Saturday, December 2, 2017

सह्याद्रीनवल ..... सांदण दरी

सह्याद्रीनवल ..... सांदण दरी

Submitted by रोहित ..एक मावळा on 20 August, 2011 - 10:03
राकट .. कणखर सह्याद्री ...
आसमंताला भिडलेल्या उंचच उंच शिखरांचा सह्याद्री .....
खोलच खोल दर्‍या-खोर्‍यांचा सह्याद्री ...
काळजाचा ठोका चुकविणार्‍या कोकणकडांचा सह्याद्री...
निसर्गसंपत्तीने नटलेला सह्याद्री.....
सह्याद्री
... बस्स नावात सगळ सामावलेल आहे.
अशा या आपल्या लाडक्या सह्याद्रीत अनेक रत्न दडलेयत.आपल्या सारख्या भटक्यांची पारखी नजर त्याच्यावर आहे.पण ही संपदा आपल्याला चोरायची नाही.तर त्यातुन फक्त निसर्गानुभव घ्यायचा.वार्‍याची गाज कानात भरुन घ्यायची.ढगांशी खेळायच.पाऊस प्यायचा.डोंगर,किल्ले यांचाशी गप्पा मारायच्या.आपल्या पुर्वजांच्या पाऊलखुणा शोधायच्या. असा हा अनमोल खजिना काळजाच्या कप्प्यात जतन करुन ठेवायचा.
आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या ,निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते.
असच एक सह्याद्रीनवल म्हणजे सांदण दरी.....
एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे.
सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि जवळ-जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे.पावसळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते.कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळत.त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा.दरीतील ऊन-सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात.पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो.हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते.

सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते.मुंबईपासुन जवळ-जवळ २०० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा महामार्ग पकडायचा.कल्याण-शहापुर-कसारा घाट -घोटी - भंडारदरा(शेंडी) -पांजरे-उधवने- घाटगर डॅम मार्गे मजल दरमजल करत आपण साम्रद गावात पोहोचतो.
मायोबोलीकर मावळ्यांसोबत जुन महिन्यात सांदण दरी अनुभवुन आलो.त्याचा सविस्तर वृतांत यो-रॉक्स ने सांदण दरी येथे दिला आहे.
प्रकाशचित्रांच्या माध्यमातुन सांदण दरीची सफर घडवुन आणण्याचा हा छोटासा प्रयत्न ......
चला तर मग एका अनोख्या सफरीवर.....
सांदन दरीला जाण्यासाठी आम्ही मायबोलीकरांनी ४ जुनच्या रात्री आमच्या लक्ष्याकडे रथातुन (तीन गाड्या ) कुच केले.कसारा घाटात पावसामुळे पसरलेल्या धुक्यांनी छान सलामी दिली होती.नंतर घोटीतुन पुढे भंडारदर्‍याच्या रस्त्याला लागलो.शेंडी गाव येण्याआधी M.T.D.C चे रिसॉर्ट लागते.तेथुन उजवीकडे उधवणे गावाला आम्ही वळलो.या वळणावर काजव्यांचा अनोखा लाईटींग शो बघितला. अस वाटत होत की जणु आकाशातल्या लुकलुकणार्‍या चांदण्या खाली उतरल्या होत्या.पुढे याच रस्त्याने जाताना दाट जंगल लागले."कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य" या नावाने हे जंगल बिबट्यांसाठी प्रसिद्ध आहे.या जंगलातुन जात असताना आजुबाजुला असलेली दाट झाडी अन त्यातुन वाट काढणारा निरव रस्ता एक वेगळीच अनुभुती देऊन जातो.भंडारदरा बॅकवाटर च्या काठाने पुढे वळणावळणाच्या रस्त्याने घाटघरला पोहोचलो अन तेथुन पुढे साम्रद गावात नवी पहाट घेऊन आलो.
रात्रीचा पाऊस पडुन गेला होता.पहाटेच कुंद वातावरण पसरल होत.तीस-चाळीस उंबर्‍याच छोटस साम्रद गाव हळुहळु जाग होत होत.येथुन दिसनारा नजारा म्हणजे आपल्या सारख्या भटक्या लोकांसाठी एक पर्वणीच असते.कारण समोरच एका बाजुला डौलाने उभ्या असलेल्या अन नेहमी आपल्याला आव्हान देणार्‍या अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगा पाहुन डोळ्याचे पारणे फिटते.तर दुसर्‍या बाजुला रतनगड,आजोबा गड उभे ठाकलेले दिसतात.
साम्रद गावाच्या बाजुला मोठ खडकाळ माळरान पसरलेल होत.तेथेच आमचे रथ स्थानापन्न केले.
पहाटेच मंत्रमुग्ध वातावरण अन चारी बाजुला पसरलेला निसर्ग डोळ्यात साठवुन घेत होतो.
पावसाचे काही ढग रात्रीच्या निळाईत रंगुन गेले होते तर काही ढग त्या शिखरांशी लगट करण्याचा प्रयत्न करताना दिसले.
क्षितिजावर हळुहळु पिवळसर छटा उमटु लागल्या होत्या.
याच त्या विशाल गगनाला भिडलेल्या अलंग-मदन-कुलंग अन कळसुबाई रांगा ...
या सह्याशिखराच्या कुशीत काही ढग विसावलेले होते.
त्या माळरानाच्या बाजुला हि छोटीशी टेकडीसुद्धा दिसली.
शिपनुर टेकडी ...
सुर्याच्या कोवळ्या सोनेरी किरणांनी सृष्टीला हळुहळु रंगवायला सुरुवात केली.
कोवळ्या किरणांनी आमच्यात अनोखा जोश भरला.रात्रीची मरगळ निघुन गेली.मग काय ...
त्या किरणांना मुठीत पकडायला मायबोलीकरांचा उडी-उडीचा खेळ रंगला.
उड्या मारुन झाल्यानंतर आता पोटाकडे मोर्चा वळविला.गावातल्या दत्ताच्या घराकडे आम्ही वळलो.दता भांगरे च्या घरी नाश्त्याची अन जेवणाची सोय केली होती.मस्तपैकी चहा-पोह्याची भर पोटात टाकली.
साम्रद गावातील एक घर ...
या भागात जवळपास सगळी अशीच घरे पहावयास मिळतात.
ठेंगणी,कौलारु, शेणाने सारविलेल्या कुडाच्या भिंती ....
सुर्य बर्‍यापैकी वरती आला होता.पिवळ्या छटांनी सारा आसमंत भारून टाकला.
मग सांदण दरीला जायला आम्ही मावळ्यांनी कुच केले.
दरीत जाण्यासाठी गावापासुन वीस मिनिटे चालत जावे लागले.दरी अशी वरतुन दिसुन येत नाही.कारण दरीच्या आसपास खुप झाडी पसरलेली होती.या झाडीतुन जात असताना एका सापाने दर्शन दिले.पण आम्हाला भाव न देता तो पटकन निघुन गेला.त्या झाडीतुन पुढे गेल्यावर पाण्याची एक वाट दिसली.त्या वाटेवर दगडधोंड्याच साम्राज्य होत.दगडी खडकाळ वाट पायदळी तुडवत आम्ही दरीच्या तोंडापाशी येऊन उभे ठाकलो.
सांदण दरीच्या तोंडापाशी पाण्याच्या एका वाटेवर सुर्यकिरणांचा अनोखा पिसारा फुललेला दिसला.
दगडधोंड्यानी भरलेली अद्भुत अशी निसर्गनवल सांदण दरीत आम्ही पाऊल ठेवत होतो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती.धरतीच्या पोटात आम्ही शिरकाव करणार होते.दरीत दोन्ही बाजुला पसरलेल्या कातळकडा आम्हाला भेटायला आतुर झाल्या होत्या.
माकडउड्या मारत आमचा प्रवास सुरु झाला.
या कातळकडा पाहुन अचंबा वाटत होता.
दरीतुन वरती दिसणारे हे आकाश .....
थोड्या वेळ चालल्यानंतर पहिला पुल लागला.नुकताच उन्हाळा संपुन पावसाळा सुरु झाला होता म्हणुन या पुलात पाणी खुप कमी होत.
तरीपण त्या पाण्यात पाय न भिजवता कातळाच्या कपारीला पकडुन कडेकडेने तो टप्पा आम्ही पार केला.
पुढे थोड चालल्यानंतर काही ढग आमची खोडी काढायला दरीत उतरले.
धुक्क्यात हरविलेली दरी....
मागे वळून बघितले तर ...
वरच आकाशसुद्धा दिसत नव्हत..
पण त्या धुक्यातल्या पावसाच्या स्पर्शाने अंगावर रोंमाच उभा राहिला.
धुक्यातुन चालत आता आम्ही दुसर्‍या पुलापाशी पोहोचलो.
दुसरा पुल कसोटी पाहणारा ....
खरच येथे पाणी किती असेल काही कल्पना नव्हती.पाण्याचा अंदाज घ्यायला बाजीराव अवि पुढे गेला अन त्याच्या मागोमाग मी त्या पाण्यात उतरलो.आपसुकच कॅमेरा बॅगरुपी पेटार्‍यात बंद झाला.पाणी चांगलच थंडगार होत.दोन्ही बाजुच्या कातळभिंतीत तीन ते चार फुट अंतर असलेली ही जागा थोडी खोलगट होती.पायाखाली दगडसुद्धा लागत होती.त्यामुळे अंदाज घेत आम्ही पुढे सरकत होते.आधी गुढघाभर.... पुढे कमरे एव्हढे .... अन एका ठिकाणी तर छातीएव्हढे पाणी लागले.मग दोरीच्या साहाय्याने एक-एक करत सगळ्यांनी तो पॅच पार केला.(याचे फोटो यो च्या वृतांतात पाहिले असतीलच)
हा पॅच पार करत असताना ठक्क करत दरीत आवाज झाला.धुक्यामुळे वरती काही दिसत नव्हत.त्यामुळे नक्की कशाचा आवाज झाला कळले नाही.
कातळातुन पावसाचे थेंब नितळत होते.पावसाचे ते तुषार पिऊन मन तृप्त झाल.
दगडाळ वाटेवरुन पुढे कुच केले.
सह्याद्रीच्या या रुपापुढे फक्त नतमस्तक व्हायच....
ढग बाजुला सरले अन धुक कमी झाल.दरीच्या सुरुवातीला दिसणारे मोठे आकाश
नंतर निमुळत झाल..

