Monday, April 27, 2020

सुकी मासळी व्यावसायिकही चिंताग्रस्त

यंदाच्या वर्षी करोना संकटामुळे मासळी पकडण्यासाठी मच्छीमारांच्या बोटी समुद्रात जाऊ  न शकल्याने ओल्या मासळी विक्रेत्यांसोबतच सुक्या मासळीची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर देखील संक्रांत आली आहे. ऐन हंगामात सर्व काही बंद असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरवर्षी ऑक्टोबरपासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मासळी सुकविण्यास सुरुवात होते. यामध्ये बोंबील, करंदी, मांदेली, वागटी, जवळा ही सुकविलेली मासळी ही फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान विविध ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी जाते. या हंगामात या मासळी खरेदीसाठीही नागरिकांची  मोठी मागणी असते. त्यामुळे या बांधवांना या विक्रीतून चांगली कमाई होत असते.  यावर्षी मासळीचे प्रमाण कमी आहे. कारण याआधी चक्रीवादळ व अवकाळी पाऊस यामुळे किनाऱ्यावर सुकविण्यासाठी ठेवण्यात आलेली मासळी भिजून गेल्याने खराब झाली होती. त्यानंतर पुन्हा या बांधवांनी अवघ्या काही दिवसांतच मासळी सुकवून विक्रीसाठी तयार के ली. परंतु  करोनामुळे त्यावरही पाणी सोडावे लागले आहे. सुक्या मासळीची विक्री आगाशी, अर्नाळा, मांडवी, विरार, पापडी, नायगाव, जूचंद्र अशा विविध ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी जाते मागील दोन महिन्यांपासून बाजारही बंद असल्याने किरकोळ विक्री करणारेही अडचणीत सापडले आहेत
संकटचक्र सुरूच
मच्छीमार बांधवांवर मागील तीन वर्षांपासून विविध प्रकारची संकटे सुरूच आहेत. याआधी तीन वर्षांपूर्वी ओखी वादळ आले होते त्यावेळी सुक्या मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर चक्रीवादळ व यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस अशा विविध प्रकारच्या वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना करून त्यातून सावरत नाही तोवर करोना विषाणूचे संकट उभे राहिले आहे त्यामुळे एकापाठोपाठ एक संकट उभे राहत असल्याने या बांधवांवरील संकटाचे चक्र सुरूच आहे.
खवय्यांचीही निराशा
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खवय्ये मंडळी विविध ठिकाणच्या  बाजारातून सुकी मासळीची खरेदी करतात. खरेदी केलेली सुकी मच्छी पावसाळ्यातील वापरासाठी बरणीत भरून त्याची साठवणूक करतात जशी चव येईल त्याप्रमाणे बोंबलाचे कालवण, झुणका, आंबट, आचार असे विविध प्रकारचे पदार्थ तयार केले जातात मात्र यंदाच्या वर्षी करोनामुळे बहुतेक ठिकाणचे सुक्या मासळी विक्रीचे  बाजारच बंद असल्याने सुकी मासळी मिळत नसल्याने खवय्ये मंडळींचीही निराशा झाली आहे .
यंदाच्या वर्षी अवकाळी पाऊस व त्यानंतर आता करोनाचे संकट यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडूनही कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यामुळे आम्ही कशा प्रकारे जगायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे
– वासंती मेहेर, सुकी मासळी विक्रेत्या व व्यावसायिक

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...