Thursday, March 8, 2018

श्रीरामपूर म्हटले की, क्रिकेटपटू झहीर खान,

श्रीरामपूर म्हटले की, क्रिकेटपटू झहीर खान, केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब शिंदे, रामराव आदिक, गोिवदराव आदिक यांच्यासह अनेक नेत्यांची नावे डोळ्यासमोर येतात. ऊस शेती, सहकार, उद्योग, सहित्य, संस्कृती, कला अशा अनेक क्षेत्रांत पुढारलेले हे शहर. अशा या शहरात खरे तर खासगी अभियांत्रिकी वा वैद्यकीय महाविद्यालये किंवा भरमसाट शुल्क घेणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करून पसे कमविण्याचा उद्योग करण्याऐवजी मीनाताई जगधने यांनी प्राथमिक शाळा सुरू करण्याचा खटाटोप केला. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या त्या भगिनी. आप्पासाहेब पवार यांनी मीनाताईंना राजकारणात काम करण्याऐवजी शिक्षणात काम करण्याचा सल्ला दिला. शक्य असूनही स्वत:ची शिक्षणसंस्था काढण्याचे त्यांनी नाकारले आणि ‘रयत’च्याच माध्यमातून १९९२ मध्ये आठ मुलांना घेऊन बालवाडी सुरू केली.
या बालवाडीच्या शिक्षिका म्हणजे करुणा जेम्स व शमिम पठाण. सोमय्या प्राथमिक विद्या मंदिर ही आजची शाळा सुरुवातीला बोरावके महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या एका खोलीत बालवाडी म्हणून सुरू झाली. पुढील वर्षी पहिलीचा वर्ग सुरू झाला. बालवाडीत राबविण्यात आलेल्या आनंददायी शिक्षण प्रयोगांमुळे वर्षभरातच ती नावारूपाला आली. आज बाराशेहून अधिक विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. त्या काळात इंग्रजी माध्यमांची शाळांची चलती सुरू झाली होती. पण शाळेने मात्र मराठी माध्यम निवडले. इंग्रजीत विद्यार्थी कमी पडू नये म्हणून इंग्रजी भाषेच्या शिक्षणावरही जोर देण्यात आला.
कलागुणांना वाव
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेने विविध उपक्रम सुरू केले आहे. साने गुरुजी कथामाला ही त्यापैकीच एक. खोडकर मुलांना शिक्षा न करता त्यांच्यातील इतर कलागुणांना संधी देऊन त्यांचा आत्मविश्वास शाळा वाढविते.
प्रयोगशील शाळांना भेटी
शिक्षक राज्यभरातील प्रयोगशील शाळांना भेटी देऊन त्यांपैकी अनेक उपक्रम शाळेत राबवितात. पुणे येथील गरवारे बालभवन, लीना पाटील, शोभा भागवत, रमेश पानसे, राजीव तांबे, रेणू गावस्कर, भाऊसाहेब चासकर, विद्या प्रतिष्ठान यांनी यशस्वीपणे राबविलेले वेगवेगळे प्रयोग शाळेने अंगीकारले आहेत.
एक पाऊल पुढेच
२००० पासून सेमी इंग्रजीच्या शाळा सुरू झाल्या, परंतु या शाळेने सुरुवातीपासून सेमी इंग्रजी सुरू केले. त्याकरिता शिक्षकांना इंग्रजीचे शिक्षण देण्यात आले. आठवडय़ातून दोन दिवस ‘इंग्रजी दिवस’ म्हणून पाळले जातात. त्या दिवशी विद्यार्थी व शिक्षक इंग्रजीतच एकमेकांशी संभाषण करतात. शिक्षकांना संगणक प्रशिक्षणही शाळेने फार आधीपासून सुरू केले होते. त्यानंतर लगेचच शाळा डिजिटल बनविण्यात आली. संगणक प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला. गणित, इंग्रजी, विज्ञान, भूगोल यांच्या स्वतंत्र संगणकसज्ज प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. कविता, कथा, शाळेचे पाठ याचे स्लाइड शो केवळ शिक्षकच नाही तर मुलेही करू शकतात. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व इंटरनेटचा वापर विद्यार्थी सहजपणे करतात. पण सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावी वापर शाळेने सुरू केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली बुद्धिसंपदा व ज्ञानसाधना वाढविण्याचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या माध्यमातून सुभाषिते, सुविचार, राष्ट्रपुरुषांच्या चरित्रातील महत्त्वाची माहिती, भाषणातील काही मुद्दे आदींबरोबरच मुलांनी केलेल्या कविता, लिहिलेल्या गोष्टी, विविध परीक्षांमध्ये मिळविलेले यश यांचीही माहिती दिली जाते.