जिथे नजर जाईल तेथे कातळच...
शेवटी एकदाचे आम्ही दरीच्या दुसर्‍या टोकापाशी पोहोचलो.
मायोबोलीकर दिसतात का बघा ?
नाही दिसले ... जरा जवळुन बघा..
त्या दगडावरती कसे पहुडलेत...
येथे थोड खाली एक छोटासा रॉक पॅच उतरुन जाव लागत.
सांदण दरीपर्यंतचा ट्रेक हा येथेच संपतो.येथुन खाली उतरायला तीन मोठे रॉक पॅचेस पार करुन खाली उतराव लागत.५०,७ अन १५ फुटाचे अवघड रॉक पॅचेस रॅपलिंग करुन उतरावे लागतात.ही वाट हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेसारखी आहे.
या नळीच्या वाटेने खाली उतरुन तुम्ही कोकणात उतरु शकता.ही वाट पुढे आजोबा गडाच्या पायथ्याशी असलेल्या डेहणे गावापाशी घेऊन जाते.तेथुन आसनगावला जाता येते.नाहीतर पुन्हा सांदण दरीच्या पायथ्यापासुन करोली घाटातुन ट्रेक करत साम्रद गावापाशी येता येत.अट्टल ट्रेकर्स सांदण दरी - करोली घाट असा ट्रेक करतात.
आम्ही आणलेल्या शिदोरीतला खाऊ पोटात सरकविला.अन या रांगड्या निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ हरवुन गेलो.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...