Friday, June 10, 2016

0
 विजय पोखरकर | अकोले, दरवर्षी प्रमाणे याही मे महिन्याचा दुसरा पंधरवडा आणि जून महिन्याचा शेवटचा पंधरवडा या दरम्यानच्या काळात भंडारदरा-घाटघर-कळसूबाई परिसरातील हजारो झाडांवर काजव्यांची ही मायावी दुनिया अवतरण्यास सुरूवात होते. या वर्षी मे महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात काजव्यांनी हजेरी लावली. या परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पांजरे, सांम्रद , वाकी, रतनवाडी भागात रात्रीच्या अंधारात लुकलुकत्या काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना आकर्षित करतात व मनाला सुखाऊन जातात. 
कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे भंडारदरा, चिचोंडी, बारी या आदिवासी भागात तसेच रंधा धबधब्याच्या जवळपास असलेल्या पाणथळ जागी असलेली अनेक झाडे आता लक्षावधी काजव्यांनी लगडलेल्या स्थितीत पहायला मिळतात. विशेष करून हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभूत खेळ आता सुरू आहे व तो आपल्याला पहायला मिळतोय. ज्या झाडांवर काजव्यांची काही क्षणाची का होईना 'वस्ती' असते, ती झाडे 'ख्रिसमस ट्री' सारखी चमकदार कामगिरी करताना दिसतात. एका लयीत लुकलुकत प्रकाशित झाले की मग मनाला मोहवून टाकतात. झाडांच्या खोडांवर, फांद्यावर, पानांवर बसलेले व हवेत उडणारे लक्ष लक्ष काजवे लक्ष वेधून घेऊ लागले आहेत. यामुळे कुतूहलमिश्रीत आणि विस्मयचकित मुद्रेने काजव्यांचा महोत्सव पाहण्याची संधी जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यत तरी येथे पहायला मिळणार आहेत.
काजव्यांच्या महोत्सवाचे हे निसर्ग वैभव आपण तासनतास मन हरखून पाहतच राहतो. भोवतीच्या काळोखाच्या विराट पसा-यात रात्रीच्या प्रकाशाचा हा अदभूत खेळ, खेळत बेधुंद होऊन त्यात आपण स्वत:ला हरवून बसतो. एखाद्या शानदार समारंभात रात्रीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या वेळी दिव्यांच्या माळांची जशी चाचपणी चालू असते, तशी 'त्या' उत्साही मंडळींची लगबग सतत चालू असते. कुठंतरी एखाद्या झाडावर काजव्यांची लकेर दिसता दिसता विरून जाते तर कुठे तरी शेकोटीतल्या निखाऱ्यांवरून ठिणग्या उसळाव्या तशा ठिणग्या उसळताना दिसतात. रात्र चढता चढता रस्त्यातील वाहतूक कमी होत गेली की, काजव्यांच्या झुळकावर झुळका येऊ लागल्या की, दवाशिवाय मनावर रोमांच उभे राहतात. सर्वत्र मिट्ट काळोख, ओथंबलेलं आभाळ, गार वारा सुटला व हळूहळू नीरव शांततेनं आसमंताला घेरून टाकलं आणि पहाल तर काजव्यांचा महोत्सवाची आतषबाजी रंगात आलेली आहे. एखाद्या दरीच्या काठावरून हा नजारा न्याहाळताना अचानक पत्नीच्या किंवा प्रियेच्या काळ्याभोर केसांत एखादं काजव्याने फूल पकडून माळावं, हा मोह आवरला पाहिजे कारण तुमच्या या मोहामुळे बिचार्‍या काजव्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याचेही भान ठेवावे लागते. वाटलंच तसं तर स्वत:ला आवर घातला पाहिजे. या सर्व गदारोळात रात्र कधी चढत गेली हे कळतच नाही. कारण तोपर्यंत आपल्या मनावर काजव्यांनी ताबा मिळवलेला असतो आणि काजव्यांनी वेडंपिसं करून सोडलेलं होतं. रंधा धबधबाच्या अलीकडचं वळण तर हमखास काजवे चमकताना दिसतात. रस्त्यालगत १५-२० फुटांच्या परिघात तीन उंच झाडांनी गोलाकार फेर धरलेला दिसतो. माथ्यावर काजव्यांनी फांद्या-पानांचा पसारा आणि मध्ये आकाशाचा तुकडा पहायला मिळेल. त्या तीनही झाडांना पानांऐवजी काजवेच लगडलेली दिसतात. झाडंच पेटून उठली आहेत असा भास होतो. कधी हे झाड, तर कधी ते झाड चमकदार बनताना दिसतात.
..आणि अचानक लक्षात येते की, जवळपासच्या आकाशातली अभ्रं दूर झाली, झाडांमधून डोकावणारा आकाशातला चतकोर लबाड, यासोबतच चांदण्यांनी लखलखला, तुमची नजरबंदी झाल्याशिवाय राहात नाही. वाटते, इथं आकाश नव्हते पण चांदणंच भरलेले आकाश खाली जमिनीवर आल्याचा संभ्रम नक्कीच होतो. आता धुक्याचा पडदा कळत न कळत जाणवला की, मन उगीचच हुरहुरलं होतं. रात्रीच्या अंधारात हा खेळ खेळताना वेळ कसा उडून गेला ते समजत नाही, आणि पहातो तर सर्वत्र फटफटलेलं होऊन झुंजूमुंजू झालेलं दिसतंय. म्हणजेच आता उजाडलं आहे.
आता या सूर्यप्रकाशापुढे काजव्यांची प्रभा ती काय? हा तिरकसपणा जमेस धरला तरी रात्रीच्या राज्यातला काजव्यांचा दिमाख काही वेगळाच. म्हणूनच आयुष्यभरासाठी काजव्यांच्या महोत्सवाची अशी एखादी आठवण, एखादा क्षण मनात कायमचे घर करुन राहातो.

महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व डेक्कन ट्रॅव्हल कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारदरा क्षेत्रावर 30 जून 1016 पर्यंत काजवा महोत्सवाचे आयोजन केले असून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची व्यवस्थाही त्याचेकडंन करण्यात आली आहे. यासाठी त्यांनी काही शुल्क ठेवले आहे.

फोटो - विजय पोखरकर, अकोले.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...