Thursday, June 18, 2020

*पित्त , कफ , वात ,मधुमेह डोळे, अपचन , आदी २५ रोगावर रामबाण उपाय*

अकोले,ता . १८:अकोले तालुक्यात अभयारण्य क्षेत्रात १० हजार हेकटरवर खाजगी व वनविभागाच्या मालकीच्या हजारो झाडे असून स्थानिक आदिवासी त्याच्या विक्रीतून आपला उदरनिर्वाह चालवतात मात्र हे "हिरडा "आयुर्वेदिक व गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आपणाला पाहायला मिळतात याबाबत वनस्पती अभ्यासक डॉ . भाऊराव उघडे म्हणाले  हिरडा म्हणजे ‘हरीतकी’ ही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. सुरवारी हिरडा, बाळ हिरडा, रंगारी हिरडा असे याचे मुख्य प्रकार आहेत. ‘नास्ती यस्य गृहे माता तस्य माता हरीतकी’ म्हणजे ज्याच्या घरी आई नाही त्याची काळजी हिरडा घेतो. इतके हिरड्याचे महत्त्व आयुर्वेदात वर्णन केलेले आहे.
भूक न , लागणे, अन्न न पचणे, यावर बाळहिरडे खावेत. मलावष्टम्भावर हिरड्याचे चूर्ण रोज रात्री कोमट पाण्याबरोबर घ्यावे. मूळव्याधीच्या आजारात संडासाला खडा होणे, कुंथावे लागणे, यावर हिरडा घ्यावे. अम्लपित्तावर हिरडा चूर्ण तुपाबरोबर घ्यावे. खोकला, दमा, कफ, यावर हिरडा चूर्ण आणि पिंपळी चूर्ण मधातून चाटून खावे.
हिरडा हा डोळ्यांना फार उपयुक्त आहे. डोळे येणे, डोळ्यांना लाली, सूज, डोळ्यांना आग, डोळ्यांना पाणी येणे, या डोळ्यांच्या विविध विकारांवर सुरवारी हिरड्याच्या क्वाथाने डोळे धुवावेत. हिरडा, बेहेडा, आवळा, यापासून त्रिफळा चूर्ण तयार करतात. रोज रात्री १ चमचा त्रिफळा, १ चमचा मध, २ चमचे तूप, असे सेवन केल्यास डोळ्यांचे तेज वाढते. चष्म्याचा नंबर कमी होतो. मध आणि तूप मात्र सम प्रमाणात असू नये. हरीतकी हे रसायन आहे. रोज हिरडा चूर्ण सेवन केल्याने शरीर निरोगी रहाते. बुद्धी तरतरीत रहाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. घाम जास्त येत असल्यास आंघोळीच्या वेळी अंगाला हिरडा चूर्ण लावावे. लहान मुलांना काही वेळा संडासाला होत नाही, कुंथावे लागते. अशा वेळी हिरडा पाण्यात उगाळून चाटवावा. दमा, उचकी लागणे यावर हिरडा, सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. अजीर्ण, भूक न लागणे यावर सुरवारी हिरडा आणि सुंठ गरम पाण्यातून घ्यावी. काविळीवर हिरड्याचा चांगला उपयोग होतो. असा हा हिरडा अनेक व्याधींवर गुणकारी आहे.
फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत, १) विजया, २) रोहिणी, ३) पूतना, ४) अमृता, ५) अभया, ६) जीवन्ती आणि ७) चेतकी
  • बाळ हिरडा – फळात अठळी तयार होण्यापूर्वीच आपोआप गळून पडणारे फळ, याचा औषधात विशेष उपयोग होतो. लहान बालकात याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
  • चांभारी हिरडा – हिरड्याचे थोडे अपरिपक्व फळ म्हणझे चांभारी फळ, उपयोग कातडी कमविण्यासाठी होतो. मोठ्या प्रमाणात निर्यात.
  • सुरवारी हिरडा – हिरड्याचे पूर्ण पिकलेले फळ म्हणजे सुरवारी, औषधी उपयोग अनेक.
  • रंगारी हिरडा - याचा उपयोग रंगासाठी होतो.
या वनस्पतीला संस्कृत भाषेत अनेक नावे आहेत :-
  • हरीतकी - शंकराच्या घरात (हिमालयात) उत्पन्न होणारी, सर्व रोगांचे हरण करते.
  • हेमवती, हिमजा - हिमालय पर्वतावर उत्पन्न होणारी.
  • अभया - हिरड्याचे नित्य सेवन केल्याने रोगाचे भय राहत नाही.
  • कायस्था - शरीर निरोगी, धष्टपुष्ट करणारी.
  • पाचनी - पाचन करणारी.
  • प्रपथ्या - पवित्र करणारी.
  • प्रमथा - रोगांचे समूळ उच्चाटन करणारी.
  • श्रेयसी - श्रेष्ठ.
  • प्राणदा - जीवन देणारी.
