Thursday, May 5, 2016

प्राथमिक शाळेतली मुलं आपल्या आई-बापाच्या शेती व्यवसायाकडं कसं पाहतात, शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांबद्दलचं त्यांचं आकलन कसं असतं, हे जाणून घेतलं, तर एक वेगळंच वास्तव समोर येतं. शेतकऱ्यांच्या दुःखाचं मूळ कशात आहे, हे या वयातच मुलांना समजावं यासाठी एका प्रयोगशील शिक्षकानं केलेली ही उठाठेव.
👉"उसाच्या भाववाढीसाठी शेतकरी रस्त्यावर' अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली होती. शाळेच्या रोजच्या परिपाठात मुलांनी ती वाचली. बातमीवर चर्चा सुरू झाली. मुलं मते मांडू लागली. "शेतकऱ्यांना भावासाठी आंदोलन का बरं करावं लागतं?' एका मुलानं प्रश्न विचारला. नेहमीप्रमाणं सुरवातीला मुलांनीच या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. मयूर म्हणाला, की उसाला भाव वाढून मिळावा म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. "आंदोलन म्हणजे काय रे?' मी खडा टाकून पाहिला. मुलं म्हणाली, ""आपल्या मागण्या मान्य करून घ्यायला लोकांना आंदोलन करावं लागतं. स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजी पण आंदोलनं करायचे...'' प्रसादनं उदाहरणासह मुद्दा स्पष्ट केला. "आंदोलन कोणाच्या विरुद्ध असतं?' मुद्दा पुढं नेण्याच्या हेतूनं मी विचारलं. बहुसंख्य मुले म्हणाली "सरकारच्या!' "शेतकरी शेतात मातीत राबतो. भरपूर कष्ट घेतो. शेतीतून माल पिकवतो. सरकारनं शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्यायला पाहिजे. सरकार भाव देत नाही म्हणून शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. तोटा होतो म्हणून लोक चिडत्यात. आंदोलनं करत्यात.'' एकमेकांच्या मुद्द्यात भर घालीत मुलांनी परस्पर सहकार्यानं प्रश्नाचं नेमकं उत्तर तयार केलं!
उसाच्या उत्पादनासाठी एकरी होणारा खर्च, लागवडीपासून रात्रंदिवस घ्यावी लागणारी मेहनत यावर तपशीलवार चर्चा झाली. केवळ ऊसच नाही तर कांदा, टोमॅटो, भाजीपाल्यासह इतरही पिकांच्या एकूण अर्थकारणाविषयी बरंच बोलणं झालं! आमच्या बहिरवाडीच्या (ता. अकोले, जि. नगर) शाळेत येणारी जवळपास सगळी मुलं तशी शेतकऱ्यांचीच; परंतु यातल्या बऱ्याच मुलांना एखाद्या पिकासाठी येणारा उत्पादन खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न माहीत नव्हतं. गप्पांतून पिकाला अमूक इतका खर्च येतो, हे बहुतेकांना पहिल्यांदाच कळलं! एखादं पीक शेतात लावल्यापासून ते बाजारात विकेपर्यंत शेतकऱ्याला काय काय दिव्यं करावी लागतात, हेही मुलांना नीट माहीत नव्हतं. "जमिनीवरचं वास्तव' पाहून आम्ही शिक्षकही चक्रावून गेलो!
कोणत्याही पिकाच्या विक्रीतून शेतकऱ्याला फायदाच होतो, अशी सर्वच मुलांची धारणा होती. आमच्या शाळेतली मुलं तशी बारा-तेरा वर्षे वयापर्यंतची म्हणजे तशी लहान वयोगटातली; पण शेतकऱ्यांचं म्हणजे स्वतःच्या बापाचंच जगणं मुलांना नीट समजलेलं नसल्याचं नागडं वास्तव या गप्पांतून अधोरेखित झालं. ते अस्वस्थ करत राहिलं. ग्रामीण भागात घरातल्या मुलांना चर्चेत सामावून घेतलं जात नाही. निर्णय प्रक्रियेत मुलं-मुली-महिलांना आजही फारसं स्थान नसतं. आमची पाठ्यपुस्तकंदेखील शेतकऱ्यांचं हसरं आणि शेताचं हिरवंगार चित्र रंगवत असतात. मुळात पाठ्यपुस्तकं वास्तवाला भिडतच नाहीत! शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा संघर्ष त्यातून पोचत नाही. परिणामी आजच्या समाज वास्तवाशी विद्यार्थ्यांचा सांधा जुळत नाही.
