Thursday, July 26, 2018

भाताच्या शेताची लावनी....

भाताच्या शेताची लावनी....
    आज रविवार होता,शेतात गेलो होतो. जिकडे तिकडे भाताच्या लावनीची लगिन घाई सुरू होती.कोणी रोप काढत होते. कुठे यंत्रावर चिखल चालला होता .कुठे भाताची लागन चालू होती .सारं कसं शांत होतं .बैलाला ओरडल्याचा आवाज नाही.कूठं भलरी नाही, कुठं दुरडी नाही ,शेतात रोटर येत होता. शेत नांगरून चिखल करून जात होता .वावरात दोन तीन माणसंच दिसत होती.
मला माझा लहानपणीच्या भात लावनीची आठवन आली .उन्हाळ्यात पेर्ते व्हा ,पेर्ते व्हा.अशी  पावशी ओरडायला लागली की खऱ्या अर्थाने लावनीची सुगी सुरू व्हायची. शेतात नांगरनी सुरु व्हायची .तरवे लोटायचे ,शेतातला काटा कुटा वेचायचा. नंतर.बीयाचे भात स्वच्छ करायचे  निवडायचे भुईमुगाच्या शेंगा फोडायच्या. तो पर्यंत सुतार गावात हजर व्हायचा .नांगर ,कुळव, पाभार, भरायचा पिढी तयार करायचा. तोपर्यंत मिरग यायचा. शेतात धुळ वाफ्यावर मग भात पेरायचा. बाजारातून खतं आणायचा  उडीद काळे घेवडे आणायचे वाळवायचे भाजायचे भरडायचे कारण लावणीला उडदाचं गुठं आणि काळ्या घेवड्याची आमटी त्या काळी जीव की प्राण असायची.पाऊस पडला की  नाचनीला सुरवात व्हायची .वडपौर्णिमेला वड पुजला, की नाचनी आवटायला सुरवात व्हायची .कधी कधी नाचनी लाऊन माझी आई पोळ्या करायला घरी यायची.आणि तोपर्यंत झरं फुटलेले असायचे आणि भात लावनीला सुरूवात व्हायची. मग घरातला, भावकीतला, शेता जवळ शेत ,असलेल्या. बैलवाल्याच्या हंद्यात जायाचे .एक एका औताच्या मागे किमान दहा बारा माणसं. बायका लावायला असायच्या सकाळी तरवा काढायचा. तोपर्यंत औत्या शेत नांगरायचा.पाठाळं धरायचा . चिखल तयार व्हायचा, तरवा निघायचा. आम्हा लहान मुलांकडे रोप बांधाव काढायचे . चिखल झाला की परत वावरात फेकायचे काम असायचे .एवढ्या वेळात दुरडी यायची त्यात भात, हायब्रिडची भाकरी, उडदाचं गुठं ,कांदा असा बेत असायचा .कधी काळ्या घेवड्याची आमटी ,नाचन्याची भाकरी,  सुकट किंवा तळलेला बोंबिल असायचा. शिवाय बैलांना कणिकीचं गोळं, किंवा दोन दोन भाकरी असायच्या .अंगावर खोळ, त्याखाली पोतं, आणि मस्त पैकी अंगावर,ताटावर कालवनात  पडणारा पाऊस .याखाली जेवायचं आणि झऱ्याचं किंवा व्हळचं गोड पाणी  प्यायचं .आणि चिखलात उतरायचं. कोपरं लाऊन झालं की औत सुटायचं औत्या बैल धुवायला ओढ्यावर, नदीवर किंवा ओहळेवर जायाचा.मग इकडे भलरीला सुरवात व्हायची .
रायबाय गं जायबाय गं 
 तुझा दुलरी वाडा।
तुझ्या वाड्याला,वाड्याला
 तुझ्या खिडक्या चार।।
 भलरी तालात याची कोरभर वावार लाऊन व्हयाचं. तेवढ्यात ननंद भावजयांची जुगलबंदी व्हायची वहिनीला  घालून मग भलरी व्हायची.
वहीनी गं निजली जागी व्ह तरी गं।
लहु बाळाला लहु बाळाला वाळं आलं घे तरी गं ।।
 मग वहीनीलाही राग यायचा आणि ती म्हणायची 
आंब्याचं पान काय हिरवंगारं।
दादां वहीनी चिखल करं।
 दादाजी बैल जाऊद्या घरीं
नांगर खांद्यावरी।।
एवढ्यात ढापल्याला हुकी यायची पावड्यानं ढापलत ढापलत तो कारभारनीला चिढवत गायाचा.
 थड थड वाजतं। मठान शिजतं ।
हाडकानं दुखतय दाड गं सजने ।।
रस्सा रस्सा वाढ गं ।।
रस्सा रस्सा वाढ गं।।
 अशी भलरी गात गात वावार कधी लाऊन व्हायचं ते कळायचं नाही अंगात हुडहुडी भरलेली असायची. अंग आवतारायचं ,घरी यायचं दादांच्या (वडीलांच्या) पुढ्यात अंघोळ करायची. आणि भलरी गुणगुणत कधी झोप लागायची कळायचेच नाही.असं जवळ जवळ पंधरा ते तीन आठवडं चालायचं त्यात रविवारचा मोडा यायचा जातीवंत शेतकरी रवीवारी स्वतः औत ओढल पण बैल जुपायचा नाही. यातच बेंदुर यायचा बैल रंगवायचे सजवायचे. मिरवनूक काढायची. किती आनंद वाटायचा. शिवाय ज्याचं शिबं पडल त्याच्या घरी पुरण पोळ्या व्यायच्या सारा हंदा जेवायला यायचा किती आनंदी आनंद असायचा.
 पण आज हे सारं बदललय शेतकऱ्याची खरी दौलत असलेला बैल आज नामशेष झाला. सर्ज्या ,राज्या ,पठान, वजीर ,परधान ,ढवळ्या, पवळ्या सारे शेतकऱ्यांचे मित्र सोडून गेले .तो हंदा ती एकी संपली. ती भलरी, ती लोकगीतं नष्ट झाली. संध्याकाळी एखादा शेतकरी लावणीला मागे राहिला तर बांधावरनं जाणारा माणुस ,बाई शेतात वाकत होती. कुणाच्या घरी वाईट घडलं, तर सारा गाव त्याच्या शेतात जाऊन लावनी करून देत असायची. हे सारं सारं संपलं. आज कोण कोणाच्या शेतात जाईना, मदत करेना, इतकंच काय पण जो भात खातोय तो मुंबईला. आणि ज्याला चालाय येत नाही ते म्हातारे आईवडील शेतात राबताना दिसत आहेत. जाऊद्या उद्या बेंदुर येईल. पण त्या दिवशी पुजायला गावात बैल दिसनार नाही.पण त्या दिवशी कोणाला ना कोणाला तरी या लावनीची आणि तिच्या साठी शेतकऱ्या साठी नि स्वार्थी पणे राबणाऱ्या ढवळ्या, पवळ्याची आठवण मात्रं नक्की येईल एवढं मात्र नक्की.
                    बळवंत पाडळे

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...