Monday, July 3, 2017

घोड चूक July 3, 2017 09:37:54 PM नीलेश उजाळ 0 Comment श्याम, विश्वनाश आणि चिन्मय तिघे मित्र एकदा जंगलामध्ये जांभळं काढण्यासाठी गेले होते. मे महिना संपत आला होता आणि शाळा सुरु व्हायची वेळ जवळ आली होती. श्याम, विश्वनाथ आणि चिन्मय एकाच वर्गातले एकमेकांचे जिवलग मित्र होते. गावात त्यांची घरंही आजूबाजूलाच होती. शाळेत जाताना एकत्र, क्रिकेट खेळायला जाताना किंवा कुठे फिरायला जाताना हे तिघे नेहमी एकत्र असायचे. जांभळांचा बहर खूप जोमात आहे हे कळल्यावर, ते तिघे मित्र आपल्या गावाबाहेरील जंगलात जांभळं काढण्यासाठी भर दुपारी निघाले होते. सूर्य डोक्यावर थैय थैय नाचत होता आणि दुपार असल्याने वारयालाही जोर सुटला होता. तिघेही चालत असताना गप्पा गोष्टी करत एक-एक पाऊल पुढे टाकीत होते. “यार तुम्ही वह्या घेतल्यात का रे? मी तर सॅंडल, छत्री, वह्या आणि पुस्तके सारं सारं घेतलं परवाच” चिन्मय म्हणाला! त्यावर श्याम आणि विश्वनाथ एकदमच म्हणाले. होय.. ! जंगलातील मळकट वाटेवरून गप्पा गोष्टी करत करत तिघेही कधी जांभळाच्या झाडाखाली पोहचले हे त्यांना कळलेच नाही. आजूबाजूच्या सर्वच जांभळींवरील जांभळं संपून गेली होती आणि ज्या जांभळाच्या झाडावर भरपूर जांभळं दिसत होती ते झाड फार उंच होते. छोट्या छोट्या बाजूच्या झाडांवर श्याम अगदी शेंड्यापर्यंत चढायचा पण, हे झाड इतर झाडांपेक्षा फार मोठे असल्यामुळे श्यामला या झाडावर चढता येत नव्हते. श्याम झाडावर चढण्यात पटाईत होता तर, विश्वनाथ उत्तम नेमबाज होता आणि चिन्मय फक्त नेहमी या दोघांच्या सोबत जायचा त्यांना मदत म्हणून आणि जांभळं असो , आंबे असो वा इतर काही असो तो अगदी सारं छानपणे गोळा करायचा. एकाच झाडावर जांभळं आहेत आणि तेही फार उंचावर हे बघून तिघेही थोडे निराश झाले होते. पण पुढल्याच क्षणी विश्वनाथ म्हणाला, “अरे घाबरू नका. चढता नाही आले तर काय झाले ? मी नेम धरून घड च्या घड पडतो, तुम्ही फक्त टिपत राहा.” “अरे हा मस्त! चालेल तू पाड आम्ही टिपतो.” चिन्मय हसमुख चेहऱ्याने म्हणाला. “बरोबर चिन्या! आयला याचा नेम तरी कधी कामाला येणार”? चिन्मयला टाळी देत श्याम म्हणाला. विश्वनाथ दगडाने नेम धरून जांभळांचे घड च्या घड पाडत होता आणि चिन्मय व श्याम भरभर जांभळं गोळा करत होते. चिन्मय आणि श्यामच्या हातातील, आईकडून घेतलेल्या साखरेच्या छोट्या छोट्या पिशव्या आता जांभळांनी भरायला आल्या होत्या. विश्वनाथने दगड मारायचे आणि लगेच सरसर सरसर टिपटिप टिपटिप पडणारा जांभळांचा पाऊस बारकाईने आपल्या पिशवीत वेचून घ्यायचा असं खूप वेळ चालू होतं. दोघेही जांभळांच्या नादात एवढे दंग झाले होते की, विश्वनाथ कधी दगड मारतोय याचे त्यांना आता भानच उरले नव्हते. जांभळांच्या वेडापायी ते झाडाखालून हटलेच नव्हते. विश्वनाथच्या दगड मारण्याकडे आता त्यांचे मुळीच लक्ष नव्हते आणि ते झाडाखाली आहेत याचे विश्वनाथलाही भान नव्हते. तो दगडांवर दगड मारतच होता. एवढ्यात ठक्कन जोराचा आवाज झाला आणि चिन्मयला भिरभिरल्यासारखे झाले. दोन्ही हातांनी डोके दाबून तो विश्वनाथला जोराच्या शिव्या देऊ लागला. “आईईईई ग! फोडलंस साल्या!” चिन्मय जोराने ओरडला. विश्वनाथ आणि श्याम चिन्मय जवळ जाऊन बघतात तर काय? चिन्मयच्या डोक्यातून घळाघळा रक्त सांडत होते आणि चिन्मयचे सारे कपडे रक्ताने माखले होते. तो प्रकार पाहून तिघेही खूप घाबरून गेले. आता घरी काय सांगणार याच विचारात ते घराकडे घूम पळू लागले. विश्वनाथ मात्र सारखा चिन्मयला घरी नाव न सांगण्याची विनंती करत होता. मधूनच धावत धावता तिघे हसतही होते. झाडावर दगड मारल्यावर तो दगड खाली पडल्याची खात्री केल्याशिवाय झाडाखाली जाऊ नये याची नवी सीख त्यांना मिळाली होती. त्यात जांभळं आणायला जाताना चिन्मयच्या आज्जीने सांगितलेलेही त्यांना आठवले होते. “दगड बिगड मारू नुका हो जांबलीवर आनि चडू पन नुका, हातात आली तरच काडा”! आपण केलेल्या घोड चूकीमुळे चिन्मयचं डोकं फुटलं होतं हे तिघांनाही चांगलेच कळले होते. यापुढे कोणतीही गोष्ट करण्याआधी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केल्याशिवाय ती गोष्ट करणार नाही अशी शपत त्या तिघांनाही घेतली आणि चिन्मयच्या आई सोबत म्हणजे राधिका बाईंसोबत विश्वनाथ आणि श्याम चिन्मयला घेऊन डॉक्टरकडे गेले.
















No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...