शेतकऱ्याच्या दु:खाचं मूळ नेमकं कशात आहे, शेतीमाल निघाल्याबरोबर त्याचे भाव का पडतात, आणि याला कोण जबाबदार आहे, हे मुलांना याच वयात समजायला हवं, असा विचार मनात आला. तशी चर्चा आणखीन जराशी पुढं सरकली. "शेतात कोण राबतं रे?'मुलांना विचारलं. "आमचे आई-बाप.' मुलांचं उत्तर. शेतकरी पिकाला जीव लावतात. तळहातावरच्या फोडासारखं जपतात. विजेच्या भारनियमनामुळे रात्री-अपरात्री पाणी द्यायला जातात. त्यांना विंचू-साप चावतात. ते थंडी-वाऱ्यात कुडकुडतात. बिबट्याच्या हल्ल्यात जिवानं जातात. खतं-औषधं यासाठी उधारी-उसनवारी करतात. हे करताना अनेकदा कर्जबाजारी होतात. यातून शेतीच्या आतबट्ट्याच्या व्यवसायाचं चित्र मुलांच्या बोलण्यातूनच मुलांसमोर आलं. काहींना हे जरा जरा माहीत होतं; पण इतकं चिकित्सकपणे या विषयाकडं आजवर कोणी पाहिलं नव्हतं.
सहावीतला कुणाल संवेदनशील आणि विचारी मुलगा. तो म्हणाला, ""ऊस, टोमॅटो, कांदा असं काहीही असू द्या. शेतकरी कष्ट करतो. मग पीक आल्यावर त्याला भाव का बरं देत नाही?'' आपले आई-बाप राब-राब राबतात. अहोरात्र खपतात. पिकवतात; पण उत्पादित मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आपल्या आई-बापाला नाहीये. पीक कोण घेतं? आणि भाव कोण ठरवतं? असं चर्चेला जोरदार वळण मिळालं. ""शेतकरी पिकवतो ना? मग भाव ठरवायचा अधिकार बी त्यालाच पाहिजेल,'' सातवीतल्या अंकितानं ठासून सांगितलं. ""किराणा माल, बिस्कीट, कपडे, सोने-चांदी घ्यायला बाजारात गेल्यावर दुकानदार पैसे कमी करत नाहीत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच असं का बरं होतं?'' शीतलचा बिनतोड प्रश्न. मग मी शेतकरी कवी इंद्रजित भालेरावांच्या काही कवितांचा संदर्भ देत मुद्दा स्पष्ट केला. शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी आणि राजू शेट्टी यांच्या चळवळीविषयी थोडंसं सांगितलं. प्रश्न काढून आणा. खासदार राजू शेट्टी यांना फोन लावू. त्यांची मुलाखत घेऊ, असं मुलांना सुचवलं. दुसऱ्या दिवशी खासदार शेट्टींना फोन लावला. टीव्हीवर, पेपरात दिसणारा खासदार आपल्याशी फोनवर बोलतोय, याचा मुलांना खूप आनंद झाला. मुलांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. शेट्टींनी मुलांच्या पातळीवर येऊन प्रश्नांची उत्तरे दिली. लहान मुलांचे इतके चिकित्सक प्रश्न ऐकून त्यांनी मुलांना शाबासकी दिली. शिवाय "तुमची शाळा शेतकरी चळवळीला अभ्यासू कार्यकर्ते देणार,' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. आम्ही शेट्टी साहेबांशी बोललो, असे मुलांनी घरी जाऊन सांगितले. पालकांचा आधी विश्वासच बसेना. खरे समजल्यावर त्यांना मुलांचे कौतुक वाटले. इंद्रजित भालेरावांचे कवितासंग्रह मुलांना वाचायला दिले. मुलांच्या अनेक कविता तोंडपाठ झाल्या. आता मुले या विषयाकडे डोळसपणे पाहू लागली. मुले स्वतः शेतकऱ्यांच्या सद्यःस्थितीविषयी लिहू लागलीत.
शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलेल्या मुलांना त्यांच्याच प्रश्नांची जाणीव नसल्याचे वास्तव आम्हाला हादरवून टाकणारे होते. पाठ्यपुस्तकांतल्या चित्रांत दिसणारे शेतकरी स्त्री-पुरुषांचे गोरेगोमटे, नीटनेटके, देखणे चेहरे प्रत्यक्षात शेतामातीत शोधूनही सापडत नाहीत. "पीक खुशीत डोलतंया भारी, भरला आनंद समद्या शिवारी...' अशा समृद्धीचं गाणं गाणाऱ्या कवितांतून आणि धड्यांतून इथलं दारुण वास्तव पोचत नाही. ऋतुबदल, पिके, शेतीभाती एवढ्यापुरताच तिथला "परीघ' मर्यादित असतो! अस्मानी-सुलतानी संकटांनी नाडलेल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना, दु:ख पाठ्यपुस्तकांतून मुलांना भेटत नाहीत. समजा भेटल्या तरी त्या ललितरम्यतेत हरवलेल्या असतात. परिणामी वास्तव समजून घेताना मुलांना अडचणी येतात.
