🌿 *चिल्हेवाडी धरणातील दर्याबाई माता दर्शन* 🌿
निसर्गाच्या कुशीत, कातळाच्या कुशीत वसलेले श्रद्धास्थान!
जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी धरणाच्या परिसरात, आदिवासी दुर्गम भागातील कातळाच्या कुशीत आणि उंच कडेकपारीत वसलेले दर्याबाई मातेचे स्थान म्हणजे श्रद्धा, निसर्गसौंदर्य आणि भौगोलिक अद्भुततेचा एक अनोखा संगम आहे.
हे ठिकाण म्हणजे निसर्गाने स्वतःच्या हातांनी घडविलेली एक अप्रतिम कलाकृतीच! उंचच उंच कातळकडे, नैसर्गिक भिंतींसारखी भासणारी डोंगररचना, खोल घळी आणि त्यातून निर्माण झालेले निसर्गाचे अद्भुत रूप पाहताना मन अक्षरशः थक्क होते.
मुथाळणे घाट चढून मुथाळणे गावातून पुढे येसरठाव धरणाच्या दिशेने प्रवास करत आपण जेव्हा खोल दरीत उतरू लागतो, तेव्हा वाटेत आडवी येते ती मांडवी नदी. याच मांडवी नदीवर चिल्हेवाडी धरणाची निर्मिती करण्यात आली आहे.
चिल्हेवाडी धरणाच्या पश्चिमेकडे, जिथे धरणाचे बॅकवॉटर संपते, तिथे निसर्गाने निर्माण केलेली एक सुंदर नैसर्गिक घळ पाहायला मिळते. याच परिसरात दर्याबाई मातेचे हे प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान वसलेले आहे.
या ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे पाहायला मिळणारे नैसर्गिक रांजणखळगे! पाण्याच्या प्रवाहामुळे हजारो वर्षांच्या कालखंडात कातळावर निर्माण झालेल्या या नैसर्गिक रचना म्हणजे भूगर्भशास्त्रीय प्रक्रियेचा एक विलक्षण आविष्कार आहे. निसर्गप्रेमी आणि भौगोलिक रचनांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक पर्वणीच!
एका बाजूला निसर्गाने घडविलेली भव्य कातळरचना, दुसऱ्या बाजूला मांडवी नदीचे पात्र, सभोवताली डोंगरदऱ्यांचे विहंगम सौंदर्य आणि या सर्वांच्या सान्निध्यात विराजमान झालेली दर्याबाई माता... हे सारे अनुभवताना मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि समाधान लाभते.
खरंच, जुन्नर तालुक्याच्या दुर्गम भागात निसर्गाने जपून ठेवलेला हा अनमोल ठेवा आहे. अशा ठिकाणांना भेट देताना केवळ पर्यटनाचा आनंद न घेता त्यांचे नैसर्गिक सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय संपन्नता जपण्याची जबाबदारीही आपण स्वीकारली पाहिजे.
निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार अनुभवावा, त्याचे सौंदर्य मनात साठवावे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी तो जतन करावा.
🌳 निसर्ग जपूया, निसर्ग समजून घेऊया!
✍️ रमेश खरमाळे
माजी सैनिक
🌿 जय पर्यावरण! 🌿
No comments:
Post a Comment