Thursday, August 20, 2020

कौशल्य विकास


केंद्र सरकारकडून सातत्याने कौशल्य विकासाचा नारा लावला जात असतांना युवकांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात याबाबतची माहिती पोहचलेली नाही. देशाला २०२० पर्यंत १२ कोटी कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘स्कील इंडिया डेव्हलपमेंट मिशन’ ही योजना सुरु आहे. देशात दहावी पासूनच करिअरचा विचार करणारे २३ टक्के, बारावीपासून ३८ टक्के आणि पदवीनंतर याबाबतचा विचार सुरु करणारे ४७ टक्के विद्यार्थी आहेत. फक्त १८ टक्के विद्यार्थीच करिअर विषयक समुपदेशन सुविधेचा लाभ घेतात. आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच असून चीनमध्ये ४५ टक्के, अमेरिकेत ५६ टक्के, जर्मनीत ७४ टक्के, जपानमध्ये  ८० टक्के आणि दक्षिण कोरियात ९६ टक्के कुशल मनुष्यबळ असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्य शिक्षणाचे – व्यवसाय शिक्षणाचे – चीनमध्ये १०० तर जर्मनीमध्ये १६० विद्यापीठे आज अस्तित्वात आहेत.
भारतात आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. १६ टक्के युवकांना व्यवसाय करावा असे वाटते तर खाजगी क्षेत्राकडे वळणाऱ्यांचे प्रमाण फक्त ६ टक्केच आहे. राज्याच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणांवर ७४ टक्के विद्यार्थ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.
आपल्या राज्यात सरकारने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांद्वारे २०२२ पर्यंत ५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. विविध क्षेत्रांतील कौशल्य विकासाशी संबंधित ६०० प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध केले आहे. राज्यात एकूण ४१७ शासकीय आणि ४५४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार केला असता जवळजवळ तीन दशकांपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांना तांत्रिक शिक्षण किंवा टेक्निकल असं म्हटलं जायचं. त्याला शालेय शिक्षणामध्ये अतिरिक्त ग्रेड असायची. ज्या विद्यार्थ्यांना आठवीनंतर या तांत्रिक अभ्यासक्रमाचा फायदा करून घ्यायचा आहे ते विद्यार्थी यासाठी आठवड्यातून साधारणत: एकदा दर शुक्रवारी, यासंबंधीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असे. यामध्ये मुळातच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा आयटीआयच्या अभ्यासक्रमांची प्राथमिक माहिती व्हावी व त्यासाठी त्यांची आवड वृध्दिगत व्हावी हा यामागचा हेतू होता. मात्र शासनाने प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश येत नव्हते. त्यावेळी मुलांमध्ये, पालकांमध्ये याबद्दल अजिबात जागरूकता नव्हती, हे एक महत्त्वाचे कारण त्याच्या अपयशामागे होते असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...