Friday, July 27, 2018

आदिवासी आश्रमशाळेतील मुलींसाठी प्रेरिका कार्यशाळेचा आरंभ
महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागातर्फे सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित आदिवासी समाजासाठी ज्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात, त्यांचाच एक भाग म्हणून आदिवासी मुलामुलींसाठी निवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. या आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना वयात येतांना आरोग्य विषयीचे अनेक प्रश्न भेडसावत असतात. त्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन मिळावे तसेच त्यांना इतर अनेक नवीन विषयांची माहिती व्हावी, यासाठी आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्था पुणे यांच्याकडून प्रेरिका प्रशिक्षणाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आज महाराष्ट्रात आदिवासी मुलींसाठी ११०० च्या वर अनुदानित व शासकीय आश्रम शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलींना शालेय शिक्षणाबरोबर त्यांना जीवन शिक्षणही दिले जाते. परंतु मुलींच्या आरोग्याचे प्रश्न हे मुख्यतः वैयक्तिक स्वच्छता, वयात येतानाचे प्रश्न, सुरक्षितता इत्यादींशी संबधित असतात. त्याचे प्रशिक्षण मिळाल्यास या मुलींमध्ये शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी होईल व त्या सक्षम देखील होतील. या कार्यशाळेत आरोग्याशी निगडीत विषयांबरोबर सामाजिक कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, नैसर्गिक सौंदर्य वर्धन, कला-हस्तकला इत्यादी विषयही समाविष्ट आहेत याचे मार्गदर्शन आश्रमशाळेतील मुलींशी रोजचा संपर्क असणाऱ्या समन्वयक विद्यार्थिनी दिल्यास ते अधिक परिणामकारक होईल याचा विचार करून आश्रमशाळेत शिकणारीच एक नेतृत्वगुण असलेली व सभाधीट मुलगी-प्रेरिका म्हणून तयार करण्याची संकल्पना डॉ. किरण कुलकर्णी आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी सुचवली व ती प्रत्यक्षात अंमलबजावणीत आणण्याचे काम आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे या संस्थेला देण्यात आले आहे. या कार्यशाळा महाराष्ट्रात सर्वत्र सर्व ठिकाणी राबविण्यासाठी संस्थेने तज्ञ प्रशिक्षक तयार केलेले असून हे तज्ञ शिक्षक शाळांमध्ये जाऊन प्रेरीकाचे प्रशिक्षण पूर्ण करतील असा विश्वास श्री. एस.जी.चव्हाण, कार्यकारी संचालक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणे यांनी व्यक्त केला. 
 या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आदिवासी शाळेतून एका मुलीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची कार्यशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर यांच्या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा सावरचोळ येथे दि. २४ जुलै ते २८ जुलै २०१८ रोजी घेण्यात आली. यावेळी सहाय्यक शिक्षण प्रकल्प अधिकारी श्री. आर.के.साबळे, श्री. झोपळे, श्री. पायीके, कनिष्ठ विस्तार अधिकारी व शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सावरचोळ येथील मुख्यध्यापक श्री. झरेकर, कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित होते व आखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने प्रकल्प समन्वयक प्रा.विद्या वैद्य, श्री. दत्तात्रय ठोसर, सागर कोचरेकर व पूजा भीसे उपस्थित होते.  सदर प्रशिक्षणात डॉ. दिपाली पानसरे यांनी महिला सबलीकरण या विषयावर उपस्थित प्रशिक्षांणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. श्रद्धा वाणी यांनी आरोग्य व स्वच्छता या विषयावर माहिती दिली आणि सीमा अत्रे यांनी व्यक्तिमत्व विकास या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच श्रीमती वसावे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, श्री. साहेबराव पथवे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, श्री. सोमनाथ मेंगाळ, सरपंच सावरचोळ व शरद कानवडे उपसरपंच सावरचोळ यांनी कार्यक्रमास सदिच्छाभेट दिली.
 प्रशिक्षानंतर या प्रेरीकांना आपापल्या आश्रमशाळेत इतर मुलींना, सुट्टीच्या काळात स्वतःच्या घरी, शेजारीपाजारी, गावात याविषयावर मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. आदिवासी समुदायासाठी या प्रशिक्षित प्रेरिका त्यांनी घेतलेले ज्ञान व सकारात्मक दृष्टीकोन यांच्या मदतीने आरोग्य व इतर बाबतीत मार्गदर्शकांचे काम करू शकते. अज्ञान व गरिबीच्या अंधकारात धडपडणाऱ्या आदिवासी समुदायांना या प्रेरिका नक्कीच प्रेरणादायी ठरतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. प्रशिक्षणानंतर ह्या प्रशिशिक्षित प्रेरिका इतरांमध्ये आरोग्य व इतर विषयांच्या बाबतीत जाणीव- जागृती निर्माण करण्यास सक्षम होतील ह्या प्रेरिका आश्रमशाळेतील इतर विद्यार्थिनींना आरोग्य व इतर विषयांच्या बाबतीत मार्गदर्शन करतील, त्यांना आरोग्य स्वच्छतेच्या चांगल्या व योग्य सवयी लावतील. इतर विद्यार्थिनींच्या-मासिक पाळीबद्दलच्या समस्यांविषयी चर्चा करून व आवश्यकतेनुसार त्यांच्या समस्या शिक्षकांपर्यंत पोहचवतील व विद्यार्थिनी व आश्रमशाळा व्यवस्थापन ह्यांच्यामधील दुवा बनून संवेदनशील वातावरण निर्माण करतील असा विश्वास आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याचे प्रकल्प समन्वयक श्री. योगेश चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...