Thursday, June 30, 2016

bhandardara nisrg



bhandardara fulancha

मॉन्सूनच्या आगमनाची वर्दी देणारा काजव्यांचा अनोखा प्रकाशोत्सव... तो संपतो न संपतो, तोच सुरू होणारा जलोत्सव... आणि आता सह्यगिरीच्या कुशीत बहरलाय रानफुलांचा पुष्पोत्सव. अभिजात सौंदर्याचे वरदान लाभलेल्या कळसूबाई-हरिश्‍चंद्रगडाच्या निसर्गसौंदर्याला या रंगीबेरंगी फुलांच्या अलंकारांनी निराळीच झळाळी आली आहे...

फुलांची ही दुनियाच अद्‌भुत आहे. कित्ती फुले? त्यांच्या तऱ्हाही तितक्‍याच. रंग, रूप, गंध, आकार, रचना... प्रत्येकाचे आपले निराळे वैशिष्ट्य. काही रात्री फुलतात, तर काही दिवसा. काही सुवासिक, तर काही वास नसलेली... काही औषधी गुणधर्म असलेली, तर काही चक्क कीटकभक्षी! पिवळीधम्मक सोनकी आठ-पंधरा दिवस रंगाची मुक्त उधळण करते, तर कारवी मात्र रुसून बसल्याप्रमाणे सात वर्षे मुक्‍यानेच काढते अन्‌ सप्तपदी भरली, की फुलांनी फुलून सुगंधाने मोहरून जाते.

दुर्गभ्रमंती, गिर्यारोहण, निसर्गसहली आणि पावसाळी पर्यटनासाठी "चांगला परिसर' अशी कळसूबाई- रतनगड- हरिश्‍चंद्रगड- माळशेज घाट या भागाची आजवरची ओळख आहे; मात्र जैवविविधतेने नटलेल्या या परिसराची आणखी एक विशेष ओळख पुढे येतेय, ती येथील रानफुलांच्या अनोख्या पुष्पोत्सवामुळे!

सर्वोच्च शिखर कळसूबाई, खड्या उंचीचा हरिश्‍चंद्रगड, बुलंद, बेलाग अशा विशेषणांना साजेसे अलंग, मदन, कुलंग हे कुर्रेबाज दुर्गत्रिकुट. पाबर, भैरव, शिंदोळा, घनचक्कर, कात्राबाई यांना सामावून घेणारी दुर्गराज रतनगडाची बलाढ्य पर्वतरांग. अस्ताव्यस्त पसरलेले दुर्गम डोंगरकडे, आभाळाला भिडणारे सुळके, खोल दऱ्या, जीवघेणे उतार, साम्रदची सांदण... आणखी बरेच काही... निसर्गशिल्पांचे कोंदण लाभलेली ही ठिकाणे पाहिली, की भटकंतीचे चीज होते. भटक्‍यांची पंढरी हे बिरुद सार्थपणे मिरविणाऱ्या हरिश्‍चंद्रगडाची नवलाई मनाला मोहित करते.

हिमालयाच्या खालोखाल देशभरात सह्यपर्वताची ख्याती आहे. त्यात रानफुलांबाबत कळसूबाई- हरिश्‍चंद्रगडाचा परिसर हा जगभरातल्या 18 महत्त्वाच्या ठिकाणांपैकी (हॉट स्पॉट) एक समजला जातो. सध्या येथील पर्वतपठारांवर, डोंगरमाथ्यांवर, उतारांवर कुठे खडकात फुललेल्या रानफुलांच्या रूपाने इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांची उधळण सुरू आहे. येथील रानसम्राज्ञीने हिरवा शालू परिधान केला आहे. जागोजागी अजूनही निर्झरांचं मंजूळ गाणं ऐकू येत आहे... पक्ष्यांची किलबिल सुरू आहे... फुलांचा बहर रंगीबेरंगी फुलपाखरांना निमंत्रण देतो आहे... रुंजी घालणाऱ्या मधमाश्‍या फुलांना बिलगताहेत.... निसर्गाने गंधर्व-किन्नरांची मैफल भरविल्यासारखे वाटते आहे. त्यात नटखट-उनाड वाऱ्यावर डोलणारी अगणित फुले जणू भोवतीने फेर धरून नाचत रानपऱ्यांच्या नृत्याच्या आविष्काराचा भास घडवत आहेत. या "मयसभे'तील फुलांचे नानाविशेष, रंग, गंध, निळाई, हिरवाई या नाट्याची "भैरवी' आता सुरू झाली आहे. हा रंगविलास पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो.

