Thursday, May 5, 2016

बबलीचीही 'शाळा'!
पंधरा दिवसांपूर्वी अपरिचित बबली सकाळी सकाळी शाळेत आली. चार दोन दिवस असेच गेले. तिने शाळेच्या परिसरातच मुक्काम ठोकला. येता जाता मुलं बबलीबरोबर खेळू लागले. ती पण मस्त रमली. झाडाच्या सावलीत मस्त लोळायची, दुपारी तिथेच ताणून द्यायची! हळूहळू बबलीची मुलांसोबत भारीच गट्टी जमली. मुलंच नाहीत तर आम्ही शिक्षक, पालकही तिच्या प्रेमात पडलो. सर्वांना तिचा भलता लळा लागलाय. आता आता तर सारेच तिला जीव लावायला लागलेत. तिची काळजी घेताहेत. बघता बघता ती आमच्या परिवाराचाच जणू एक भाग बनलीये. तिच्या अल्लड, खेळकर आणि गोड, लोभस असण्याच्या आणि वागण्याच्या गोष्टी मुलांमार्फत घराघरांत पोहोचल्यात. ते ऐकून आज सकाळी खास तिला बघायला काही पालक आणि गावकरीही खास शाळेत आले होते. त्यांच्याही पायात ती घुटमळू लागली.
सहावीतला उदय पवार तिला खायला बिस्कीट आणून देतो. शाळेजवळच राहणारी पाचवीतली अनुजा पाडेकर सायंकाळी बबलीला भाकरी खायला देते. दुसरीतली वैभवी घरून खास तिच्यासाठी डब्यात जास्तीची भाकरी आणते!
स्नेहल पथवे तर शाळेतला खिचडीभात घेताना ताटात तिच्याही वाट्याचा वाढून घेते. बबली जिथं बसलेली असते, तिथं तिच्याशेजारी झाडाखाली सावलीला जेवायला बसते. स्वतः जेवते तिला पण जेवू घालते!
ओंकार चासकर आणि आदित्य पाडेकर हे दोघेही तिला आठवणीने पाणी पाजतात. तिचे बबली हे नामकरणही मुलांनीच ठेवलेय!
भूषण काळे तिला कोणी त्रास देत नाही ना? याची मनापासून काळजी घेत असतो. रोजच्या परिपाठात तिच्याविषयी आस्थेवाईकपणे बोललं जातं. सारेजण तिची काळजी घेताहेत.
आपण इतरत्र नेहमी बघतो, अनेक शाळांचा परिसर म्हणजे मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनलेला असतो. शाळा सुटल्यावरच नाही, तर शाळा भरलेली असतानाही अनेकदा मोकाट जनावरांचा त्रास होत असतो. बबली मात्र याला पूर्णपणे अपवाद आहे. ती एकदम स्मार्ट आहे. क्यूट दिसते. सध्या ती प्रिग्नंट आहे. तिची अवस्था जराशी अवघडल्यासारखी झाली आहे. आता लवकरच ती पिल्लांना जन्म देणार आहे. आम्हा सर्वांनाच त्या दिवसाची प्रतीक्षा लागून आहे...
आम्ही शाळेत रोजच्या परिपाठात एक विषय घेऊन त्यावर सर्वजण बोलतो. बाकी त्या विषयाशी संबंधित माहिती आणि स्वतःची मतं, निरीक्षणं मुलं दुसऱ्या दिवशी लिहून आणतात. हे लिहिण्याला काही फ्रेम नसते. एखाद्या विषयावर मुक्तपणे व्यक्त होणं अपेक्षित असतं. अनेकदा विषयदेखील मुलंच ठरवतात. जसं की परवा शेतकरी, काल बाभळी असे विषय होते...
आज मुलांनीच विषय निवडला बबली!
कधी कधी मी पण दिलेल्या विषयावर टिपणवजा लिहून दुसऱ्या दिवशीच्या निवडक मुलांच्या लिखाणाच्या सादरीकरणाबरोबर ते वाचून दाखवतो. मुलं बबली तसेच त्यांच्या घरच्या परिसरातल्या पाळीव कुत्र्यांविषयी आज लिहितीलच. या निमित्तानं आज या विषयावरचा माझाही गृहपाठ पूर्ण झाला!

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...