Wednesday, April 29, 2020

विणीच्या हंगामात कोकीळ एक ते दोन अंडी दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालतात आणि अंड्यांच्या संख्येतला फरक आढळू नये म्हणून दुसऱ्या पक्ष्याची अंडी खाली फेकून देतात. उदाहरणार्थ, ‘कु हू कु हू’ ओरडणारा एशियन कोयल हा कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी ठेवतो, जसे पिल्लू मोठे होते, तसे मोठ्या चतुराईने या पिल्लाला आपल्या कळपात आणून त्याच्यावर कोकिळा संस्कार करते. अशाच पद्धतीने पिल्लू मोठे झाल्यावर त्याला कळपात घेतात. पावसाळा जसा संपत येतो तसे पुन्हा परतीच्या वाटेवर जातात.

आंब्याला मोहोर येण्याच्या काळात वसंताच्या आगमनापासून ऐकू येणारा 'कुहूsकुहू' पुढे ऑगस्ट-सप्टेंबरच्या अखेरीस ग्रीष्मातही तसाच आवाज ऐकू येतो. कुहू अशी साद ऐकू आली की 'कोकिळेला कंठ फुटला म्हणायचा' असे बऱ्याच जणांच्या तोंडून सहज उद्गार निघतात.
खरतर कोकीळा कधीच सुंदर आणि गोड गात नाही किंवा ‘कुहूकुहू’ आवाज करीत नाही. मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. बऱ्याच जणांना माहीत नसते की पंचमातील साद कोकिळेची नसून कोकीळ नर पक्ष्याची आहे. असे बघण्यात आले आहे की चिमण्या व इतर पक्षी पहाटे जशी चिवचिवाट करतात किंवा एकसुरात विशिष्ठ आवाज करत एकमेकांशी संवाद सादत असतात तसे कोकीळ पक्षी समूहाने करीत नाहीत तसेच इतर पक्षांच्या मनानी कोकीळ पक्षाचा आवाज खूपच मोठा असतो साधारण अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळ व्यापले जाते. आपल्याला काही सांगायचे असेल तर त्यासाठी स्पीकर लागतो. कोकीळ नर पक्षाच्या आवाजाचा चढ उतार राग, प्रेम, आणि बऱ्याच गोष्टी सांगून जाते. ‘या मधुर आवाजाने अनेक कवी व लेखकांच्या साहित्यात कोकिळेने महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. पण बिचारा कोकीळ 'कुहू कुहू' असे वारंवार ओरडत राहून त्याचा गळा सुजला तरी त्याच्याकडे कुणाचे लक्षच नसते ही गोष्ट अधोरेखित करण्यासारखी आहे.

परमेश्वराने जीवांची निर्मिती करताना प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूत तसेच वनस्पती, पक्षी आणि प्राणीमात्रात काहीना काही वैशिठ्ये मुद्दामुनच ठेवली आहेत जसे आवाज, आकार, रंग, दिसणे आणि त्यापाठी काहीतरी कारण असलेच पाहिजे. असो.
विविध पक्षांची किलबिल पहाटेच्या शांतवेळी सगळ्यांनी ऐकली असेल. आपण जंगलात भटकंतीला गेलो असता, किंवा परसदारी आपण नेहमी विविध तऱ्हेच्या पक्षांनी काढलेल्या वेगवेगळ्या आवाजाने त्यांच्या मित्र मैत्रिणींना घातलेल्या सादेने, कधी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून शत्रू पासून सावध करण्यासाठी काढलेल्या विविध आवाजाने मन अचंबित होते आणि हे बघण्यात आणि ऐकण्यात खूप मजा वाटे !

कोकीळा पक्षी कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो आणि ती उबविण्याची जबाबदारी सोपवितो. कावळा त्याच्या घरट्याकडे कोणासही फिरकू देत नाही. तो त्याच्या घरट्याचे जीवापाड रक्षण करीत असतो. कावळा आणि कोकीळा या दोन पक्षात मोठे वैर आहे. कोकीळ पक्षी कधीच घरटी बांधत नाहीत ते कावळ्याच्या घरात अंडी घालतात आणि ती उबविण्याची जबाबदारीही कावळ्याकडे सोपवितात. अंडी दुसर्‍याच्या घरट्यात घालणे, ती न उबवणे, पिल्ले झाली कि त्यांना चारा पाणी न देणारा हा पक्षी जो फक्त अंडी घालतो आणि पिल्लांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबादारी कावळ्यावर सोपवतो. वसंत ॠतूत कुहू कुहू गाणारा हा पक्षी आंबा, आणि बाभळीच्या दाट झाडीत जास्त प्रमाणात आढळतो.

कोकीळ मादी बहुदा कावळयाचं घरटं अंडी घालण्यासाठी शोधत असते. कोकीळ नर व मादी ऐतोबा आहेत. बहुतेक सर्व पक्षी आपल्या कुवतीनुसार सुबक वा ओबडधोबड घरटं तयार करतात. पण कोकीळ नर मादींना 'असावे घरकुल आपले छान' ही कवी कल्पना वाटत असावी. मूर्ख लोक घरं बांधतात यावर त्यांचा विश्वास असतो. घरटं बांधलं नाही तरी यथाकाल अंडी देण्याची वेळ येते मग कावळीच्या नकळत तिथे कोकीळ मादी अंडी घालते. कावळी मादी ती अंडी उबवते. बाहेर आलेल्या पिलांना भरवते. ही पिले उडून जाईपर्यंत तिला त्याचा थांगच लागत नाही. तसे बघता पक्षात धूर्त आणि चतुर ‘कावळा’ पक्षी असावा पण येथे अपवाद आढळतो.

