Sunday, April 2, 2017

मोहाच्या झाडाला पुन्हा पुन्हा पाणी देण्याची गरज नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यावरच ते आपल्याला फुले, फळे देते. एक मोहाचे झाड एका वर्षाला साधारणतः किलोभर फुले व साडेतीन किलो फळे देते. यावर कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही, की खते द्यावी लागत नाहीत. गरज आहे ती फक्त त्यांचे संवर्धन करून संख्या वाढविण्याची.

मोहात पडावे असे मोहाचे झाड फांद्यांच्या टोकास झुपक्याने आलेली पिवळ्यामातकट रंगाची मोहाची फुले आणि जमिनीवर गळालेली मनमोहक फुले...
आदिवासी पट्टय़ात मोहाचे झाड वा फुलं यासाठी महु हा शब्द प्रचलित आहे. या झाडाला आदिवासी जमाती देव मानतात. या झाडाखालीच त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे सण/धार्मिक कार्यक्रम या झाडाच्या फळांपासून बनविलेल्या दारूशिवाय (मोहाची दारू) पूर्ण होत नाहीत. मोह फुलांचा बहर ओसरल्यावर त्याच कळीतून टोळंबी नामक फळ आकाराला येवू लागते. हे झाड सुमारे दहा-पंधरा वर्षांचे झाल्यानंतर त्याला फुलांचा बहर यायला सुरुवात होते. साधारणत: मार्च महिन्यात या झाडाची पाने परिपक्व होवून गळून पडतात. नंतर झाडांच्या फाद्यांवरील कळ्या हळूहळू कोंब फुटून वाढायला लागतात. त्यांची वाढ सुमारे पंधरवडय़ात पूर्ण होताच त्यांचे मोह फुलात रुपांतर होते. त्यानंतरच्या पंधरवडा-तीन आठवडय़ात ही फुलं परिपक्व होवून आपोपच गळायला लागतात. दररोज टोपली दोन टोपली फुलं वेचून गोळा करणे, ती घरात माळ्यावर वाळत घालणे ही कामे पूर्ण केली जातात. ज्या देठापासून फुलं गळून पडतात त्याच ठिकाणी हाताच्या अंगठय़ाच्या आकाराची फळं वाढायला सुरुवात होते. ही फळं घडाच्या स्वरुपात येतात व त्यांची वाढ साधारणपणे जूनमध्ये पूर्ण होते. त्याच सुमारास मान्सूनला सुरुवात झालेली असल्याने ही फळं अर्थात टोळंबीच्या बियांचा सडा मोह झाडाच्या खाली दिसतो. फुलांप्रमाणेच टोळंबीचं बी देखील वेचणे, गोळा करणे आणि पाडय़ावरील माळ्यावर सुरक्षित ठेवणे ही कामे आदिवासी करतात. टोळंबीच्या बियांपासून काढलेल्या तेलाचा खाद्यतेल म्हणून उपयोग केला जातो. त्यापासून निघालेली ढेप याचाही वापर जनावरांना खाद्य म्हणून वा साबण तयार करण्यासाठी होतो. टोळंबीप्रमाणेच साधारणत: वर्षांचे मोह झाड (तरु) असेल तर त्याच्या मुळ्यांचा अर्क माणूस वा जनावरांच्या डोळ्यातील फूल (टिका)काढण्यासाठी केला जातो. टोळंबीच्या तेलाचाही औषध म्हणून वापर केला जातो. आदिवासींमध्ये मोह फुलाला अन्नाचा दर्जा आहे. ही फुलं भाजल्यावर त्यापासून चटणी तयार केली जाते. त्यात अन्य कडधान्याचा वापर केल्यास पोषक आहार म्हणून त्याचा वापर होतो. मोहाच्या फळांचे पुरण फार चविष्ट असते. गावकरी ही फुलं जमवतात आणि सुकवून साठवतात, मग गरज पडेल तशी ह्या फुलांपासून दारु बनवून प्यायची थोडक्यात डोंगरदऱ्यातील आदिवासींसाठी पोटाची खळगी भरण्याचे एक प्रमुख साधन म्हणून मोहाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे.मध्यम उंचीच्या या पर्णझडी वृक्षास "मोह', "मोहा', "मऊहा' या प्रचलित नावांनी आणि "मधुका' "मोहरा फॅट', "बटर ट्री', "मोहा ट्री', "ईलाईप बटर' इ. इंग्रजी नावांनी ओळखले जाते. चिकूच्या सॅपोटेशी या कुळातील या प्रजातीला "मधुका लॉगीफोलीया' या शास्त्रीय नावानेही ओळखले जाते. या प्रजातीचा उपयोग खाद्यतेल, औषधी, इमारती, लाकूड, जळण, पशुखाद्य, कीडनाशके, मद्यनिर्मिती, पेपर निर्मितीसाठी होतो