हिरड्यात गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट हे पाच रस आहेत. फक्त खारट रस नाही. यातील गोड, तिखट आणि तुरट रसांमुळे पित्त दोषाचा नाश होतो. कडू, तिखट आणि तुरट रसांमुळे कफ दोष दूर होतो. तर गोड आणि आंबट या रसांमुळे वात दोष दूर होतो.
हिरड्याचे लघु आणि रुक्ष असे गुण आहेत. लघु म्हणजे ज्या योगाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो, उत्साह येतो. सामान्यत: लघु गुणाच्या द्रव्यांनी शरीरातील वाढलेला कफदोष कमी होतो. शरीरात ज्या ज्या ठिकाणी मलाची निर्मिती होते त्या त्या ठिकाणी या गुणाच्या औषधांचा प्रभाव होतो, हिरड्याची फळे मल दोष दूर करतात. रुक्ष म्हणजे शरीरात रूक्षपणा, कठीणपणा येतो. या गुणामुळे शरीरातील वात दोषाचे प्रमाण वाढते, कफ दोषाचे प्रमाण कमी होते. मधुमेह सारख्या रोगात याचा खूप उपयोग होतो.
अपचन, अतिसार, आंव पडणे, मूळव्याध, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता, अजीर्ण, आम्लपित्त, दाह, रक्तपित्त, कुष्ठरोग, इसब, पित्त्जशूळ, संधिवातज्वर, उदररोग, पांडुरोग ,मूतखडा, उचकी, उलटी, अशा अनेक विकारांवर हिरडा महत्त्वाचे औषध मानले गेले आहे. कुपचन रोगांत सुरवारी हिरड्याचा चांगला उपयोग होतो.अतिसार, आंव आणि आंतड्याची शिथिलता यांत चांगला गुण येतो. अर्श (मूळव्याध) रोगात हिरडा सैंधवाबरोबर देतात आणि रक्तार्शांत त्याचा क्वाथ देतात. अर्श सुजून दुखत असल्यास हिरडा उगाळून लेप देतात.
हिरडा जरी बहुपयोगी असला तरी, त्याचा वापर ऋतु प्रमाणे विविध द्रव्यांसह करावा:
  • वसंत ऋतु अर्थात चैत्र, वैशाख मध्ये मधा सोबत,
  • ग्रीष्म ऋतू अर्थात ज्येष्ठ, आषाढ मध्ये गुळा सोबत,
  • वर्षा ऋतु अर्थात श्रावण, भाद्रपद मध्ये सैंधव मिठा सोबत,
  • शरद ऋतु अर्थात आश्विन, कार्तिक मध्ये साखरे सोबत,
  • हेमंत ऋतु अर्थात मार्गशीर्ष, पौष मध्ये सुंठी सोबत, आणि
  • शिशिर ऋतु माघ, फाल्गुन मध्ये पिंपळी सोबत. हिरडा प्रक्रिया केंद्र उभारून रोजगार निर्मिती -- अकोले तालुक्यात जंगली माल मोठ्या प्रमाणात असून या जंगलीमालावर सेमी प्रोसेस केली व ग्राइंडिंग करून माळ तयार केला तर दरवर्षी २० ते ३० कोटीची उलाढाल होऊन हजारो उपेक्षित गरीब आदिवासी माणसांना रोजगार उपलब्ध होऊन या भागातील स्थलांतर थाम्बले राज्यातील सर्वच आदिवासी भागात हि परिस्थिती असून बायफ सारख्या संस्थांनी पुढाकार घेतल्यास व सरकारने सकारात्मक भूमिका बजावली तर आदिवासी बचत गटाच्या माध्यमातून महिला युवक व जेष्ठ नागरिकांना स्वयं रोजर्गार तयार होऊन आदिवासींची उपासमार , कुपोषण होणार नाही . वनविभागाने हिरडा , बेहडा , करवंद जांभूळ , मोह , करंज , मध यांचे संवर्धन केल्यास  तसेच बाळ हिरड्याचे केमिकल , पावडर काढून कच्चा माल  तयार केल्यास शहरातील माणूस गावाकडे वाळल्याशिवाय राहणार नाही हे तितकेच खरे , राजकीय व्यक्तींनी आपण गोरगरीब जनतेचा आधार कसे बनू त्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून कार्य केलयास  ---  तालुक्यातील जंगलातील आदिवासी उपासी व रोजगार र्विना राहणार नाही हे तितकेच खरे ...मात्र अकोले तालुक्यात मी मी तू तू हि भाषा सुरु असून आदिवासीचा विकास हेच ध्येय ठेवून जागृतीची गरज असल्याचे सुरेश भांगरे यांनी सांगितले

    फोटो akl १८प ४,५,६
    राजूर -- निसर्गाचे भरभरून देणे लाभलेला वैभवशाली तालुका 'अकोले'. प्रचंड मोठी वनसंपदा, हरिश्चंद्रगड - कळसुबाई संरक्षीत अभयारण्य आणि त्यात असलेले नानाविविविध वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्या प्रजाती. मुबलक पाणी पाऊस यांनी संपन्न असलेली ही भूमी आणि त्याच भूमीत आपल्या प्राचीन परंपरा जपून गुण्यागोविंदाने आपली उपजीविका शेती- पशुपालन आणि वनउपज यांवर भागवणार मोठा आदिवासी जनसमुदाय.
