला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलं होतं. लहानच मोठं केलं होतं त्यालाच आता तो मारायला लागला होता. एक दिवस औत सोडलं न बाबा त्यांना जवळच्या बांधावर चरण्यासाठी घेऊन जात होता तर जाताजाता वनाश्याला काय हुकी आली काय माहीत बाबालाच बांधावर उचलून टाकलं होतं. भाऊ जवळ होता म्हणून थोडक्यात निभावल त्या दिवशी. आणि अजून एक गोष्ट अशी होती की त्याची शिंग पाठमोरी होती न गोल आकाराची झाली होती . त्यामुळं जरी मारलं तर फक्त मुका मार लागायचा. असं करता करता त्यानं भाऊ सोडून सगळ्यांनाच शिंगाव घेतलं होतं. अगदी मला ही नाही सोडलं त्यानं. माझ्या बाबतीत काय झालं तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग सुट्टीमध्ये मी नेहमी भावा सोबत जायचो औतावर बसायला. कारण कुठं वावरात जास्त गबाळ( गवत) झालं असलं की कुळाची किंवा फरटाची पाळी घालावा लागायची. मग गवत निघण्यासाठी औतावर वजन म्हणून एक छोटासा दगड ठेवायला लागायचा. पण मी सोबत असलो की भावाचा दगड ठेवायचा ताण( त्रास) वाचायचा न दगडाची जागा मी घ्यायचो. खूप मज्जा यायची न जेंव्हा वेळ भेटेल तेव्हा मी एखादं औताच मोडान( चक्कर) आणायचो. असं औतावर बसून बसूनच मी औत हाकायला ही शिकलो होतो. औत हाकून झालं की भाऊ वनाश्याला न मथुऱ्याला चाराया नेण्याचं काम माझ्याकड सोपवायचा. असं रोज त्यांच्या सोबत जाऊन जाऊन मला जरा अति आत्मविश्वास आला होता की वनाश्या आता मला चांगला ओळखायला लागलाय न मला मारनार ही नाही. पण तोच अति आत्मविश्वास एक दिवस माझ्या चांगलाच अंगलट आला. झालं काय की बांधाला चरता चरता कासरा वनाश्याच्या पायात गुतला होता न तो मी अति आत्मविश्वासाने काढायला गेलो. पार अगदी त्याच्या गळ्याला मिठी मारायचाच राहिलो होतो. जसं मी कासरा काढायला गेलो तसं वनाश्यानं मला जवळच्या गव्हात उचलून टाकलं. मी आयोव.... आयोव करत तिथून पळत बोंबलत सुटलो थेट भावाला जाऊन गाठलं. अन त्याला मोठ्याने भोकाड वासवतच घडलेला प्रकार सांगून टाकला. त्यानंतर मी वनाश्याला कधीच चारायला घेऊन एकटा गेलो नाही. वनाश्यानी त्या दिवशी मला उचलून टाकून भाऊ सोडून सगळ्यांना मारल्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर बैल पोळा आला की आम्ही दोन भाऊ ( संदिप अन मी) बैलांन पेक्षा गाईच्या गोऱ्यांना जास्त सजवायचो. नवी घुंगर माळ नवी मोरखी असं सारं काही नवं नवं आम्ही गोऱ्यांना सजवायलाच जास्त वापरायचो. गावात मिरवणुकीला ही मस्त सजवून न्यायचो. वनाश्याकड थोडं दुर्लक्ष च करायचो आम्ही. त्याला चिडवत बोलायचो आम्हांला लई मारितो ना तुला सजवणारच नाही जा. गोणीतून काढलेलं आमच्या हातचं काय उरलं सुरल गोंड कांडकी भाऊ त्यांना बांधायचा न छान सजवायचा. वनश्याला हिंगोळ लावायचं काम भावकडच असायचं. त्याला दुसरं कोणी हिंगळ लावलेलं आवडतच नव्हतं. पोळा झाला की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सगळ्या घुंगरमाळा व ईतर सामान सोडून ऐका गोणपाटात बांधून ठेवायचं. परत दुसऱ्या वर्षी तेच सामान काढून त्यांना सजवायचं. काही खराब झालं तरच नवीन आणायचं नाहीतर तेच वापरायचं. असं दरवर्षीच असायचं. पण मज्जा यायची पोळ्याला. मला वाटतं अजूनही त्या घुंगर माळा तश्याच आहेत त्यांना बंधायचो त्या. तेव्हढीच एक काय आठवण उरली आहे त्यांची. आता राहिला होता फक्त भावाचा नंबर. तर एक प्रसंग असा आला की ज्वारीची कनसं काटणीचा सिजन चालू होता. रानात काटलेली कणसं बैलगाडीची साटी भरून घरी आणायची व घराच्या माळदावर उन्हाला तापायला घालायची. त्या दिवशी ही अशीच कनसांची साटी भरून घरी आणली होती ती गाडीतून घराच्या ओट्यावर खाली करत होतो. आणि ओट्याच्या जवळच लगेच बैलांची दावन होती. गाडी खाली होई पर्यंत त्यांना भावाने तिथंच बांधलं होतं. गाडीच्या धुऱ्या खाली करताना चाकांना उटी लावली नसल्यामुळे उतार असल्यामुळे गाडी काय भावाला झेपवता आली नाही. भाऊ गाडी सोबत नेमकी वनश्या च्या समोर आला न तसच वनाश्यानं भावाला माघून जोरदार धडक दिली. वनाश्याने दिलेल्या धडकेमुळे भावाचं तोंड जाऊन नेमकी धुऱ्यांना आदळलं व भावाचे समोरचे दोन दात जाग्यावरच गळून पडले. घडीभर तर कोणाला काहीच कळले नाही की नेमकी काय झालं ते. नशिब भावाला दुसरी काही जास्त ईजा झाली नव्हती मात्र भावला त्याचे दोन दात कायमचे गमवावा लागले. आता घरात एकच चर्चा चालू झाली की वनाश्याला विकून टाकायचा म्हणून. आज दात पाडलेत उद्या कोणाचा जिव घेईल म्हणून. पण भावाला त्याचीच चूक लक्षात आली व म्हंटला वनाश्यानी मला मारलचं नाही तर मी गाडी घेऊन तो बसला असताना त्याच्या शिंगावर जाऊन बसलो. जेव्हा तो घाबरून उठला तेव्हा माझं तोंड धुऱ्यांना आदळल म्हणून. काहीजण बोलत होते घरचा बैल आहे काय वाया जाईल का ? परत दुसरा कसा निघतोय कसा नाही. अश्या अनेक उलट सुलट चर्चा नंतर वनाश्याला विकायचं रद्द करण्यात आलं. हा भावाने तरी त्याचा राग काढलाच त्याच्यावर थोडा. राग काढला म्हणजे चांगला चोपला होता वनाश्याला. आता मात्र वनाश्या आणि मथुऱ्या दोघही थकले होते. नांगराला चालताना त्याची चाहूल लागत होती भावाला. आता चाव्हरीला चालायची त्यांची ताकद संपली होती. अन त्यातच दुष्काळ ही पडला होता. पुढील वर्षीची नांगरट काशी करायची हा भावाला मोठा प्रश्न पडला होता. आता परत एकदा दोघांनाही विकायचा विषय घरात हळूहळू येऊ लागला होता. वाटत होतं यांना नाही विकावा खूप सेवा केली त्यांनी. दावणीलाच मारून द्यावं यांना असं सगळ्यांना वाटायचं पण दुष्काळ पडल्यामुळे चार चार बैलं सांभाळणं अवघड होतं. शेती केल्या शिवाय तर काही पर्याय नव्हता. आईनं व भावानं काळजाव दगड ठेऊन एक दिवस दोघांनाही विकून टाकलं. आमच्या आयुष्यतला वनवाश्या आम्हांला कायमचा सोडून गेला होता. त्या दिवशी घरात चूल सुद्धा पेटवली नव्हती. घरच्या दावणीला बैलं येत राहतील जात राहतील पण वनवाश्या सारखा बैल कधीच दावणीला दिसणार नाही हे ही तेव्हढंच खरं. मी सुरवातीला जसं म्हंटल ना की आमचा संसार उभा करण्यात भावाचा न आईचा जेव्हढा वाटा आहे तितकाच वाटा मला वनवाश्या चा ही वाटतो. जो पर्यंत घरात पोळा साजरा होत राहील तोपर्यंत वनवाश्या ही आमच्या मनात साजरा होत राहील कायमचाच.... सोमनाथ कोंडीभाऊ चौधरी मु. पो. करंदी, ता. पारनेर जि. अहमदनगर 9421778013

Friday, August 30, 2024

सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!

