लॅपटॉप, पोल्ट्री, घरघंटीच्या आमिषातून फसवणुकीचे आरोप
योगेश भांगरेविरोधात राजूर पोलिसांकडे सहा-सात तक्रारी; सुमारे २५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप
अकोले, ता. २९ : लॅपटॉप, पोल्ट्री व्यवसाय, घरघंटी, झेरॉक्स मशीन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ऑनलाइन पैसे घेतल्याच्या आरोपावरून एकदरा येथील लोकनियुक्त सरपंच योगेश उर्फ रामा भिवा भांगरे याच्याविरुद्ध राजूर पोलिस ठाण्यात यापूर्वी सहा-सात तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारींमध्ये विविध व्यक्तींकडून मिळून सुमारे २५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील आदिवासीबहुल एकदरा गावातील योगेश भांगरे याच्याकडून अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, आरोग्य कर्मचारी, पोस्टमन, किराणा दुकानदार, शेतकरी, महिला, डॉक्टर, पोलिस कर्मचारी, सरपंच-सदस्य, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि प्राचार्यांसह अकोले, इगतपुरी, सिन्नर, ठाणे परिसरातील व्यक्तींना विविध आमिषे दाखवून ऑनलाइन पैसे पाठविण्यास सांगितल्याच्या तक्रारी आहेत.
तक्रारीनुसार, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, घरघंटी, पोल्ट्री फार्म आदी वस्तू कमी किमतीत मिळवून देण्याचे तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे सांगितले जात होते. पैसे पाठविण्यासाठी डोंबिवली येथील नेहा गुप्ता व प्रमोद गरुड यांच्या नावाच्या क्यूआर कोडचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीशी नातेवाईक, सरपंच किंवा परिचित असल्याने नागरिकांनी विश्वास ठेवून पैसे पाठविल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, पैसे मिळाल्यानंतर संपर्क होत नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मुख्याध्यापकाची ३० हजारांची तक्रार
दरम्यान, अकोले,राजूर येथील २ मुख्याध्यापकांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समोर आले आहे. योगेश भांगरे याने आपण माजी सरपंच तसेच संबंधित शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे सांगितले. सरपंच परिषदेच्या माध्यमातून लॅपटॉप घेण्यात येत असून, एका सरपंचाने लॅपटॉप न घेतल्याने तो लॅपटॉप शाळेला देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यासाठी १५ हजार रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगण्यात आले. भांगरे याच्या सांगण्यावरून संबंधित क्यूआर कोडवर १५ हजार रुपये पाठविण्यात आले. मात्र, पैसे भरल्यानंतर आश्वासन दिल्याप्रमाणे लॅपटॉप मिळाला नसल्याचा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे.
दोन वर्षांपासून गावाबाहेर असल्याची माहिती
योगेश भांगरे हा एकदरा येथील रहिवासी असून, मागील सुमारे दोन वर्षांपासून तो गावात वास्तव्यास नसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्याचे आई-वडील व अपंग भाऊ गावात राहत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पोलिसांनी विविध तक्रारींच्या पार्श्वभूमीवर त्याचा सध्याचा ठावठिकाणा शोधून काढावा, अशी मागणी होत आहे.
या प्रकरणातील व्यवहार ऑनलाइन असल्याने संबंधित बँक खाती, यूपीआय व्यवहार, क्यूआर कोड, मोबाइल क्रमांक तसेच पैशांच्या व्यवहाराची पुढील साखळी तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या खात्यावर रक्कम जमा झाली, त्या खात्यातून पुढे ती कोणत्या खात्यावर किंवा व्यक्तीकडे वळविण्यात आली, याचा तपास केल्यास प्रकरणाचा अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.
ग्रामपंचायतीच्या कामांवरही परिणाम
दरम्यान, योगेश भांगरे गेल्या सुमारे दोन वर्षांपासून गावाबाहेर असल्याने एकदरा ग्रामपंचायतीच्या कामकाजावरही परिणाम होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. ग्रामपंचायतीचा निधी वेळेत खर्च न झाल्यास विकासकामे रखडण्याबरोबरच निधी शासनाच्या तिजोरीत परत जाण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन करण्याची तयारी ग्रामस्थांनी सुरू केली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
योगेश भांगरे याच्याविरुद्ध यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारी आणि सध्याची तक्रार यांचा परस्पर संबंध आहे का, प्रत्यक्षात किती रकमेचे व्यवहार झाले, या व्यवहारांमध्ये अन्य व्यक्तींचा सहभाग आहे का, तसेच संबंधित क्यूआर कोड व बँक खात्यांचा वापर नेमका कोणाकडून करण्यात आला, याचा तपास होणे अपेक्षित आहे.
राजूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, वरील सर्व आरोप तक्रारींवर आधारित असून त्यांची सत्यता पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. योगेश भांगरे याच्याविरुद्ध दोष सिद्ध झालेला नाही.सहायक पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी तक्रार दाखल करून कसून चौकशी सुरू केली असून फसवणूक झालेल्या व्यक्तींनी संपर्क साधण्याचा आव्हान केले आहे
No comments:
Post a Comment