Thursday, May 3, 2018

जाती, धर्म, पंथाचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या हाती माणुसकीचा झेंडे हाती घ्यावेत - डॉ. राजेंद्र धामणे

जाती, धर्म, पंथाचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या हाती माणुसकीचा झेंडे हाती घ्यावेत - डॉ. राजेंद्र धामणे 

म.टा.वृत्तसेवा,अकोले-
देशासाठी क्रांतीकारक व स्वातंत्र सैनिकांनी केलेले बलिदान व्यर्थ ठरवायचे नसतील तर प्रत्येक माणसाने जाती, धर्म, पंथाचे झेंडे बाजूला ठेवून आपल्या हाती माणुसकीचा झेंडे घेतले पाहिजेत. जात, पात, धर्म, पंथ याच्यापलिकडे जावून माणसाने माणसाशी माणूस म्हणून माणसासारखे वागावे. पण आताच्या काळात माणुसकीचा अभाव दिसतोय आणि इतरांच्या वेदना कमी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत.  आपण माणूस सोडून इतर प्रश्नलाच अधिक महत्त्व दिले जात आहे.आम्ही माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून निराधार, बेवारशी, पोटासाठी रस्त्यावर भटकंती करणार्‍या महिलांना समाजात चांगले स्थान मिळावे म्हणून काम करतोय, आपणही या सामाजिक  उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अहमदनगर येथील माऊली प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेंद्र धामणे  यांनी केले. 
    क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या 170 व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने क्रांतिवीर राघोजी भांगरे  प्रतिष्ठान, देवगाव व यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठान, शेंडी यांच्या सयुंक्त विद्यमाने बुधवारी (२ मे) तालुक्यातील देवगाव या आदिवासी गावी क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन सोहळा  साजरा करण्यात आला. यावेळी समाजभूषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नगर येथील माऊली प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र व सुजिता धामणे पती आणि पत्नी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या साहित्य संमेलनच्या अध्यक्षा प्रा. डाॅ. माहेश्वरी गावित, ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेले जिल्हा पोलीस अधीक्षक व अकोले विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे दोनदा पराभूत झालेले उमेदवार मधुकर तळपाडे, मवेशीचे माजी सरपंच व राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे अशासकीय सदस्य शरद कोंडार, उडदावणे येथील आदिवासी सेवक दामोदर गिऱ्हे, सौ.चंद्रभागा भोईर यांना शाल, श्रीफळ, फेटा व समाजभूषण पुरस्काराचे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना डॉ. राजेंद्र धामणे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल सहस्र्बुद्धे उपस्थित होते. प्रारंभी यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सतिश काळे यांनी केले. विनायक साळवे यांनी समाजभूषण पुरस्कार सन्मानपत्राचे वाचन केले.
    यावेळी प्रमुख वक्ते डॉ. अनिल सहस्र्बुद्धे  यांनी आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे, क्रांतिवीर गोविंद खाडे, रामजी भांगरे व तालुक्यातील समकालीन क्रांतिवीरांच्या कार्यकतृत्वाचा इतिहास उलगडून सांगत  उपस्थितीतांना सर्वांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मानवी जीवनातील एक व्यवस्था म्हणजेच धर्म आहे. या व्यवस्थेत आपण कोठे बसतो याचा शोध घ्यावा. ऋषी व कृषी संस्कृतीचा शोध ऋषी अगस्त्य यांनी लावला. दोन हजार वर्षापूर्वी कोणत्याही प्रकारची जातीव्यवस्थाच अस्तित्वात नव्हती. ब्रिटिशांनी मुलवननिवासी लोकांना जाती जमाती  आदिवासी ठरवले. त्याकाळी चोर  दरोडेखोर यांच्यासाठी जातीनिहाय एकप्रकारचे श्युडुल तयार केले होते. आजही आपण तोच शब्द सर्रास वापरतोय, याचा अभिमान नाही तर लाज वाटली पाहिजे. कारण आपल्याला अभिमान वाटतो ते  राघोजी भांगरे व इतर सर्व जण हे दरोडेखोर नव्हते, तर ते स्वातंत्र संग्रामात स्वतःला झोकून देणारे क्रांतिवीर होते. म्हणूनच इंग्रजांना सुद्धा नाईलाजाने का होईना पण या संघर्षाचा उल्लेख 'कोळ्यांचा उठाव' असाच करावा लागला, असेही डाॅ. सहस्र्बुद्धे यांनी सांगितले. 
     यावेळी बोलताना अशोकराव भांगरे म्हणाले की,  क्रांतिवीर राघोजी भांगरे हे मुळचे अकोल्यातील देवगाव येथील मुळ रहिवासी आहेत. त्यांना 2 मे रोजी इंग्रजांनी ठाणे जिल्हा कारागृहात फाशी देण्यात आले.  त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी क्रांतिवीर राघोजी भांगरे स्मृती प्रतिष्ठान व यशवंतराव भांगरे आदिवासी विकास प्रतिष्ठानच्या सयुंक्त विद्यमाने देवगाव, तालुका अकोले येथे स्मृतिदिन साजरा करण्यात येतोय. मात्र पुढील वर्षीपासून अमित भांगरे, सचिन भांगरे व मोठ्या संख्येने सहभागी होणार्‍या युवकांच्या पुढाकारातून 2 मे रोजी याठिकाणी केवळ मिरवणूक व सभा न घेता, दिवसभर विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम व संशोधनपर कार्यक्रम राबविण्यात येतील, असेही अशोकराव भांगरे यांनी स्पष्ट केले. 
   याप्रसंगी आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, डाॅ. शहाजी माळी, मारुती लांघी, पांडुरंग भांगरे, जिल्हा परिषद सदस्य   सौ. सुनीता भांगरे, युवा उद्योजक अमित भांगरे, शेंडीचे सरपंच दिलीप भांगरे, पंचायत समिती सदस्य देवराम सामेरे, देवराम गभाले, मंगळा पटेकर, श्रावणा भांगरे, धनंजय संत, नितीन जोशी, उर्मिला राऊत, अलका अवसरकार, दत्तात्रय देशमुख, दत्तात्रय बोऱ्हाडे, ज्ञानेशवर झडे, नामदेव भांगरे, देवीदास शेलार, सुनील पानसरे, आदिवासी भागातून युवक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर भांगरे यांनी उपस्थितीतांचे आभार मानले.















No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...