मॉन्सूनच्या आगमनाबरोबरच तशी पुष्पोत्सवाची सुरवात होते. फुलझाडांचे प्रामुख्याने गवतवर्गीय, झुडूप, वेली आणि झाडे, असे चार प्रकारांत वर्गीकरण करता येते. कारवीचा अपवाद वगळता येथे गवतफुलांची संख्या मोठी आहे. दाटीवाटीने उगवलेली, वाऱ्यावर डोलणारी गवतफुले पाहिली, की आपले मनही नकळत "गवत फुला रे गुवत फुला' म्हणू लागते. काही फुले सुंदर, मोहक, सौंदर्यवान नववधूसारखी! काही एकदम चिमुकली, नाजुकशी. म्हणजे 1.5 "एमएम'ची, तर काही अगदी टपोरी 250 मिलिमीटर आकाराची. वर्षभरात फुलणाऱ्या फुलांत पांढऱ्या रंगाच्या फुलांचा भरणा सर्वाधिक. त्याखालोखाल गुलाबी, निळा, पिवळा, लाल, हिरवा, असा क्रमांक लागतो.

नवरात्रोत्सवाचे आणि फुलोत्सवाचे अतूट नाते आहे. सह्याद्रीत सर्व ऋतूंमध्ये फुलणाऱ्या रानफुलांची संख्या पाचशेच्या घरात आहे; परंतु याचा बहर "पीक पॉइंट'ला असतो तो सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये. सध्या अनेकविध फुले फुललेली असली, तरी भाव खातेय ती पिवळी सोनकी. सोनकीच्या इटुकल्या फुलांच्या फुललेल्या पुष्पमळ्यांनी पवर्तपठारे पीतवर्णी दिसताहेत. तिला सोबत आहे ती रानतेरडा, रानगाजर, श्‍वेतांबरा, फांगळा, आभाळी-नभाळी, ढालगोधडी, सोनटिकली, लाजाळू, जांभळी, मंजिरी, गोपाळी, रानतूर, सोनसरी, पांढरी कोरांटी, उंदरी, कुसुंबी.. आणखी कितीतरी फुलांची!

मुळातच हरिश्‍चंद्रगडाचा हा परिसर म्हणजे सृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नच जणू! शेकडो प्रकारच्या वृक्षलतांची साथसोबत या भागाला लाभली आहे. येथील नवलाई, स्थळविशेष, गूढरम्यता, नीरव शांतता, पावित्र्य आजवर अनेकांनी न्याहाळले. विविधांगांनी. मात्र, "माउंटन ऑफ फ्लावर्स' ही या सह्यपर्वताची ओळख नव्यानेच होते आहे.

काही विशेष...
- वर्षभरात सह्याद्रीच्या कुशीत सुमारे पाचशे प्रकारची फुले उमलतात. त्यात सप्टेंबरमध्ये 83, तर ऑक्‍टोबरमध्ये 74, अशी 157 फुले या दोन महिन्यांत फुलतात.

- गवतवर्गीय फुलांची संख्या 276, तर वेली 75 असून, झुडपे 84 व झाडे 65 आहेत.
- 37 प्रकारची फुले देशभरात दुर्मिळ आहेत.
- विविधरंगी फुलांत 145 पांढरी, 112 गुलाबी, 100 निळसर, 96 पिवळी, 24 लाल, तर 23 हिरव्या रंगाची आहेत.

- ऑगस्टमध्ये कळसूबाई परिसरात दिसणारी रानफुले - श्‍वेतांबरा, कोरडू, ढालगोधडी, पानतेरडा, विंचवी, नभाळी, पांढरी खारचुडी, पिवळी खारचुडी, आभाळी, विष्णुकांत, रानपोपटी, रानहळद.

- सप्टेंबर - धोतरा, म्हाळुंग, चतार, रानजिरे, ठिपके इरीड आमरी, सीतेचा गजरा, शेवरी, रानशेवरी, गंजकर्णिका, चिकटा, घावटी, दवबिंदू, तेरडा, लालगोधडी, शिंदळ माकुडी, नेप्ता, रानतीळ, रानओवा, दुधाळी, नीळवंती, केणा, गुंज, कुसुंबी, तरवड, उंदरी, सोनटिकली, रानझेंडू, रानवांगे, मुरुडशेंग.

- ऑक्‍टोबर -  लाजाळू, लालतेरडा, पानफुटी, पांढरी, कोरांटी, करंजी, गुलाबी शेवरा, गिरिपुष्प, उन्हाळी, नीलांबरी, निवळी, निसुरडी, घाणेरी, बारका, सोनकडी, सोनकी, मोठा कावळा, सीतेची आसवं, पाचगणी हबे आमरी, रानभेंडी, गोपाळी, जांभळी मंजिरी, रानतूर, जंगली ताग, सोनसरी, सापकांदा, पंदा.
---
कळसूबाई-हरिश्‍चंद्रगडाचा हा परिसर रानफुलांच्या विविधतेबाबत कास पठाराच्या बरोबरीचा आहे; परंतु दुर्गम असल्यामुळे अजून हा पुष्पखजिना लोकांसमोर आलेला नाही. येथील रानफुले पाहणं हा केवळ अपूर्व आणि अवर्णनीय अनुभव असतो. कंदीलपुष्प (शेरोपेजिया) ही वैशिष्ट्यपूर्ण पुष्पवनस्पती केवळ येथेच आढळते.
- श्रीकांत इंगळहळीकर, रानफुलांचे अभ्यासक, पुणे

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...