Tuesday, June 25, 2024

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे....

बीजमाता पद्मश्री , राहीबाई पोपेरे..... सौ . राहीबाई सोमा पोपेरे , राहणार कोंभाळणे तालुका- अकोले, जिल्हा अहमदनगर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला . वडिलांची गरिब परिस्थिती आणि घरी सात भावंडे असल्याने राहीबाईंना शाळेत घातलेच नाही . घरी आई वडिलांसोबत त्या शेतामध्ये मदत करु लागल्या . बालपणापासूनच शेतीची आवड असलेल्या राहीबाईंना वयाच्या बाराव्या वर्षीच लग्न होऊन सासरी जावे लागले . त्यांचे माहेर आणि सासर कोंभाळने गावचेच आहे. सासरी आल्यानंतर पती सोमा यांचे सोबत त्या शेतात राबू लागल्या .सुरुवातीला रासायनिक शेतीकडे कल असल्याने त्यांनी या शेतीचा अनुभव घेऊन पााहिला . घरातील वाढते आजारपण व दवाखाण्यावर होणारा बेसुमार खर्च याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की संकरित वानांना उत्पादन जरी जास्त येते तरी उत्पादन खर्चही मोठा होतो .रासायनिक औषधे व कीटकनाशके मोठयाप्रमानात वापरल्याने त्यांचा आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो . त्यानंतर त्यांनी परस बागेत गावरान भाजीपाला उत्पादन घरी खण्यासाठी सुरू केले .त्यांना परसबाग उभारणी साठी जनरल मिल्स पुरस्कृत व बायफ संस्था संचलित आदिवासी विकास प्रकलपांतर्गत मदत करण्यात आली .त्यांना यासाठी विविध फळझाडे जसे की चिक्कू , आंबा , सीताफळ , पपई , लिंबू , कढीपत्ता , शेवगा , हादगा , अंजीर , या प्रकारची बहुवर्षायू फळझाडे लागवडीसाठी देण्यात आली . सोबतच तांत्रिक मार्गदर्शनही करण्यात आले.पाणी नसल्याने ही झाडे कशी सांभाळणार हा प्रश्न त्यांना पडला .त्यावर त्यांना बायफच्या कृषी तज्ञांनी मार्गदर्शन करताना दगडांपासून आच्छादन झाडांच्या बुंध्या सभोवती करण्याचा सल्ला दिला. दगडांचे आच्छादन केल्यामुळे अत्यंत कमी पाण्यात झाडे तग धरू लागले . हवा , सोसाट्याचा वारा, वादळ व प्रखर ऊन यापासून बाष्पीभवनाने उडून जाणारे पाणी वाचून झाडांना त्याचा उपयोग होऊ लागला . हळूहळू परसबाग वाढू लागली आणि राहीबाईंचे मन परसबागेत रमू लागले . या परस बागेतच देशी गावरान बियांचा संग्रह पुन्हा जमू लागला. त्यांनी हाळू हाळू देशी बियांच्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेती मधेही बदल घडवून आणला . रासायनिक शेतीकडे झुकलेला परिवार पुणे पुन्हा गावरान व अस्सल देशी पिकांकडे वळवला. दरम्यान बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यामाने समंध आला .एके दिवशी बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे दिवसभराचे कामे आटोपून शेजारील मोठे असलेले गाव खिरविरे येथून परतीचा प्रवास करताना राहीबाई यांच्याकडे चहा पिण्यासाठी थांबले . रस्त्याच्या कडेलाच राहीबाई यांचे घर असल्याने व पाऊस पडून गेल्याने हवेत गारवा कमालीचा वाढला होता त्यामुळे रस्त्यात विसावा म्हणून सहज ते राहीबाई यांच्या वस्तीवर वळले होते.. घरा समोरील ओट्यावर बसून त्यांनी राहीबाई सोबत गप्पा सुरू केल्या. चहा पिता - पिता त्यांचे लक्ष्य राहीबाई निवडत असलेल्या बियाण्यांकडे गेले. नुकताच पाऊस सुरू झाला म्हणून शेतावर लागवडीसाठी त्यांना ही बियाणे घेऊन जायचे होते . त्यांना विचारणा करून या बियांची माहिती त्यांनी घेतली . येवढे विविध प्रकारचे बियाणे बघताना त्यांना नवल वाटले. त्यांनी अधिक चौकशी केली असता गाडगे , मडके , कणग्या , बळद आणि शेणाने सारवलेल्या भिंती यातील अस्सल गावठी वणाचे बियाणे त्यांनी दाखविण्यासाठी काढून आनले . श्री.