बहुउद्देशीय, उपयुक्त मोह या वृक्षाची लागवड ग्रामीण भागात झाल्यास रोजगारनिर्मितीस चालना मिळू शकते. यासाठी वृक्ष लागवड करताना या वृक्षाविषयीचे ज्ञान त्याचबरोबर या वृक्षाविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

आढळ ः उष्ण, समशीतोष्ण कटिबंधातील पर्णझडी, आर्द्र पर्णझडी, मिश्र जंगलामध्ये हा वृक्ष आढळतो. हा वृक्ष पर्णझडी, मिश्र जंगलामध्ये, नद्या-नाले काठ, शेताचे बांध इ. ठिकाणी आढळतात. देशात बिहार, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातचा डांग प्रांत आणि बंगाल इ. ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात आढळतो. या वृक्षांची लागवड ही मुद्यामहून काही ठिकाणी केल्याचे आढळते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, रायगड, विदर्भ इ. ठिकाणी मोहाची झाडे आढळून येतात.

उपयोग ः "मधुका इंडिका' आणि "मधुका लॉजीफोलिया', या दोन्ही प्रजातीचे उपयोग अनेक आहेत. या झाडाच्या फुलाचा उपयोग भाजी व मद्यनिर्मितीसाठी केला जातो. बियांपासून जे तेल मिळते ते खाद्यतेल म्हणून आणि साबण निर्मितीसाठी वापरले जाते. पेंड किंवा ठेपीचा वापर खत म्हणून केला जातो. खोडाच्या सालीचा काढा हिरड्यांमधून येणारे रक्त, तोंडाचा अल्सर इ.साठी उत्तम आहे. फुलांचा उपयोग कफ आणि अस्थमा या रोगातही केला जातो. "मोहा तेलाचा' वापर कातडीचे रोग, सांधेदुखी, डोकेदुखी इ. रोगासाठी उत्तम मानले जाते. पेंड किंवा ठेपीला कीडनाशक, जंतुनाशक म्हणून प्रभावीपणे उपयोगी पडत असल्याने शेतात पेंडीचा उपयोग केला जातो. फळांचा उपयोग शिकेकाईबरोबर केस धुण्यासाठी वापर होतो. फळापासून सुगंधी तेलही मिळते. मुळांचा उपयोग अल्सरसाठी केला जातो. लाकडांचा उपयोग इमारत बांधकाम, जळण म्हणून केला जातो. लिखाणाचे कागद आणि प्रिंटिंग कागद निर्मितीसाठी या झाडाच्या लाकडांचा लगदा वापरला जातो. मोहापासून मिळणाऱ्या फुले, फळे व इतर भागांपासून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक आदिवासी आपला उदरनिर्वाह करतात. मोहाच्या फुलात व फळात बरेच औषधी गुणधर्म आहे. फळे शुक्रवर्धक, बल्य आणि शीतल आहे. मोहाचे फूल दहा ग्रॅम, एक ग्रॅम जिरे मिसळून तुपात टाकून दिल्यास शक्ती वाढते. मोहाच्या फुलांचा मध इतर मधापेक्षा गोड असतो. संग्रहणी आणि आम्लपित्तांच्या रोग्यांनाही मोहाचे फूल फार उपयोगी आहे.