मार्च महिन्यात पाच-सहा दिवस आवकाळी पावसाने जोरात धिंगाणा घातला होता. पाऊस आणि गारपिटीने पिके होत्याची नव्हती झाली. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. नुकसानभरपाईसाठी आंदोलनं सुरू झाली. मग या विषयावर तर मुलांनी आपणहून परिपाठात चर्चा घडवून आणली. "आपण झाडं तोडली. गाड्या-कारखाने यांचा कार्बन वातावरणात सोडला. त्यामुळे तापमान वाढले. हिमशिखरं वितळत आहेत. ओझोनचा थर पातळ होतोय, त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर येऊ शकतील. जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राची पाणीपातळी वाढत आहे. माणसाने हवा, माती, पाणी दूषित केले. म्हणून निसर्गाचा कोप झालाय...' मुलं किती नेमकेपणानं सांगत होती! त्यातून बाहेर पडायला आपण काय करायला हवे, असे विचारल्यावर मुलांनी किती छान गोष्टी सांगितल्या-
1. फटाके बनवायला लागणाऱ्या कागदासाठी झाडे तोडतात म्हणून सगळ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करायची.
2. प्रत्येकाने एक झाड दत्तक घ्यायचे आणि ते जगवायचे. (शाळेतल्या मुलांनी दीड हजार झाडे लावलीत आणि जोपासलीत.)
3. प्लॅस्टिक पर्यावरणाचा शत्रू आहे म्हणून ते वापरायचे नाही. कापडी पिशव्या वापरायच्या.
4. मोठे झाल्यावर एक दिवस मोटारसायकलऐवजी सायकल वापरायची.
5. रासायनिक खते आणि औषधांमुळे मातीचे खूप नूकसान झालेय. अनेक मुंग्या आणि मुंगळे, विंचू त्यामुळे मेलेत, नष्ट झाले आहेत. म्हणून सेंद्रिय शेती करायची. गावठी बी-बियाणे गोळा करायचे.
पर्यावरणाचा सबंध विचार मुलांच्या बोलण्यातून समोर आला. शिक्षक म्हणून हा अनुभव खूप सुखावणारा होता.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या राज्य किसान सभेचे नेते एके दिवशी शाळेत आले. शाळा बघून झाल्यावर मुलांशी गप्पा मारायची लहर त्यांना आली. आम्ही मुलांना त्यांचा त्रोटक परिचय सांगितला. मुलांशी गप्पा सुरू झाल्या. आमचा संकल्प म्हणजे एकदम चुणचुणीत. तो म्हणाला, ""साहेब, तुम्ही बघत्यात. शेतकरी थंडी-वाऱ्यात शेतात किती राबत्यात. माल पिकवित्यात. तो माल विकल्यावर त्यांना फायदा व्हायला पायजेल ना? मग तोटाच कसा काय होतो? शेतकऱ्यांना फायदा होईल असा भाव द्या असं तुम्ही सरकारला सांगायला पाहिजे!'' संकल्पने फेकलेला गुगली चेंडू त्या बेसावध नेत्याच्या एकदम अंगावर गेला. ते म्हणाले, ""बाळा, तू फार लहान वयात फार मोठा प्रश्न विचारलास. तुला खरं सांगतो, आम्ही सारे मोठे लोक या प्रश्नाचं उत्तर शोधत आहोत.'' ""शेतकऱ्याने नाही पिकवले तर शहरातले लोकं काय खातील?'' असा रास्त प्रश्न अभिजितनं उपस्थित केला. तोच धागा पकडत ऋषिकेशने इंद्रजित भालेरावांच्या कवितेतल्या ओळी त्यांना ऐकवल्या- ""सांगा माझ्या बापानं नाही केला पेरा
तर तुम्ही काय खाल धत्तुरा?''
ंमुलांच्या या अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं त्या नेत्याकडे नव्हती. त्यांची भंबेरी उडाली. "उशीर होतोय. मी येतो...' म्हणत त्यांनी शाळेचा निरोप घेतला. मुलांनी त्या नेत्याला निरुत्तर केलं, यापेक्षा मुलं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे चिकित्सक नजरेनं बघत आहेत, हे महत्त्वाचं!
- 9422855151
(लेखक प्रयोगशील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत.)

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...