जितीन साठे यांनी ही सर्व बियाणे आणि त्यांचे प्रकार यांच्या नोंदी घेतल्या . सर्व प्रकार आणि काही भाज्या यांचे त्यांनी फोटोही घेतले . हेसर्व करत असताना त्यांच्या लक्षात आले की. श्रीमती राहिबाई यांच्याकडे सुमारे सतरा प्रकारचे पिके व 48 वाण एकाच वेळेस उपलब्ध आहेत . नुसतेच हे सांभाळलेले नव्हते तर या सर्व वाणांची सविस्तर माहिती त्यांच्याकडे उपलब्ध होटी. विशेष म्हणजे त्या शाळा शिकलेल्याच नसताना हि सर्व माहिती ध्यानात ठेवणे ही खूप कठीण बाब आणि इतकीच वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या बियांची माहिती संकलित केल्यानंतर साठे यांनी ही माहिती वर्तमानपत्रासाठी काम करणाऱ्या पत्रकार मित्रांना कळवली .या कामाची सर्वात पहिली दाखल सकाळ वृत्तपत्राने घेतली . नंतर जमा केलेली सर्व माहिती श्री. साठे यांनी विषय तज्ञ श्री. संजय पाटील यांना दिली व कोंभाळणे हे राहीबाई यांचे मूळ गाव जनुककोश प्रकल्पात जोडण्याची विनंती केली. हा कप्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता . राहिबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान व बियाणे संग्रह याची नोंद घेऊन तिच्या राहत्या घरातील एक छोट्या खोलीत बियाणे बँक बायफ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष श्री.गिरीशजी सोहनी यांचे मार्गदर्शनाने व हस्ते वर्ष 2016 मध्ये सुरू करण्यात आली . या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज या बीज बँकेत 54 पिकांचे 116 विविध प्रकारचे आणि गुण वैशिष्ट्य असलेले वाण उपलब्ध आहेत . यातील वाल आणि पावटयाच्या सुमारे 20 वाणांचा संग्रह आहे .हे सर्व वाण प्रोटीन युक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत . यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकणारे आहेत . या शिवाय भात , नागली , वरई , सुमारे 30 विविध प्रकारच्या भाज्या , तेल वर्गीय पिके , तृन व गळीत धान्य असे विविध प्रकारचे वाण त्यांनी जतन करून ठेवलेले आहेत . निसर्गातील अमूल्य असा ठेवा पुढच्या पिढीसाठी ठेवला आहे. .बायफच्या मदतीने त्यांनी या वाणांचा प्रचार व प्रसार करतांना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनातून सहभाग नोंदवला आहे . या शिवाय शाळा , कॉलेज , बचत गट ,चर्चा सत्र ,शिबिरे , शेतकरी प्रशिक्षणे या माध्यमाने देशी वाणांचे जतन व प्रसार कार्य मोठया प्रमाणात केले आहे .अकोले तालुक्यातील आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमाने स्थानिक वाणांचा प्रसार मोठया प्रमाणावर केला आहे .परसबागेत लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी पोहचवले आहे . कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून त्या मार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य बायफच्या मदतीने सुरू ठेवलेले आहे. .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन लोकमत वृत्तपत्र समूहाने सर्वप्रथम जिल्हा व नंतर विभाग पातळीवरील पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे .याशिवाय वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार ,बायफचा राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा आदर्श शेतकरी पुरस्कार , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार,आदिवासी विभागाचा आदिवासी सेवक पुरस्कार ,झी मिडियाचा अनन्य सन्मान ,कृषी विभागातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय जिजामाता कृषिभूषण पुरस्कार , जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभागातर्फे दिला जाणारा आदर्श शेतकरी जिल्हा स्तरीत पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत .बी.बी.सी. वर्ल्डने नुकत्याच जाहीर केलेल्या 100 प्रतिभावान व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश करण्यात आला आहे . त्यांना नुकताच IBN Lokmat News 18 या मराठी वृत्तवाहिनीचा आदर्श शेतकरी सन्मान श्री .चंद्रकांतदादा पाटील कृषी मंत्री यांचे हस्ते पुण्यात प्रदान करण्यात आला . दादांनी त्यांचे कार्याची खास दखल घेत बीज बँक तात्काळ बांधून देणार असल्याचे व्यासपीठावरूनच जाहीर केले .