वनस्पतिशास्त्र ः
उंच वाढणाऱ्या या वृक्षांची पाने साधी 6 ते 20 सें.मी. लांब आणि 3.5 ते 10 सें.मी. रुंद असतात. पाने टोकाला निमुळती शेपटीसारखी काहीशी आणि देठाकडेही निमुळती झालेली असतात. पानांच्या देठातून फुले येतात. सुवासिक फुलांच्या पाकळ्या पांढऱ्या क्रीम रंगाच्या असतात. फुले गुच्छात जमिनीकडे झुकलेली असतात. फुले शेंड्याकडे येतात. फळे पिकल्यानंतर पिवळी होतात. मधुका लॉजीफोलीया या प्रजातीच्या दोन उपजाती महाराष्ट्रात आढळतात. पुंकेसराच्या आकारावरून "लॉजीफोलीया' आणि "लॅटीफोलिया' या दोन उपजातीपैकी "लॅटीफोलीया' ही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.

लागवड व निगा ः
फुले, पांढरी, अत्यंत सुवासिक फेब्रुवारी - एप्रिल या कालावधीत येतात. मोठ्या प्रमाणात फळे, फुले मिळण्यासाठी 20-25 वर्षांचा कालावधी लागवडीनंतर लागतो. 200-300 वर्षापर्यंत ही झाडे फळे, फुले देतात. पूर्ण वाढ झालेले झाड एक क्विंटलपर्यंत फुले देते. फळे तयार झाल्यानंतर त्यातून बिया काढून त्यांचा उपयोग रोपनिर्मिती व तेल काढण्यासाठी केला जातो. बिया जास्त सुकविल्यास अथवा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यांची उगवण्याची क्षमता नष्ट होते. या झाडामध्ये दरवर्षी बियाणे मोठ्या प्रमाणात मिळत नाही. एका आड एक वर्षाने बियाणे मोठ्या प्रमाणात मिळते. त्यासाठी बियाणे फ्रिजमध्ये रोपवाटिकेसाठी साठवून ठेवणे आवश्‍यक असते. फळे मे-जूनमध्ये तयार होत असल्याने हा कालावधी बियाणे गोळा करण्यासाठी कमी पडतो व बरीचशी फळे पावसाळ्यामध्ये वाया जातात. चांगले परिपक्व बियांचा रुजवा वेळेत पेरणी झाल्यास 13-47 टक्के मिळतो. मोहाच्या झाडाला पुन्हा पुन्हा पाणी देण्याची गरज नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यावरच ते आपल्याला फुले, फळे देते. एक मोहाचे झाड एका वर्षाला साधारणतः किलोभर फुले व साडेतीन किलो फळे देते. यावर कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही, की खते द्यावी लागत नाहीत. गरज आहे ती फक्त त्यांचे संवर्धन करून संख्या वाढविण्याची.

"देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे‘ या विंदांच्या कवितेप्रमाणेच निसर्गाचे अगणित उपकार जीवसृष्टीवर आहेत, असे वाटते. आपण कोणाकडून घ्यावे हे सांगताना विंदा म्हणतात, "हिरव्या-पिवळ्या माळाकडून, सह्याद्रीच्या कड्याकडून, वेड्यापिशा ढगाकडून, पृथ्वीकडून, दर्याकडून, नदीकडून‘ ही प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी देतेय. निसर्गाच्या अगणित वरदानापैकी एक मोहाचे झाड! या एकट्या मोहाच्या झाडाचा जरी आपण विचार केला तरी निसर्गातील अशा अनेक गोष्टींचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. आदिवासींचा कल्पवृक्ष समजल्या जाणाऱ्या या मोहाला वसंतऋतूत फुले लागतात. झाडांची पूर्ण पानगळ होऊन मादक, मोहक, उग्र वासाने आसमंत भरून आणि भारूनही टाकणारा मोह! दूरवरून स्वतःची चाहूल सांगणारा, त्याची दखल घ्यावीच लागेल असा वास नाकात शिरतो आणि आपण त्याचा शोध घेऊ लागतो.