छान! सुंदर!!👍 आणि धारेबाबांना विनम्र अभिवादन!!🙏 राघोजी भांगरे नंतर आता एक एक आदिवासी क्रांतिकारक समोर येत आहे! याला कारण मोबाईल! मोबाईलमुळे अगदी छोटीशी गोष्ट जगभर क्षणात पोहचते. धारेबाबा प्रमाणेच आमच्या खिरविरे गावचे " रामा डगळे " नावाचे बंडकरी 1920 ते 1945 दरम्यान होऊन गेले. अगदी 1980 सालापर्यंत ते हयात होते. पण रामा डगळे यांचे बंड इंग्रज सरकार विरुद्ध नव्हते तर राजूर येथील जे वाणी, गुजराती आदिवासीना त्रास देत असत, त्यांच्या जमिनी कर्जपायी गहाण घेऊन आपल्या नावावर करून घेत असत, अशा गुजराती सावकरांविरुद्ध रामा डगळे यांनी बंड पुकारले होते. रामा बंडकरी म्हणून ते नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. वेळ मिळाल्यास रामा डगळे बंडकरी यांच्या विषयी मला जे माहित आहे, ते मी आपणास विस्तृतपणे लिहून पाठविण. कारण रामा बंडकरी यांच्या तोंडून मी त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या आहेत! धन्यवाद!🙏 शुभ रात्री!🙏🙏 ....... पराड सर. ( खिरविरे )

श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत

श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा या अकोले तालुक्यात ज्या वीरांच्या रक्तातून इतिहास धावला, ज्यांच्या मनगटात रग आणि छातीत धग होती असे राघोजी भांगरा, बापू भांगरा, रामा किरवा, धरमा मुंढा, खंडू साबळा, बुधा पेढेकर व धारेराव असवला या आदिवासी क्रांतिकारकांच्या शौर्याच्या खूप जुन्या इतिहासाची पार्श्वभूमी या तालुक्याला लाभलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात(सन – १८०० ते १८५० च्या दरम्यान) ‘आदिवासी ४० गाव डांगाण’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुळा व प्रवरा नदी खोर्‍यातील भागात ‘राजूर’ ही खूपच जुनी व एकमेव मोठी मानाची बाजारपेठ होती. याच परिसरात डोंगरदर्‍यातील आदिवासी भागात सावकारशाही व इंग्रज राजवटीतील अधिकार्‍यांनी दुही माजवली होती. रानावनांत राहाणार्‍या, गोरगरीब आदिवासींच्या कुटुंबात जाऊन धान्य, कोंबड्या व बकरं मागणे; आणि नाही दिले तर धाक दाखवणे, हाणामारी करणे अशा प्रकारचा छळ व त्रास इंग्रज सरकारने नेमलेले अधिकारी करत असत. सावकार अल्प मुदतीचे कर्ज देऊन आदिवासी बांधवांच्या जमिनी ताब्यात घेत असत. पोटाला चिमटा घेऊन जगणार्‍या कोंडारोंडा, रानभाज्या, जंगली कंदमुळे खाऊन पोट भरणार्‍या आदिवासींची लेकरं मात्र भाकरीच्या तुकड्यासाठी टाहो फोडायची. परंतु सावकारशाहीला कधीच या दीनदुबळ्या आदिवासींची दया आली नाही. अशा या जाचक, जुलमी इंग्रज राजवट व सावकारशाहीला लगाम घालण्यासाठी सह्याद्रीची वादळं क्रांतिकारकांच्या रूपानं पेटून उठली. अशा या वादळांनी अकोले तालुका व राजूर पंचक्रोशीत १८ व्या शतकात अनेक चळवळी व बंड पुकारले. या आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रज राजवट व सावकारशाहीला ‘सळो की, पळो’ करून सोडले; आणि माझ्या आदिवासी समाज्यावर होणार्‍या अन्यायाला व अत्याचाराला वाचा फोडली. याच कालखंडात क्रांतिकारी चळवळीत व बंडात उडी घेऊन आदिवासी समाज्यासाठी जीवाची बाजी लावणार्‍या वीर धारेराव या खास आदिवासी रत्नाची पारख आपण या कथेच्या माध्यमातून करून घेणार आहोत. सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेलं, सह्याद्रीची शान आणि सह्याद्रीचा मान म्हणून नावाजलेलं कुमशेत हे एक आदिवासी गाव. या गावाला निमकोकण असे मी म्हणेल; कारण अकोले तालुक्यात जून महिण्यात कुठेही पावसाची चाहूल नसतांना सुद्धा अगदी कोकण परिसराप्रमाणेच कुमशेत गाव परिसरात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाच्या हलक्या तर काही अंशी जोरदार सरी बरसू लागतात. त्यामुळे येथील बळीराजा मात्र लवकरच सज्ज होऊन आपल्या भातशेतीची जमीन कसण्यास तयार असतो. अशा या अतिदूर्गम, डोंगराळ भागात १८ व्या शतकात कुमशेत गावी वीर धारेराव यांचा जन्म एका सामान्य व गरीब शेतकरी कुटुंबात झाला. धारेराव लहानपणापासूनच गुरे राखण्याचे व चारण्याचे काम करत. त्यामुळे निसर्गाशी, झाडाझुडपांशी, डोंगरदर्‍यांशी नाळ जोडलेल्या या माणसाला परिसराची खडान् खडा माहिती होती. एकदा रानात गुरे चारत असतांना धारेरावांना कोकतर (रान कोंबडी) दिसली. दगडी गोट्याचा नेम धरून धारेरावांनी त्या रानकोंबडीची शिकार केली. शिकार केलेली रानकोंबडी धारेराव एका वनस्पतीच्या पानांत गुंडाळून सायंकाळच्या वेळी आपली जनावरे घेऊन घरी आले. जनावरे गोठ्यात जाऊ लागली. त्यावेळी धारेरावांनी शिकार करून आणलेली रानकोंबडी हार्‍या(बांबूपासून बनवलेले कोंबड्या डालण्याचे साधन) खाली डालून ठेवली; आणि धारेराव जनावरे दावणीला बांधण्यासाठी गोठ्यात गेले. जनावरे बांधून बाहेर आल्यानंतर शिकार करून आणलेल्या रानकोंबडीची सागोती(चिकन) करण्यासाठी त्यांनी हारा उचकला. तर काय..? त्या वनस्पतीच्या पानांत गुंडाळून आणलेली रानकोंबडी पुन्हा जिवंत झाली होती. धारेरावांना जरा आश्चर्यच वाटले. मग त्यांच्या डोक्यात विचार आला की, या वनस्पतीचाच काहीतरी चमत्कार घडला असावा. क्षणाचाही विलंब न लावता धारेराव आल्या मार्गे पुन्हा जंगलात गेले. त्या ठिकाणी पोहचल्यानंतर धारेरावांनी त्या वनस्पतीच्या काही मुळ्या, पाने आपल्या जवळ असणार्‍या कापडी बटव्यात घेतल्या व घरी आले. रात्री जेवण झाल्यावर बर्‍याच उशीराने धारेरावांनी बटव्यातील मुळ्या व पाने बाहेर काढली. त्या मुळ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या व एका खडबडीत दगडावर उगाळून एक ग्लासभर रस तयार करून स्वत:पिऊन घेतला. त्या आणलेल्या पानांतील एक दीड पाने खाल्ली. त्यानंतर धारेराव निवांतपणे झोपी गेले. मध्यरात्रीच्या वेळी झोपेत असतांना एक अद्भूत संवेदना धारेरावांच्या देहाला जाणवली. धारेराव अचानक झोपेतून ताडकण उठले. तेंव्हा त्यांना शरीर व डोके जड झाल्याचे जाणवू लागले. तेंव्हा आपल्या देहात नक्कीच काहीतरी एक दैवी शक्ती संचारल्याची जाणीव झाली. याच काळात राजूर पंचक्रोशीत आदिवासी समाज्यावर होणार्‍या अन्याय व अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी क्रांतिकारी चळवळींना वेग येऊन रौद्ररूप धारण केले होते. राघोजी भांगरे, कोंड्या नवला अशा आदिवासी क्रांतिकारकांनी या चळवळीत उडी घेऊन बंडाची ठिणगी पेटविली होती. त्याच्या पडसादांनी सह्याद्री पूर्णपणे दुमदुमली होती. त्याचवेळी सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेल्या दीनदुबळ्या आदिवासी बांधवांवर होणार्‍या अन्याय व अत्याचाराचा सूड घेण्यासाठी कुमशेत गावचे सुपुत्र वीर धारेराव हे एक आदिवासी वादळ अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेला असलेले शेवटचे गाव कुमशेत, ठाकरवाडी पंचक्रोशीत पेटून उठले होते. आदिवासी गोरगरीबांना धान्य, कपडे, थोडेफार पैसे अशी मदत पुरवत होते. धारेराव ठाणे जिल्ह्यातील सावरणा, बांडशेत, वालिवरे अशा आदिवासी गावातील जनतेला देखील मदत करायचे. अगदी जव्हार, माळशेजच नाही, तर.., भीमाशंकर पर्यंत आपल्या मदतीचा हात जनसामान्यांसाठी पुढे करत होते. धारेरावांचे हे कार्य इंग्रज राजवटीच्या व सावकारशाहीच्या डोळ्यात सलू लागले. धारेरावांच्या मदतकार्याला चाप लावून धारेरावांना पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ‘पाथरे’ घाटातील पोलिस चौकीत इंग्रज पोलिस तैनात केले होते. परंतु संजीवनीच्या स्वरूपातील वनस्पती सेवन केलेल्या धारेरावांच्या अंगी काहीतरी दैवी शक्ती संचारत असल्याने इंग्रज पोलिसांना धारेरावांना पकडण्यात यश आले नाही. पोलिस त्यांना पकडायला आल्यानंतर धारेराव १००० फुटाचा कडा(कोकणकडा) सहज उतरून खाली जायचे व पुन्हा सहज वरती चढूण यायचे. वार्‍यासारखे धावायचे, पळायचे, कधी – कधी कोकणकड्यावरून सहज खाली उडी टाकायचे, तरीही कसलीच जखम, ईजा धारेरावांना होत नव्हती. धारेराव बाबा बहुरूप्या सारखी वेगवेगळी रूपं धारण करायचे. कधी गुराखी… तर कधी मध काढणाराचे रूप घ्यायचे. कधी – कधी वाटसरू होऊन पोलिसांत देखील मिसळायचे. गप्पा मारायचे. त्यांच्यातच राहून पोलिसांच्या हालचालींची टेहळणी करायचे. पोलिस त्यांनाच विचारायचे धार्‍या दिसला काय कुठे? तेंव्हा हा बहुरूपी धार्‍याच उत्तर द्यायचा की, तो बंडकरी..? असेल कुठेतरी..?