नर कोकीळ कावळयासारखाच काळा कुळकुळीत पण जरा सडपातळ आणि डौलदार दिसतो. महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे त्याचा लाल डोळा. जसा माणिक लाल रंगाचा असतो तसा त्याचा भास होतो. मादी कोकीळ हा वेगळाच पक्षी आहे इतपत वेगळी वाटते. नर नखशिखांत काळा, मादी मात्र फिकट राखी रंगावर त्याच गडद रंगानं खडी काढावी अशी. नराची नजर गरीब तर तिची कावेबाज. तिच्या अप्पलपोटया स्वभावाचे दर्शन बऱ्याच जणांना अनेकदा घडले असेल.
दर १८ वर्षांनी 'कोकीळा व्रताचा' महिना येतो त्यावेळी कोकीळेचे दर्शन झाल्याशिवाय किंवा आवाज ऐकल्याशिवाय भाविक महिला अन्नग्रहण करीत नाहीत. त्यावेळी अनेक कोकिळ नरांना लोकांकडून बंदीवास धडवला जातो याकडे पक्षी मित्रांनी काळजी घ्यावयास पाहिजे.

हिवाळ्याची सुरूवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यागत वाटतो. कोकिळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकिळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. कोकिळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो. कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध हे यांचे आवडते खाद्य आहे.
ध्य भारतापासून थरच्या वाळवंटापर्यंतच्या भूभागाने संपूर्ण उन्हाळाभर कडक ऊन सहन केलेले असते. त्याचीच परिणती म्हणून भारतीय उपखंडावर कमी दाबाचा पट्टा तयार होतो. हवेच्या दाबातली ही दरी भरून काढण्यासाठी हिंदी महासागरावरून दमट वारे केरळमार्गे आपल्या दिशेने धावत सुटतात आणि हिमालयाच्या छातीवर आढळतात. वाऱ्यांच्या या प्रवासातूनच पाऊस पडतो.
पुढचे चार महिने सजीवसृष्टीच्या जल्लोषाचे, उत्सवाचे असतात. झाडे, फुले, लता, वेली, कीटक, पशू-पक्षी सारे सारे अतिशय उत्साहात असतात, लगबगीत असतात. हाच बहुतेक पक्ष्यांच्या विणीचा हंगाम असतो. कोकिळा, चातक, पावशा हे सारे कोकिळेच्या जातकुळातले पक्षी बाकीच्या कष्टकरी पक्ष्यांच्या घरटी बनवण्याच्या प्रगतीकडे लक्ष ठेवून असतात आणि कष्टकरी पक्ष्यांचे लक्ष नाही ना, हे पाहून संधी साधतात. त्यांच्या घरटय़ात आपले अंडे घालतात. अशी संधी काही कोकीळकुलोत्पन्नांना सहजासहजी मिळत नाही. अशा वेळी निसर्गाने या पक्ष्यांना एक दैवी देणगी दिली आहे. कोकीळ पक्षी संपूर्ण तयार झालेले अंडे स्वत:च्या पोटातच ठेवू शकतो व जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा ते अंडे घालतात. थोडक्यात, अंडी घालण्याची वेळ ही कोकीळ पक्ष्यांच्या स्वत:च्या नियंत्रणात असते.
या सगळ्या कोकिळेच्या जातींसोबत ‘कारुण्य कोकिळा’ नावाचा अजून एक पक्षीही पावसाळ्यात ठाणे, कोकण परिसरात येतो. मात्र कोकिळेच्या इतर जातीपेक्षा कारुण्य कोकिळा ही आकाराने फारच लहानखुरी असते. तिचा आकार साधारणत: साळुंकीएवढा असतो.
वटवटय़ा, शिंपी, शिंजीर यांसारख्या छोटय़ा पक्ष्यांच्या घरटय़ात कारुण्य कोकिळा आपले अंडे टाकतात. अनेकदा हे छोटे पक्षी स्वत:च्या आकारापेक्षा मोठय़ा झालेल्या कारुण्य कोकिळेच्या पिलांचे संगोपन करताना दिसतात.
जंगले, डोंगर-उतारावरील वनराई, बागायतींमध्ये पावसाळ्यात या पक्ष्यांचा वावर असतो. हे पक्षी वर्षभर गात नाहीत तर फक्त पावसाळ्यातच गातात. सध्या या पक्ष्याचा ‘पी पिप पी पी’ असा सततचा मोठ्ठा आवाज ऐकायला मिळतो. जंगलात आवाज जरी सतत येत असला तरी लाजाळू स्वभावामुळे या पक्ष्याचे दर्शन होणे तसे दुर्लभच असते.
छोटी चोच, लाल डोळे, राखी रंगाची पाठ, उडताना दिसणारे पंखावरचे पांढरे ठिपके, लांब शेपटीवर आतील बाजूस पांढऱ्या पट्टय़ा तर बाहेरील बाजूवर पट्टय़ा नाहीत, असे याचे वर्णन करता येईल.




No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...