Thursday, July 26, 2018

जलराज भंडारदरा!

जलराज भंडारदरा!

भंडारदऱ्याची भटकंती आपल्याला नेहमीच ताजंतवानं करते.




भंडारदरा जसा भव्य आहे तसा त्याचा इतिहासही भव्य आहे.


निरेन आपटे 

विलोभनीय निसर्गसंपदा लाभलेल्या भंडारदऱ्याची भटकंती आपल्याला नेहमीच ताजंतवानं करते. त्याहूनही लोभस आहेत ती इथली भोळीभाबडी, सरळ मनाची माणसं..

‘राकट देशा, कणखर देशा,
दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा
अंजन कांचन करवंदीच्या
काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या
दळदारी देशा’

राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांनी महाराष्ट्राचं वर्णन करणारं हे गीत लिहिलं. ते प्रत्यक्ष अनुभवायचं तर कोकणापासून ते विदर्भापर्यंत, नारळी-पोफळीपासून संत्र्यांच्या बागांपर्यंत फिरावं लागेल. लेण्याद्री, सहय़ाद्रीमधून भटकंती करावी लागेल. साहजिकच, एक जन्म पुरा पडणार नाही. पण हे वर्णन एकाच स्थानावर अनुभवायचं असेल तर या भंडारदरा येथे.

भंडारदरा हे स्थान रतनगड, अलंग-कुलंग, हरिश्चंद्रगड, भरवगड, घाटघर आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखराने वेढलेले आहे. आसपास असलेल्या अनेक पर्वतांवरून पाणी खाली येतं आणि प्रवरा नदीला मिळतं. हे पाणी अडवून सर लेस्ली विल्सन या इंग्रज अधिकाऱ्याने १९१० साली इथे त्या वेळचं आशियातील सर्वात मोठं धरण बांधलं. म्हणून या धरणाला विल्सन डॅम असं नाव देण्यात आलं. पावसाळ्यात धरणाचं पाणी सोडतात तेव्हा धरणाच्या पायथ्याशी धबधबा तयार होतो त्याला अम्ब्रेला फॉल म्हणतात. आणि इथे असलेला रंधा धबधबाही पाहण्यासारखा आहे.

महाराष्ट्रात कुठेही भटकंती करतो तेव्हा मी स्थानिक लोकांशी बोलतो. भंडारदऱ्याला मला गाइड संपत महानोर भेटले. दोन दिवस ते माझ्यासोबत होते. त्यामुळे भंडारदऱ्याची खरी माहिती मिळाली.

भंडारदरा जसा भव्य आहे तसा त्याचा इतिहासही भव्य आहे.

भंडारदऱ्यामध्ये महर्षी वाल्मीकी आणि अगस्ती यांचं वास्तव्य होतं, असं मानलं जातं. प्रवरा ही गंगेची एक धारा आहे असे मानून तिला ‘अमृतनदी’ म्हणण्यात आले आहे. रतनगड जावजी यांच्या ताब्यात होता. पुढे कॅप्टन गोडार्डने हा किल्ला जिंकला. किल्लेदार गोिवदराव यांनी तो पुन्हा ताब्यात आणला. राघोजी भांगरे या क्रांतिकारकाने येथील डोंगराळ भागाच्या आधारे इंग्रजांविरुद्ध बंड केलं होतं. विशेष उल्लेख करावा लागेल तो स्व. नामदेव जाधव यांचा. इंग्रजांच्या कारकिर्दीत अकोले तालुक्यातील वीरगाव येथे जन्मलेल्या नामदेव जाधव यांनी इंग्रजांच्या सन्यातर्फे दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये पराक्रम गाजवला. त्यांना व्हिक्टोरिया क्रॉसने गौरवण्यात आलं. ‘ऑस्ट्रेलियन वॉर मेमोरियल’मध्ये त्यांची माहिती देण्यात आली आहे.

रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीचं आहे, जे आजही स्थापत्यशास्त्रासाठी आदर्श ठरलं आहे.

