“माझे पाय मातीतच राहणार...”
पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत
अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे हे गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मात्र, या यशानंतरही “माझे पाय मातीतच राहणार,” असे ठामपणे सांगणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या मनात आजही आपल्या गावाविषयी तितकाच जिव्हाळा आहे. बीजमाता म्हणून देशभर ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय गाव, गावकरी आणि निसर्गाला देतात.
“माझं माहेर आणि सासर दोन्ही कोंभाळणेच. माझं संपूर्ण आयुष्य या गावात गेलं. गावातली माणसं आजही कोठेही गेली की अभिमानाने सांगतात, ‘आम्ही पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावचे आहोत.’ हीच माझी खरी कमाई आहे,” असे त्या सांगतात.
जंगलाच्या कुशीत वाढलेल्या राहीबाईंचं बालपण अत्यंत संघर्षमय होतं. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबात लहानपणीच आईचं छत्र हरपलं. वडिलांनीच आईची माया देत संसार आणि मुलांचा सांभाळ केला. “गरिबीने लाजू नये; चांगल्या कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही,” ही वडिलांची शिकवण आयुष्यभर सोबत राहिल्याचं त्या आवर्जून सांगतात.
अत्यंत हालअपेष्टांत बालपण गेले. जंगलातून सरपण गोळा करणे, मोळ्या विकणे, शेतीकाम, घरकाम या सगळ्या जबाबदाऱ्या लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आल्या. शिक्षणाचा गंधही नव्हता. देवळात भरायच्या शाळेतील एक प्रसंग त्या आजही विसरलेल्या नाहीत. “गुरुजींनी मारल्यामुळे मला शाळेची भीती वाटली आणि मी पुन्हा कधीच शाळेत गेले नाही,” असे सांगताना त्यांच्या आवाजात आजही वेदना जाणवतात.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. संसार, मुलं, शेती आणि संघर्ष यात आयुष्य पुढे सरकत राहिलं. “मुलांना पाठीवर बांधून शेतात काम केलं. गरिबीतही आम्ही आनंदाने जगलो,” असे त्या सांगतात. आजही त्या आपल्या संघर्षाकडे खंत म्हणून नव्हे, तर ताकद म्हणून पाहतात.
कोंभाळणे गावाची ओळख पूर्वी कुस्तीपटूंमुळे होती. गावातील अनेक पहिलवानांनी पंचक्रोशीत नाव कमावले. “त्यांनी गाव सोडलं नाही, याचाही अभिमान वाटतो,” असे त्या सांगतात. पुढे देशी बियाण्यांच्या जतनासाठी केलेल्या कार्यामुळे राहीबाईंची ओळख देशभर पोहोचली. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
मात्र, इतकी मोठी ओळख मिळूनही राहीबाईंची मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. “आम्ही जंगलचे राजे आहोत. यापेक्षा मोठी पदवी कोणती?” असे त्या अभिमानाने म्हणतात.
गाव बदलत असले तरी आदिवासी भागातील समस्या मात्र कायम असल्याची खंत त्या व्यक्त करतात. “दवाखाना आहे पण उपयोग नाही. पाणी आठ-आठ दिवस येत नाही. रस्त्यांची कामं वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत. लोक आजारी पडतात. आम्ही कसं जगायचं ते सरकारने सांगावं,” असा सवाल त्या करतात.
“देशात भव्य विकास होतोय, पण आदिवासी भागाकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. किमान प्राथमिक गरजा तरी पूर्ण करा आणि आम्हाला माणसासारखं जगू द्या,” अशी आर्त मागणी राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.
(शब्दांकन : शांताराम काळे)
No comments:
Post a Comment