Sunday, April 2, 2017

जय बिरोबा

राजूर ,ता . १६:-ह्युई , ह्युई असा आवाज काढत व जय बिरोबा  जय म्हणत उघड्या अंगावर  तेलाचे चटके सहन करीत नवसपूर्ती करण्यासाठी ५० भाविकांनी कौठ्वाडी येथील कठ्याच्यायात्रेत कठे नाचविले . हे दृश्य पाहण्यासाठी असंख्य भाविक व आबालवृद्ध हा प्रकार पाहून स्तब्ध झाले होते ग्रामस्थांनी व पोलिसांनी यात्रचे नियोजन उत्तम  प्रकारे केले होते . तर रात्रभर मनोरंजनाचे  अक्षय तृतीये नंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी कौठ्वाडी या आदिवासी गावात श्री क्षेत्र बिरोबा महाराजांची चांभार घाटाखाली "कठा यात्रा "भरते साकीर वाडी गावातून मनाची काठी नाचत वाजत गाजत येते हि काठीचा मंदिराला स्पर्श होतच मानाचा भोईर यांचा कठा जय बिरोबा कि जय म्हणत जो कठा घेतो त्याच्या अंगात येते व तोंडातून -ह्युई , ह्युई असा आवाजनिघताच त्या बरोबर इतर कठे पेटविले जातात . श्री बिरोबाला नवीन कपडे घातले जातात . नैवद्य दाखवून गोंधळ घातला जातो . मंदिरात घंटानाद तसेच संभळ  , ढोल , ताश्या, डफ , सनई , धोधाना एकाच वेळी हे वाद्य वाजायला सुरुवात होती नि मग काठी पुढे व त्यामागे -ह्युई , ह्युई असा आवाज करीत नवसाचे पेटते कठे मिरवायला सुरुवात होते .    रात्री १२ वाजण्याच्या निरव  शांततेत सर्वच जन या डोळा या देही या वृत्तीने हे कठे पाहतात . या पार्श्वभूमीवर येथील हे दृश्य बघणा-याला काहीसे चक्रावून टाकते. नवसाला पावणारा देव म्हणून हजारो आदिवासींची बिरोबावर श्रद्धा आहे.
'कठा' म्हणजे काय, तर बुडाच्या बाजूने कापलेली घागर. कापलेला भाग या घागरीत आतील बाजूस उपडा करून ठेवतात. खैर, जांभूळ, साग, सादडा अशा ढणाढणा पेटणा-या वनस्पतींची धपलाटे घागरीत उभी भरतात. पेट घेतलेला कठा विझू नये, म्हणून आत कापूर, कापूस टाकतात. बाहेरच्या बाजूने अष्टगंध, चंदनाच्या रंगाने छानदार नक्षी काढतात. रान चाफ्याच्या विविध रंगी फुलांनी कठा मस्त सजवतात. सजवलेले कठे बिरोबाच्या मंदिरासमोर मांडतात. भाविक गण यात तेल ओतत असतात. आदिवासी श्रद्धाळू बिरोबला नवस बोलतात. नवसपूर्ती झाली की ते बिरोबाला नवसाचा कठा आणतात.
डोक्यावर पेटलेले कठे... त्यातून उसळणा-या तप्त ज्वाला... फेरीगणिक ओतले जाणारे तेल... मंदिरात अविरतपणे सुरु असलेला घंटानाद... दैवताच्या नावाचा जयघोष... संबळ, धोदाणा-पिपाणी, डफ, तशा अशा पारंपरिक वाद्यांचा सुरु असलेला गजर शिवारभर दुमदुमतो आहे... 'हाईऽऽऽ हाईऽऽऽ' असं लयबद्ध चीत्कार भक्तगणांच्या मुखातून बाहेर पडतो आहे... उघड्या अंगावर तापलेले तेल ओघळतेय... मात्र फे-यांमागून फे-या सुरूच आहेत... निशाणाच्या काठीमागून मिरवणूक चाललेली... नऊ-साडेनऊला सुरु झालेली मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते... कोठून कोठून आलेले यात्रेकरू हा अनोखा नजारा श्वास रोखून, विस्मयचकित मुद्रेनं पाहातच राहातात. आदिवासी संस्कृतीचा हा चित्तवेधक आविष्कार पाहताना सर्वच थक्क होवून जातात...
आता कठ्यांची मिरवणूक संपलेली असते. आपण माघारी फिरतो. परतीच्या वाटेवरून चालू लागतो. तेव्हादेखील आपल्या डोळ्यांसमोर नाचत रहातात काळोखाच्या पार्श्वभूमीवर पेटलेले हलते पलिते...तो वाद्यांचा नाद कानात घुमत राहतो... काहीतरी 'निराळे' पाहायला मिळाल्याची साक्ष आपण स्वतःलाच देत असतो. अशी ही कठ्याची यात्रा एकदा तरी पाहावी. या यात्रेचे नियोजन सरपंच ,दतात्रय भोईर , काशिनाथ साबळे व साकीरवाडी  , कौठ्वाडी ग्रामस्थ करतात यावर्षी ५० कठे पेटली तर राजूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील पवार , राहुल रुपवते यांनी चोख बंदोबस्त ठेवला सुमारे ५० हजार भाविक या यात्रेस उपस्थित होते . सोबत फोटो

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...