रणरणत्या उन्हात डोंगर-दऱ्यांतून फिरताना पाण्याचा थेंबही कोठे नजरेस पडू नये, तहानेने आर्त झालेला जीव आणि अशा वेळेस नजरेस पडलेला मोह. अम्बळ, करवंद, मोह अशा कितीतरी फळा-फुलांचा रस निसर्गात आपल्यासाठी "ज्यूस बार‘ म्हणून उभे असतात. दोन-तीन अम्बळाची फळे किंवा मोहाची फुले तोंडात टाकली की मन प्रसन्नच होणार. डोशींहळपस ऊळषषशीशपीं चव अनुभवल्याचा आनंद आपल्याला मिळेल. आदिवासींचा कल्पवृक्ष ही अतिशय समर्पक उपाधी असणाऱ्या या मोहाच्या झाडाला आदिवासींच्या जीवनातही अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच मोहाच्या झाडावर कुऱ्हाड चालवली जात नाही. मोह हा उष्ण कोरड्या जमिनीत येणारा पानझडी वृक्ष आहे. साखर, प्रथिने, जीवनसत्त्व आणि खनिजांचे उच्च प्रमाण असलेला मोह हा एक अत्यंत उपयुक्त वृक्ष आहे.

मोहाची पाने, फुले, फळे, खोड, साल या प्रत्येक भागाचा उपयोग केला जातो. मोहाच्या पानांचा उपयोग पत्रावळ्या बनविण्यासाठी केला जातो. बियांचा वापर साबण बनविण्यासाठी तसेच त्यापासून पेंड/ढेप बनविली जाते.. याच्या लाकडाला वाळवी लागत नाही तसेच ते पाण्यातही कुजत नाही. मोहाच्या सालीपासून बनविलेला काढा हिरड्यातून रक्त येणे, तोंडाचा अल्सर इ.वर गुणकारी आहे. मोहाच्या झाडापासून अनेक प्रकारची औषधे बनविले जातात. ती त्वचाविकार, मेंदूविकार, केसांचे आजार, अल्सर, गुडघेदुखी, जुनाट खोकला अशा अनेक आजारांवर गुणकारी आहेत.

मोहाचा उपयोग अन्न म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. मोहाची फुले कच्चीही खाल्ली जातात. भरपूर ग्लुकोज असणारी ही फुले वाळवून भाजून किंवा नुसती वाळवूनही खातात. ही वाळवलेली फुले किशमिशसारखीच पौष्टिक आणि रुचकर असतात. मोहाच्या फळांना "मोहट्या‘ असे म्हणतात. या मोहट्याचा उपयोग भाजी करण्यासाठी होतो. साधारणपणे मे महिन्यात झाडाला फळे लागतात. ही फळे वाळवून साठवून ठेवली जातात . ज्या भागात मोह असते त्या भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. अशा वेळी घराबाहेर पडणेही मुश्‍कील असताना या वाळवलेल्या मोहट्या भाजी म्हणून आणि फुलांचे किशमिश खाद्य म्हणून उपयोगी येतात. मोहापासून अतिशय औषधी असलेला गूळ किंवा साखर तयार करतात. मोहाच्या फुलापासून चिक्की तयार करता येते. फूल आणि खडीसाखर मिळून गुलकंद तयार करता येतो, हा "मोहकंद‘ अतिशय पौष्टिक असतो. ताज्या फळांच्या पल्पपासून जॅम, जेली, सॉस बनविता येते. मोहाच्या फळांपासून तेल काढले जाते, त्याचा उपयोग खाद्यतेल म्हणून केला जातो.