        भंडारदरा भागातील वाकी, शेंडी, भंडारदरा, मुरशेत, पांजरे , उडदावणे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेम्भे, मुतखेल तसेच हरिश्चंद्रगड परिसरात येणारे पाचनई, अंबित, कुमशेत इत्यादी गावे अभयारण्यातून मिळणारा हिरडा, आंबट येडींगा, करवंद, आंबा, जांभूळ ह्याची तोड करून ते स्थानिक बाजारात विकून आपली उपजीविका भागवतात.मात्र सरकारने हिरडा खरेदी न केल्याने सर्व हिरडा पावसाने खराब झाला असून आदिवासी च्या हातात  पैसे नसल्याने त्याला उपासमारीला सामोरे जावे लागत आहे त्यासाठी शासनाने आम्हाला जीवदान द्यावे अशी मागणी आदिवासी भागातील सरपंच , ग्रामस्थ , आदिवासी संघटना यांनी केली आहे.  
    --सरकार हिरडा घेत नाही व्यापारी काटा मारतात --
    असाच एक गंभीर प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून कानावर पडत आहे. स्थानिक आदिवासी बांधव अभयारण्यातून जोर हिरडा तोडून ह्या उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाच्या सुरुवातीला हिरडा तोडून बाजारात विक्रीस आणतात. शेंडी (भंडारदरा), राजूर, कोतुळ इथल्या व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारण्याचे प्रकार सातत्याने होत असतात. 
      सोमा धिंदळे याने  'घरचा हिरडा बाजार आणला, चांगला गोण भरून होता.... आधी दुकानात नेऊन मोजला ३५ किलो भरला, मग व्यापाऱ्याच्या काट्यावर टाकला तर २९ किलो भरला..'.
        अनेक वेळी अनेकांच्या तोंडून ह्या तक्रारी येत  आहे. हे व्यापारी जेव्हा गोरगरीब आदिवासी बांधवांचा हिरडा काट्यावर ठेवतात तेव्हा ह्यांची पद्धत खूप चालखीची असते. हिरडा काट्यावर ठेवायचा आणि किती वजन झाले ते पटकन सांगायचे... समोरच्या व्यक्तीने नीट बघायच्या आत तो हिरडा ढिगात ओतून द्यायचा. म्हणजे पुन्हा समोरच्या हिरडा विकणाऱ्याने काही शंका घेतली तरी त्याचाच हिरडा तो ढिगातून पुन्हा काढून खर खोटं करू शकत नाही...!
    सुरेश भांगरा ---(चईत आन् वैश्याक) लगीनसराईत  या कालखंडात "बाळहिरडा" येतो. बाळहिरडा हा बी बाजण्यापुर्वीच तोडायचा असतो. काट्याकुट्यातुन, पालापाचोळ्यातुन, प्रसंगी जीवाची बाजी लावून , हिरडीच्या शेंड्या-पालवावर चढून माझें आदिवासी बांधव हिरडा जमा करतात. झाडावं यंगून जेवढा हातात येईल तेवढा हाताने ओटीत ओढतात. सकाळी-सकाळीच वारासुटण्यापुर्वी सऱ्याने हिरड झोडतात आणि दिवसभर तहान-भुक विसरून आदिवासी बांधव ते यचून घेतात. कारण येणाऱ्या पावसाळ्यासाठी ,चार महिन्यांसाठी हिरडा हीच त्यांची एकमेव पोडगी असते. 
       प्रत्येक दिसी यचलेल्या हिरड्यांचे वेगवेगळे वाळवन असते.
    रोज सकाळी उन पडल्यावर वाळत घालने व संध्याकाळी उन कमी झाल्यवर गोळा करून ठेवणे असा दिनक्रम चालू असतो.
    मधल्या काळात हिऱ्डे ओढण्यासाठी, झोडण्यासाठी जाणे.
    नंतर वाळवून झाल्यावर गोण्या भरून ठेवतात. योग्य हमी भाव आल्यावर ईकुन टाकतात. 
        व्यापारी वेगवेगळ्या भावाने हिरडा खरेदी करतात. एवढे कष्ट करूनही कधीकधी मातीमोल भावाने हिरडा घेतला जातो. पण... कधी योग्य तो हमीभाव मिळावाच अस आदिवासी बांधवांनी हट्ट धरला नाही किंवा हट्टाहास केल्याचे मला तरी आठवत नाही.व्यापारी किलोमागे ठरवेल तसे, म्हणेल तसे ते देउन टाकतात.
            आमच्या सावा-वरईचा भाव..आमच्या नागलीचा भाव...आमच्या हिरड्या-बेहरड्याचा भाव...आमच्या डिंक-मधाचा भाव...आमच्या रानमेव्याचाभाव...दुस्रा-तिस्राच कोणीतरी ठरवत असतो...मातीमोल भावाने... आमच्या मालावर आमचाच अधिकार नाही..




No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...