भंडारदऱ्याची निसर्गसंपन्नता इतकी विलोभनीय आहे की सिनेजगतालाही इथल्या दऱ्याखोऱ्यांचा मोह होतो. ज्या सिनेमाला कथेसोबत भूगोल असतो ती कथा जास्त जिवंत बनते. म्हणून भंडारदऱ्यामध्ये अनेक सिनेमांचं चित्रीकरण झालं. विशेष उल्लेख करावा लागेल तो ‘जैत रे जैत’चा.

गो. नि. दांडेकरांच्या या कथेला इथल्या डोंगरदऱ्यांची पाश्र्वभूमी लाभली आहे. ठाकर वस्तीचं चित्रीकरण इथे झालं आहे. कवी ना. धों. महानोर यांनी लिहिलेलं गीत आहे,

‘आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडुन इवले घर’

भंडारदऱ्यात राजूर, कोतुर, नवलेवाडी इत्यादी गावातून फिरताना महानोरांनी या सिनेमासाठी लिहिलेली सर्व गाणी अनुभवता येतात. राज कपूर यांनाही या भागाचं खूप आकर्षण होतं. म्हणून त्यांनी ‘राम तेरी गंगा मली’चं चित्रीकरण इथे केलं. ‘हिना’ सिनेमामध्ये भारत-पाकिस्तानची सीमारेषा दाखवताना भंडारदऱ्याचा उपयोग केला आहे. ‘कटी पतंग’मधील ‘ये शाम मस्तानी, मदहोश किये जा’ या  गाण्यात मागे रंधा धबधबा दिसतो.

भंडारदऱ्यात फिरताना आमच्या गाइडसह कांदाभजी, वडापाव विकणारे दुकानदार या सिनेमांची नावे भराभर सांगतात. आम्ही कोकणकडय़ाच्या दिशेने निघालो तेव्हा वाटेत अनेक गावकरी दिसत होते. अनेक वृद्ध स्त्रियासुद्धा शेतात राबत होत्या.

गाइड महानोर सांगू लागले, ‘भंडारदऱ्यामध्ये हॉस्पिटल नाही. कारण इथे कुणालाही शुगर, बीपीचा त्रास नाही. कोलेस्टेरॉल काय असतं ते कुणालाही माहीत नाही. कारण आम्ही रोज कमीतकमी दहा किलोमीटर चालतो. दिवसभर शेतीत राबतो. भाजीभाकरी खातो. माझा आजा आता ९३ वर्षांचा आहे. आजही तो कमरेला विळा लावतो आणि लाकूडफाटा गोळा करायला रानात जातो. त्याने जन्मात कधीही इंजेक्शन घेतलेलं नाही.’

शुद्ध हवा, निसर्गाची साथ, दर ऋतूमध्ये फुलणारी रानफुले, पशुपक्ष्यांची सोबत आणि बारा महिने टिकणारी हिरवाई यामुळे इथले गावकरी निरोगी जीवन जगतात. भंडारदऱ्याचे लोक इतके साधेभोळे आहेत की जो मत मागायला येईल त्याला मत देतात. त्या बदल्यात त्या नेत्याने विकास करायचा असतो हेसुद्धा त्यांना माहीत नाही. इथल्या पाडय़ांवर फिरताना हांडे-कळशी भरून चालत निघालेल्या अनेक महिला दिसतात.

इंग्रजांनी दूरदृष्टीने इथं इतकं विशाल धरण बांधलं की त्यातील पाणी वर्षभर अनेक शहरांची तहान भागवून उरतं. घाटघरमधून वीजनिर्मिती करतं. पण तेच पाणी शेजारच्या गावात नळावाटे जात नाही.

तरीही इथे त्याची कोणी तक्रार करत नाही. इथल्या खेडय़ापाडय़ातील महिला, मुले प्रचंड कष्ट करून आपलं अस्तित्व टिकवून ठेवतात तेव्हा

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दाच्या देशा’

या ओळी अगदी खऱ्या ठरतात. कोकणकडय़ाकडे किंवा अमृतेश्वर मंदिराकडे जाताना कळसूबाई शिखरावरील मंदिराचा भगवा रंग दिसत राहतो.

‘जरिपटक्यासह भगव्या
झेंडय़ाच्या एकचि देशा॥
प्रणाम घ्यावा माझा हा,
श्रीमहाराष्ट्र देशा ’

हे गडकरींचं गीत आपोआप ओठांवर येतं !!
सौजन्य – लोकप्रभा

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...