आज आपण बघतो आदिवासी भागात कुपोषणाचे, आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात आहे. पण याच आदिवासी भागात मोहवृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. गरज आहे ती फक्त या झाडांचे महत्त्व ओळखून त्याच्या लागवडीस आणि जोपासनेस प्रोत्साहन देण्याची.

विदर्भासारख्या अनेक आदिवासी भागांत या वृक्षांची सख्या जास्त आहे. या भागातील तुटपुंजे उत्पन्न आणि दारिद्य्राचा संबंध पाहता कुणाही जाणकाराच्या लक्षात येईल की "मोह‘ हा येथील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बनू शकतो. येथील दारिद्य्र कायमस्वरूपी हटवून शाश्‍वत चरितार्थाचे साधन बनू शकते. परंतु, मोहापासून दारू बनते या एका कारणामुळे या झाडाला बाद करण्यात आले आहे. वास्तविक द्राक्षापासून, उसापासून बनणाऱ्या दारूवर बंदी नाही; परंतु अतिशय नैसर्गिक स्वरूपात उच्च जीवनसत्त्वाचे प्रमाण असणाऱ्या या दारूवर बंदी आहे. या एका कारणामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशा या वृक्षाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. अनेक भागांत ऊस, द्राक्ष, कापूस या जास्त पाणी लागणाऱ्या नगदी पिकांना आपण प्रोत्साहन देतो. आताच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर विचार केला तर मोहाच्या झाडाला पुन्हा पुन्हा पाणी देण्याची गरज नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यावरच ते आपल्याला फुले, फळे देते. एक मोहाचे झाड एका वर्षाला साधारणतः किलोभर फुले व साडेतीन किलो फळे देते. यावर कोणत्याही रासायनिक औषधांची फवारणी करावी लागत नाही की खते द्यावी लागत नाहीत. गरज आहे ती फक्त त्यांचे संवर्धन करून संख्या वाढविण्याची, व्यापक दूरदृष्टी ठेवून काम करण्याची आणि देशहिताच्या इच्छाशक्तीची!

आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मोहापासून बनल्या जाणाऱ्या विविध पदार्थांची प्रक्रिया केंद्रे सुरू होण्याची गरज आहे. मोहाचा किशमिश छानशा "कव्हरिंग‘मध्ये विकला जावा. जसे काटेसावरीच्या फुलांच्या रंगांचा उपयोग चीनने "नैसर्गिक फ्लेवर‘ म्हणून प्रसारित केला, जुईच्या वाळवलेल्या कळ्या-पाने "चायनीज स्लीम टी‘ म्हणून बाजारात आणला. (याचा भाव रुपयाला ग्रॅम आहे.), तसेच मोहफुलांचा फ्लेवर किंवा चिरतारुण्य टिकवणारे मोहचिक्की किंवा मोहकंद मार्केटमध्ये का येऊ नये? मोहाचा सेंद्रिय गूळ किंवा साखर आपण बाजारात का आणू नये? चीनने प्रमोट केलेले सोया सॉस, चिली सॉस सगळीकडे वापरले जाते तसे मोहसॉस किंवा जॅम बाजारात का मिळू नये? इतर देशांनी उत्पादित केलेले विकत आणून खाण्यापेक्षा आपल्या देशात तयार झालेले, आपल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या आपल्याकडील नैसर्गिक संसाधनांना महत्त्व देण्याची वेळ आली आहे. आज खाद्यपदार्थाच्या क्षेत्रातील जागतिक उलाढाल पाहता ज्या मोहापासून अल्कोहोल नसलेले अनेक प्रकारचे पदार्थ बनविता येतात, त्यावरून त्याचे महत्त्व आपल्या लक्षात यावे.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...