Thursday, June 18, 2020

*हिरडा ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे .तिचे जतन करून वृद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. *

आदिवासींच्या चरितार्थाचा आधार ठरतोय हिरडा

अकोले प्रतिनिधी- 
हिरडा हे सह्याद्री पर्वतरांगांच्या घाट माथ्यावर वाढणारे एक उपयुक्त झाड आहे .हिरड्याचा उपयोग आयुर्वेदिक औषध बनविण्यासाठी  तसेच रंगकाम उद्योगात मोठ्या प्रमाणावर केला जातो .हजारो आदिवासी कुटुंबांचे हिरडा हे जीवन चरितार्थाचा आधार ठरला आहे .अकोले तालुक्यातील बहुतेक आदिवासी पट्ट्यात हिरडा हे झाड जंगलांमध्ये मुबलक प्रमाणात आढळते .दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बाळहिरडा आणि पक्व झालेला हिरडा गोळा करण्याचे काम शेकडो आदिवासी बांधव करत असतात .गोळा केलेला हिरडा  महामंडळातर्फे विकतात .त्याचे पुढे काय होते हे मात्र कोणालाही माहीत नसते .हिरडा ही पारंपरिक जंगल संपत्ती आहे हिरड्याची झाडे जशी जंगलात आढळतात तशी ती खाजगी जमिनीवरही आढळतात .परंतु शेत जमीन तयार करण्यासाठी शेकडो हिरड्याचे झाडं इतर झाडांन प्रमाणेच तोडून टाकण्यात आली .असे करण्यामागे शेत जमीन जास्त महत्त्वाचे वाटल्याने बहुतेक स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांनी जमिनी काढण्यावर भर दिला व त्या प्रक्रियेत हिरड्या सारखी मौलिक जंगल संपत्ती कायमची नामशेष होत आहे .परंतु त्यातूनही काही धोरणी  शेतकरी हिरड्याच्या झाडाला संरक्षण देऊन त्याचे संवर्धन करताना दिसतात. एकदरे गावचे श्री हैबत भदू भांगरे यांनी सुमारे 60 ते 70  हिरड्याची झाडे जतन केलेली आहेत. त्यांच्या घराजवळ प्रचंड मोठी हिरड्याची झाडे वाढलेली दिसतात .त्यांचे जतन करण्यामागे त्यांचा हेतू हा होता की पाऊस पाणी वेळेवर नाही झाले तर शेती टिकवणे खूप कठीण होते .अशा वेळेस हिरड्याचे हमखास उत्पन्न दरवर्षी मिळत असते . तसेही हिरड्याच्या झाडांना कुठल्याही प्रकारचे रोग किड येत नाहीत. हिरड्याचे  संवर्धन करताना कुठलाही खर्च येत नाही त्यामुळे बिना खर्च हिरडा आपल्याला शाश्वत उत्पन्न देऊन जातो .हैबत भांगरे यांच्या  वडिलोपार्जित जमिनीमध्ये  एकूण 70  हिरड्याची झाडे आहेत . त्यापैकी  उत्पन्न देणारी 40  झाडे आहेत .हिरड्याच्या बाबतीत हैबत दादा  खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगतात . हिरडा बीयांची उगवण  तशी सहजासहजी होत नाही  .परंतु जर शेळीने हिरड्याचे बियाणं खाल्लं  आणि तिच्या  विष्टेतून ते बाहेर पडलं  म्हणजेच लेंडयामधून ते बाहेर आले  तर त्याच्यावर  नैसर्गिक बीज प्रक्रिया होऊन  ते बियाणे  जंगलात  ज्या ठिकाणी शेळी  या लेंड्या टाकते  त्याठिकाणी ते  उगवले जाते. हिरडा हे त्यांना उत्पन्नाच्या दृष्टीने जास्त शाश्वत वाटते  .शाश्वत उत्पन्ना साठी  त्यांनी हिरड्याचे जतन केले आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये बाळ हिरड्याची काढणी केली जाते व एप्रिल मे या महिन्यांमध्ये पक्व झालेल्या हिरड्यांची काढणी केली जाते .सध्याच्या बाजारभावानुसार प्रति किलो 150 रु बाळहिरडा व 15 रु पक्व झालेल्या हिरडा विक्री केला जातो .हिरड्या  पासून दरवर्षी होणारे सरासरी उत्पन्न 20 ते 25 हजार मिळते . त्याची तुलना जर शेतीशी केली तर शेतीची एकूण मिळकत 30 ते 35 हजार इतके  आहे.आणि शेतीला प्रत्येक गोष्टीसाठी खर्च करावा लागतो ते वेगळेच. इथे मात्र हिरड्याला कुठलाही खर्च नाही. दरवर्षी काढणी आणि विक्री एवढेच काय ते.नैसर्गिक दृष्ट्या हिरडा जंगलात उताराच्या जमिनीवरही सहज वाढतो .सदाहरित असलेल्या हिरड्याला उन्हाळ्यात बिया लागतात .या बीयांची काढणी करण्याअगोदर हिरडा बिया छोट्या असताना काढणी केल्यास त्याला बाळहिरडा म्हणतात .बाळ हिरड्याला बाजार भाव तुलनेने जास्त असतो .पक्व झालेल्या हिरड्याला खूप कमी बाजारभाव भेटतो .म्हणून आदिवासी भागातील अनेक कुटुंब हिरडा गोळा करण्याच्या कामी उन्हाळ्यामध्ये व्यस्त असतात .अकोले ,
आंबेगाव, जुन्नर या आदिवासी  तालुक्यांमध्ये हिरडा गोळा करण्याचे काम उन्हाळी हंगामात जोर धरते .

कोट -1 हिरडा ही निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे .तिचे जतन करून वृद्धी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा संबंध आदिवासी गरीब जनतेच्या जीवन चरितार्थाशी आहे .त्यामुळे हिरड्या चे जंगल वाढवणे व ते जतन करणे यावर भर दिला पाहिजे .
जितीन साठे ,
विभागीय अधिकारी बायफ -नाशिक 

कोट-2 -माझ्या शेतात वडिलोपार्जित 60 ते 70 हिरड्याची झाडे आहेत त्यांची तोड न होऊ देता मी शेती करतो वर्षाकाठी कसेही वीस पंचवीस हजार रुपयांचे उत्पन्न भेटते आणि आणि हे उत्पन्न शाश्वत आहे श्री दैवत भदु भांगरे शेतकरी, एकदरे ता.अकोले

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...