घनदाट जंगलात, कडेकपारी. परंतु बहुरूपी स्वत: धार्‍या असल्याची भणक देखील कधी इंग्रज पोलिसांना लागू दिली नाही. धार्‍याला पकडून देणार्‍या ईसमाला इंग्रज पोलिसांनी ईनाम सुध्दा घोषित केले होते. इंग्रज सरकारने धार्‍याला पकडण्यासाठी उचललेलं प्रत्येक पाऊल, प्रत्येक योजना अयशस्वी होत होती. १५-२० दिवस दबा धरून बसलेल्या पोलिसांना धार्‍या सापडत नव्हता. धार्‍याला पकडायला इंग्रज पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. त्यामुळे पोलिसही चवताळले होते. रानावनांत दिसणार्‍या आदिवासींना दम भरत होते. मारझोड करत होते. त्यामुळे धार्‍या कनवळला होता. अखेर त्याने स्वत: इंग्रज पोलिसांच्या स्वाधीन होऊन शरणागती पत्कारायचे ठरवले होते. एके दिवशी धार्‍याने पोलिसांची भेट घेऊन आदिवासींवर होणारा अन्याय व अत्याचार थांबविण्याबाबत विनंती केली. आणि म्हणाला की, तुम्ही मला शरण या. मी सुध्दा तुम्हाला शरण येतो. मग तुम्ही मला ज्या ठिकाणी न्याल त्या ठिकाणी मी तुमच्याबरोबर येण्यास तयार आहे. परंतु माझी एक अट आहे, ती म्हणजे माझे फक्त शीर(मुंडके/डोके) कापून न्या. माझे धड मात्र माझ्या जन्मभूमीत राहू द्या. मग मात्र इंग्रज पोलिस तयार झाले. धार्‍याला पकडून त्याचे शीर कापले गेले. आणि त्वरित पुणे या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्या काळात जेलमध्ये इंग्रज जेलर जो कोणी होता, त्याच्या समोर वीर धारेरावांचे शीर ठेवण्यात आले. त्या जेलरने धार्‍याचे शीर पाहिल्या बरोबर धार्‍याच्या शीराला व आदिवासी समाज्याला ‘शिवीगाळ’ केल्याचा प्रकार घडला असावा. (असा अंदाज वर्तवला जातो) त्याच क्षणी धार्‍याचे शीर जिवंत होऊन त्या जेलरच्या नरड्यावर उडून बसले व जोराने चावा घेतला. तसाच जेलर घाबरला व जोरात विव्हळला. आपल्या दोन्ही हातांनी जोराने धार्‍याच्या शीराला पकडून बाजूला झटकले. तेंव्हा माझ्या या शीराला माझ्या जन्मभूमीत घेऊन चला असे धार्‍याच्या शीराने इंग्रज पोलिसांना बजावले. धार्‍याच्या शीराचा असा रौद्र व राक्षसी अवतार पाहून इंग्रज पोलिसही घाबरले होते. त्यामुळे विलंब न लावता पोलिस धार्‍याचे शीर घेऊन कुमशेतला आले, आणि ज्या ठिकाणी धार्‍याचे धड पडले होते, त्या ठिकाणी या लढवय्य क्रांतिकारकाचा अंत्यविधी करण्यात आला. अशी आख्यायिका/वीर धारेरावांची कर्मकथा कुमशेत येथील काही वृद्ध जाणकार लोक, सरपंच सय्याजी असवले, सराजी असवले, बुधा बांडे इ. ग्रामस्थ मंडळी सांगतात. इतिहासात कुठेही या वीर धारेरावांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद झाली नाही, म्हणून ही आख्यायिका मागे पडली असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. असा हा गोरगरीबांचा कैवारी धार्‍या.. आदिवासी जनतेच्या गळ्यातील जणू काही ताईत बनला होता. आदिवासी समाज वीर धारेराव बाबांना देव मानतो, आजही मानत आहे. काही वर्षानंतर धारेराव बाबांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी धारेराव बाबा आदिवासी जनतेच्या सदैव स्मरणात रहावेत म्हणून कुमशेत गावच्या ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून एक धारेरावांचे समाधीस्थळ म्हणून एक मंदीर बांधले. स्मशान म्हटलं की, प्रत्येकाच्या मनात अगोदरच एक प्रकारचं भय निर्माण झालेलं असतं. परंतु या धारेराव बाबांचे अंत्यसंस्कार केंद्र/समाधी या आधुनिक युगात अकोले तालुक्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ व तीर्थक्षेत्र बनले आहे. जणू काही स्वर्गातील इंद्राची बाग ‘नंदनवन’ या कुमशेत व ठाकरवाडी परिसरात अवतरले आहे. अगदी तिनही मौसमात निसर्गाची खरी नवलाई पाहून मन भरून जाते. त्यामुळे पर्यटकांच्या चेहर्‍यावरील आनंद हा अगदी ओसांडून वाहत असतो. म्हणून दरवर्षी हजारो पर्यटक या निसर्गरम्य परिसरात धारेराव बाबांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. पर्यटकांचे खास आकर्षण म्हणजे वीर धारेरावांचे मंदिर, अहमदनगर व ठाणे जिल्ह्यांची सीमारेषा ठरलेला अवाढव्य असा कोकणकडा, आजोबा पर्वत, नाफ्ता डोंगर, घोडी शेप, जुडी कलाडगड, कोंबडा डोंगर, गवळी देव, घनचक्कर डोंगर, मुडा डोंगर, घोड पाऊल, शिपाई बुडी ओढा आणि पाथर्‍या घाट अशी विविध नयनरम्य पर्यटनस्थळे व धारेराव बाबांचे गुरू सदोबा महाराज यांचे समाधीस्थळ पर्यटकांचे लक्ष वेधल्या शिवाय राहात नाही. कळसुबाई व हरिश्चंद्रगड अभयारण्यातील जैवसृष्टीचा खजिना या धारेराव बाबांच्या पावनभूमीत कुमशेत परिसरात आपल्याला पाहावयास मिळतो. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट अरण्य, महाराष्ट्राचे मानचिन्ह शेकरू आपल्याला या अरण्यात पाहावयास मिळतो. तसेच वाघ, बिबट, रान डुक्कर, तरस असे अनेक प्रकारचे प्राणी व विविध प्रकारचे पक्ष्यांचे आपल्याला दर्शन घडते. खरी ग्रामीण जीवनशैली कशी असते याची जाणीव आपल्याला होते. रायभोग भाताचे जुने पारंपारिक वाण या गावाने टिकवून ठेवले आहे. आजही काही शेतकरी रायभोग भाताचे पिक घेतात. भोजनात रायभोगाच्या तांदळाचा भात सेवन करतात. या तीर्थक्षेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर पुढील परिसरात साधारणतः १०० कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचा शेंदूर फासलेला गोलगरगरीत दगड(गोटी) ठेवली आहे. भाविक भक्ताने वीर धारेराव बाबांचे नाव घेऊन एखादी इच्छा मनोमन व्यक्त करायची व ती दगडाची गोटी उचलण्याचा प्रयत्न करायचा, जर त्या भक्ताच्या मनातील ईच्छा/मनोकामना धारेराव बाबांच्या कृपेने पूर्ण होणारी असेल तर ती दगडाची गोटी उचलते. अन्यथा उचलत नाही. अशी एक या दगडाची(गोटीची) आख्यायिका वृद्ध व जाणकार लोक सांगतात. चैत्र महिन्यामध्ये कुमशेतकर मंडळी संपूर्ण महिनाभर आठवड्याचा एक दिवस असे धारेराव बाबांसाठी पाच रविवार पाळीक दिवस(मोडे) पाळतात. या मोड्याच्या दिवशी शेतात कोणत्याही प्रकारचे कुठलेच काम करत नाहीत.

बापू निर्भीड पत्रकार

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भा...