आणि अवघ्या 45 दिवसात भव्य बीज बँक आणि घर त्यांना बांधूनही दिले .त्याचा हस्तांतरण सोहळा तीन मार्च 2019 रोजी कोंभाळणे येथे माननीय चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .या प्रसंगी जिल्याचे पालकमंत्री श्री.राम शिंदेही हजर होते .राहीबाईंनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री .अचुतानंद द्विवेदी यांनी एक लघुपट त्यांच्या कार्यावर आधारित तयार केला . त्या लघुपटाला वर्ष 2019 मधील फ्रान्स येथे झालेल्या कांन्स चित्रपट महोत्सवात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक भेटले आहे .देशपातळीवर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा महिला व बाल कल्याण विभागाचा वर्ष 2018 चा नारी शक्ती पुरस्कार माननीय राष्ट्पती श्री . रामनाथ कोविंद यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे. झी मीडियाचा उंचा माझा झोका या पुरस्कारनेही त्या नुकत्याच सन्मानित झाल्या आहेत .महाराष्ट्रातील तूफान गाजलेला विनोदी कार्यक्रम चला हवा येउद्यानेही त्यांना मंचावर निमंत्रित केले होते. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कारहि जाहीर झाला आहे.वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईचा संदर्भ आणि माहिती विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी घेण्यात आली आहे.जगातील सर्वात सुंदर स्त्री होण्याचा मान मिळवलेल्या युक्ता मुखी यांनी राहीबाईंकडून आहार विषयी सखोल माहिती घेतली . रयत शिक्षण संस्थेचा देशपातळीवर दिला जाणारा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार( अडीच लाख रुपये) नुकताच त्यांना नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तसेच पी. के .आण्णा पाटील फाउंडेशन तालुका - शहादा जिल्हा नंदुरबार येथे एक लाख रुपयाचा पुरस्कार त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. ,नुकताच त्यांना 8 नोव्हेंबर 2021 रोजी मानाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा , भारत सरकार कडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात झाला आहे . मसूरी , उत्तराखण्ड येथे असलेल्या लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी भारत सरकार यांच्या माध्यमाने सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या फेस वन मधील प्रशिक्षणासाठी पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचा कृषी क्षेत्रातील असलेला अनुभव नव्यानेच निवडण्यात आलेल्या व अमृत महोत्सवी बॅचचे 183 आयएएस अधिकाऱ्यांना माहिती करून देण्यासाठी किसान सामवेद अंतर्गत या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या यबीजमाता म्हणून ग्रामीम आणि आदिवासी भागात त्या प्रसिद्ध आहेत आणि हाजारो कष्टकरी ,गरीब लोकांना, शेतकरी कुटुंबाना त्या प्रेरणास्थान बनून राहिल्या आहेत .गावोगावी जशा पैशाच्या बँका आहेत तशाच गावरान बियाणे बँका तयार झाल्या पाहिजेत हे त्यांचे लक्ष आहे .गावरान बियाणे संवर्धन आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन प्रचार प्रसार व प्रत्यक्ष कार्यक्रम यावर भर दिला जाईल. शाळा , कॉलेजे , विद्यालये हे सुध्दा या कार्यक्रमाचा भाग असणार आहे.येत्या काही काळात शाळेतील मुलांना गावरान बियाणे संवर्धन आणि प्रसार व शेतीत त्यांना यशस्वी यावर परिपूर्ण माहिती देण्याचा एक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.त्यासाठी बायफ संस्था , शासन , विविध विकास यंत्रणा व संशोधन केंद्र यांना सामावून घेत कार्यक्रम केला जाणार आहे. जास्तीत जास्त हा विषय शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणे हा जीवनाचा भाग असेल असे त्या आवर्जून सांगतात .

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...