एक दिवस दप्तराविना
मुलांचे दप्तराचे ओझे कमी करण्याकरिता आठवडय़ातून एक दिवस ‘दप्तरविना शाळा’ हा उपक्रम राबविला जातो. प्रत्येक विषयाच्या गृहपाठासाठी एकच वही दररोज शाळेत वापरली जाते.
शिक्षकांकरिता व्याख्याने
विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांकरिताही तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. मुलांमधील नकारात्मकता घालवून सकारात्मकता तयार करण्यासाठी शिक्षक प्रयत्नशील असतात. पण शिक्षकांमधील नकारात्मकता काढणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.
बालसभा
विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व गुण व नेतृत्वगुण विकसित करण्याकरिता बालसभेचे आयोजन केले जाते. वक्ता, सूत्रसंचलन अशी सर्व कामे विद्यार्थीच करतात. या बालसभांमध्ये मुलांच्या मनाप्रमाणे त्यांना सादरीकरण करता येते. विद्यार्थी हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे म्हणून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांची भाषणे व प्रयोग तर नेहमीच केले जातात. विद्यार्थ्यांना टपाल कार्यालय, पोलीस ठाणे, रेल्वेस्थानक, आठवडे बाजार, बँका येथे नेऊन त्यांना व्यवहारज्ञान शिकविले जाते. आनंद मेळावा आयोजित करून व्यापार, खरेदी-विक्रीचे शिक्षण दिले जाते. रक्षाबंधन, पर्यावरणपूरक गणेशोत्सव यांबरोबरच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचेही शिक्षण दिले जाते.
वर्गातही ग्रंथालय
विद्यार्थी आपल्या वाढदिवसाला शाळेत चॉकलेट वाटण्याऐवजी पुस्तक भेट देतात. शाळेचे सुसज्ज असे ग्रंथालय आहेच. या शिवाय प्रत्येक वर्गात किमान ३०० पुस्तके स्वतंत्रपणे ठेवलेली असतात. महिन्यातून दोनदा ग्रंथालयातील सर्व पुस्तके शाळेच्या आवारात ठेवली जातात. ही पुस्तके विद्यार्थी घरी नेऊन वाचून परत करतात. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा होते. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकही या उपक्रमात सहभागी होतात. वाचन संस्कृती वाढविण्याचा हा प्रयोग आहे.
सण-उत्सवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यावर भर दिला जातो. दिवाळीत फटाके उडविण्याऐवजी मुले दिवाळी अंक खरेदी करतात. ही पुस्तके शाळेला दिली जातात. शैक्षणिक सहली, आकाशदर्शन, शास्त्रज्ञांच्या भेटी, साहित्यिकांशी सुसंवाद, स्वच्छता अभियान, वैयक्तिक स्वच्छता, स्पर्धा परीक्षांची तयारी आदी उपक्रमही राबविले जातात.
आज या शाळेचा लौकिक इतका आहे की, पालक प्रवेशासाठी रांगा लावतात. त्यामुळे सोडत काढून प्रवेश द्यावे लागतात. शाळेला आय.एस.ओ. मानांकन यापूर्वीच मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...