Tuesday, May 19, 2026

डोंगराची काळी मैना बाजारात

अकोले, ता. १९ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या रानमेव्याची चाहूल लागली असून डोंगरची ‘काळी मैना’ म्हणून ओळख असलेल्या करवंदांनी राजूर परिसरातील बाजारपेठ गजबजू लागली आहे. रंधा, माळेगाव, घाटघर, शिंगणवाडी, रतनवाडी आदी डोंगराळ भागातील करवंदांच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी लगडल्या असून उन्हाळ्यातील हा आंबट-गोड रानमेवा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एप्रिल-मे महिन्यात करवंदांचा हंगाम सुरू होतो. यंदा मात्र वैशाख सुरू होऊनही करवंदे उशिरा पिकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्राबाबत आदिवासी बांधवांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. काही जण यंदा पावसालाही उशीर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक आदिवासी मुले पहाटेपासून जंगलाची वाट धरत आहेत. पाटीभर करवंदे गोळा करून राजूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला आहे. पळस किंवा चांद्याच्या पानांचे डोमे तयार करून राजूर बसस्थानक परिसरात ‘करवंद घ्या... करवंद...’ अशी हाक देत ही चिमुकली विक्री करताना दिसत आहेत. भंडारदरा, हरिश्चंद्रगड किंवा रंधा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांभोवतीही ही मुले गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एका डोम्याची किंमत पाच ते दहा रुपये असून दिवसभरात शंभर ते दीडशे रुपयांची विक्री होत असल्याचे मुलांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर नवीन वह्या, पुस्तके आणि गणवेश घेण्यासाठी हे पैसे उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही मुले घरखर्चाला हातभार लावण्यासाठीही करवंद विक्री करत आहेत. रंधा, माळेगाव, केळुंगण, घाटघर, शिंगणवाडी, मुरशेत, बारी, रतनवाडी, कोलटेंभे या भागात करवंदांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र या रानमेव्याला स्थानिक बाजारपेठेपलीकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही. राहाता, शिर्डी, राहुरी, कोल्हार, संगमनेर परिसरातील व्यापारी अल्प दराने करवंद खरेदी करत असल्याने आदिवासी बांधवांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. आदिवासी महामंडळाने करवंद खरेदीसाठी पुढाकार घेत योग्य हमीभाव दिल्यास आदिवासी भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत करवंद पोहोचल्यास ‘डोंगरची काळी मैना’ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, काही ठिकाणी डोंगरांना लागणाऱ्या आगीमुळे करवंदांच्या जाळ्या नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाने करवंदाच्या झाडांचे संवर्धन व संगोपनासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

मजुषा वाढदिवस

सहजीवनाची शिल्पकार प्रेमाचा झरा त्यागाची मूर्ती ममतेची सावली कर्तृत्ववान अर्धांगिनी संघर्षातील दीपस्तंभ आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा...